डॉनल्ड ट्रम्प यांनी इराणला नवीन धमकी
नवी देहली – उद्या, मंगळवारी (७ एप्रिल) इराणमध्ये ‘वीज प्रकल्प दिन’ आणि ‘पूल दिन’ एकाच दिवशी येत आहेत, याचा अर्थ आक्रमण होईल. इराणने हॉर्मुझची सामुद्रधुनी उघडली पाहिजे, अन्यथा तो नरकात पोचेल, अशी नवीन धमकी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डॉनल्ड ट्रम्प यांनी इराणला दिली आहे. यापूर्वी अमेरिकेने इराणची राजधानी तेहरानला कराज शहराशी जोडणार्या बी १ महामार्गावरील पुलावर आक्रमण केले होते. हा पूल आखाती देशांमधील सर्वांत उंच पूल मानला जातो.
अमेरिकेची अवस्था आम्ही नरकाप्रमाणे करू ! – इराण
इराणी सैन्याच्या प्रवक्त्याने टेलिग्रामवर एक निवेदन प्रसारित केले आहे. त्यात सांगण्यात आले आहे की, अमेरिकेने जर इराणी नागरिकांना लक्ष्य केले, तर आम्ही जे पाऊल उचलू ते विनाशकारी पाऊल असेल आणि व्यापक स्वरूपातले आक्रमण असेल, हे अमेरिकेने विसरू नये.
दुसरीकडे इराणच्या संसदेचे सभापती महंमद बाघेर गालिबफ यांनी म्हटले की, अमेरिकेने जर सामान्य नागरिकांना लक्ष्य केले, तर तिने हे लक्षात ठेवावे की, अमेरिकेची अवस्था आम्ही नरकाप्रमाणे करू. तुमच्या देशातल्या प्रत्येकाला हेच वाटेल की, आपण या नरकात का रहात आहोत ? ट्रम्प हे नेत्यान्याहू यांच्या सांगण्यावरून सर्व चेतावण्या देत आहेत, जे त्यांनी बंद केले पाहिजे.
अमेरिका हतबल होऊन आणि घाबरून धमक्या देत आहे ! – इराण
इराणने ट्रम्प यांची ४८ घंट्यांची हॉर्मुझ उघडण्याची चेतावणी फेटाळून लावली. ट्रम्प यांनी म्हटले होते की, वेळ संपत आहे आणि असे न झाल्यास इराणच्या ऊर्जा ठिकाणांना लक्ष्य करून नष्ट केले जाईल.’ इराणी सैन्याने म्हटले आहे की, अमेरिका हतबल होऊन आणि घाबरून धमक्या देत आहे.
अमेरिका ४७ वर्षांत काहीही करू शकली नाही आणि आताही काही करू शकणार नाही ! – इराण

भारतातील इराणच्या सर्वोच्च नेत्यांचे प्रतिनिधी डॉ. अब्दुल मजीद हकीम इलाही यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डॉनल्ड ट्रम्प यांनी इराणला दिलेल्या धमकीला प्रत्युत्तर दिले. ते म्हणाले की, यात काही नवीन नाही. गेल्या ४७ वर्षांत ते इराणचे काहीही करू शकले नाहीत आणि आताही काही करू शकणार नाहीत.
‘अमेरिकेने इराणविरुद्धचे युद्ध जिंकले आहे’, या ट्रम्प यांच्या दाव्यावर इलाही म्हणाले की, आम्ही याला रणांगणावर आणि रस्त्यांवर प्रत्युत्तर देऊ शकतो. ते म्हणायचे, ‘आम्ही ३ दिवसांत सर्व काही करू’; पण आता एका महिन्यापेक्षा अधिक काळ लोटला आहे.
अमेरिकेने चेतावणी देण्याऐवजी संवाद साधावा ! – रशिया
जर अमेरिकेने चेतावणी देण्याऐवजी संवादाचा मार्ग स्वीकारला, तर परिस्थिती सामान्य होऊ शकते, असे रशियाचे परराष्ट्रमंत्री सर्गेई लॅवरोव्ह यांनी इराणचे परराष्ट्रमंत्री अब्बास अराघची यांच्याशी दूरध्वनीवरून झालेल्या संभाषणात म्हटले. संघर्ष न्यून करण्याचे प्रयत्न यशस्वी होतील, अशी आशा लॅवरोव्ह यांनी व्यक्त केली.
युद्धात पाकिस्तानची कोणतीही भूमिका नाही ! – इराण
अब्दुल माजिद हकीम इलाही यांनी सांगितले की, या युद्धात पाकिस्तानची कोणतीही भूमिका नाही. पाकिस्तानच्या माध्यमातून इराण आणि अमेरिका यांच्यात चर्चा होत असल्याच्या बातम्या पूर्णपणे खोट्या आहेत. अशा अफवा केवळ तेलाच्या किमतींवर प्रभाव टाकण्यासाठी पसरवल्या जात आहेत. प्रत्यक्षात, कोणतीही गंभीर चर्चा होत नाही आणि काही देश केवळ देखाव्यासाठी चर्चेच्या नावाखाली बोलत आहेत.
भारतासह जगातील सर्व देश हे युद्ध टाळण्यासाठी साहाय्य करू शकतात !
भारताच्या भूमिकेबद्दल ते म्हणाले की, भारतासह जगातील सर्व देश हे युद्ध टाळण्यासाठी साहाय्य करू शकतात. जर सर्व देशांनी एकत्र काम केले, तर हे संकट सोडवले जाऊ शकते. इराणला हे युद्ध नको आहे आणि ते लवकर संपवायचे आहे. हे एक लादलेले युद्ध आहे, ज्याचा परिणाम जगभरातील अनेक देशांतील लोकांवर होत आहे.
इराणवर आक्षेपार्ह भाषेत टीका केल्याने ट्रम्प यांची पद जाण्याची भीती
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डॉनल्ड ट्रम्प यांनी सामाजिक माध्यमातून इराणविरुद्ध आक्षेपार्ह आणि शिवराळ भाषेचा वापर केल्यामुळे ट्रम्प यांच्यावर अमेरिकेतूनच टीका होऊ लागली आहे. त्यांना पदावरून हटवण्यासाठी अमेरिकेच्या राज्यघटनेतील ‘२५ व्या घटना दुरुस्ती’चा आधार घेण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
ट्रम्प यांनी इराणबद्दल अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन भाष्य केले असल्याने अमेरिकेतील ५ प्रमुख खासदारांनी ट्रम्प यांच्या मानसिक क्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. खासदारांच्या मते, ट्रम्प त्यांचे कर्तव्य निभावण्यास सक्षम नाहीत आणि त्यांच्या अशा वागण्यामुळे संपूर्ण जगाला युद्धाच्या दरीत लोटले जात आहे.
काय आहे ‘२५ वी घटना दुरुस्ती’ ?
‘२५ व्या घटना दुरुस्ती’नुसार जर राष्ट्राध्यक्ष त्यांच्या पदाचे दायित्व पार पाडण्यास शारीरिक किंवा मानसिक दृष्ट्या असमर्थ असतील, तर त्यांना पदावरून हटवले जाऊ शकते.
१. या प्रक्रियेसाठी आधी उपराष्ट्राध्यक्ष आणि मंत्रीमंडळ यांना एक प्रस्ताव समंत करावा लागतो.
२. जर राष्ट्राध्यक्षांनी याला विरोध केला, तर हे प्रकरण संसदेत जाते.
३. संसदेच्या दोन्ही सभागृहात दोन-तृतीयांश बहुमताने हा प्रस्ताव संमत झाला, तर राष्ट्राध्यक्षांना तात्काळ पद सोडावे लागते आणि उपराष्ट्राध्यक्ष उर्वरित काळासाठी पदभार स्वीकारतात.
ट्रम्प ३ दिवसांच्या रजेवर!
इराणविरोधात वादग्रस्त विधान केल्यानंतर ट्रम्प अचानक ३ दिवसांच्या सुटीवर गेले आहेत. त्यांच्या या सुटीमुळे अमेरिकेच्या राजकीय वर्तुळात अनेक चर्चाना उधाण आले आहे.
हॉर्मुझ उघडण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे युद्ध संपवणे ! – चीन

चीनचे परराष्ट्रमंत्री वांग यी यांनी रशियाच्या परराष्ट्र मंत्र्यांसमवेतच्या चर्चेच्या वेळी सांगितले की, हॉर्मुझची सामुद्रधुनी उघडण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे युद्ध थांबवणे. जर युद्ध संपले, तर जलवाहतूक पूर्ववत् होऊ शकते.
इराकचा तेलपुरवठा ठप्प
इराकच्या सरकारी मालकीच्या बसरा तेल आस्थापनाने सांगितले की, ते देशांतर्गत प्रतिदिन अंदाजे ९० सहस्र बॅरल तेलाचे उत्पादन करत आहेत; परंतु हॉर्मुझची सामुद्रधुनी बंद असल्यामुळे तेलाची निर्यात करू शकत नाही.
आक्रमणांमुळे कामकाजातही व्यत्यय आला आहे आणि अनेक परदेशी आस्थापने त्यांच्या कर्मचार्यांना इराकमधून बाहेर काढत आहेत, ज्यामुळे उत्पादन आणि पुरवठा यांच्यावर परिणाम होत आहे.
नेपाळमध्ये २ दिवसांची साप्ताहिक सुटी लागू
आखातातील युद्धामुळे निर्माण झालेल्या इंधन संकटाच्या पार्श्वभूमीवर नेपाळ सरकारने सरकारी कार्यालयांसाठी २ दिवसांची साप्ताहिक सुट्टी लागू केली आहे. आता सरकारी कार्यालये शनिवार आणि रविवार या दोन्ही दिवशी बंद रहातील. यापूर्वी केवळ शनिवार हाच सुटीचा दिवस म्हणून निश्चित करण्यात आला होता. आता सरकारी कार्यालये सकाळी ९ ते सायंकाळी ५ या वेळेत कार्यरत रहातील; तर यापूर्वी कामाची वेळ सकाळी १० ते सायंकाळी ५ अशी होती.
यापूर्वी इंधनाचा पुरवठा अखंडित रहावा या उद्देशाने नेपाळने विमान इंधनाच्या दरांमध्ये तब्बल ११७ टक्क्यांपर्यंत वाढ केली होती.

US Iran War : अमेरिकेच्या संसदेत इराणविरुद्धचे युद्ध थांबवण्याचा ठराव संमत
अहिल्यानगरमध्ये धर्मांधांकडून हिंदु कुटुंबावर प्राणघातक आक्रमण !
भारताला विनाशाकडे नेणारा ‘वोकिझम’ !
Paris Riot : फ्रान्स सरकारने या पुढे ‘शून्य सहनशीलते’चे धोरण अंगीकारावे !
Khan Sir Coaching Firing : पाटलीपुत्र (बिहार) येथे प्रसिद्ध खान सर यांच्या शिकवणी वर्गावर आक्रमण
बांगलादेशाच्या विरोधामुळे घुसखोरांना सीमेवरून परत पाठवणे होत आहे अवघड !