‘गायन, वादन, नृत्य आणि नाट्य या कलांतून ईश्वरप्राप्तीसाठी साधना’, याचे प्रास्ताविक विवेचन !
४ सप्टेंबर २०२५ या दिवसापासून प्रत्येक गुरुवारी चालू झालेल्या लेखमालेत आपण ‘गायन, वादन, नृत्य आणि नाट्य’, या कलांची माहिती घेत आहोत. या कलांच्या सादरीकरणाचा उद्देश काळाच्या प्रभावामुळे पालटत असला, तरी ‘कलेकडे केवळ कला म्हणून न पहाता कलेतून आध्यात्मिक उन्नती कशी साधावी’, हे येथे पाहूया. लेखांक १९)
‘आनंदप्राप्ती’ हे प्रत्येक मनुष्याच्या जीवनाचे ध्येय आहे. त्यासाठी मनुष्य प्रतिदिन झटत असतो; परंतु आजकालच्या धकाधकीच्या जीवनात प्रत्येक जण कोणत्या ना कोणत्या चढ-उतारातून जात असतो. जीवनातील विविध परिस्थितींमध्ये व्यक्तीचे ‘निराशा, ताण घेणे, काळजी वाटणे, राग, अपेक्षा करणे’, यांसारखे स्वभावदोष उफाळून येतात. त्याचा व्यक्तीच्या जीवनावर नकारात्मक परिणाम होतो. त्यामुळे व्यक्ती दुःखी होऊन आनंदापासून दूर जाते.
यावर उपाय म्हणून सध्या अनेक ठिकाणी ‘व्यक्तीमत्त्व विकास (पर्सनॅलिटी डेव्हेलपमेंट)’ अथवा ‘तणाव व्यवस्थापन (स्ट्रेस मॅनेजमेंट)’ शिकवले जाते. त्यामुळे व्यक्तीला तात्कालिक सुख मिळते अथवा कठीण प्रसंगांतून बाहेर पडता येते; परंतु जीवनात शाश्वत आनंद मिळवण्यासाठी ‘स्वभावदोष-निर्मूलन अन् गुण-संवर्धन प्रक्रिया’ अधिक लाभदायक ठरू शकते. या प्रक्रियेचे जनक आहेत, सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले ! त्यांनी निर्माण केलेल्या गुरुकृपायोगानुसार अष्टांग साधनेची आठ अंगे पुढीलप्रमाणे आहेत – १. स्वभावदोष-निर्मूलन आणि गुण-संवर्धन, २. अहं-निर्मूलन, ३. नामजप, ४. भावजागृतीसाठी करायचे प्रयत्न, ५. सत्संग, ६. सत्सेवा, ७. सत्साठी त्याग आणि ८. प्रीती (इतरांविषयी निरपेक्ष प्रेम). या पैलूंतील ‘स्वभावदोष-निर्मूलन आणि गुण-संवर्धन प्रक्रिया’, हा एक महत्त्वाचा पैलू आहे. स्वभावदोष-निर्मूलन प्रक्रियेमुळे कला-उपासकाच्या साधनेचा पाया सिद्ध होतो. आज आपण ‘कला-साधनेमध्ये ‘स्वभावदोष-निर्मूलन आणि गुण-संवर्धन’ यांसाठी कलाकाराने कशा प्रकारे प्रयत्न करावेत ?’, हे जाणून घेणार आहोत. (भाग २)

१. ‘स्वभाव’ आणि ‘स्वभावदोष’ म्हणजे काय ?
१ अ. व्यक्तीच्या अंतर्मनातील संस्कारांप्रमाणे तिचा स्वभाव बनत असणे : ‘प्रत्येक व्यक्तीचा एक स्वभाव असतो. त्यामुळे त्या व्यक्तीचे ‘व्यक्तीमत्त्व’ सिद्ध होते. स्वभावामध्ये व्यक्तीचे गुण आणि दोष अंतर्भूत असतात. जेव्हा व्यक्तीच्या कृतीतून तिच्या अंतर्मनातील संस्कार प्रगट होतात, तेव्हा त्याला त्या व्यक्तीचा ‘स्वभाव’, असे म्हणतात, उदा. एखादा इतरांशी सहजतेने बोलू शकत असेल आणि चांगल्या प्रकारे संवाद साधत असेल, तर ‘त्याचा स्वभाव बोलका अन् मनमिळाऊ आहे’, असे आपण म्हणतो. थोडक्यात, स्वभाव म्हणजे व्यक्तीची प्रकृती. प्रत्येक व्यक्ती ही भिन्न स्वभावाची असते. व्यक्तीच्या अंतर्मनातील संस्कार जसे असतात, तशी त्या व्यक्तीची वृत्ती, म्हणजे स्वभाव बनतो.
१ आ. व्यक्तीच्या स्वभावामुळे तिची स्वतःची किंवा इतरांची हानी होत असल्यास तो तिचा स्वभावदोष असणे : आध्यात्मिक परिभाषेत स्वभावदोष म्हणजे ‘षड्रिपू’ ! सर्वसाधारणपणे व्यक्तीच्या चांगल्या संस्कारांना ‘गुण’ आणि वाईट सवयींना ‘स्वभावदोष’, असे म्हटले जाते. एखाद्याच्या स्वभावामुळे त्या व्यक्तीची स्वतःची किंवा इतरांची हानी होत असेल, तर तो त्या व्यक्तीचा स्वभावदोष झाला, उदा. एखाद्या व्यक्तीमध्ये ‘वेळेचे पालन न करणे’, हा स्वभावदोष असेल, तर त्याचा परिणाम त्या व्यक्तीवर तर होतोच; परंतु त्याचा परिणाम समष्टीवरही (अनेक जणांवरही) होतो.
‘काम, क्रोध, लोभ, मोह, मद आणि मत्सर’, हे षड्रिपू प्रत्येक स्वभावदोषाच्या मुळाशी कार्यरत असतात. प्रत्येक व्यक्तीमध्ये हे षड्रिपू अल्प-अधिक प्रमाणात कार्यरत असतात.
२. मनुष्याच्या स्वभावदोषांमुळे त्याची शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक स्तरावर होणारी हानी !

२ अ. शारीरिक : ‘मनुष्याचे स्वभावदोष हे त्याच्या शारीरिक आजारांना कारणीभूत ठरतात’, असे वैद्यकीयदृष्ट्या प्रमाणित झाले आहे, उदा. अतीकाळजी, राग आणि नकारात्मक विचार यांमुळे आम्लपित्ताचा त्रास, तसेच ताणामुळे उच्च रक्तदाब, मधुमेह इत्यादींसारखे शारीरिक आजार उद्भवतात.
२ आ. मानसिक : मनुष्याच्या ‘मनाची एकाग्रता अल्प असणे, तणाव, निराशा, आत्मविश्वासाचा अभाव’ इत्यादी स्वभावदोषांमुळे मानसिक आजार उद्भवतात. स्वभावदोषांमुळे उद्भवणार्या मानसिक त्रासांतून मुक्त होण्यासाठी काही जण व्यसनांकडे वळतात. व्यसनांमुळे समस्या न सुटता त्या वाढतात.
२ इ. आध्यात्मिक : साधना करण्यासाठीही कला-उपासक आणि साधक यांच्यात स्वभावदोष अल्प असणे आवश्यक आहे. स्वभावदोष अधिक असल्यामुळे कलाकाराच्या साधनेत अडथळे येऊन त्याच्या आध्यात्मिक प्रगतीचा वेग न्यून होतो. त्यामुळे साधनेत पुढे जाण्यासाठीही साधकाच्या स्वभावदोष-निर्मूलनाचा पाया सिद्ध होणे अत्यावश्यक आहे.
३. स्वभावदोषांमुळे कलाकाराची होणारी हानी
कलाकाराच्या स्वभावदोषांमुळे तो कलेमध्ये एकाग्रता साधण्यापासून आणि कलेतील ‘आनंद’ घेण्यापासून वंचित राहू शकतो. त्याची काही उदाहरणे पुढे दिली आहेत.
३ अ. कलेमध्ये अपयश आल्यास निराशा येऊन मन अस्थिर होणे : कलाकाराला अथवा कला शिकणार्याला त्याच्या कलेमध्ये अपयश आले अथवा कलाक्षेत्रात अपेक्षित अशी प्रगती करता आली नाही, तर त्याला निराशा येऊ शकते. यामागे त्याचे ‘निराशा आणि नकारात्मक विचार करणे’, हे स्वभावदोष कार्यरत असतात. त्यामुळे अशा प्रसंगांत त्याला स्थिर रहाता येत नाही.
३ आ. प्रतिकूल परिस्थितीच्या वेळी अस्थिरता आल्याने एकाग्रता न्यून होणे : एखाद्या कार्यक्रमात ध्वनीक्षेपण यंत्रणा (साउंड सिस्टम) व्यवस्थित नसली किंवा साथ-संगत करणारे कलाकार वेळेत आले नाहीत, तर कलाकाराला राग येतो, त्याची चिडचिड होते, तसेच त्याच्या मनाची अस्थिरता वाढते. येथे ‘राग आणि चिडचिड करणे’, हे स्वभावदोष कार्यरत होतात. त्यामुळे प्रतिकूल परिस्थितीत कलाकार स्थिर राहू शकत नाही. परिणामी त्याची कलेतील एकाग्रता न्यून होऊ शकते. कलाकाराचा नृत्याचा कार्यक्रम अथवा गायनाची मैफील असतांना अकस्मात् त्याची प्रकृती बिघडली, तर त्याला ‘आता सादरीकरण कसे करावे ?’, याची काळजी वाटते. येथे ‘काळजी करणे’, हा स्वभावदोष कार्यरत होतो.
बर्याचदा कलाकारांना वरीलप्रमाणे वेगवेगळ्या परिस्थितींतून जावे लागते. कलाकारांना समस्या कळते; पण ‘समस्येवर मात कशी करायची ?’, हे त्यांना ठाऊक नसते.
आपल्यातील स्वभावदोष हे याच जन्मातील नसून जन्मोजन्मीच्या संस्कारांमुळे ते आपल्यात असतात. ‘वेगवेगळ्या परिस्थितींमध्ये आपण स्थिर राहून प्रसंग कसा हाताळायचा ?’, हे आपल्याला ‘स्वभावदोष-निर्मूलन प्रक्रिया’ शिकवते. ही प्रक्रिया सहज आणि सुलभ आहे. ‘आपल्या चित्तावर असलेले अयोग्य संस्कार पुसून योग्य कृतीचा संस्कार मनावर करणे’, म्हणजेच ‘स्वभावदोष-निर्मूलन प्रक्रिया’ होय.
लेखाच्या पुढच्या भागात आपण ‘स्वभावदोष-निर्मूलन प्रक्रिया कशी राबवावी ? आणि तिचे कलाकाराला होणारे लाभ’, तसेच ‘कलाकारामध्ये असलेल्या गुणांचा लाभ तो कला-साधनेसाठी कसा करू शकतो ?’, याचे विवेचन जाणून घेणार आहोत.’ (क्रमशः)
संग्राहक : कु. अपाला औंधकर (भरतनाट्यम् विशारद, आध्यात्मिक पातळी ६० टक्के, वय १९ वर्षे), महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, फोंडा, गोवा. (२१.४.२०२६)
याच्या नंतरचा लेख वाचण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/1037395.html
साधकांना सूचना आणि हितचिंतकांना विनंती
या लेखमालिकेविषयी कुणाला शंका किंवा प्रश्न असल्यास पुढील क्रमांकावर संपर्क साधावा. – संगीत विभाग, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा.
संपर्कासाठी पत्ता
श्री. मनोज सहस्रबुद्धे
संपर्क क्रमांक : ८७९३६ ७८१७८
ई-मेल : [email protected]
लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणात पीडित धर्मांध मुलांना प्रत्येकी १० लाख रुपये हानीभरपाई देण्याचा मद्रास उच्च न्यायालयाचा आदेश !
‘श्री समर्थ रामदास – एक अभ्यास’ ग्रंथ : अभ्यासपूर्ण मननीय, चिंतनीय आणि संदर्भ ग्रंथ
सिनेमा आणि स्वतःची स्वप्ने : यशाविषयी सिनेमा काय प्रकट करतो ?
श्री शिवराज्याभिषेक आणि खोटे कथानक (नॅरेटिव्ह) !
‘सनातन क्रांती’ची नांदी !
छत्रपती संभाजी महाराजांचे ईश्वरनिष्ठ मन !