वजनवाढ आणि स्त्रीरोग : आयुर्वेदाचा दृष्टीकोन

आजच्या आधुनिक जीवनशैलीत स्त्रियांमध्ये वजन वाढण्याची समस्या झपाट्याने वाढतांना दिसते. ही समस्या केवळ बाह्य सौंदर्यापुरती मर्यादित नसून ती स्त्रियांच्या आरोग्यावर आणि विशेषतः स्त्रीरोगांवर मोठ्या प्रमाणात परिणाम करणारी आहे. मासिक पाळीतील अनियमितता, पाळी बंद होणे, ‘पॉलीसिस्टिक ओवॅरीयन सिंड्रोम (पी.सी.ओ.एस्.)’, ‘हार्मोनल’ (संप्रेरके) असंतुलन, गर्भधारणेत अडचणी, तसेच मानसिक ताण या समस्या वजन वाढीसह वारंवार आढळतात.

(लेखांक ९)

लेखांक ८ वाचण्यासाठी क्लिक करा → https://sanatanprabhat.org/marathi/1024419.html

१. आयुर्वेदानुसार वजन वाढण्यामागील कारणे आणि लक्षणे

आयुर्वेदानुसार ‘वजनवाढ ही शरिरातील दोष, धातू आणि अग्नी यांच्या असंतुलनामुळे निर्माण होणारी अवस्था आहे. आयुर्वेदात वजन वाढ, म्हणजे शरिरात मेद धातूचे प्रमाण वाढणे’, असे मानले जाते. जेव्हा जठराग्नी मंद होतो, तेव्हा अन्न पूर्णपणे पचत नाही आणि शरिरात आम सिद्ध होतो. हा आम आणि कफदोष वाढल्यामुळे शरिरात चरबी साठू लागते. ‘चरक संहिते’मध्ये ‘मेद वाढल्यामुळे कफदोष वाढतो’, असे स्पष्ट सांगितले आहे. त्यामुळे वजनवाढ ही केवळ आहारामुळे नसून संपूर्ण चयापचय प्रक्रियेतील बिघाडाचे लक्षण मानले जाते. स्त्रियांमध्ये वजनवाढीची काही विशिष्ट लक्षणे दिसून येतात. लवकर थकवा येणे, शरिरात जडपणा जाणवणे, मासिक पाळी उशिरा येणे किंवा अनियमित होणे, रक्तस्रावात पालट होणे, चेहर्‍यावर मुरुम येणे, केस गळणे, पोट आणि मांड्या यांवर चरबी वाढणे, तसेच गर्भधारणेत अडचणी येणे, ही महत्त्वाची लक्षणे मानली जातात. अनेक वेळा ‘पी.सी.ओ.एस्.’ किंवा ‘हार्मोनल’ असंतुलन असलेल्या स्त्रियांमध्ये वजन वाढ ही मुख्य तक्रार असते.

आयुर्वेदानुसार वजनवाढ होण्यामागे अनेक कारणे असतात. जड, गोड, तेलकट आणि तळलेले अन्नपदार्थ अधिक प्रमाणात सेवन करणे, शारीरिक हालचालींचा अभाव, मानसिक ताण, अपुरी झोप, दिवसा झोपण्याची सवय अन् अनियमित आहार-विहार या कारणांमुळे कफदोष वाढतो, तसेच आर्तव वह स्रोतस आणि मेदोवह स्रोतस यांमध्ये अवरोध निर्माण झाल्यास स्त्रीरोग समस्या अधिक वाढतात.

वैद्या (सौ.) सारिका नीलेश लोंढे

२. आयुर्वेदानुसार चिकित्सा आणि औषधोपचार

आयुर्वेद चिकित्सा करतांना केवळ वजन न्यून करण्यावर भर दिला जात नाही. वैद्य रुग्णाची प्रकृती, पचनशक्ती, मासिक पाळीचा इतिहास, मानसिक स्थिती, तसेच ‘हार्मोनल’ लक्षणे यांचा सखोल अभ्यास करून उपचार योजना ठरवतात. आयुर्वेदामध्ये दोष संतुलन आणि अग्नी सुधारणा हे उपचाराचे मुख्य उद्दिष्ट असते. औषधी उपचारामध्ये त्रिफळा, गुग्गुळ, कांचनार गुग्गुळ, लोध्र आणि अशोक यांसारखी औषधे वैद्यकीय सल्ल्यानुसार दिली जातात. काही रुग्णांमध्ये शिलाजीत किंवा इतर औषधी योगांचा वापर केला जातो. पंचकर्म उपचारांमध्ये उद्वर्तन, वमन आणि बस्ती या प्रक्रिया उपयोगी ठरतात. या उपचारांमुळे शरिरातील कफ आणि मेद न्यून होण्यास साहाय्य होते, तसेच ‘हार्मोनल’ संतुलन सुधारते.

घरगुती स्तरावर काही सोपे उपायही उपयुक्त ठरतात. सकाळी कोमट पाणी पिणे, जेवणानंतर त्रिकट चूर्णाची अल्प मात्रा घेणे, नियमित चालणे किंवा सूर्यनमस्कार करणे, रात्री लवकर जेवण करणे आणि दिवसा झोप टाळणे यांमुळे वजन नियंत्रणात रहाण्यास साहाय्य होते, तसेच प्रक्रिया केलेले पदार्थ, अधिक साखर आणि थंड पेये टाळणे आवश्यक आहे. आहारामध्ये ज्वारी, बाजरी, हिरव्या भाज्या, डाळी आणि ताक यांचा समावेश करणे लाभदायक ठरते. कोमट पाणी पिण्याची सवय ठेवणे, हे पचन सुधारण्यासाठी उपयुक्त असते. संतुलित आहार, नियमित व्यायाम आणि योग्य दिनचर्या या गोष्टी आयुर्वेदात अत्यंत महत्त्वाच्या मानल्या आहेत.

३. वजन नियंत्रणात रहाण्यासाठी…

वजन वाढ ही स्त्रीरोगांची मूळ समस्या नसून शरिरातील दोष असंतुलनाचे लक्षण आहे. आयुर्वेद स्त्रीचे संपूर्ण शरीर आणि मनाचे संतुलन यांवर भर देतो. योग्य उपचार, आहार आणि जीवनशैली यांचे पालन केल्यास वजन नियंत्रणात रहाते अन् स्त्रियांचे एकूण आरोग्य सुधारते.

– वैद्या (सौ.) सारिका निलेश लोंढे, ‘निर्विकार आयुर्वेद हॉस्पिटल’, भोसरी, पुणे.

लेखांक १० वाचण्यासाठी क्लिक करा → https://sanatanprabhat.org/marathi/1029608.html

🪷‘स्त्री रोग आणि आयुर्वेद’ या मालिकेतील सर्व लेख वाचण्यासाठी इथे क्लिक करा🪷