योनी आरोग्य आणि आयुर्वेद : स्वच्छता अन् काळजी

स्त्री आरोग्यात योनी (Vagina) हा अत्यंत महत्त्वाचे अवयव असून त्याचे आरोग्य केवळ स्त्रीरोगांपुरते मर्यादित नसून संपूर्ण शारीरिक आणि मानसिक आरोग्याशी जोडलेले आहे. आजच्या पालटत्या जीवनशैलीत अयोग्य स्वच्छता पद्धत, रासायनिक उत्पादने, ताणतणाव आणि चुकीच्या सवयींमुळे अनेक स्त्रियांना योनीसंबंधित तक्रारी भेडसावत आहेत. आयुर्वेद योनी आरोग्याकडे केवळ स्वच्छतेच्या दृष्टीने न पहाता दोष-संतुलन आणि स्रोतस (शरिरातील वाहिन्या) शुद्धीच्या दृष्टीने पहातो.

(लेखांक १०)

लेखांक ९ वाचण्यासाठी क्लिक करा → https://sanatanprabhat.org/marathi/1026930.html

१. योनीचे आरोग्य आणि काही लक्षणे

आयुर्वेदात योनीला ‘योनी’ किंवा ‘स्त्रीजननमार्ग’ असे संबोधले जाते. योनी आरोग्य हे मुख्यतः आर्तव वह स्रोतस, अपान वात, तसेच कफ आणि पित्त दोष यांच्या संतुलनावर अवलंबून असते. योनी स्वच्छता, म्हणजे केवळ बाह्य स्वच्छता नसून शरिरातील दोष संतुलित ठेवणे, हेही तितकेच महत्त्वाचे आहे.

योनी आरोग्य बिघडल्यावर काही सामान्य लक्षणे दिसून येतात. यामध्ये पांढर्‍या किंवा पिवळसर पाण्याचा स्राव, दुर्गंधी, खाज सुटणे, जळजळ होणे, योनीत कोरडेपणा, संभोगाच्या वेळी वेदना, वारंवार मूत्रसंक्रमण, तसेच मासिक पाळीतील पालट यांचा समावेश होतो. अनेक वेळा ही लक्षणे दुर्लक्षित केली जातात; परंतु त्यामागे गंभीर स्त्रीरोग समस्या दडलेल्या असू शकतात.

२. आयुर्वेदानुसार योनी विकारांची कारणे 

वैद्या (सौ.) सारिका नीलेश लोंढे

आयुर्वेदानुसार योनी विकारांची कारणे अनेक असू शकतात. अपान वाताचे विकृतीकरण, पित्तदोष वाढ, कफ साचणे, आर्तव वह स्रोतस दुष्टी, सतत रासायनिक साबण किंवा ‘व्हेजिनल वॉश’ (vaginal wash)चा वापर, घट्ट कपडे, अस्वच्छता, मानसिक ताण आणि ‘हार्मोनल’ (संप्रेरक) असंतुलन ही प्रमुख कारणे मानली जातात. विशेषतः अतीस्वच्छतेच्या नावाखाली रासायनिक पदार्थांचा वापर केल्याने योनीतील नैसर्गिक संरक्षण प्रणाली नष्ट होते.

३. आयुर्वेदासह अन्य उपचार

अ. आयुर्वेदाचे उपचार : आयुर्वेदानुसार चिकित्सेत योनी विकारांचा विचार करतांना केवळ स्थानिक लक्षणांवर उपचार न करता रुग्णाची प्रकृती, दोष स्थिती, पचनशक्ती, मासिक पाळीचा इतिहास, प्रसूती किंवा गर्भपाताचा इतिहास, तसेच मानसिक स्थिती यांचा सखोल अभ्यास केला जातो. आयुर्वेदात योनी शुद्धी, दोष शमन आणि अपान वात संतुलन हे उपचाराचे मुख्य उद्दिष्ट असते. औषधी उपचारांमध्ये लोध्र, अशोक, त्रिफळा, मंजिष्ठा, दारुहरिद्रा आणि गुडुची यांसारख्या औषधांचा वापर वैद्यकीय सल्ल्यानुसार केला जातो. काही रुग्णांमध्ये योनी पिचु, योनी धावन किंवा बस्ती यांसारख्या उपचारपद्धत उपयुक्त ठरतात. या उपचारांमुळे सूज, स्राव आणि संसर्ग न्यून होण्यास साहाय्य होते.

आ. घरगुती उपचार : या स्तरावर योनीचे आरोग्य राखण्यासाठी काही सोपे आणि सुरक्षित उपाय करता येतात. स्वच्छ आणि कोमट पाण्याने बाह्य स्वच्छता ठेवणे, सुगंधी साबण किंवा ‘केमिकल व्हेजिनल वॉश’ टाळणे, सुती अन् सैल कपडे वापरणे, मासिक पाळीच्या कालावधीत स्वच्छता पाळणे, तसेच पुरेसे पाणी पिणे आवश्यक आहे. त्रिफळा क्वाथ किंवा नीम काढ्याने बाह्य स्वच्छता वैद्यांच्या सल्ल्याने करता येते.

इ. आहार : आहाराचाही योनी आरोग्यावर मोठा परिणाम होतो. अधिक तिखट, आंबट, तेलकट आणि प्रक्रिया केलेले पदार्थ टाळावेत. ताक, हिरव्या भाज्या, फळे, पुरेसे पाणी आणि हलका आहार घेणे लाभदायक ठरते. मानसिक ताण न्यून करणे, योग आणि प्राणायाम करणे, हेही अपान वात संतुलनासाठी उपयुक्त आहे.

४. आरोग्य दीर्घकाळ उत्तम रहाण्यासाठी…

योनी आरोग्य हे स्त्रीच्या संपूर्ण आरोग्याचे प्रतिबिंब आहे. आयुर्वेद योनी स्वच्छतेला नैसर्गिक, संतुलित आणि सुरक्षित पद्धतीने जपण्याचा मार्ग दाखवतो. योग्य स्वच्छता, संतुलित आहार, नियमित दिनचर्या आणि वैद्यकीय सल्ल्याने केलेले आयुर्वेदाचे उपचार यांमुळे स्त्रीचे योनी आरोग्य दीर्घकाळ उत्तम राहू शकते.

– वैद्या (सौ.) सारिका नीलेश लोंढे, ‘निर्विकार आयुर्वेद हॉस्पिटल’, भोसरी, पुणे.

लेखांक ११ वाचण्यासाठी क्लिक करा → https://sanatanprabhat.org/marathi/1032141.html

🪷‘स्त्री रोग आणि आयुर्वेद’ या मालिकेतील सर्व लेख वाचण्यासाठी इथे क्लिक करा🪷