प्रभु श्रीरामासमान सर्वार्थांनी आदर्श असणारा श्रीभूदेवीचा अवतार – सीतामाता !

आज वैशाख शुक्ल नवमी (२५.४.२०२६) या दिवशी ‘सीता नवमी’ आहे. त्या निमित्ताने…

वैशाख शुक्ल नवमी (२५.४.२०२६) या दिवशी ‘सीता नवमी’ आहे. हा सीतेचा प्रगट दिन (जन्मदिवस) मानला जातो. त्यानिमित्त सनातनच्या ज्ञानप्राप्तकर्त्या साधिका सुश्री मधुरा भोसले (आध्यात्मिक पातळी ६५ टक्के) यांना सीतामातेविषयी मिळालेले सूक्ष्मातील ज्ञान पुढे दिले आहे.

(भाग १)

१. भूदेवीची उत्पत्ती आणि ‘पृथ्वी’ची निर्मिती

‘सत्ययुगात जेव्हा नारायणाच्या डाव्या दंडातून श्री महालक्ष्मीदेवी प्रगट झाली, तेव्हा श्री महालक्ष्मीतत्त्वाला सगुण रूप प्राप्त झाले. श्रीविष्णु भक्तवत्सल असल्यामुळे तो भक्तांची सतत काळजी घेत असतो. भगवंताचे हे भक्तवत्सलरूप पाहून श्री महालक्ष्मीच्या मनात भक्तांप्रतीचा करुणाभाव आणि वात्सल्यभाव जागृत झाला. तेव्हा तिच्यातील पृथ्वीतत्त्वापासून ‘भूदेवी’ची उत्पत्ती झाली. ब्रह्मदेवाने याच भूदेवीपासून नंतर ‘पृथ्वी’ची, म्हणजे ‘भूलोका’ची निर्मिती केली. अशा या भूदेवीच्या, म्हणजे धरणीमातेच्या स्वरूपात श्री महालक्ष्मी सतत सगुण रूपात वास करते आणि पृथ्वीवरील समस्त जिवांचा मातृत्वभावाने प्रतिपाळ (सांभाळ) करते. श्री महालक्ष्मीदेवीचे श्रीरूप हे वैकुंठात शेषशय्येवर विराजमान असणार्‍या श्रीमन्नारायणाच्या चरणांशी कार्यरत असते.

२. श्रीमन्नारायणाने विविध अवतार घेऊन वेळोवेळी भूदेवीचे रक्षण करणे

असुरांना वैकुंठात प्रवेश करता येत नाही. त्यामुळे श्रीविष्णूशी लढण्यासाठी ते भूदेवीला त्रास देतात. तेव्हा भूदेवीची दुर्दशा पाहून वैकुंठातील श्रीमन्नारायण विविध अवतार घेऊन पृथ्वीवर अवतरित होतो आणि असुरांचा नाश करून पृथ्वीरूपी भूदेवीचे अन् विविध भक्तांचे रक्षण करतात, उदा. सत्ययुगात जेव्हा हिरण्याक्षाने भूदेवीला पाताळात नेऊन बंदी केले, तेव्हा ब्रह्मदेवाच्या नासिकेतून श्रीविष्णूच्या ‘वराह’ अवताराची निर्मिती झाली. या वराह अवताराने पाताळात जाऊन हिरण्याक्षाशी घनघोर युद्ध केले आणि त्याचा नाश केला अन् भूदेवीला सुळ्यांवर उचलून पाताळातून बाहेर काढून शेषनागाच्या फण्यावर स्थापित केले.

३. प्रत्येक युगातील श्रीविष्णूच्या अवतारांच्या वेळी शक्तीस्वरूपिणी भूदेवी आणि श्रीदेवी यांचे झालेले अवतार ! 

(चित्रावर क्लिक करा)

४. भूदेवी आणि श्रीदेवी यांच्यातील भेद !

(चित्रावर क्लिक करा)

५. सीतामातेची विविध नावे आणि त्यांचा अर्थ !

सुश्री (कु.) मधुरा भोसले

५ अ. सीता : नांगराच्या अग्र, म्हणजे पुढील भागास ‘सीत’ म्हणतात. जेव्हा जनकराजा शेतामध्ये सोन्याचा नांगर चालवत होता, तेव्हा नांगराच्या अग्रभागाला एक खडक लागला. तो खडक बाजूला केल्यावर जनकराजाला भूमीमध्ये एक पेटी मिळाली. ती पेटी उघडल्यावर तिच्यात एक नवजात बालिका होती. या बालिकेचा शोध नांगराच्या अग्रभागामुळे झाल्यामुळे त्या नवजात बालिकेला ‘सीता’, या नावाने संबोधले गेले.

५ आ. जनकनंदिनी किंवा जनकपुत्री : सीता ही राजा जनकाची सुपुत्री असल्यामुळे तिचे नाव ‘जनकनंदिनी किंवा जनकपुत्री’ होते.

५ इ. मैथिली : सीता ही मिथिला राज्याची राजकुमारी असल्यामुळे तिचे नाव ‘मैथिली’ होते.

५ ई. रमा : सीता प्रभु श्रीरामाची भार्या होती. ‘रमेश’ हेसुद्धा श्रीरामाचे एक नाव आहे. रमेशाची पत्नी म्हणून सीतामातेला ‘रमा’, हे नाव प्राप्त झाले आणि प्रभु श्रीरामाला ‘रमापति’, हे संबोधन प्राप्त झाले.

५ उ. जानकी : जनकाची कन्या म्हणून सीतेला ‘जानकी’, हे नाव प्राप्त झाले.

५ ऊ. भूमिजा : भूमीतून उत्पन्न झाल्यामुळे सीतामातेला ‘भूमिजा’, हे नाव प्राप्त झाले.

५ ए. भूमीनंदिनी किंवा भूमीकन्या किंवा भूमीपुत्री : माता सीता ही भूमीदेवीची सुपुत्री असल्यामुळे तिला ‘भूमीनंदिनी, भूमीकन्या किंवा भूमीपुत्री’, असेही संबोधले जाते.

५ ऐ. रामसंगिनी : सीतेला प्रभु श्रीरामाचा संग नित्य लाभतो; म्हणून तिला ‘रामसंगिनी’, असे म्हटले जाते.

५ ओ. वैदेही : जनक राजाच्या राज्याचे नाव ‘विदेह’, असे होते. सीता ही विदेह राज्याची राजकुमारी होती; म्हणून तिला ‘वैदेही’, असे संबोधले जाते. आध्यात्मिकदृष्ट्या जनक राजा परम ज्ञानी असल्यामुळे तो देहातीत अवस्थेत होता. त्याची पुत्री सीता हीसुद्धा देहबुद्धीच्या पलीकडील देहातीत असणारी ‘विदेही’ अवस्था अनुभवत होती. त्यामुळे तिला ‘वैदेही’, असे संबोधले जाते.’

(क्रमशः)

– सुश्री मधुरा भोसले (सूक्ष्मातील ज्ञानप्राप्तकर्त्या साधिका, आध्यात्मिक पातळी ६५ टक्के), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१२.४.२०२६)

याच्या नंतरचा लेख वाचण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/1034086.html

  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • सूक्ष्मातील दिसणे, ऐकू येणे इत्यादी (पंच सूक्ष्मज्ञानेंद्रियांनी ज्ञानप्राप्ती होणे) : काही साधकांची अंतर्दृष्टी जागृत होते, म्हणजे त्यांना डोळ्यांना न दिसणारे दिसते, तर काही जणांना सूक्ष्मातील नाद किंवा शब्द ऐकू येतात.
  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या काही वेळा अनिष्ट शक्तींमुळे किंवा ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांना / संतांना / धर्मप्रेमींना आलेल्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सर्वांनाच येतील, असे नाही. - संपादक
  • सूक्ष्म-ज्ञानाविषयीचा प्रयोग : काही साधक सूक्ष्मातील कळण्याच्या क्षमतेचा अभ्यास म्हणून ‘एखाद्या वस्तूविषयी मन आणि बुद्धी यांच्या पलीकडे काय जाणवते’, याची चाचणी करतात. याला ‘सूक्ष्म-ज्ञानाविषयीचा प्रयोग’ म्हणतात.