इस्रायलची गुप्तचर यंत्रणा ‘मोसाद’चे जगासह भारताला साहाय्य !

२९ मार्च या दिवशीच्या लेखात ‘मोसाद’ या इस्रायलच्या गुप्तहेर संस्थेने तिच्या स्थापनेपासून केलेले काही पराक्रम पाहिले. हे काही मोजकेच पराक्रम दिले होते, जेणेकरून ‘मोसाद’ कोणत्या थरापर्यंत जाऊन कार्य करू शकते ? हे लक्षात येईल. ‘मोसाद’ जगातील सर्वांत घातक गुप्तहेर संघटना मानली जाते. ‘युद्ध करून नाही, तर बुद्धीने विजय मिळवणे’, हे त्यांचे सूत्र आहे.

भाग ३ 

भाग २ वाचण्यासाठी क्लिक करा → https://sanatanprabhat.org/marathi/1023559.html

१. ‘मोसाद’कडून अमेरिकेची गुप्तचर यंत्रणा ‘सीआयए’च्या हेरांना प्रशिक्षण 

अमेरिकेची गुप्तचर यंत्रणा ‘सीआयए’च्या गुप्तहेरांना प्रशिक्षण ‘मोसाद’कडूनच मिळाले आहे. वर्ष १९५९ मध्ये ‘ऑपरेशन डायमंड’ नावाची मोहीम राबवली. त्या वेळी ‘सोव्हिएत युनियन’ने ‘मिग-२१’ हे प्रगत लढाऊ विमान बनवले होते. ‘सीआयए’ आणि ब्रिटीश गुप्तचर संस्था यांना ते चोरण्यात अपयश आले होते; पण ‘मोसाद’ने एका वैमानिकाला स्वत:च्या जाळ्यात ओढून ते संपूर्ण लढाऊ विमान इस्रायली तळावर उतरवायला लावले आणि अमेरिकेला त्याचा अभ्यास करण्याची संधी दिली. ही इस्रायलसाठी मोठी उपलब्धी होती.

अमेरिकेने ‘लिबरेट इराक’ (इराकला स्वातंत्र्य मिळवून देणे) मोहीम चालू केली होती. सद्दाम हुसेनचे सरकार पाडण्यासाठी अमेरिकेला प्रशिक्षणाची आवश्यकता होती, जे ‘मोसाद’ने दिले. रस्त्यावरील बाँबस्फोट आणि आत्मघाती आक्रमणे यांपासून वाचण्यासाठी अमेरिकेने इस्रायलकडून प्रगत तंत्रज्ञान घेतले. जानेवारी २००३ मध्ये पेंटागॉनची ‘टीम’ तेल अविवमध्ये आली, जिथे ‘मोसाद’ने त्यांना गनिमी कावा आणि शहरी युद्धाचे धडे दिले.

अगदी अलीकडे, म्हणजे वर्ष २०२० मध्ये अमेरिकेने ‘मोसाद’च्या साहाय्याने इराणचे मेजर जनरल कासिम सुलेमानी यांची हत्या केली. सुलेमानी यांनी प्रवासात तीनदा भ्रमणभाष क्रमांक पालटूनही ‘मोसाद’ने तेल अविवमध्ये बसून त्यांचा अचूक मागोवा घेतला. अमेरिकेने ड्रोनद्वारे त्यांच्यावर बाँब फेकून त्यांना ठार केले. हा इराणसह जगासाठीही धक्का होता. त्यामुळे असे म्हटले जाते की, एकदा एखाद्याचे नाव ‘मोसाद’च्या ‘हिट लिस्ट’मध्ये (‘लक्ष्य सूची’मध्ये) आले की, त्याचे वाचणे अशक्य असते.

‘मोसाद’चे भारताला साहाय्य

पंतप्रधान मोदींच्या सुरक्षेचे उत्तरदायित्व ‘मोसाद’कडेच

आज इस्रायलचे भारताशीही पुष्कळ चांगले संबंध आहेत. इस्रायलने ‘कुहाटा प्लान’ अंतर्गत पाकिस्तानचा अणूप्रकल्प उघड केला होता. वर्ष २०१५ मध्ये जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी तुर्कीयेला गेले होते, तेव्हा त्यांच्या सुरक्षेचे उत्तरदायित्व ‘मोसाद’कडेच होते. 

– श्री. यज्ञेश सावंत

२. ‘मोसाद’ : गुप्त कारवायांची ‘मास्टरमाईंड’ (मुख्य सूत्रधार)

जेव्हा शत्रूराष्ट्राच्या सर्वोच्च नेत्याला किंवा आतंकवाद्याला लक्ष्य करायचे असते, तेव्हा ‘मोसाद’ अत्यंत गुप्त आणि अत्याधुनिक तंत्रज्ञान यांचा वापर करते.

श्री. यज्ञेश सावंत

अ. मोहिमेची पूर्वसिद्धता : कोणतीही मोठी मोहीम राबवण्यापूर्वी अनेक वर्षे नियोजन केले जाते.

आ. खबर्‍यांद्वारे माहिती मिळवणे : शत्रूच्या गोटात स्वतःचे खबरे पेरले जातात. इराणचे सर्वाेच्च धार्मिक नेते अयातुल्ला खामेनी यांची हत्या करण्यात आली. खामेनी यांच्या अगदी जवळच्या वर्तुळातील लोकांमध्येही या खबर्‍यांचा समावेश असू शकतो.

इ. सिग्नल इंटेलिजन्स : ‘सॅटेलाईट फोन’ (उपग्रहांवर आधारित भ्रमणभाष), ‘एनक्रिप्टेड’ (गुप्त सांकेतिक) संदेश आणि इंटरनेट हालचाली यांवर २४ घंटे लक्ष ठेवले जाते.

ई. संगणकीय प्रणालींचा वापर : ‘पेगासस’सारखे ‘स्पायवेअर’ (गुप्त संगणकीय प्रणाली) वापरले जाते. संबंधिताचा भ्रमणभाष पूर्णपणे ‘हॅक’ करून त्याचे ‘माईक’ आणि छायाचित्रक दूरवरून नियंत्रित करणे शक्य होते.

उ. ‘एआय’द्वारे नियंत्रित बंदूक : इराणचे अणूशास्त्रज्ञ मोहसेन फखरीजादेह यांना मारण्यासाठी ‘मोसाद’ने ‘सॅटेलाईट’द्वारे नियंत्रित होणारी आणि ‘एआय फेस रेकग्निशन’ (कृत्रिम बुद्धीमत्तेच्या साहाय्याने चेहरा ओळखणे) असलेली स्वयंचलित बंदूक वापरली होती.

ऊ. लहान ड्रोन वापरणे : हे ड्रोन थेट खिडकीतून घरात वा कार्यालयात शिरून स्फोट घडवू शकतात.

३. ‘मोसाद’ची ‘टार्गेटेड किलिंग’ची (लक्ष्य ठरवून हत्या करण्याची) पद्धत ‘मोसाद’कडून गोपनीय मोहिमेत काही टप्पे पार पाडले जातात

अ. सिग्नल इंटेलिजन्स आणि पाळत : ‘मोसाद’ ही ‘युनिट ८२००’ नावाच्या ‘सायबर विंग’चा वापर करते. हे युनिट जगातील कोणत्याही कोपर्‍यातील भ्रमणभाषचे संपर्क, ई-मेल किंवा संदेश वाचू / ऐकू शकते. नेत्यांच्या हालचालींचा ‘पॅटर्न’ (ते कुठे जातात-येतात, दिनक्रम इत्यादी) समजून घेण्यासाठी ‘सॅटेलाईट इमेजरी’चा वापर केला जातो.

आ. सायबर आक्रमण आणि पेजर तंत्रज्ञान : नुकतेच लॅबेनॉनमध्ये ‘हिजबुल्ला’ या आतंकवादी संघटनेच्या विरोधात ‘मोसाद’ने ‘पेजर’ (लघुसंदेशाचे यंत्र) आणि ‘वॉकी-टॉकी’ (बिनतारी यंत्रणा) यांच्याद्वारे स्फोटांचे तंत्र वापरले. सहस्रो उपकरणांमध्ये लपवलेली अल्प प्रमाणातील स्फोटके एका विशिष्ट सिग्नलद्वारे एकाच वेळी उडवण्यात आली. शत्रूच्या संपर्काच्या साधनांचेच शस्त्रात रूपांतर करणे, हे ‘मोसाद’चे वैशिष्ट्य आहे.

इ. बंकर बस्टर बाँब : जर एखादा आतंकवादी गटाचा प्रमुख अथवा इस्रायलचा शत्रू भूमीखालील खोल बंकरमध्ये लपला असेल, तर ‘मोसाद’ आणि इस्रायली वायूसेना ‘बंकर बस्टर’ बाँबचा वापर करतात. हे बाँब भूमीच्या अनेक फूट खाली जाऊन स्फोट घडवतात, ज्यामुळे संपूर्ण इमारत किंवा बंकर कोसळतो.

इराणचा अणू कार्यक्रम हा इस्रायलसाठी अस्तित्वाचा प्रश्न आहे. ‘मोसाद’ने हा कार्यक्रम रोखण्यासाठी प्रत्यक्ष युद्धाऐवजी ‘छुप्या युद्धा’चा मार्ग निवडला आहे. यात त्यांनी सायबर आक्रमणे, शास्त्रज्ञांच्या हत्या आणि अत्याधुनिक तंत्राचा वापर केला आहे.

इस्रायल आणि छत्रपती शिवाजी महाराज


इस्रायलचे भारतातील अधिकारी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी तज्ञांना विचारून माहिती गोळा करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांनी इस्रायलमधील एका रस्त्याला छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव देण्याचा प्रस्ताव तेथील शासनाकडे मांडला होता. काही इस्रायली संरक्षण तज्ञांच्या मते ‘डोंगराळ भागात अल्प सैन्यानिशी मोठे युद्ध कसे जिंकावे ? याचे सर्वोत्तम उदाहरण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज !’ इस्रायलचे अनेक माजी सैन्य अधिकारी आणि नेते भारताला भेट देतात, तेव्हा ते अनेकदा रायगड किंवा शिवकालीन गडांना भेट देऊन महाराजांच्या युद्धनीतीविषयी आदर व्यक्त करतात.

– श्री. यज्ञेश सावंत

४. इराणच्या अणू कार्यक्रमाला अनेक प्रकारे खीळ घालण्याचा प्रयत्न  

अ. ‘व्हायरस’द्वारे सायबर आक्रमण : वर्ष २०१० मध्ये ‘मोसाद’ आणि ‘सीआयए’ यांनी एकत्रितपणे इराणच्या ‘नतान्झ’ अणूकेंद्रावर एक अत्यंत वेगळ्या प्रकारचे सायबर आक्रमण केले. त्यांनी एक संगणक ‘व्हायरस’ असा सिद्ध केला की, जो इंटरनेटविनाही पसरू शकत होता. हा ‘व्हायरस’ एका ‘पेनड्राईव्ह’द्वारे अणूकेंद्राच्या यंत्रणेमध्ये घुसवण्यात आला.

या व्हायरसने युरेनियम शुद्ध करणार्‍या ‘सेंट्रीफ्युज’ यंत्राचा वेग अनियंत्रित केला, ज्यामुळे जवळजवळ १ सहस्र यंत्रे स्वतःहून फुटून नष्ट झाली. इराणचा अणू कार्यक्रम यामुळे अनेक वर्षे मागे पडला.

आ. अणूशास्त्रज्ञांच्या पद्धतशीर हत्या : इराणकडे अण्वस्त्र सिद्ध करण्याचे ज्ञान राहू नये, यासाठी ‘मोसाद’ने त्यांच्या मुख्य शास्त्रज्ञांना लक्ष्य केले. वर्ष २०१०-१२ या कालावधीत तेहरानच्या रहदारीमध्ये दुचाकीवरून जाणार्‍या व्यक्तींनी शास्त्रज्ञांच्या कारला ‘मॅग्नेटिक बाँब’ चिकटवून त्याचे स्फोट घडवले.

इ. तेहरानमधील ऐतिहासिक कागदपत्रे आणि सीडी (ध्वनीचित्रतबकडी) यांची चोरी : वर्ष २०१८ मध्ये ‘मोसाद’च्या एजंट्सनी तेहरानमधील एका गुप्त गोदामाचे कुलूप तोडून इराणच्या अणू कार्यक्रमाची ५५ सहस्र कागदपत्रे आणि १८३ सी़डीज् चोरल्या. ही सर्व कागदपत्रे त्यांनी रातोरात ट्रकमधून इराणच्या सीमेबाहेर नेली. या कागदपत्रांमुळे जगापुढे सिद्ध झाले की, इराण गुपचूप अण्वस्त्रे बनवण्याचा प्रयत्न करत आहे.

ई. पुरवठा साखळीत बिघाड : इराण जेव्हा अणूप्रकल्पासाठी बाहेरून अत्याधुनिक उपकरणे मागवतो, तेव्हा ‘मोसाद’चे एजंट्स वाटेतच ती उपकरणे पालटतात किंवा त्यात असे दोष निर्माण करतात की, ती बसवल्यानंतर काही दिवसांतच मोठा स्फोट होतो.

५. ‘मोसाद’कडून भारताला वेळोवेळी करण्यात आलेले साहाय्य

भारत आणि इस्रायल यांच्यातील गुप्तहेर संबंध अत्यंत जुने अन् विश्वासाचे आहेत. भारताची गुप्तहेर संघटना ‘रॉ’ आणि इस्रायलची ‘मोसाद’ यांनी अनेकदा पडद्यामागून एकमेकांना मोठे साहाय्य केले आहे. यातील काही प्रमुख मोहिमा खालीलप्रमाणे –

अ. वर्ष १९७१ चे भारत-पाकिस्तान युद्ध : या युद्धाच्या वेळी भारताला शत्रूच्या हालचालींची अचूक माहिती हवी होती. त्या काळात भारताचे इस्रायलशी अधिकृत राजनैतिक संबंध नव्हते. तरीही ‘मोसाद’ने भारताला पाकिस्तानच्या सैन्य हालचालींची उपग्रहाद्वारे काढलेली छायाचित्रे आणि महत्त्वाची माहिती पुरवली होती. यामुळे भारतीय सैन्याला रणनीती आखणे सोपे झाले.

आ. वर्ष १९९९ चे कारगिल युद्ध : कारगिलच्या शिखरांवर पाकिस्तानी घुसखोर सैनिक बसले होते आणि भारतीय ‘बोफोर्स’ तोफांना खालून वर मारा करणे कठीण जात होते. त्यामुळे भारताला तातडीने अत्याधुनिक शस्त्रास्त्रांची आवश्यकता होती. त्याच वेळी अमेरिकेने साहाय्य करण्यास नकार दिला होता; पण इस्रायलने स्वत:च्या ताफ्यातील ‘लेझर गाईडेड बाँब’ आणि ड्रोन तातडीने भारताला दिले. या तंत्रज्ञानामुळे भारतीय वायूसेनेला शत्रूचे बंकर्स अचूकपणे उडवता आले, ज्यामुळे युद्धाचे पारडे भारताच्या बाजूने झुकले.

इ. मुंबईत झालेले २६ नोव्हेंबर २००८ चे आतंकवादी आक्रमण : या आक्रमणाच्या वेळी मुंबईतील ‘नरिमन हाऊस’ (ज्यूंचे केंद्र) आतंकवाद्यांनी कह्यात घेतले होते. ‘मोसाद’ने भारताला तात्काळ त्यांच्या विशेष ‘कमांडो युनिट’चे साहाय्य देऊ केले होते. भारताने कमांडो कारवाई करून ही मोहीम फत्ते केली. ‘मोसाद’ने तांत्रिक माहिती आणि आतंकवाद्यांचे संभाषण पकडण्यामध्ये भारताला मोलाची साथ दिली होती.

ई. काश्मीर मोहीम : काश्मीरमधील आतंकवाद मोडून काढण्यासाठी ‘मोसाद’ने ‘रॉ’च्या एजंट्सना शत्रूच्या वेशात राहून माहिती काढण्याचे विशेष प्रशिक्षण दिल्याचे समजते. ‘मोसाद’चे अधिकारी अनेकदा भारतात येऊन सीमा सुरक्षा आणि गुप्तचर माहिती गोळा करण्याचे आधुनिक तंत्राविषयी अवगत करतात. भारतीय गुप्तचर यंत्रणा ‘रॉ’च्या बांधणीमध्ये ‘मोसाद’ने भारताला पुष्कळ साहाय्य केल्याची माहिती आहे.

६. ‘मोसाद’चे महान गुप्तहेर इली कोहेन

इली कोहेन यांची कथा ही एखाद्या चित्रपटापेक्षाही अधिक थरारक आहे. त्यांना ‘मोसाद’चा सर्वांत महान गुप्तहेर मानले जाते. एका सामान्य माणसाने शत्रूराष्ट्राच्या सर्वोच्च पदापर्यंत मजल मारून संपूर्ण देशाला कसे हतबल केले, याची ही सत्यकथा आहे.

अ. ‘कामेल अमीन साबेथ’ यांचा जन्म : १९६० च्या दशकात इस्रायलला सीरियाच्या सैन्य हालचालींची माहिती हवी होती. त्यासाठी ‘मोसाद’ने इली कोहेन यांची निवड केली आणि त्यांना एक नवी ओळख दिली. त्यांचे नामकरण ‘कामेल अमीन साबेथ’ केले, ते एक श्रीमंत अरब व्यापारी बनले, जे अर्जेंटिनाहून सीरियात परतले होते. इली कोहेन यांनी अर्जेंटिनामध्ये राहून सीरियाच्या नेत्यांशी मैत्री केली आणि वर्ष १९६२ मध्ये ते सीरियाची राजधानी दमास्कस येथे पोचले.

आ. सीरियाच्या सत्तेच्या शिखरावर : इली कोहेन यांनी स्वत:ची बुद्धीमत्ता आणि श्रीमंती यांचा वापर करून सीरियाचे राजकारणी, सैन्य अधिकारी आणि मंत्री यांच्याशी घनिष्ट संबंध निर्माण केले. त्यांनी स्वत:चे राजकीय वलय एवढे मोठे केले की, ते सीरियाचे संरक्षण उपमंत्री होण्याच्या जवळ पोचले होते. त्यांना सीरियाच्या अत्यंत गुप्त अशा ‘गोलान हाईट्स’ सैन्य तळांवर जाण्याची अनुमती मिळाली होती, जिथे कुणाही सामान्य व्यक्तीला प्रवेश नव्हता.

इ. नीलगिरीची झाडे लावण्याचा सल्ला आणि युद्धात विजय : गोलान हाईट्सच्या दौर्‍यावर असतांना इली कोहेन यांनी सीरियाच्या सैन्याला एक ‘सल्ला’ दिला. ते म्हणाले, ‘उन्हात कडक पहारा देणार्‍या सैनिकांसाठी सावली हवी, म्हणून आपण इथे नीलगिरीची झाडे लावूया.’ सीरियाच्या सैन्याला हा सल्ला पुष्कळ आवडला आणि त्यांनी प्रत्येक बंकर अन् तोफ यांच्या मागे एक नीलगिरीचे झाड लावले. परिणामी वर्ष १९६७ च्या ‘६ दिवसांच्या युद्धात’ इस्रायली वायूसेनेला शत्रूचे बंकर्स शोधण्याची आवश्यकताच पडली नाही. जिथे नीलगिरीचे झाड होते, तिथे त्यांनी बाँब टाकले आणि अवघ्या काही घंट्यांमध्ये सीरियाचे सैन्य उद्ध्वस्त केले.

ई. इली कोहेन कसे पकडले गेले ? : इली कोहेन प्रत्येक रात्री स्वत:च्या घरातील रेडिओ ट्रान्समीटरद्वारे इस्रायलला गुप्त माहिती पाठवत असत. जानेवारी १९६५ मध्ये सोव्हिएत युनियनच्या साहाय्याने सीरियाने रेडिओ सिग्नल ट्रॅक करण्याचे आधुनिक तंत्रज्ञान वापरले. जेव्हा इली कोहेन माहिती पाठवत होते, तेव्हा सीरियन सुरक्षा दलाने त्यांच्या घरावर धाड घातली आणि त्यांना रंगेहात पकडले.

उ. इली कोहेन यांचे बलीदान : इली कोहेन यांच्यावर खटला चालवून त्यांना १८ मे १९६५ या दिवशी दमास्कसच्या चौकात जाहीर फाशी देण्यात आली. इस्रायलने त्यांचे प्राण वाचवण्यासाठी पुष्कळ प्रयत्न केले; पण सीरियाने ऐकले नाही. आजही इस्रायलमध्ये त्यांना एका देवाप्रमाणे मानले जाते; कारण त्यांनी दिलेल्या माहितीमुळेच इस्रायलने ‘६ दिवसांचे युद्ध’ जिंकले होते.

‘मोसाद’ आजही अशाच धाडसी एजंट्सच्या जोरावर टिकून आहे. युद्धात केवळ शस्त्रे महत्त्वाची नसतात, तर अचूक माहिती आणि शत्रूच्या गोटात केलेला शिरकाव विजयासाठी पुष्कळ महत्त्वाचा असतो.

(समाप्त)

गुरुचरणार्पणमस्तु । 

– श्री. यज्ञेश सावंत, सहसंपादक, दैनिक ‘सनातन प्रभात’, पनवेल. (३१.३.२०२६)