आज अनेक तरुण मुली आणि महिला यांच्यामध्ये मासिक पाळीशी संबंधित आजार ‘पॉलीसिस्टिक ओवॅरीयन डिसिज (पीसीओडी)’ किंवा ‘पॉलीसिस्टिक ओवॅरीयन सिंड्रोम (पी.सी.ओ.एस्.)’ यांची समस्या वाढतांना दिसते. मासिक पाळी अनियमित होणे, पाळी न येणे किंवा उशिरा येणे, वजन वाढणे, चेहर्यावर ‘पिंपल्स’ (पुटकुळ्या) येणे, केस गळणे, अंगावर अनावश्यक केस वाढणे आणि गर्भधारणेत अडचणी येणे, अशी लक्षणे या अवस्थेत आढळतात. अनेक जणींना हा आजार ऐकून भीती वाटते; पण योग्य वेळी समजून आणि योग्य उपचार केल्यास या समस्येवर नियंत्रण मिळवणे नक्कीच शक्य आहे.
(लेखांक ८)
लेखांक ७ वाचण्यासाठी क्लिक करा →https://sanatanprabhat.org/marathi/1021930.html

१. आयुर्वेदाच्या दृष्टीने ‘पॉलीसिस्टिक ओवॅरीयन डिसिज (पीसीओडी)’ किंवा ‘पॉलीसिस्टिक ओवॅरीयन सिंड्रोम (पी.सी.ओ.एस्.)’
आधुनिक वैद्यकशास्त्रात याला ‘हार्मोनल’ (संप्रेरके) असंतुलनाशी संबंधित समस्या मानली जाते, तर आयुर्वेद या अवस्थेकडे संपूर्ण शरिराच्या असंतुलनाच्या दृष्टीने पहातो. आयुर्वेदानुसार ‘पॉलीसिस्टिक ओवॅरीयन डिसिज (पीसीओडी)’ किंवा ‘पॉलीसिस्टिक ओवॅरीयन सिंड्रोम (पी.सी.ओ.एस्.)’ यांमध्ये मुख्यत्वे कफ आणि वात दोष यांचा बिघाड दिसून येतो. कफदोष वाढल्यामुळे शरिरात जडपणा, वजन वाढ आणि अंडोत्सर्जनात अडथळा निर्माण होतो, तर वातदोष बिघडल्यामुळे मासिक पाळी अनियमित होते. यासह पचनशक्ती न्यून होऊन शरिरात ‘आम’ साचतो, जो या समस्येला अधिक गंभीर बनवतो.
‘पीसीओडी’मध्ये मासिक पाळी अनियमित होणे, हे सर्वांत सामान्य लक्षण असते. काही स्त्रियांमध्ये पाळी महिनोन्महिने येत नाही, तर काहींमध्ये पुष्कळ अल्प किंवा पुष्कळ अधिक येते. आयुर्वेदाच्या दृष्टीने ही अवस्था केवळ गर्भाशयापुरती मर्यादित नसून पचनसंस्था, ‘हार्मोन्स’, मानसिक ताण आणि जीवनशैली यांचा एकत्रित परिणाम असते. त्यामुळे उपचार करतांना केवळ पाळी नियमित करणे एवढाच उद्देश नसून शरिराचा एकूण समतोल साधणे महत्त्वाचे ठरते.
२. आयुर्वेद आणि योग यांचे उपचार

आयुर्वेदाच्या उपचारांचा मुख्य उद्देश कफदोष शमवणे, वातदोष संतुलित करणे, पचनशक्ती सुधारणा करणे आणि अंडाशयांचे कार्य नैसर्गिकरित्या सुधारण्याचा असतो. ‘कुमारी (कोरफड)’, ‘शतावरी’, ‘अश्वगंधा’, ‘त्रिफळा’ यांसारखी औषधी द्रव्ये ‘पीसीओडी’मध्ये उपयुक्त मानली जातात. ‘कुमारी आसव’, ‘शतावरी कल्प’ किंवा ‘त्रिफळा चूर्ण’ यांचा वापर वैद्यांच्या सल्ल्याने केल्यास हळूहळू पाळीची नियमितता आणि शरिराची चयापचय प्रक्रिया सुधारू शकते. येथे हे लक्षात घेणे आवश्यक आहे की, ‘पीसीओडी’मध्ये उपचार दीर्घकालीन असतात आणि सातत्य महत्त्वाचे असते. जीवनशैलीतील पालट हे ‘पीसीओडी’ नियंत्रणात आणण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे ठरतात. जंकफूड (पिझ्झा, बर्गर) अती खाणे, गोड पदार्थ, थंड पेये आणि बैठी जीवनशैली टाळणे आवश्यक आहे. हलका, पचायला सोपा आणि पोषक आहार घेणे, नियमित चालणे किंवा सौम्य व्यायाम करणे यांमुळे कफदोष न्यून होण्यास साहाय्य होते. अतीउपवास किंवा अतीव्यायाम दोन्हीही टाळणे आवश्यक असते.
मानसिक ताण, चिंता आणि सततचा तणाव यांचा ‘पीसीओडी’वर मोठा परिणाम होतो. त्यामुळे ध्यान, प्राणायाम आणि योग यांचा नियमित सराव केल्यास ‘हार्मोनल’ संतुलन सुधारण्यास साहाय्य होते. भुजंगासन, बद्धकोनासन आणि कपालभाती यांचा सौम्य सराव (योग्य मार्गदर्शनाखाली) उपयुक्त ठरतो. पुरेशी झोप आणि नियमित दिनचर्या या गोष्टीही उपचारांचा भाग आहेत.
३. ‘पीसीओडी’ नियंत्रणात आणण्यासाठी…
एकूणच ‘पीसीओडी’ / ‘पी.सी.ओ.एस्.’ हे दोन्ही आजार आजीवन नसून जीवनशैलीशी संबंधित समस्या आहे. आयुर्वेद या समस्येकडे समग्र दृष्टीकोनातून पहातो आणि मूळ कारणांवर उपचार करण्यावर भर देतो. योग्य आहार-विहार, मानसिक संतुलन, सातत्यपूर्ण आयुर्वेदाचे उपचार आणि वैद्यांच्या मार्गदर्शनाखाली घेतलेली काळजी यांमुळे ‘पीसीओडी’ नियंत्रणात येऊन स्त्रीचे आरोग्य, आत्मविश्वास अन् प्रजनन क्षमता सुधारू शकते.
– वैद्या (सौ.) सारिका नीलेश लोंढे, निर्विकार आयुर्वेद हॉस्पिटल, भोसरी, पुणे.
लेखांक ९ वाचण्यासाठी क्लिक करा → https://sanatanprabhat.org/marathi/1026930.html
शांत, संयमी, दूरदर्शी नेतृत्व, विनम्रता आणि सेवाभाव यांचा आदर्श असलेल्या आदरणीय दीदी !
डॉक्टरांना (आधुनिक वैद्यांना) मारून कुणाचा जीव वाचणार ?
हिंदूंना शत्रूबोध नाही !
भारतातील ‘डेटा सेंटर्स’मुळे निर्माण होणारे जलसंकट !
न्यायालयातील भाषेचा अडथळा : ‘लॅटिन’ संज्ञांमुळे सामान्य माणूस भारतीय कायद्यापासून दूर जात आहे का ?
समर्थ रामदासस्वामींच्या ‘दासबोधा’तील संदर्भांवरून ‘१०८’ या जपसंख्येचे महत्त्व !