गर्भधारणा न होण्याची कारणे आणि आयुर्वेद : एक समग्र दृष्टीकोन

आजच्या धावपळीच्या जीवनशैलीत अनेक दांपत्यांना गर्भधारणा होण्यात अडचणी येतांना दिसतात. ही समस्या केवळ शारीरिक नसून मानसिक, आहारविहार आणि जीवनशैली यांच्याशीही संबंधित आहे. आयुर्वेद या समस्येकडे अत्यंत सखोल आणि समग्र दृष्टीने पहातो. ‘गर्भधारणा न होणे, म्हणजे वंध्यत्व’, असे सरळ न म्हणता ‘शरिरातील काही असंतुलनामुळे त्यात अडथळे निर्माण होतात’, असे आयुर्वेद मानतो.

(लेखांक १२)

लेखांक ११ वाचण्यासाठी क्लिक करा → https://sanatanprabhat.org/marathi/1032141.html

१. गर्भधारणा न होणे म्हणजे काय ?

‘विवाहानंतर नियमित प्रयत्न करूनही योग्य कालावधीत गर्भधारणा न होणे, ही अवस्था गर्भधारणा न होणे’, असे म्हणतात. आयुर्वेदानुसार गर्भधारणेसाठी ऋतू (योग्य काळ), क्षेत्र (गर्भाशय), बीज (अंड आणि शुक्र) अन् अंबु (पोषण) हे ४ घटक अत्यावश्यक मानले आहेत. यांपैकी कोणातही दोष निर्माण झाल्यास गर्भधारणा होण्यात अडचणी येतात.

वैद्या (सौ.) सारिका नीलेश लोंढे

२. प्रमुख लक्षणे

मासिक पाळी अनियमित असणे, पाळी उशिरा येणे किंवा न्यूनाधिक रक्तस्राव, पांढर्‍या पाण्याचा त्रास, वजन वाढ किंवा घट, मुरुम आणि केस गळणे (‘हार्मोनल’ (संप्रेरक) लक्षणे), थकवा अन् अशक्तपणा, मानसिक ताण आणि चिंता, अनेक प्रयत्नांनंतरही गर्भधारणा न होणे

३. आयुर्वेदानुसार कारणमीमांसा

आयुर्वेदानुसार गर्भधारणा न होण्यामागे खालील कारणे आहेत –

अ. अपान वाताचे विकृतीकरण : गर्भधारणेच्या प्रक्रियेत अडथळा

आ. आर्तव वह स्रोतस दुष्टी : अंडोत्सर्जन आणि पाळीवर परिणाम

इ. कफदोष वाढ : अवरोध निर्माण करून ‘पी.सी.ओ.एस्.’ (पॉलीसिस्टिक ओवॅरीयन सिंड्रोम)सारख्या समस्या

ई. पित्तदोष वाढ : गर्भाशयात दाह आणि असंतुलन

उ. मंद अग्नी अन् आम निर्मिती : शरिरातील पोषण न्यून होते

ऊ. मानसिक ताण : हार्मोनल संतुलन बिघडते

४. आयुर्वेदाच्या चिकित्सेत विचार करतांना काय पहावे ?

आयुर्वेदात ‘केवळ गर्भधारणा होत नाही’, या तक्रारीवर उपचार न करता संपूर्ण स्थितीचा विचार केला जातो. यामध्ये स्त्रीची प्रकृती (वात, पित्त, कफ), मासिक पाळीचा संपूर्ण इतिहास, पचनशक्ती (अग्नी) आणि आम स्थिती, वजन अन् हार्मोनल लक्षणे, मानसिक स्थिती (ताण अन् चिंता), आवश्यकतेनुसार पतीचीही पडताळणी केली जाते.

५. उपचाराचा मुख्य उद्देश

दोष संतुलन + गर्भाशय शुद्धी + बीज गुणवृद्धी + मानसिक संतुलन

६. आयुर्वेदानुसार औषधी उपचार (वैद्यकीय सल्ल्यानुसार)

अ. शतावरी : गर्भाशय पोषण आणि हार्मोनल संतुलन

आ. अशोक : पाळी नियमित करण्यासाठी

इ. लोध्र : स्राव अन् सूज न्यून करते

ई. गुडुची (गिलोय) : रोगप्रतिकारशक्ती वाढवते

उ. कांचनार गुग्गुळ : ‘पी.सी.ओ.एस्.’ / गाठींमध्ये उपयोगी

आवश्यकतेनुसार वमन, बस्ती, विरेचन आणि उत्तर बस्ती यांसारखे पंचकर्म उपचार उपयुक्त ठरतात.

७. घरगुती आयुर्वेदाचे उपाय

अ. सकाळी कोमट पाणी पिणे

आ. ताजे, गरम आणि पचायला सोपे अन्न सेवन

इ. प्रतिदिन ३० मिनिटे चालणे किंवा योग

ई. ताण न्यून करण्यासाठी ध्यान आणि प्राणायाम

उ. पुरेशी झोप (७ ते ८ घंटे)

ऊ. अतिव्यायाम, उपाशी रहाणे किंवा स्वतःहून औषधे घेणे टाळावे.

८. आहारविषयक मार्गदर्शन

अ. काय घ्यावे ? : दूध, तूप, सत्त्वयुक्त आहार, फळ भाज्या, फळे, डाळी आणि संपूर्ण धान्य

आ. काय टाळावे ? : जंक फूड (पिझ्झा, बर्गर), प्रक्रिया केलेले पदार्थ, अधिक थंड, तिखट आणि आंबट पदार्थ, साखर अन् बेकरी पदार्थ

९. व्यायाम

हलके पोटाचे व्यायाम, योगासने, पवनमुक्तासन, धनुरासन आणि भुजंगासन यांसारखी आसने करावीत.

१०. निष्कर्ष

गर्भधारणा न होणे, ही केवळ एक समस्या नसून शरिरातील दोष असंतुलनाचे लक्षण आहे. आयुर्वेद या समस्येवर मूळ कारणांवर आधारित उपचारपद्धत सुचवतो. योग्य आहार, संतुलित जीवनशैली, मानसिक स्थैर्य आणि वैद्यकीय मार्गदर्शन यांमुळे गर्भधारणेची शक्यता नैसर्गिकरित्या वाढू शकते.

– वैद्या (सौ.) सारिका नीलेश लोंढे, निर्विकार आयुर्वेद हॉस्पिटल, भोसरी, पुणे.

लेखांक १३ वाचण्यासाठी क्लिक करा → https://sanatanprabhat.org/marathi/1036850.html

🪷‘स्त्री रोग आणि आयुर्वेद’ या मालिकेतील सर्व लेख वाचण्यासाठी इथे क्लिक करा🪷