लग्नानंतर स्त्रीच्या आयुष्यात शारीरिक, मानसिक आणि सामाजिक, असे अनेक पालट घडून येतात. नवीन वातावरण, दिनचर्येतील पालट, आहारातील अनियमितता, लैंगिक जीवनाचा प्रारंभ, तसेच मानसिक ताण यांचा थेट परिणाम स्त्रीच्या प्रजनन आरोग्यावर होऊ शकतो. त्यामुळे काही स्त्रियांमध्ये लग्नानंतर पाळी येण्यामध्ये होणारे पालट, योनीसंबंधित तक्रारी, पांढर्या पाण्याचा त्रास, संभोगाच्या वेळी वेदना किंवा गर्भधारणेत अडचणी अशा स्त्रीरोग समस्या दिसून येतात. आयुर्वेद या समस्यांकडे केवळ स्थानिक विकार म्हणून न पहाता संपूर्ण शरिरातील दोष संतुलनाच्या दृष्टीने पहातो.
(लेखांक ११)
लेखांक १० वाचण्यासाठी क्लिक करा → https://sanatanprabhat.org/marathi/1029608.html
१. समस्या म्हणजे काय ?
लग्नानंतर होणार्या स्त्रीरोग समस्या, म्हणजे स्त्रीच्या प्रजनन संस्थेशी संबंधित अशा तक्रारी, ज्या नवीन जीवनशैली, ‘हार्मोनल’ (संप्रेरके) पालट किंवा मानसिक कारणांमुळे उद्भवतात. आयुर्वेदात या विकारांचा संबंध मुख्यतः आर्तव वह स्रोतस, अपान वात आणि कफ-पित्त दोष यांच्याशी जोडला जातो.
२. प्रमुख लक्षणे
अ. मासिक पाळी अनियमित होणे किंवा उशिरा येणे
आ. पाळीच्या कालावधीत वेदना किंवा न्यूनाधिक रक्तस्राव
इ. पांढर्या पाण्याचा त्रास (श्वेतप्रदर)
ई. योनीत खाज, जळजळ किंवा दुर्गंधी
उ. संभोगाच्या वेळी वेदना
ऊ. पाठदुखी, कंबरदुखी आणि थकवा
ए. गर्भधारणेत अडचणी
ऐ. मानसिक चिडचिड अन् ताण
३. आयुर्वेदानुसार कारणमीमांसा

आयुर्वेदानुसार या समस्यांची मुख्य कारणे खालीलप्रमाणे आहेत –
अ. अपान वाताचे विकृतीकरण : प्रजनन कार्यावर परिणाम
आ. कफदोष वाढ : स्राव, सूज आणि अवरोध निर्माण करतो
इ. पित्तदोष वाढ : जळजळ, दाह अन् संसर्ग निर्माण करतो
ई. आर्तववह स्रोतस दुष्टी : पाळी आणि गर्भधारणा यांवर परिणाम
उ. मंद अग्नी आणि आम निर्मिती : शरिरात विषद्रव्य साठते
ऊ. मानसिक ताण अन् अस्थिरता : हार्मोनल संतुलन बिघडते.
४. चिकित्सेचा विचार करतांना काय पहावे ?
आयुर्वेदाचे उपचार करतांना केवळ लक्षणांवर उपचार न करता खालील गोष्टींचा सखोल विचार केला जातो –
अ. रुग्णाची प्रकृती (वात-पित्त-कफ)
आ. मासिक पाळीचा इतिहास
इ. पचनशक्ती (अग्नी) आणि आम स्थिती
ई. योनीसंबंधित तक्रारींचा कालावधी
उ. मानसिक स्थिती आणि ताणतणाव
ऊ. लैंगिक जीवनातील पालट
उपचाराचा मुख्य उद्देश, म्हणजे दोष संतुलन, स्रोतस शुद्धी आणि अपान वात नियमन.
५. आयुर्वेदानुसार औषधी उपचार
(वैद्यकीय सल्ल्यानुसार घेणे)
अ. लोध्र : स्राव न्यून करून योनी आरोग्य सुधारते
आ. अशोक : पाळी नियमित करते
इ. शतावरी : हार्मोनल संतुलन आणि गर्भाशय पोषण
ई. त्रिफळा : स्रोतस शुद्धी आणि पचन सुधारणा
ऊ. मंजिष्ठा : रक्तशुद्धी आणि दाह न्यून करते
आवश्यकतेनुसार योनी धावन, योनी पिचु, बस्ती यांसारखे उपचार उपयोगी ठरतात.
६. आयुर्वेदाचे घरगुती उपाय
कोमट पाण्याने नियमित बाह्य स्वच्छता ठेवावी. सुगंधी किंवा ‘केमिकल’युक्त (रसायनयुक्त) ‘व्हजायनल वॉश’ (योनीची स्वच्छता) टाळावे. सुती आणि सैल कपडे वापरावेत. त्रिफळा किंवा नीम काढ्याने बाह्य स्वच्छता (वैद्यांच्या सल्ल्याने), पुरेसे पाणी पिणे आणि शरीर ‘हायड्रेट’ ठेवणे (शरिरातील पाण्याची पातळी योग्य ठेवणे), तसेच ताण न्यून करण्यासाठी योग आणि प्राणायाम करावा.
७. आहार आणि दिनचर्या
अ. काय घ्यावे ? : फळभाज्या, ऋतूंनुसार फळे, तूप, हलका आणि पचायला सोपा आहार
आ. काय टाळावे ? : अधिक तिखट, आंबट आणि तेलकट पदार्थ, ‘फास्ट फूड’ (पिझ्झा, बर्गर) अन् प्रक्रिया केलेले पदार्थ, दिवसा झोप आणि अनियमित दिनचर्या
८. निष्कर्ष
लग्नानंतर होणार्या स्त्रीरोग समस्या या सामान्य असल्या, तरी त्याकडे दुर्लक्ष करणे धोकादायक ठरू शकते. आयुर्वेद या समस्यांवर नैसर्गिक आणि मूळ कारणांवर आधारित उपचारपद्धत सुचवतो. योग्य आहार, योग्य व्यायाम, संतुलित जीवनशैली, मानसिक स्थैर्य आणि वैद्यकीय मार्गदर्शन यांमुळे स्त्रीचे प्रजनन आरोग्य दीर्घकाळ निरोगी राहू शकते.
– वैद्या (सौ.) सारिका नीलेश लोंढे, ‘निर्विकार आयुर्वेद हॉस्पिटल’, भोसरी, पुणे.
लेखांक १२ वाचण्यासाठी क्लिक करा → https://sanatanprabhat.org/marathi/1034643.html

इगतपुरीतील धरणाजवळ पर्यटकांवर आक्रमण करणार्या ९ स्थानिक गुंडांना अटक !
शांत, संयमी, दूरदर्शी नेतृत्व, विनम्रता आणि सेवाभाव यांचा आदर्श असलेल्या आदरणीय दीदी !
डॉक्टरांना (आधुनिक वैद्यांना) मारून कुणाचा जीव वाचणार ?
हिंदूंना शत्रूबोध नाही !
भारतातील ‘डेटा सेंटर्स’मुळे निर्माण होणारे जलसंकट !
न्यायालयातील भाषेचा अडथळा : ‘लॅटिन’ संज्ञांमुळे सामान्य माणूस भारतीय कायद्यापासून दूर जात आहे का ?