भगवंताचे नामाने जीवन सुखाचे होते ! – ह.भ.प. मोहन बांद्रे महाराज

पाग (चिपळूण) येथे अखंड हरिनाम सप्ताह भावपूर्ण वातावरणात साजरा

चिपळूण, ४ एप्रिल (वार्ता.) – दुर्जनांच्या नाशासाठी, सज्जनांच्या रक्षणासाठी, तसेच मनुष्याला आनंदाचा मार्ग दाखवण्यासाठी द्वापर युगात भगवान श्रीकृष्णाने अवतार घेतला. ‘धर्मसंस्थापना करणे’, हे भगवंताचे कार्य आहे. ‘भगवंताची लीला ऐकणे’, हे भाग्य आहे. भगवान परमात्म्याच्या नामात आनंद आहे. भगवंताच्या लीलेतील आनंद आपल्यापर्यंत पोचवण्याचे काम संत तुकोबाराय अभंगांतून करत. भगवंताच्या नामातील आनंद घ्यायला हवा. मनुष्याचे जीवन दुःखाने भरून गेले आहे. पुढचा काळ कठीण आहे, भगवंताला स्वतःच्या हृदयात ठेवा, मुखाने भगवंताचे नाम घ्या, तुमचे जीवन सुखाचे होईल, असे मार्गदर्शन गोवळकोट येथील ह.भ.प. मोहन बांद्रे महाराज यांनी केले. ते पाग-गोपाळकृष्ण वाडीतील श्री देव गोपाळकृष्ण मंदिरात अखंड हरिनाम सप्ताहात काल्याच्या कीर्तनाच्या वेळी बोलत होते.

बालकृष्णाच्या पायाच्या स्पर्शाने यमुनेचा पूर ओसरणे, पुतना मावशीचा वध, कालिया मर्दन, असे भगवंताच्या लीलेचे प्रसंग ह.भ.प. बांद्रे महाराजांनी या कीर्तनातून  भावपूर्ण मांडले.

‘कीर्तनात उपजोनिया पुढती येऊ । काला खाऊ दहीभात ।।’ या तुकोबारायांच्या अभंगावर निरुपण केले. या सप्ताहात ज्ञानेश्वरी पारायण, महिला मंडळांची भजने, श्री देव गोपाळकृष्ण पालखीचा छबिना आणि महाप्रसाद अशा कार्यक्रमांनी हरिनाम सप्ताह भावपूर्ण वातावरणात साजरा झाला. या कार्यक्रमाचा लाभ शेकडो भाविकांनी घेतला. कार्यक्रमाचे नियोजन मंडळाच्या कार्यकर्त्यानी नेटकेपणाने केले होते.

‘सनातन प्रभात’चे कार्य मोलाचे ! – ह.भ.प. मोहन बांद्रे महाराज

‘सनातन प्रभात’चे जागृतीचे कार्य आहे; म्हणून समाजात आज चांगले चित्र दिसत आहे. कार्य मोलाचे आहे, असेच चालू राहूदे !, असा अभिप्राय ह.भ.प. मोहन बांद्रे यांनी साधकांशी चर्चा करतांना दिला.