‘१३ आणि १४ डिसेंबर २०२५ या कालावधीत नवी देहली (इंद्रप्रस्थ) येथे ‘सनातन राष्ट्र शंखनाद’ महोत्सव झाला. या महोत्सवातील दुसर्या दिवसातील सकाळच्या सत्राचे केलेले सूक्ष्म परीक्षण येथे दिले आहे.
भाग ३
भाग २ वाचण्यासाठी क्लिक करा → https://sanatanprabhat.org/marathi/1027623.html

१. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे जीवनचरित्र (इंग्रजी) (Brief Biography of Sachchidananda Parabrahman (Dr) Jayant Athavale) या ग्रंथाचे प्रकाशन होणे
या ग्रंथातून ‘श्रीविष्णूची क्रियाशक्ती आणि शिवाची ज्ञानशक्ती’ यांच्या संयुक्त लहरी वातावरणात प्रक्षेपित झाल्या, तसेच चैतन्यमय नादलहरीही निर्माण होऊन त्या संपूर्ण वातावरणात प्रक्षेपित झाल्या.
२. हिंदु जनजागृती समितीचे मध्यप्रदेश आणि राजस्थान येथील समन्वयक श्री. आनंद जाखोटिया यांनी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या कार्याचा संक्षिप्त परिचय करून देणे

‘कार्यक्रमाच्या ठिकाणी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे सूक्ष्म रूप कार्यरत झाले होते. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवलेरूपी श्रीविष्णूच्या सूक्ष्म देहातून दैवी गोळा बाहेर आला आणि या ज्ञानशक्तीच्या गोळ्यातून ‘सनातन संस्थे’ची निर्मिती झाली. त्यानंतर सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवलेरूपी श्रीविष्णूच्या सूक्ष्म देहातून आणखी एक दैवी गोळा बाहेर आला आणि या क्रियाशक्तीच्या गोळ्यातून ‘हिंदु जनजागृती समिती’ची निर्मिती झाली’, असे मला जाणवले.
३. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या मार्गदर्शक संदेशाचे वाचन हिंदु जनजागृती समितीचे धर्मप्रचारक सद्गुरु नीलेश सिंगबाळ यांनी करणे
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या ‘हिंदु राष्ट्राची निर्मिती करण्याच्या ध्येयाची पूर्ती केल्यानंतर ‘ते राज्य रामराज्याप्रमाणे आदर्शरित्या चालवणे’, हे आपल्या सर्व धर्मप्रेमी हिंदूंचे ध्येय साध्य करायला हवे’, या संदेशाचे वाचन सद्गुरु नीलेश सिंगबाळ यांनी केले. यातून प्रभु श्रीरामाचे प्रतीक असलेल्या सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांची आशीर्वादात्मक ज्ञानशक्ती हिंदु राष्ट्राच्या स्थापनेचे दिशादर्शन करण्यासाठी आणि संकल्परूपी क्रियाशक्ती प्रत्यक्ष हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी सक्रीय झाल्याचे जाणवले.
४. उद्बोधन सत्रामध्ये ‘सनातन कार्यदर्शन’ या विषयावर मान्यवर हिंदुत्वनिष्ठ मार्गदर्शन करत असतांना केलेले सूक्ष्म परीक्षण
४ अ. विश्व हिंदु परिषदेचे आंतरराष्ट्रीय कार्याध्यक्ष अधिवक्ता आलोक कुमार यांनी मार्गदर्शन करणे : अधिवक्ता आलोक कुमार यांच्या मनात हिंदु धर्माविषयी अभिमान आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले अन् त्यांच्या आध्यात्मिक उत्तराधिकारी श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांच्या प्रती पुष्कळ आदरभाव असल्याचे जाणवले, तसेच त्यांच्यामध्ये हिंदु धर्माविषयी जाणून घेण्याची जिज्ञासू आणि अभ्यासक वृत्ती जाणवली.
४ आ. ‘सुदर्शन’ वृत्तवाहिनीचे मुख्य संपादक डॉ. सुरेश चव्हाणके यांचे उद्बोधक मार्गदर्शन : डॉ. सुरेश चव्हाणके यांनी ‘धर्मद्रोह्यांनी हिंदूंवर विविध प्रकारे आघात केल्यामुळे भारतातील हिंदूंची लोकसंख्या न्यून होत आहे’, याविषयी सविस्तर सूत्रे प्रभावीरित्या सांगून उपस्थितांमध्ये जागृती केली. ते जेव्हा बोलत होते, तेव्हा त्यांच्या हृदयात केशरी रंगाच्या धर्मशक्तीचे वलय कार्यरत होऊन ही धर्मशक्ती त्यांची ओजस्वी वाणी आणि प्रतिभाशाली विचार यांतून सभागृहात प्रक्षेपित होत होती. त्यामुळे त्यांचे प्रभावी भाषण ऐकून श्रोत्यांमध्ये प्रखर राष्ट्रप्रेम आणि धर्माभिमान जागृत होत होता.
५. ‘सनातन राष्ट्र चुनौती आणि चिंतन’, या हिंदी भाषेतील ग्रंथाचे प्रकाशन होणे
‘सनातन राष्ट्र चुनौती आणि चिंतन’, या हिंदी भाषेतील ग्रंथाचे प्रकाशन होत असतांना त्या ग्रंथातून ‘पिवळ्या रंगाचे ब्राह्मतेज, केशरी रंगाचे धर्मतेज आणि लाल रंगाचे क्षात्रतेज’ यांच्या लहरींचे वायूमंडलात प्रक्षेपण झाले. या ग्रंथातून हिंदु राष्ट्राच्या स्थापनेची संकल्पना सुस्पष्ट होऊन त्याच्या स्थापनेसाठी करावयाच्या प्रयत्नांना नेमकेपणाने दिशादर्शन मिळत आहे. त्यामुळे हा ग्रंथ हिंदु राष्ट्राची स्थापना करणारा प्रेरणादायी आणि मार्गदर्शक धर्मग्रंथ आहे.
६. डॉ. सुरेश चव्हाणके यांनी लिहिलेल्या ‘इस्लामिक राष्ट्र कैसे बने’ या हिंदी भाषेतील ग्रंथाचे प्रकाशन होणे
या ग्रंथातून सत्त्व-रजप्रधान ज्ञानलहरींचे प्रक्षेपण होते. त्यामुळे हा ग्रंथ जे विकत घेतील, त्यांचे राष्ट्रप्रेम आणि धर्मप्रेम जागृत होणार आहे.
७. ‘सनातन राष्ट्रासमोरील आव्हाने आणि चिंतन’ या उद्बोधन सत्राचे सूक्ष्म परीक्षण
७ अ. सर्वाेच्च न्यायालयातील अधिवक्ता विष्णु शंकर जैन यांनी धर्मप्रेमी हिंदूंना संबोधित करणे : अधिवक्ता विष्णु शंकर जैन हे प्रखर राष्ट्रभक्त, जाज्वल्य धर्माभिमानी आणि प्रतिभाशाली अन् मेधावी धर्मवीर योद्धा आहेत. त्यांची बुद्धी आणि वाणी सात्त्विक अन् ब्राह्मतेजासह क्षात्रतेजाने युक्त आहे. त्यांच्या हृदयात ‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले, तसेच सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांचे साधक’ यांच्या प्रती नितांत आदरभाव असल्याने त्यांनी या सर्वांना हात जोडून नमन केले. त्यांच्यावर ‘प्रभु श्रीराम, भगवान श्रीकृष्ण आणि शिव’ यांची विशेष कृपा असल्यामुळे ते हिंदु धर्माच्या रक्षणासाठी प्रभावीपणे आणि यशस्वी न्यायालयीन लढा देऊ शकतात. त्यांच्यातील नितांत भावामुळे जेव्हा त्यांनी ‘नम: पार्वती पतये हर हर महादेव ।’ अशी हात उंचावून घोषणा दिली, तेव्हा वातावरणात शिव आणि शक्ती यांच्या लहरी कार्यरत झाल्या अन् माझ्या शरिरावर रोमांच आले.
(‘जैन’ या शब्दाची उत्पत्ती आणि त्याचा अर्थ : ‘जैन’ हा शब्द संस्कृत शब्द ‘जिन’ पासून आला आहे, ज्याचा अर्थ ‘विजेता’ असा होतो. आध्यात्मिक संदर्भात, याचा अर्थ असा होतो की, ज्याने आपल्या इंद्रियांवर आणि अंतर्गत शत्रूंवर (जसे की क्रोध, आसक्ती, लोभ) विजय मिळवला आहे. (साभार- संकेतस्थळ)
८. केंद्रीय सांस्कृतिक आणि पर्यटन मंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांचे देशप्रेम अन् धर्मप्रेम यांनी ओतप्रोत असलेले ओघवते आणि प्रभावशाली भाषण !
श्री. गजेंद्रसिंह शेखावत एक प्रखर देशभक्त असून कट्टर हिंदु धर्माभिमानी असल्याचे जाणवले. त्यांच्या मनात हिंदु धर्माप्रती पुष्कळ श्रद्धा आणि आदरभाव असल्याचे त्यांचे तेजस्वी विचार अन् ओघवती वाणी यांतून जाणवले. त्यांनी सांगितले, ‘‘सनातन संस्थेने समाजातील घटकांचे नैतिक मूल्य वाढवणे, त्यांच्यात राष्ट्रप्रेम जागृत करणे आणि त्यांना आध्यात्मिक ऊर्जा देण्याचे महत्त्वाचे कार्य केले. कालचक्राच्या अनुकूलतेमुळे भारतीय संस्कृती पुन्हा उदित होण्याचा काल आरंभ झालेला आहे.’’ तेव्हा मला कालचक्राचे दर्शन झाले. या चक्राचा रंग आधी काळा होता. नंतर काही क्षणांनी या चक्राचा रंग करडा होऊन नंतर भगव्या रंगाचा झाला. यावरून ‘हा काळ धर्मसंस्थापनेसाठी पूरक सिद्ध होणार आहे’, असे मला जाणवले.
९. रणसंवाद
‘भारताची राष्ट्रीय सुरक्षानीती’ याविषयी स्फूर्तीदायी संवाद करण्यात आला.
९ अ. विंग कमांडर विनायक डावरे (निवृत्त) यांनी हिंदूंचा राष्ट्राभिमान आणि धर्माभिमान जागृत करणारी प्रभावी सूत्रे सांगणे : विंग कमांडर विनायक डावरे (निवृत्त) यांच्यामध्ये हिंदूंविषयी, तसेच हिंदूंची संस्कृती आणि राष्ट्रीयत्व यांच्याविषयी पुष्कळ अस्मिता जाणवते. त्यांनी राष्ट्रविघातक घटकांचे खरे स्वरूप अतिशय सुस्पष्टपणे आणि प्रभावीपणे मांडले. त्यांची जोशपूर्ण सूत्रे ऐकून धर्मप्रेमींमध्ये राष्ट्ररक्षणाची तीव्र तळमळ जागृत झाल्याचे जाणवले.
९ आ. हिंदु विधीज्ञ परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर यांनी नक्षलवादाच्या सत्य स्वरूपाचे प्रभावीपणे विवेचन करणे : अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर यांच्यावर श्री गणेशाची कृपा असल्यामुळे त्यांची बुद्धी सूक्ष्म, सात्त्विक, प्रतिभाशाली आणि तेजस्वी आहे. त्यांच्यावरील श्री सरस्वतीदेवीच्या कृपेमुळे त्यांचे विचार आणि वाणी यांमध्ये अत्यंत सुस्पष्टपणा अन् शस्त्राप्रमाणे प्रखरता जाणवते. त्यामुळे ते अत्यंत चांगला आणि परिणामकारक युक्तीवाद करू शकतात. त्यामुळे न्यायालयात धर्माच्या बाजूने निर्णय मिळण्यास साहाय्य होते. त्यांनी चर्चासत्रात हिंदूंचा घात करणार्या अर्बन अन् वैचारिक नक्षलवादाचा आपल्या स्तरावर प्रतिकार करून त्यांना निष्प्रभ करण्याविषयीची सत्यनिष्ठ आणि अभ्यासपूर्ण सूत्रे मांडून धर्मप्रेमींमध्ये जागृती निर्माण केली. त्यांच्यात ‘क्षात्रतेज, ब्राह्मतेज आणि धर्मतेज’ यांचा त्रिवेणी संगम झाला आहे. याची प्रचीती त्यांचे तेजस्वी विचार अन् प्रभावी वाणी यांतून येते.
९ इ. ‘यूथ फॉर पनून कश्मीर’चे अध्यक्ष राहुल कौल यांनी काश्मिरी हिंदूंची व्यथा सांगून त्यांच्या पुनर्वसनाविषयी दिशादर्शन करणे : श्री. राहुल कौल यांनी काश्मिरी हिंदूंवरील अत्याचारांच्या संदर्भातील वस्तूनिष्ठ माहिती सांगून त्यांच्यावरील अन्यायाला वाचा फोडली. यातून त्यांच्यामधील हिंदु समाजाप्रतीची आत्मीयता आणि जिहादच्या विरोधात परखडपणे अन् कणखरपणे लढण्याची क्षात्रवृत्ती जाणवली. त्यांनी ‘पनून कश्मीर’च्या हिंदूंना ठोस पाठिंबा आणि साहाय्य करण्याचे आवाहन करून सर्व धर्मप्रेमी हिंदुत्वनिष्ठांमध्ये राष्ट्रीय चेतना जागृत केली.
सनातन जय सनातन जय सनातन धर्म महान !
१०. कृतज्ञता
‘या दोन दिवसांच्या कार्यक्रमाचे सूक्ष्म परीक्षण करण्याची सेवा भगवंताने माझ्याकडून करून घेतल्याबद्दल मी भगवंताच्या चरणी भावसुमने अर्पण करते.’
(क्रमश )
– सुश्री मधुरा भोसले (सूक्ष्म ज्ञानप्राप्तकर्ती साधिका, आध्यात्मिक पातळी ६५ टक्के), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (ज्ञान मिळण्याचा दिनांक : १४.१२.२०२५, वेळ : सकाळी ११ ते दुपारी २ आणि कालावधी : ३ घंटे)
ही आहे राजकीय पक्षांची दु:स्थिती !
‘श्रद्धे’चा बाजार !
‘जीवोत्तम विद्यापीठ’ : भारतीय ज्ञानपरंपरेचे आधुनिक पुनरुज्जीवन !
स्वातंत्र्यवीर सावरकर यांची रणनीती आणि नेताजी सुभाषबाबूंशी झालेली भेट
खासगी संस्थांची नोंदणी अनिवार्य नाही !
घरात आश्रमाची अनुभूती देणारे पलूस (सांगली) येथील बर्गे कुटुंबीय !