(म्हणे) ‘वारकरी संप्रदाय सनातन धर्मापासून वेगळा !’ – Vikas Lavande NCP

  • राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे प्रवक्ते विकास लवांडे बरळले !

  • वारकरी संप्रदायतील २० ‘प्रतिगामी महाराजां’ची नावे केली घोषित !

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे प्रवक्ते विकास लवांडे

मुंबई – ‘वारकरी संप्रदाय सनातन धर्मापासून वेगळा आहे’, असे बरळत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे प्रवक्ते विकास लवांडे यांनी वारकरी संप्रदायामध्ये सनातन धर्माचे कार्य करणार्‍या वारकर्‍यांना धर्मांध ठरवण्याचा प्रयत्न केला आहे. विकास लवांडे यांनी अशा २० जणांची नावे घोषित केली आहेत. या सूचीत श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे कोषाध्यक्ष प.पू. स्वामी गोविंद देवगिरी महाराज, वारकरी संप्रदायाचे भीष्माचार्य समजले जाणारे बंडातात्या कराडकर, राष्ट्रीय कीर्तनकार चारूदत्त आफळे, ज्येष्ठ कीर्तनकार ह.भ.प. प्रकाश महाराज जवंजाळ आदी धर्मधुरिणांचा समावेश आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदर शरद पवार यांनी नुकतेच ‘वारकरी संप्रदायामध्ये ६० टक्के हिंदुत्वनिष्ठ शिरले आहेत. त्यामुळे वारकरी संप्रदायामध्ये धर्मांधपणा वाढत आहे’, असे वक्तव्य केले होते.

‘संत नामदेव महाराजांनी प्रथम भगव्या रंगाची पताका हातात घेतली आणि संत ज्ञानेश्वर महाराजांनी पहिला ग्रंथ दिला. सनातन धर्माचे अधिष्ठान आणि ग्रंथ वेगळे आहेत. वारकरी विचार कोणत्याही प्रकारचा भेदभाव मानत नाही. सध्या वारकरी संप्रदाय संपवण्यासाठी उत्तर भारतातून प्रदीप शर्मा, कालीचरण महाराज, धीरेंद्र शास्त्री आणि स्वामी आनंद स्वरूप यांसारखे लोक येत आहेत’, अशी आधारहीन टीका विकास लवांडे यांनी केली.

हे वाचा → ♦ (म्हणे) ‘वारकरी संप्रदायात ‘प्रतिगामी’ विचारांची घुसखोरी झाली !’ – Sharad Pawar

संपादकीय : भोंदू पुरोगाम्यांपासून सावधान !

(म्हणे) ‘कीर्तनकार उघडपणे भाजपचा प्रचार करतांना दिसत आहेत !’ – लवांडे

या वेळी विकास लवांडे यांनी ‘भाजपच्या आध्यात्मिक आघाडीचे नेते तुषार भोसले यांनी निवडणुकीपूर्वी आंळदीत बैठक घेऊन कीर्तनकार-महाराज यांना भाजप, हिंदुत्व यांच्या आधारे प्रचार करण्यास सांगितले. यासाठी पैशांची पाकिटेही वाटण्यात आली. त्यामुळेच कीर्तनकार उघडपणे भाजपचा प्रचार करतांना दिसत आहेत’, असा आरोप केला.

संपादकीय भूमिका

  • सनातन, म्हणजेच हिंदु धर्मातील ‘भगवद्गीता’ हा प्रमुख धर्मग्रंथ आहे. त्यावरच आधारित संत ज्ञानेश्वर महाराज यांनी ज्ञानेश्वरी लिहिली आहे. संत एकनाथ महाराज यांचे ‘एकनाथी भागवत’, संत तुकाराम महाराज, संत नामदेव महाराज आदी संतांनी लिहिलेले सहस्रो अभंगाचा गाभा सनातन धर्मातील भक्ती परंपरा हाच आहे !
  • शरद पवार गट जातीवादाचे राजकारण करायचे काही सोडत नाही; परंतु हिंदूंमध्ये फूट पाडण्याचे षड्यंत्र आता फार काळ चालणार नाही, हे शरद पवार गटाने आणि त्यांचे प्रवक्ते विकास लवांडे यांनी जाणावे !
  • सहस्रो वारकरीच नव्हे, तर समस्त हिंदू ज्यांचा आदर करतात, असे हिंदूंचे संत आणि ह.भ.प. यांना प्रतिगामी ठरवण्याचा अधिकार शरद पवार गटाला कुणी दिला ?