इस्रायलची घातक गुप्तहेर संघटना ‘मोसाद’ !

सध्या इराणविरुद्ध अमेरिका-इस्रायल यांच्या युद्धामध्ये इसायलची गुप्तहेर संघटना ‘मोसाद’ महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आहे. यानिमित्ताने ‘मोसाद’विषयी जाणून घेत आहोत. २२ मार्च या दिवशी प्रसिद्ध झालेल्या लेखात आपण ‘अयातुल्ला खामेनी यांची सुरक्षा, प्रत्यक्ष अचूक आक्रमण आणि इस्रायलकडून इराणच्या प्रमुखांच्या एका मागोमाग एक हत्या’, यांविषयी वाचले. आज या लेखाचा पुढील भाग येथे देत आहोत.

(टीप : मोसाद – मूळ हिब्रु शब्द त्याचा अर्थ ‘सेंट्रल इन्स्टिट्यूट फॉर इंटेलिजन्स अँड स्पेशल ऑपरेशन्स’)

भाग २ 

भाग १ वाचण्यासाठी क्लिक करा → https://sanatanprabhat.org/marathi/1021003.html

१. घातक गुप्तहेर संघटनेने घडवून आणला अयातुल्ला खामेनी यांचा मृत्यू !

१ मार्च २०२६ या दिवशीच्या सकाळी इराणने अधिकृतपणे त्यांचे सर्वाेच्च धार्मिक नेते अयातुल्ला खामेनी यांच्या मृत्यूची पुष्टी केली. देशात ४० दिवसांचा दुखवटा घोषित करण्यात आला; मात्र तेहरानच्या रस्त्यांवर संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या. एकीकडे शोक करणारे लोक, तर दुसरीकडे अनेक इराणी नागरिक फटाके फोडून आणि नाचून आनंद साजरा करत होते. खामेनी यांना मारण्याची ही मोहीम इतिहासातील सर्वांत मोठी लक्ष्यित आक्रमण ठरली. यातून हे सिद्ध झाले की, कोणताही बंकर पुरेसा खोल नाही आणि कोणतीही सुरक्षाव्यवस्था अमेरिकी अन् इस्रायली गुप्तचर यंत्रणांच्या आवाक्याबाहेर नाही.

श्री. यज्ञेश सावंत, सहसंपादक, दैनिक ‘सनातन प्रभात’

मोसादविषयी जगभर ‘अप्रूप’ आहे. भले अमेरिकेची ‘सीआयए’ जगातील सर्वांत मोठी आणि पुष्कळ आर्थिक प्रावधान, मनुष्यबळ, जगभरातील जाळे या दृष्टीने ‘क्रमांक १’ची गुप्तहेर संघटना असली, तरी अतिशय अचूक अन् घातक, तसेच आव्हानात्मक कारवायांसाठी ‘मोसाद’चा क्रमांक अग्रभागी आहे. काही गोष्टींची कल्पनाही करता येणार नाही, अशा गोष्टी या गुप्तहेर संघटनेने साध्य केल्या आहेत. त्या त्या देशातील गुप्तहेर संघटना त्या त्या भागात शक्तीशालीच आहेत. उदाहरणार्थ भारताची ‘रॉ’ ही संघटना; मात्र काही गुप्तहेर संघटना आंतरराष्ट्रीय कारवायांसाठी महत्त्वाच्या आहेत. त्या दृष्टीने त्यांचे मूल्यमापन करावे लागते.

जगात सैन्य कारवाईची चर्चा मोठी होते; मात्र या सैन्य अन् कमांडो कारवाया करण्यामागील जी सखोल आणि काही प्रमाणात अतिशय महत्त्वाची माहिती असते, ती गोळा करणे, त्याचे विश्लेषण करणे अन् त्यातून योजना सिद्ध करणे, हे मोठे काम गुप्तचर संघटनेचे असते. इस्रायलकडे ‘अमन’ आणि ‘शिन बेट’ या अन्य गुप्तहेर संघटना सैन्य गुप्तचर अन् विशिष्ट मोहिमा यांसाठी कार्यरत आहेत.

२. मोसादच्या स्थापनेमागील इतिहास

वर्ष १९३० च्या दशकात जेव्हा हिटलरची ज्यूविरोधी लाट शिखरावर होती, तेव्हा ज्यू लोकांनी स्वतःच्या संरक्षणासाठी भूमीचा तुकडा मागण्यास आणि स्वतःचे राष्ट्रवादी सरकार स्थापन करण्यास प्रारंभ केला. सततच्या छळामुळे ज्यू लोक पॅलेस्टाईनच्या दिशेने स्थलांतरित होऊ लागले; पण तिथे आधीच अरबी लोकसंख्या अधिक होती, त्यामुळे ज्यूंचे तिथे रहाणे त्यांना मान्य नव्हते. परिणामी तिथेही ज्यूविरोधी दंगली प्रारंभ झाल्या. वर्ष १९३० च्या सुमारास ब्रिटिशांनीही ज्यूविरोधी धोरणे स्वीकारली. यामुळे ज्यू लोकांचा संयम सुटला आणि वर्ष १९३० च्या मध्यापर्यंत काही लहान ज्यू लढाऊ गटांनी पूर्णपणे लष्करी संघटना स्थापन केल्या. या संघटनांपैकी एक होती ‘हगाना’ ! या संस्थेचे एक ध्येय होते ‘इस्रायल’ या स्वतंत्र ज्यू राष्ट्राची निर्मिती ! यासाठी त्यांनी ‘इस्रायली स्वातंत्र्य चळवळ’ चालू केली. यामुळे ठिकठिकाणी निदर्शने आणि दंगली झाल्या, ज्यामुळे ब्रिटीश त्रस्त झाले. अखेर वर्ष १९४८ मध्ये ब्रिटिशांनी इस्रायल सोडण्याचा निर्णय घेतला आणि त्याच वेळी संयुक्त राष्ट्रांनी एक ठराव संमत केला. या फाळणीच्या ठरावानुसार इस्रायलला शेवटी एक स्वतंत्र राष्ट्र म्हणून घोषित करण्यात आले. अशा प्रकारे इस्रायलला स्वातंत्र्य मिळाले.

इस्रायलला आखाती देशांमध्ये टिकून रहायचे असेल, तर त्यांना एका बळकट सुरक्षायंत्रणेची आवश्यकता होती. त्यांनी ‘हगाना’च्या माध्यमातून अशी यंत्रणा आधीच सिद्ध केली होती; पण तिला कोणताही अधिकृत दर्जा नव्हता. म्हणूनच वर्ष १९५१ मध्ये ‘मोसाद’ला अधिकृत दर्जा देण्यात आला.

३.  ६ दिवसांचे युद्ध आणि ‘माेसाद’चे जगभर नाव

‘मोसाद’ला स्वतःची क्षमता सिद्ध करण्याची संधी वर्ष १९६७ मध्ये मिळाली. १९६७ मध्ये इजिप्त, सीरिया, जॉर्डन आणि इराक यांसारख्या सर्व अरब राष्ट्रांनी एकत्र येऊन इस्रायलविरुद्ध युद्ध पुकारले. त्यांचे ध्येय एकच होते, ‘इस्रायलला जगाच्या नकाशावरून पुसून टाकणे.’ हे मोठे आणि अचानक ओढवलेले संकट होते; पण इस्रायलच्या सैन्याने तशी सिद्धता केली होती. इस्रायलच्या वैमानिकांना नक्की काय घडणार आहे ? याची पूर्ण कल्पना होती.

इस्रायली वैमानिकांकडे अरब देशांच्या सर्व ३२ तळांची मिनिटागणिक माहिती होती. कुठे, कधी आणि कसे आक्रमण करायचे ? याचे अचूक नियोजन त्यांच्याकडे होते. एका इस्रायली एजंटने (गुप्तहेराने) चक्क अरब नागरिक बनून इजिप्शियन सैन्याच्या एका तुकडीची दिशाभूल केली. त्यांना ‘योग्य रस्ता’ दाखवण्याचे नाटक करून त्याने संपूर्ण सैन्याला थेट ‘युद्धबंदी’ सेलपर्यंत पोचवले, म्हणजेच कोणतीही लढाई न लढता त्यांना थेट तुरुंगात पाठवले !

अशा जबरदस्त गुप्तचर यंत्रणेमुळे इस्रायलने केवळ ६ दिवसांत सर्व अरब देशांना एकट्याने हरवलेच नाही, तर त्यांचे प्रदेशही कह्यात घेण्यास प्रारंभ केला. ‘मोसाद’साठी हा एक अभूतपूर्व विजय होता. या विजयानंतर संपूर्ण जगाची नजर ‘मोसाद’कडे वळली.

४. ॲडॉल्फ आयकमनचे प्रसिद्ध अपहरण

‘मोसाद’ने आपल्या इतिहासात एकापेक्षा एक प्रगत आणि गुप्त मोहिमा यशस्वीपणे राबवल्या आहेत. ॲडॉल्फ आयकमनचे प्रसिद्ध अपहरण हे त्यापैकी एक ! हिटलरच्या मृत्यूनंतर काही नाझी कमांडर मारले गेले, तर काही भूमीगत झाले. त्यापैकीच एक होता क्रूरकर्मा ॲडॉल्फ आयकमन, ज्याला ‘ज्यू होलोकॉस्टचा आर्किटेक्ट’ मानले जाते. वर्ष १९६० मध्ये ‘मोसाद’ने त्याला अर्जेंटिनामध्ये शोधून काढले. त्याचा दिनक्रम अभ्यासून त्याला त्याच्या घरापाशीच चारचाकीतून अपहरण करून इस्रायलला आणले. तिथे ज्यूंच्या हत्येप्रकरणी त्याच्यावर खटला चालवण्यात आला. या अपहरणाची अर्जेंटिना सरकारला पुसटशी कल्पनाही लागली नाही.

५. म्युनिक हत्याकांड आणि सूडाग्नी !

‘मोसाद’ची आणखी एक गुप्त मोहीम ज्याने या संस्थेचे नाव इतिहासात अजरामर केले, ती म्हणजे वर्ष १९७२ चे जर्मनीतील म्युनिक हत्याकांड ! इस्रायलचे ११ खेळाडू ऑलिंपिकमध्ये सहभागी होण्यासाठी म्युनिक शहराच्या ‘ऑलिंपिक व्हिलेज’मध्ये गेले होते; पण सर्वांच्या डोळ्यांत धूळ फेकत पॅलेस्टाईनचे काही आतंकवादी तिथे घुसले आणि त्यांनी सर्वच्या सर्व ११ इस्रायली खेळाडूंची हत्या केली. सूड म्हणून ‘मोसाद’ने या मारेकर्‍यांचा जगभर शोध घेतला आणि त्यांना अशा वेदनादायक पद्धतीने मारले की, जगभरात ‘मोसाद’च्या नावाची दहशत निर्माण झाली. कुणाच्या बेडखाली बाँब लावला, तर कुणाच्या डोक्यात १२ गोळ्या झाडल्या – ११ गोळ्या प्रत्येक खेळाडूच्या बदल्यात आणि एक गोळी इस्रायली सरकारकडून !

६. ऑपरेशन थंडरबोल्ट

‘ऑपरेशन थंडरबोल्ट’ ज्याला ‘एन्टेबे बचाव मोहीम’ म्हणूनही ओळखले जाते, ही इस्रायली संरक्षण दलाने ४ जुलै १९७६ या दिवशी युगांडामध्ये राबवलेली एक अत्यंत धाडसी आणि यशस्वी लष्करी मोहीम होती. २७ जून १९७६ या दिवशी ‘एअर फ्रान्स’चे विमान (फ्लाईट १३९) इस्रायलमधील तेल अविववरून पॅरिसला जात होते. अथेन्समध्ये थांबलेले असतांना पॅलेस्टिनी आणि जर्मन आतंकवाद्यांनी या विमानाचे अपहरण केले. आतंकवाद्यांनी हे विमान युगांडातील एन्टेबे या काही सहस्र कि.मी. दूरवरील विमानतळावर नेले. तिथे त्यांना युगांडाचा हुकूमशाह इदी अमीन याचा पाठिंबा मिळाला. आतंकवाद्यांनी विमानातील इस्रायली आणि ज्यू प्रवाशांना वेगळे केले अन् इतर प्रवाशांना सोडून दिले. त्यांच्या बदल्यात त्यांनी इस्रायल आणि इतर देशांतील कारागृहात असलेल्या ५३ आतंकवाद्यांच्या सुटकेची मागणी केली. मागणी पूर्ण न झाल्यास ओलीस ठेवलेल्या प्रवाशांना मारण्याची धमकी दिली. इस्रायल सरकारने आतंकवाद्यांशी वाटाघाटी करण्याचे नाटक केले, जेणेकरून सैन्य सिद्धतेसाठी वेळ मिळेल.

‘ऑपरेशन थंडरबोल्ट’मधील एक क्षण

इस्रायलपासून युगांडाचे अंतर अनुमाने ४ सहस्र किलोमीटर होते. एवढ्या लांब जाऊन गुप्तपणे आक्रमण करणे, हे तांत्रिकदृष्ट्या कठीण होते. इस्रायली कमांडोंनी एन्टेबे विमानतळाची प्रतिकृती सिद्ध करून सराव केला. ही अत्यंत कठीण मोहीम होती; कारण इदी अमीन स्वत: इस्रायलचा विरोधक, त्यात विमानतळावर युगांडाच्या सैन्याची एक तुकडीही होती. ४ जुलै १९७६ मध्ये मध्यरात्री इस्रायलची ‘सी-१३० हर्क्युलिस’ ही ४ विमाने अत्यंत अल्प उंचीवरून उडत रडारला चुकवत युगांडात पोचली. इदी अमीन ज्या प्रकारच्या काळ्या मर्सिडीजमधून फिरायचा, तशीच एक गाडी विमानातून बाहेर आली, त्यामुळे युगांडाचे सैनिक इदी अमीन आले, असे वाटले; मात्र येथे एक चूक झाली की, इदी अमीन यांनी काही दिवसांपूर्वी त्यांची काळी मर्सिडिज पालटून पांढर्‍या रंगाचे चारचाकी घेतली होती आणि येथे काही सैनिकांना संशय आल्यावर त्यांनी हटकले; मात्र तेव्हा इस्रायलच्या कमांडोंनी गोळीबार चालू केला. कमांडोंची दुसरी तुकडी थेट प्रवाशांना अपहरण करून ठेवलेल्या विमानतळावरील इमारतीत पोचली. हिब्रूमध्ये त्यांनी इस्रायलचे सैन्य असून प्रवाशांना खाली बसण्यास सांगितले आणि जे बसले नाहीत, त्यांना तेथेच ठार केले.

अन्य तुकडीने विमानतळावरील युगांडाची सर्व विमाने नष्ट केली आणि सैनिकांना ठार केले. समवेत आणलेल्या चौथ्या विमानात जिवंत राहिलेल्या प्रवाशांना बसवून त्यांना सुखरूपपणे मायदेशी आणण्यात आले. या चकमकीत सर्व आतंकवादी आणि युगांडाचे ४५ सैनिक मारले गेले. या मोहिमेत इस्रायलचे केवळ एक कमांडो हुतात्मा झाले, त्यांचे नाव योनातन नेतान्याहू !

७. इराणच्या अणूशास्त्रज्ञाला दूरवरून तंत्रज्ञानाद्वारे मारणे

वर्ष २००९ मध्ये एका ब्रिटीश वृत्तपत्राने इराण सरकारचे एक गुप्त कागद उघड केला. यामध्ये स्पष्टपणे नमूद केले होते की, इराणची एक संस्था गुप्तरित्या एका अण्वस्त्र कार्यक्रमावर काम करत आहे. या बातमीने अमेरिका आणि इस्रायल हादरली ! दोन्ही देशांमध्ये इराणचा अणू कार्यक्रम नष्ट करण्यासाठी एक प्रकारची शर्यतच चालू झाली. मोहसेन फखरिजादे हे वर्ष १९९३ ते २००३ पर्यंत इराणच्या एका मोठ्या गुप्त अणू कार्यक्रमाचे नेतृत्व करत होते. अमेरिका आणि इस्रायल या दोन्ही देशांच्या अनेक प्रयत्नांनंतर वर्ष २०२० मध्ये कोरोना महामारीच्या काळात ‘मोसाद’ने मोहसेन फखरिजादेचा मागोवा घेतला. ८ महिने त्यांच्यावर पाळत ठेवली. त्याच्या हालचालींचा अभ्यास केला गेला आणि शेवटी २७ नोव्हेंबरला त्यांना एक संधी मिळाली.

‘मोसाद’ने महामार्गाच्या कडेला स्वत:चे एक ‘निसान’ आस्थापनाचे मालवाहू वाहन (पिकअप ट्रक) उभा केला. त्यामध्ये ‘एआय’ (कृत्रिम बुद्धीमत्ता) तंत्रज्ञानयुक्त आणि उपग्रहाद्वारे चालवली जाणारी मशीनगन बसवण्यात आली होती. जेव्हा मोहसेन त्या महामार्गावरून जात होते, तेव्हा मोसादच्या एजंट्सनी १ सहस्र कि.मी. दूर इस्रायलमधून ती मशीनगन यशस्वीरित्या चालवली. मोहसेन याच्यावर १३ गोळ्या झाडल्या गेल्या, त्याही इतक्या अचूकपणे की, त्यांच्यापासून अवघ्या १० इंचावर बसलेल्या त्यांच्या पत्नीला साधे ओरखडेही आले नाहीत.

त्यानंतर जशी मोहसेन याचा सुरक्षा चमू त्या ‘निसान’ वाहनाच्या दिशेने गेला, तसा मोठा स्फोट झाला आणि ती व्हॅन पूर्णपणे उडून गेली, जेणेकरून मागे कोणताही पुरावा उरणार नाही. इस्रायली एजंट्सनी उपग्रह नियंत्रित मशिनगन वापरून ही हत्या अत्यंत कौशल्याने केली, जी अमेरिकेलाही जमली नव्हती.

अशा एका मागून एक यशस्वी मोहिमा ‘मोसाद’ने राबवल्या. यामुळे जगातील महासत्तांचे लक्ष्य ‘मोसाद’वर पडले.

(क्रमशः पुढच्या रविवारी)

श्री गुरुचरणार्पणमस्तु ।

– श्री. यज्ञेश सावंत, सहसंपादक, दैनिक ‘सनातन प्रभात’, पनवेल. (२५.३.२०२६)

भाग ३ वाचण्यासाठी क्लिक करा → https://sanatanprabhat.org/marathi/1026234.html