महाराष्ट्र राज्यात गोवंशियांचे संरक्षण, संवर्धन आणि गोहत्याच्या विरोधात कठोर कारवाई करा !

  • ‘गो सन्मान आवाहन अभियान’

  • दापोली आणि राजापूर येथे तहसीलदार यांच्याकडे गोमाताप्रेमींकडून निवेदनाद्वारे मागणी

दापोली येथे तहसीलदार श्रीमती अर्चना बोंबे घोलप यांना निवेदन देतांना गोमाताप्रेमी

दापोली, २७ एप्रिल (वार्ता.) – देशभरात गोसंवर्धन आणि गोसंरक्षणासाठी जनजागृती करण्याच्या उद्देशाने चालू करण्यात आलेल्या गो सन्मान आवाहन अभियानाच्या अंतर्गत दापोली आणि राजापूर येथे तहसीलदारांना सविस्तर निवेदन देण्यात आले आहे. ‘गो सन्मान आवाहन अभियाना’च्या अंतर्गत महाराष्ट्र राज्यात गोवंशियांचे संरक्षण, संवर्धन आणि गोहत्यच्या विरोधात कठोर कारवाई करा !’, अशी मागणी या निवेदनाद्वारे केली आहे. हे निवेदन राष्ट्रपती, पंतप्रधान, राज्यपाल, तसेच राज्याचे मुख्यमंत्री यांना देण्यात आले.

या निवेदनात म्हटले आहे की,

१. भारतीय संस्कृतीतील गोमातेचे महत्त्व अधोरेखित करत केंद्रशासनाने ठोस धोरणात्मक पावले उचलावीत, अशी मागणी करण्यात आली आहे. भारतीय संस्कृतीत गोमाता ही श्रद्धेचे आणि जीवनपद्धतीचे केंद्र मानली जाते. ग्रामीण अर्थव्यवस्था, शेती आणि पर्यावरणीय संतुलन यामध्ये गायींचे महत्त्व अनन्यसाधारण असल्याचे सांगण्यात आले आहे.

२. सध्याच्या काळात भूजल, प्रदूषण, कत्तल आणि अन्य कारणांमुळे गोवंशियांवर संकट निर्माण होत असून त्यांचे संरक्षण करण्यासाठी एकसमान राष्ट्रीय धोरणाची आवश्यकता आहे. तसेच भारतीय संविधानातील कलम ४८ नुसार राज्याने गोवंशियांच्या संरक्षणासाठी आवश्यक पावले उचलावीत.

राजापूर येथे तहसीलदार विकास गमरे यांना निवेदन देतांना हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे कार्यकर्ते आणि गोमाताप्रेमी

३. या पार्श्वभूमीवर देशभरात गोसंवर्धनासाठी प्रभावी उपाययोजना राबवणे, गोवंश कत्तल प्रतिबंधासाठी कठोर कार्यवाही करणे आणि गोसंरक्षणाला कायदेशीर बळ देणे, या प्रमुख मागण्या करण्यात आल्या आहेत. गोवंशाला कायदेशीर व्यक्ती दर्जा देण्याचा विचार करावा, तसेच गोसंवर्धन आणि संरक्षणासाठी स्वतंत्र केंद्रीय गोवंश मंत्रालय स्थापन करण्याची मागणीही करण्यात आली आहे. यामुळे देशभरात एकसमान धोरण राबवणे सुलभ होईल आणि गोवंशियांचे संरक्षण अधिक प्रभावीपणे करता येईल.

४. या अभियानामध्ये संत समाज, गोभक्त आणि विविध सामाजिक संघटनांचा सहभाग असल्याचे नमूद करण्यात आले आहे. देशातील सर्व नागरिकांनी या अभियानात सहभागी होऊन गोसंरक्षणाच्या कार्याला पाठिंबा द्यावा.

दापोली येथे हे निवेदन देते वेळी मिलिंद शेठ, सचिन गायकवाड, प्रमोद पांगारकर, राकेश भांबिड, सुनंदन भावे, रोहन केळसकर, प्रदीप शेठ, सुरेश रेवाळे, संतोष गवळी, ओमकार वेल्हाळ, सुजल जयस्वाल, आदी गोरक्षक उपस्थित होते.

राजापूर येथे विश्व हिंदु परिषदेच्या सौ. माधवी हर्डीकर, हिंदु जनजागृती समितीचे विनोद गादीकर, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे राजेंद्र कुशे, हिंदवी स्वराज्य प्रतिष्ठानचे महेश  मयेकर, भाजपचे मोहन घुमे, नगरसेविका सौ. नार्वेकर, नगरसेवक दिलीप अमरे, डॉ. पाध्ये, रघुवीर बापट यांच्यासह अनेक गोमाताप्रेमी हिंदू उपस्थित होते.