इराणचे सर्वाेच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांना २८ फेब्रुवारी २०२६ या दिवशी, म्हणजे इराणविरुद्धच्या इस्रायल आणि अमेरिका यांच्या संयुक्त युद्धात ठार करण्यात आले. इराणच्या सर्वाेच्च नेत्याला युद्धाच्या पहिल्याच दिवशी ठार केल्याने जगाला धक्काही बसला. इस्रायल आणि अमेरिका यांचा मोठा विजय झाल्याचे वाटत होते; मात्र इराणने स्वत: दुसर्या दिवशी खामेनी यांच्या हत्येची पुष्टी दिली अन् ४० दिवसांचा दुखवटा घोषित केल्यानंतर या घटनेची निश्चिती झाली. त्यानंतर इराणने याचा सूड घेण्याच्या उद्देशाने जे युद्ध तीव्रतेने चालू केले, त्यामुळे सध्या अमेरिकाही त्रस्त झाली आहे. खामेनी यांना मारण्याचा गुप्त कट आणि इस्रायलची गुप्तहेर संघटना ‘मोसाद’ यांच्याविषयी लेखातून जाणून घेऊया.
भाग १

१. अयातुल्ला अली खामेनी यांची सुरक्षा
अयातुल्ला अली खामेनी हे इराणचे आणि त्यातही शिया मुसलमानांचे सर्वाेच्च नेते अन् धर्मगुरुही मानले जात होते. आखाती देशांमध्ये जे सुन्नीबहुल आहेत, त्यांच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी ते प्रयत्नशील होते. इराणमधील धार्मिक क्रांतीनंतर ते दुसरे अयातुल्ला होते. अयातुल्ला ही धार्मिक-राजकीय पदवी मुसलमान उलेमांमधील अधिक विद्वानांना आणि इराणच्या धार्मिक सर्वाेच्च प्रमुखाला दिली जाते. त्यामुळे साहजिकच त्यांची सुरक्षाव्यवस्थाही प्रचंड मोठी होती. मध्य तेहरानमधील लविझान जिल्ह्यात भूमीखाली अनुमाने ९० ते १०० मीटर खोलवर त्यांचा बंकर (म्हणजे भूमीखाली लपण्यासाठी सुरक्षित जागा) होता. या ठिकाणी उद्वाहनाने पोचण्यासाठी ५ मिनिटांहून अधिक वेळ लागत असे. हा बंकर आधुनिक जगातील कोणत्याही आक्रमणांना तोंड देण्यासाठी सक्षम होता. खामेनींची सुरक्षाव्यवस्था अत्यंत कडक आणि चोख होती. त्यांना भेटायला जाणार्या इराणच्या वरिष्ठ अधिकार्यांनाही डोळ्याला पट्टी बांधून नेले जाई, जेणेकरून इराणच्या नेत्यांनाही तो बंकर नेमका कुठे आहे, हे कळू नये.

२. इस्रायलच्या आक्रमणांनंतर दीर्घकाळ बंकरमध्ये वास्तव्य
जून २०२५ मध्ये इस्रायल आणि इराण यांच्यातील १२ दिवसांच्या युद्धानंतर जेव्हा अमेरिकेच्या ‘बी२ बाँबर्स’ विमानांनी इराणच्या अण्वस्त्र सुविधा नष्ट केल्या, तेव्हा खामेनी अदृश्य झाले. त्यांनी सार्वजनिक जीवनातून पूर्णपणे माघार घेतली आणि तेहरानखालील बंकर अन् बोगदे यांच्या खोलवर जाळ्यात आश्रय घेतला. या ठिकाणी त्यांच्या रहाण्यासाठी उत्तम व्यवस्था आणि तेथूनच इराणचा काही कारभार चालवला जात होता. ज्याप्रमाणे हमासच्या आतंकवाद्यांनी पॅलेस्टाईनमध्ये भूमीखाली बोगद्यांचे जाळे विणले होते, तेथे त्यांची जणू एक शहरच वसवले होते, तसाच भाग तेहरानमध्ये भूमीखाली करण्यात आला होता. बंकरच्या खाली आणखी बंकर असे बंकरच्या थरांच्या खाली त्यांचे वास्तव्य होते.
३. इस्रायलच्या पूर्ण नाशासाठी प्रयत्नशील
अयातुल्ला खामेनी प्रतिदिन ‘इस्रायलचा नाश असो’, असे ‘ट्वीट’ करत असत. इराणचा हा धोका कायमचा संपवण्यासाठी इस्रायल गेल्या एक वर्षापासून अनेक धोकादायक सैनिकी योजना कार्यवाहीत आणत होता. ‘इस्लामिक रिपब्लिक ऑफ इराण’मध्ये लोकशाही आणि धार्मिक सत्तासुद्धा आहे. तेथील राज्यघटनेनुसार इराणच्या सर्वोच्च नेत्याला अंतिम निर्णय घेण्याचा अधिकार प्रदान करण्यात आला आहे, म्हणजेच इराणच्या प्रत्येक गोष्टीत त्यांचा निर्णय अंतिम असतो. खामेनी यांचीच इस्रायलच्या नाशाची मनोकामना असल्यामुळे साहजिकच त्यांचे वैयक्तिक सैन्य, म्हणजे ‘इस्लामिक रिव्हॉल्युशनरी गार्ड कॉर्प्स (आय.आर्.जी.सी.)’ आणि तिन्ही सैन्यदले हे इस्रायलविरुद्ध अखंड कुरापती काढत असतात. त्यामुळे खामेनी यांचा खात्मा करणे, हे इस्रायलसाठी सर्वाेच्च प्राधान्य होते आणि ते त्यांनी साध्य केले. खामेनी यांची प्रत्यक्ष हत्या फेब्रुवारी २०२६ मध्ये झाली असली, तरी त्याविषयीची योजना २ वर्षांपूर्वीच चालू होत्या. खामेनी यांना मारणे, हे इतिहासातील कठीण सैनिकी कारवायांपैकी एक होते; कारण खामेनी राजधानी तेहरानच्या मध्यभागी सुरक्षादलांच्या अनेक थरांनी वेढलेल्या सुरक्षित ठिकाणी होते. ‘एलिट गार्ड्स’, तटबंदी असलेले कंपाऊंड्स, ‘अंडरग्राऊंड बंकर्स’ आणि ‘बॅकअप सिस्टम्स’, जे विशेषतः कोणत्याही प्रकारची आक्रमणे अपयशी ठरवण्यासाठी बनवले जातात. हे सर्व भेदण्यासाठी अत्यंत अचूक अशा आक्रमणाची आणि भेदक बाँबची आवश्यकता असते.
प्रत्यक्ष अचूक आक्रमण

इस्रायलच्या धावपट्टीवर लढाऊ विमाने सिद्ध होती. मूळ योजना ही आदल्या दिवशी रात्रीच्या अंधारात आक्रमण करण्याची होती; मात्र तेव्हाच ‘सीआयए’कडून एक तातडीचा निरोप पाठवून ‘ऑपरेशन’ थांबवण्यास सांगितले गेले. रात्रभर अनिश्चितता होती; पण २८ फेब्रुवारी या दिवशी सकाळी मिळालेल्या संदेशानुसार काही सेकंदांमध्ये लढाऊ विमाने आकाशात झेपावली. सकाळी ९.४० वाजता अनेक इमारतींवर एकाच वेळी आक्रमण करण्यात आले, जेणेकरून सुटकेचा कोणताही मार्ग मिळू नये. या एका ठिकाणी ३० बाँब टाकण्यात आले. या आक्रमणात अयातुल्ला खामेनी यांच्यासह त्यांच्या राजवटीचे सर्व प्रमुख लष्करी नेते एकाच वेळी मारले गेले. त्यानंतर पुढील २४ घंट्यांत इस्रायलने इराणच्या लष्करी कणा मोडित काढण्यासाठी पद्धतशीरपणे १२ बाँब टाकले. या ठिकाणी इस्रायलच्या कारवाईचा वेग एवढा प्रचंड होता की, इराणच्या कोणत्याही सुरक्षाव्यवस्थेला प्रतिकार करण्याची कोणतीही संधीच मिळाली नाही. मुख्य म्हणजे इस्रायलची विमाने सहजतेने लक्ष्यापर्यंत जाण्यासाठी इराणची हवाई सुरक्षा भेदण्याचे काम ‘सीआयए’ने केले होते. त्यामुळे ही लढाऊ विमाने वेगाने आणि विनाअडथळा खामेनी यांच्यापर्यंत पोचू शकली.
– श्री. यज्ञेश सावंत
४. आक्रमणाची योजना
इस्रायलची ‘मोसाद’ ही जगातील अत्यंत घातक गुप्तहेर संघटनांपैकी एक मानली जाते. ‘मोसाद’ आणि अमेरिकेची गुप्तचर संघटना ‘सीआयए’ यांनी खामेनी यांचा खात्मा करण्यासाठी गुप्त कट आखला होता. मोसादच्या मुख्यालयातून सर्व कारवाया करण्यात आल्या. यासाठी उपलब्ध माहितीनुसार इराणच्या रस्त्यांवरील सीसीटीव्ही छायाचित्रक हॅक करून त्यांचे चित्रीकरण मिळवणे. खामेनी आणि त्यांचे सुरक्षादल यांच्या वागण्याच्या पद्धतीचा अभ्यास करण्यात येत होता. युद्धासारख्या परिस्थितीत इराणचे नेतृत्व कशी प्रतिक्रिया व्यक्त करते ? कोण कुणाशी संपर्क साधतो ? ते कोणती पावले उचलतात ? ‘इस्लामिक रिव्हॉल्युशनरी गार्ड कॉर्प्स’ची ‘कमांड चेन’ कशी कार्य करते ? नेतृत्वाच्या जवळ असलेल्या अधिकार्यांच्या कमकुवत बाजू काय आहेत ?
इराणचे सर्वाेच्च नेते अयातुल्ला खामेनी यांची हत्या आणि इस्रायलची गुप्तचर संघटना ‘मोसाद’ !
गुप्त माहिती काढण्यासाठी त्यांना कशा प्रकारे जाळ्यात ओढता येईल ? इत्यादी पुष्कळ माहिती एकत्र करावी लागली. यातूनच ‘मोसाद’ आणि ‘सीआयए’ यांना २८ फेब्रुवारी या दिवशी खामेनी यांचे ठिकाण अचूक शोधता आले. ‘या ठिकाणी वरिष्ठ सैन्य आणि प्रशासकीय अधिकारी यांची गुप्त बैठक होणार होती अन् त्यामध्ये स्वत: खामेनी उपस्थित रहाणार होते’, अशी पक्की माहिती ‘सीआयए’ आणि ‘मोसाद’ यांच्या गुप्तहेरांना मिळाली होती. सर्वच महत्त्वाचे लोक एकत्र सापडण्याची अशी संधी पुष्कळ क्वचित् असते.
५. इस्रायलकडून इराणच्या प्रमुखांच्या एका मागोमाग एक हत्या
इराणकडून ज्यू आणि इस्रायल यांच्या अस्तित्वाला असलेला धोका इराण अन् त्याच्या समर्थित हमास, हिजबुल्ला आणि हुती या आतंकवादी संघटना होत्या. त्यामुळे आक्रमण करायचे, म्हणजे थेट प्रमुखांवरच करायचे, जेणेकरून त्यांचाच खात्मा झाला, तर पूर्ण व्यवस्था कमकुवत होते. इस्रायलवर हमासच्या आतंकवाद्यांनी ७ ऑक्टोबर २०२३ या दिवशी आक्रमण केले. त्यानंतर वरपासून खालपर्यंत इराण आणि त्याच्या समर्थित आतंकवादी प्रमुखांना नष्ट करण्याचा एक कलमी कार्यक्रमच हाती घेतला.
अ. हमासचा खात्मा : हमासचे प्रमुख इस्माईल हानिया आणि याह्या सिनवर हे दोन्ही प्रमुख नेते मारले गेले. ऑगस्ट २०२४ मध्ये हानियाची हत्या तेहरानमधील एका सुरक्षित ‘गेस्ट हाऊस’मध्ये दूरवरून नियंत्रित करणार्या बाँबस्फोटाने करण्यात आली, तर सिनवरचा मृत्यू गाझामध्ये एका चकमकीत झाला.
आ. हिजबुल्लाचे कंबरडे मोडले ! : २८ सप्टेंबर २०२४ या दिवशी इस्रायलने लॅबेनॉनमधील एका बंकरवर ‘बंकर बस्टर’ बाँब टाकून हिजबुल्लाचा प्रमुख हसन नसरल्ला आणि संपूर्ण उच्च नेतृत्वाला एकाच झटक्यात संपवले. त्याआधी ‘पेजर ब्लास्ट’च्या माध्यमातून हिजबुल्लाच्या सहस्रो आतंकवाद्यांना घायाळ केले आणि त्यांच्यात भीती निर्माण केली. (हिजबुल्लाचे आतंकवादी संदेशवहनासाठी ‘पेजर’ यंत्राचा उपयोग करतात, हे इस्रायलने लक्षात घेऊन ज्या आस्थापनाकडून पेजरची मागणी केली होती. त्या आस्थापनाकडून हे पेजर कह्यात घेतले. त्यात आवश्यक ते पालट केले आणि संबंधित सहस्रो आतंकवाद्यांपर्यंत हे पेजर पोचते केले. त्यानंतर विशिष्ट संदेश पाठवून या सर्वच पेजरचा स्फोट घडवून आणला.)
इ. हुतींवर प्रहार : येमेनमध्ये हुतींचा पुरवठा मार्ग तोडण्यासाठी इस्रायलने त्यांचे विमानतळ आणि बंदरे उद्ध्वस्त केली.
ई. ‘ऑपरेशन रायझिंग लायन’ : १४ जून २०२५ या दिवशी इस्रायलने थेट इराणच्या ‘आय.आर्.जी.सी.’वर आक्रमण केले. ‘मोसाद’च्या कमांडोनी इराणमध्ये घुसून ड्रोन आणि क्षेपणास्त्रे यांच्या साहाय्याने इराणची हवाई संरक्षण यंत्रणा निकामी केली. त्यानंतर इस्रायली लढाऊ विमानांनी इराणमध्ये घुसून ‘आय.आर्.जी.सी.’चे प्रमुख हुसेन सलामी आणि इतर वरिष्ठ लष्करी नेते यांना अचूक आक्रमणात ठार केले.
उ. अणूप्रकल्पांवर आक्रमण : या मोहिमेत इस्रायलने नतान्झ आणि इस्फहान येथील इराणच्या मुख्य अणूप्रकल्पांना लक्ष्य केले. यामुळे इराणचा अण्वस्त्र बनवण्याचा प्रयत्न अनेक वर्षे मागे पडला आहे.
सर्वोच्च नेते अयातुल्ला खामेनी यांना ठार केल्यावर इस्रायलने एक स्पष्ट संदेश दिला, ‘जो कुणी इस्रायलविरोधी संघटनेच्या सर्वाेच्च पदावर बसेल, तो त्यांच्या ‘हिट लिस्ट’मध्ये (लक्ष्य सूचीत) असेल.’
(क्रमशः पुढच्या रविवारी)
गुरुचरणार्पणमस्तु ।
– श्री. यज्ञेश सावंत, सहसंपादक, दैनिक ‘सनातन प्रभात’, पनवेल. (१८.३.२०२६)
भाग २ वाचण्यासाठी क्लिक करा → https://sanatanprabhat.org/marathi/1023559.html
Bangladesh Hindu Girl Murder : बांगलादेशात ८ वर्षांच्या हिंदु मुलीचे अपहरण करून हत्या !
युक्रेन-रशिया युद्धात ट्रम्प यांनी फेटाळला होता भारतीय सैनिकांना शांतता मोहिमेसाठी पाठवण्याचा प्रस्ताव !
Resolution Over Iran War : इराणविरुद्धची सैनिकी कारवाई रोखणारा ठराव अमेरिकेच्या संसदेच्या वरिष्ठ संभागृहात संमत
आपण हिंदु धर्माविषयीच्या द्वेषाच्या विरोधात खंबीरपणे उभे राहिले पाहिजे ! – US Congressman Sanford Bishop
Indus Water Treaty Crisis : सिंधू जल वाटप करारावरून पाकने काश्मीरमधील सीमेवर तैनात केले ३५ ड्रोनविरोधी युनिट !
(म्हणे) ‘मानवाधिकारांचे उल्लंघन झाल्यास भारतावर टीका करण्यास मागेपुढे पहाणार नाही !’ – US Lawmakers