युद्धजन्य परिस्थितीत मौजमजा नको, तर दायित्वाने वागा !

आखाती देशातील इराण, इस्रायल आणि अमेरिका यांच्यातील वाढत्या तणावामुळे जागतिक स्तरावर खनिज तेलाच्या पुरवठ्यावर परिणाम होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या युद्धाच्या सावटाखाली भारतातही इंधन टंचाई निर्माण होईल, अशी भीती व्यक्त केली जात आहे; मात्र ही भीती वस्तूस्थितीपेक्षा अफवांवर अधिक आधारित असल्याचे दिसून येत आहे.

१. अफवांचे पीक आणि साठेबाजीचे संकट

भारतात या युद्धाच्या संदर्भात माध्यमांमधून अनेकदा अतीरंजित बातम्या प्रसारित केल्या जात आहेत. यामुळे सर्वसामान्यांमध्ये पेट्रोल, डिझेल आणि स्वयंपाकाचा गॅस यांचा तुटवडा होईल, अशी भीती निर्माण झाली आहे. या भीतीपोटी लोकांनी पेट्रोल पंपांवर लांबच लांब रांगा लावल्या असून इंधनाचा अनावश्यक साठा करण्यास प्रारंभ केला आहे, तसेच एकाच वेळी लोकांनी स्वयंपाक गॅस सिलिंडरची नोंदणी केली, त्यामुळे त्याची मागणी वाढली. परिणामी सिलिंडरचा तुटवडा निर्माण झाला आहे. लोकांमध्ये नाहक भीतीचे वातावरण निर्माण झाल्यामुळे परिस्थिती आणखी बिकट होत आहे. वास्तविक सरकारने ‘या युद्धामुळे भारतात तेलाचा आणि स्वयंपाकाच्या गॅसचा तुटवडा निर्माण होणार नाही. भारतात मुबलक साठा आहे’, असे सांगितले आहे, तरीही माध्यमांमधील युद्धाच्या संदर्भातील अतीरंजित बातम्यांमुळे जनतेमध्ये जे भीतीचे आणि अफवेचे वातावरण सिद्ध झाले आहे. त्याचा अपलाभ साठेबाज घेत आहेत. प्रशासनाने सध्या घरगुती गॅस पुरवठ्याला प्राधान्य दिले असून हॉटेल व्यवसायासाठीच्या वापरावर काही मर्यादा आणल्या आहेत. यामुळे हॉटेल उद्योगावर परिणाम झाला असला, तरी जनतेने घाबरून न जाता संयम पाळणे महत्त्वाचे आहे.

श्री. नित्‍यानंद भिसे

२. इंधन बचतीसाठी जीवनशैलीत पालट करणे अनिवार्य !

युद्धजन्य परिस्थितीत कसे रहावे, याची सिद्धता जनमानसाने करणे अपेक्षित आहे. सध्या जगभरात अस्थिर वातावरण आहे. कोणत्या देशात कधी युद्ध होईल, हे सांगता येत नाही, भारत काही जगापासून वेगळा नाही. त्यामुळे भारतियांनी इराण-इस्रायल युद्धातून शिकणे आवश्यक  आहे. आता हे शिकायचे काय ? अनुकूल परिस्थिती आपण ज्या ज्या सुखसोयी उपभोगत असतो, त्यात नियंत्रणात आणण्याची सिद्धता ठेवावी. कोणतेही युद्ध केवळ सीमेवर लढले जात नाही, तर त्याचे परिणाम सामान्य माणसाच्या स्वयंपाकघरापर्यंत पोचतात. अशा परिस्थितीत भारतियांनी स्वतःची जीवनशैली अधिक शिस्तबद्ध करण्याची आवश्यकता आहे.

अ. स्वयंपाकात काटकसर : घरी जेवणात अनेक पदार्थ बनवत असला, तर युद्धजन्य परिस्थितीत एकच पदार्थ बनवून केवळ जिभेचे चोचले नव्हे, तर भूक भागवणे, हाच उद्देश ठेवणे. पदार्थ बनवतांना साधा, सोपा आणि अल्प गॅस लागेल, असाच पदार्थ निवडावा. गॅसची बचत करण्यासाठी एकाच वेळी अनेक पदार्थ बनवण्याऐवजी साधे आणि पौष्टिक अन्न शिजवण्यावर भर द्यावा. गॅस शक्य तितका वेळ न्यून आचेवर ठेवावा. स्वयंपाकासाठी लागणारे सर्व जिन्नस जमवल्यावर गॅस पेटवावा. या सवयी कायमस्वरूपी चांगल्याच आहेत. त्या केवळ युद्धजन्य परिस्थितीतच अंगवळणी पाडाव्यात, असे नव्हे, तर यामुळे आपण केवळ आपल्या कुटुंबाचे हित जपत नाही, तर राष्ट्रीय हिताला हातभार लावत असतो.

आ. पर्यायी व्यवस्था : अंघोळीसाठी पाणी तापवण्यासाठी गॅसचा वापर टाळून इलेक्ट्रिक हिटर किंवा सौर ऊर्जेचा वापर करावा.

इ. ‘हॉटेलिंग’ (उपाहारगृहात जाऊन खाणे) थांबवा ! : अनेकांना उपाहारगृहात जाऊन जेवण्याची सवय असते. त्याऐवजी घरचे अन्न खावे. ज्यामुळे हॉटेलचा वापर न्यून होईल. त्यातून पैसे वाचतीलच, त्यासह उपाहारगृहातील चमचमीत ‘जंक फूड’ (पिझ्झा, बर्गर) खाऊन आरोग्याची हानी टळेल. यामुळे व्यावसायिक गॅसवरील ताण न्यून होईल.

३. भविष्यातील आव्हाने आणि स्वावलंबन

युद्धजन्य परिस्थिती ही केवळ अडचण नसून ती एक शिकवण आहे. जागतिक अस्थिरतेच्या काळात भारतासारख्या देशाला सतर्क रहाणे आवश्यक आहे.

अ. सार्वजनिक वाहतुकीचा वापर : लोकांना स्वतःच्या वाहनाने बाहेर फिरण्याची हौस असते. त्याऐवजी युद्धजन्य परिस्थितीत सार्वजनिक परिवहन व्यवस्थेचा वापर करून प्रवास करावा, जेणेकरून इंधन बचत होईल. युद्धजन्य परिस्थितीत होणार्‍या इंधन टंचाईची झळ पोचणार नाही. थोडे चालत जाण्याची सवय करावी. या सर्वांमुळे आजवर घरातून बाहेर पडल्यावर वाहनाने सर्वत्र फिरण्याच्या सवयीमुळे लठ्ठपणा वाढत आहे, चालण्याच्या सवयीमुळे आणि सार्वजनिक परिवहन व्यवस्थेच्या वापरामुळे शारीरिक व्यायाम होईल. त्यामुळे चांगले आरोग्य लाभेल.

आ. आर्थिक नियोजन : युद्धजन्य परिस्थितीत काटकसर करणे, हा सर्वाेत्तम उपाय आहे. मग तो दैनंदिन जीवनात रहाणीमानात कार्यवाहीत आणण्याचा विषय आहे. पैशाच्या वापरापासून इंधन बचतीपर्यंत सगळ्या पातळीवर काटकसर करावी. युद्धजन्य परिस्थितीत व्यवहार ठप्प होतात. त्यामुळे कार्यालये आणि कारखाने बंद पडू शकतात. परिणामी रोजगार ठप्प होतात. ‘कोरोना’ महामारीच्या काळात अवघ्या जगाने हे अनुभवले आहे. त्यामुळे पैशाची काटकसर केल्याने युद्धजन्य परिस्थितीत हातात पैसा राहील आणि कठीण परिस्थितीत जगणे सुकर होईल.

इ. ग्रामीण जीवनशैलीचा अंगीकार : युद्धजन्य परिस्थिती अधिक टोकाची बनली, तर सर्वांनी शहरी जीवनप्रणाली थांबवून ग्रामीण जीवनप्रणाली आत्मसात् करणे केव्हाही उत्तम. घरच्या गॅस सिलिंडरचाही पुरवठा बंद पडला, तर चुलीवर जेवण बनवण्याचा पर्याय स्वीकारणे योग्य आहे. शहरांऐवजी ग्रामीण जीवनपद्धत अधिक शाश्वत ठरते. वाहतूक व्यवस्था ठप्प झाल्यामुळे फळे-भाज्यांचा पुरवठा थांबेल, तेव्हा उपासमार होऊ शकते; म्हणून आपल्या घरासमोर छोटी परसबाग करून फळभाज्या पिकवण्याचे प्रशिक्षण घेतल्यास उपासमारीची वेळ येणार नाही. अशी सर्व जीवनपद्धत भारतियांनी कोरोना महमारीच्या काळात वर्षभराच्या कालावधीत जगली आहे आणि भारतियांनी ती काही प्रमाणात अनुभवली आहे. ती अंगवळणी पडल्याने युद्धजन्य परिस्थितीत जगणे, हे केवळ सुकर होणार नाही, तर आरोग्यही उत्तम राहील. त्यामुळे आताच्या युद्धजन्य परिस्थितीत स्वतःची जीवनशैली सुधारण्याची आणि स्वावलंबी होण्याचा प्रयत्न करा. संयम आणि काटकसर, हेच कोणत्याही संकटावर मात करण्याचे प्रभावी शस्त्र आहे.

– श्री. नित्यानंद भिसे, पनवेल, जिल्हा रायगड.