(लेखांक ७)
आजच्या धावपळीच्या जीवनशैलीत अनेक स्त्रिया ‘हार्मोनल’ असंतुलनाच्या समस्येला सामोर्या जात आहेत. पाळी अनियमित होणे, वजन अचानक वाढणे किंवा न्यून होणे, चेहर्यावर मुरूम येणे, केस गळणे, पाळीतील वेदना, सतत थकवा, चिडचिड किंवा झोपेचा त्रास अशी लक्षणे अनेकदा ‘हार्मोनल’ असंतुलनाशी संबंधित असतात; मात्र बहुतांश वेळा या तक्रारी वेगवेगळ्या स्वरूपात दिसत असल्याने मूळ कारण लक्षात येत नाही. आयुर्वेद या सर्व लक्षणांकडे शरिरातील अंतर्गत संतुलन बिघडल्याचे संकेत म्हणून पहातो.
लेखांक ६ वाचण्यासाठी क्लिक करा → https://sanatanprabhat.org/marathi/1019364.html
१. ‘हार्मोनल’ असंतुलन म्हणजे काय ?
आयुर्वेदाच्या दृष्टीने ‘हार्मोनल’ असंतुलन, म्हणजे केवळ एखाद्या ग्रंथीचा आजार नसून दोष, धातू आणि अग्नी यांचा समतोल बिघडलेला असणे होय. वातदोष वाढल्यास पाळी अनियमित होणे, चिंता, झोप न लागणे, अशी लक्षणे दिसतात. पित्तदोष प्रबळ झाल्यास चिडचिड, अधिक उष्णता वाढणे, मुरूम, पुष्कळ रक्तस्राव होऊ शकतो. कफदोष वाढल्यास वजन वाढणे, सूज, आळस, पाळी उशिरा येणे किंवा ‘पॉलीसिस्टिक ओवॅरीयन डिसिज (PCOD)’ यांसारख्या समस्या निर्माण होऊ शकतात. त्यामुळे प्रत्येक महिलेमध्ये ‘हार्मोनल’ असंतुलनाचे स्वरूप वेगळे असते.

२. आयुर्वेद आणि घरगुती उपचार
चिकित्सेचा विचार करतांना आयुर्वेद लक्षणांपेक्षा मूळ कारणावर भर देतो. पचनशक्ती कमकुवत असणे, अयोग्य आहार, सततचा मानसिक ताण, अपुरी झोप आणि व्यायामाचा अभाव हे ‘हार्मोनल’ असंतुलन वाढवणारे महत्त्वाचे घटक मानले जातात. त्यामुळे उपचार केवळ औषधांपुरते मर्यादित न ठेवता आहार, दिनचर्या आणि मनःस्वास्थ्य यांचा एकत्रित विचार केला जातो. शरिरातील अग्नी सुधारला, तर हळूहळू ‘हार्मोनल’ कार्यही संतुलित होण्यास साहाय्य होते.
घरगुती पातळीवर नियमित वेळेला जेवण, हलका आणि सुपाच्य (पचायला सोपा) आहार, गरम पाणी पिण्याची सवय, योग्य विश्रांती अन् तणाव न्यून करण्याचे उपाय उपयुक्त ठरतात. सतत उपवास, अतीउपाशीपणा, जंक फूड किंवा झोपेची अनियमित वेळ यांमुळेही ‘हार्मोनल’ समस्या वाढू शकते. जर लक्षणे दीर्घकाळ टिकून रहात असतील, पाळी पूर्णपणे बंद होत असेल किंवा दैनंदिन जीवनावर परिणाम होत असेल, तर तज्ञ वैद्यांचा सल्ला घेणे आवश्यक ठरते.
३. ‘हार्मोनल संतुलन’ पुन्हा प्राप्त करण्यासाठी…
एकूणच ‘हार्मोनल’ असंतुलन ही आजच्या काळातील सामान्य; पण दुर्लक्ष न करण्यासारखी समस्या आहे. आयुर्वेद शरिराला एकसंध मानून दोष संतुलन, योग्य आहार आणि जीवनशैली यांच्या माध्यमातून नैसर्गिकरित्या सुधारणा घडवण्याचा मार्ग दाखवतो. संयम आणि सातत्य ठेवल्यास ‘हार्मोनल संतुलन’ पुन्हा प्राप्त करणे शक्य होते.
– वैद्या (सौ.) सारिका नीलेश लोंढे, निर्विकार आयुर्वेद हॉस्पिटल, भोसरी, पुणे.
लेखांक ८ वाचण्यासाठी क्लिक करा → https://sanatanprabhat.org/marathi/1024419.html


उन्हाळा इतका तीव्र का होत आहे ? विदेशी झाडे का नको ?
परीक्षांमधील प्रश्नपत्रिका फुटण्यामुळे विद्यार्थांच्या आणि समाजाच्या भवितव्याविषयी प्रश्नचिन्ह !
धर्म काटेकोर आचरण्याचे महत्त्व !
आहारात साखर, तेल अल्प करा आणि व्यायामावर भर द्या ! – डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री
देवाला नैवेद्य दाखवून स्वतःच खायचा ! काय अर्थ आहे मग त्या नैवेद्य दाखवण्याचा ?