साधनाप्रवास
याआधीच्या लेखांत आपण ‘पू. (श्रीमती) मंदाकिनी डगवार यांचा सनातन संस्थेच्या मार्गदर्शनानुसार साधनेला झालेला आरंभ, त्यांच्या यजमानांचा सत्संगाला जायला झालेला विरोध, साधनेला विरोध असल्याचे काही प्रसंग, त्यांनी पूर्णवेळ साधनेला आरंभ करणे, पू. काकूंना विरोध झाल्याच्या प्रसंगांत त्यांनी अनुभवलेली गुरुकृपा, यजमानांचा विरोध सहन करूनही पू. डगवारकाकूंनी निष्ठेने साधना चालू ठेवली’, यांविषयी जाणून घेतले. या लेखात त्यांना ‘नारायण नागबळी’ हा विधी करतांना आलेले अडथळे आणि विधी करतांना आलेली अनुभूती, यजमानांमध्ये जाणवलेले पालट आणि मुलांना पूर्णवेळ साधनेसाठी अनुमती देणे’, याविषयी पाहूया.
(भाग ६ )
भाग ५ वाचण्यासाठी क्लिक करा → https://sanatanprabhat.org/marathi/1021383.html

८. ‘नारायण नागबळी’ हा विधी करण्याचे ठरवल्यावर आलेले अडथळे आणि आलेली अनुभूती
८ अ. घरात पुष्कळ आध्यात्मिक त्रास असल्यामुळे सतत भांडणे होणे, ‘नारायण नागबळी’ हा विधी करण्याचे ठरवल्यावर पुष्कळ अडथळे येणे आणि ‘श्री गुरुदेव दत्त ।’ हा नामजप प्रतिदिन केल्यावर एक वर्षाने विधी करण्यासाठी त्र्यंबकेश्वर येथे जाऊ शकणे : मी घरातील सर्व कामे व्यवस्थित करत असे. मी घरातील सर्व कामे व्यवस्थित करत असूनही यजमान काही ना काही कारण काढून माझ्याशी भांडत असत. ‘तुमच्या घरात पुष्कळ आध्यात्मिक त्रास आहे. त्यामुळे सतत भांडणे होतात. त्रास दूर होण्यासाठी ‘नारायण नागबळी’ हा विधी करा’, असे मला उत्तरदायी साधकांनी सांगितले होते. यजमानांचा हा विधी करायला पुष्कळ विरोध होता. उत्तरदायी साधकांनी सांगितल्यानंतर एक वर्षाने यजमान विधी करायला सिद्ध झाले. आम्ही त्र्यंबकेश्वर येथे जाण्याची सिद्धता करत असतांना यजमान आमच्याशी पुष्कळ भांडत होते, तरीही मी ‘शांत राहून विधी पूर्ण होऊ द्यायचा’, असे ठरवले. आम्ही विधी करायला जाण्याच्या दिवशी अकस्मात् आमच्या कुळातील जवळच्या व्यक्तीचे निधन झाले. त्यामुळे आम्हाला विधी करण्यासाठी जाता आले नाही. तेव्हा ‘विधी करण्यात किती अडथळे आहेत’ हे लक्षात आले. त्यानंतर आम्ही तिघांनी (मी आणि मुले) एक वर्ष ‘श्री गुरुदेव दत्त ।’ हा नामजप प्रतिदिन ३ घंटे केला आणि ‘पुढच्या वर्षी हा विधी निर्विघ्नपणे पार पडू दे, यात कुठलेही अडथळे येऊ देऊ नको’, अशी प्रार्थना केली. नंतर एक वर्षाने श्री गुरूंच्या कृपेने यजमान विधी करायला जाण्यासाठी सिद्ध झाले आणि आम्ही हा विधी करू शकलो.
८ आ. विधीच्या वेळी कुंडात अंघोळ करत असतांना यजमान एका कपारीत (खोल भागात) अडकत होते, तेव्हा एका धिप्पाड व्यक्तीने त्यांना वाचवणे अन् त्यानंतर यजमान थोडे शांत होणे : ‘नारायण नागबळी’ हा विधी करण्यासाठी आम्ही नाशिक जवळील त्र्यंबकेश्वर येथे गेलो होतो. विधीच्या वेळी कुंडामध्ये अंघोळ करतांना यजमान कुंडाच्या कपारीत अडकणार होते. तेव्हा एका धिप्पाड व्यक्तीने यजमानांचे डोक्याचे केस धरून त्यांना वर आणले आणि यजमानांचा जीव वाचला. यजमानांना ही मोठी अनुभूती आली. ‘याआधी एक प्रतिष्ठित व्यक्ती कुंडाच्या कपारीत अडकली होती. ती व्यक्ती तेथून बाहेर निघू शकली नाही. ती व्यक्ती मृत झाली’, असे आम्हाला समजले. तेव्हापासून यजमान थोडे शांत झाले. त्यानंतर ते ‘मारुतिस्तोत्र’ नियमित सकाळ-सायंकाळ म्हणायला लागले. ही केवळ गुरुकृपाच आहे.
‘घरातून साधनेला विरोध होत असतांना त्याला सामोरे कसे जायचे’, याचा सर्वांसमोर आदर्श ठेवणार्या सनातनच्या संत पू. (श्रीमती) मंदाकिनी डगवार !

‘साधना करतांना साधिकांना अनेक प्रसंगांना तोंड द्यावे लागते आणि प्रसंगी घरातील व्यक्तींचा विरोधही पत्करावा लागतो. साधनेला विरोध होत असल्यास काही साधिका घरी राहून साधना करतात, तर काही साधिका साधना करण्याचे सोडून देतात; मात्र पू. (श्रीमती) मंदाकिनी डगवार यांचे उदाहरण विरळाच !
पू. (श्रीमती) डगवार यांनी त्यांच्या यजमानांचा तीव्र विरोध सहन करून तळमळीने साधना केली. प्रसंगी त्यांना रात्रीच्या वेळी त्यांच्या मुलांच्या समवेत घराबाहेर काही घंटे थांबावे लागले. त्यांना यजमानांच्या समोर त्यांच्या नातेवाइकांशी बोलायलाही अनुमती नव्हती. अशा कठीण परिस्थितीतही त्यांनी परिश्रम घेऊन आणि भावाच्या स्तरावर प्रयत्न करून व्यष्टी अन् समष्टी साधना केली आणि अल्पावधीत संतपद गाठले. इतकेच नव्हे, तर त्यांच्या साधनेमुळे त्यांचे यजमानही साधना करू लागले आणि त्यांनीही ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठली.
‘घरातून साधनेला विरोध होत असतांना त्याला सामोरे कसे जायचे’, याचा आदर्श सनातनच्या संत पू. (श्रीमती) मंदाकिनी विजय डगवार यांनी सर्वांसमोर ठेवला आहे. त्यांचे कौतुक करावे तेवढे थोडे !’
– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले (१०.१.२०२६)
९. यजमानांमध्ये जाणवलेले पालट
९ अ. यजमानांना पत्नीने पुरुष शिक्षकांशी बोललेले आवडत नसणे; मात्र नंतर पुरुष साधक घरी सत्संग अन् सेवा या निमित्ताने येऊ लागणे : मला यजमानांसमोर कुणाशीही बोलण्याची अनुमती नव्हती. ते कार्यालयात गेल्यावर मी माझ्या नातेवाइकांशी साधनेविषयी बोलत असे आणि त्यांच्याकडून साधना करून घेत असे. मी शाळेत नोकरी करत असतांना यजमानांना मी पुरुष शिक्षकांशी बोललेले आवडत नसे. त्यामुळे मला पुष्कळ भीती वाटत असे. हळूहळू या गोष्टींचा मला विसर पडला आणि मी पुरुष साधकांनाही सत्संग अन् सेवा या निमित्ताने घरी बोलावू लागले. गुरुदेवांच्या (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या) कृपेनेच यजमानांमध्ये हा पालट झाला.

९ आ. यजमानांनी सनातनचा आकाशकंदील काढून बाहेर टाकून दिल्यावर त्यांना ‘मला त्यात देव दिसतो’, असे सांगितल्यावर यजमान शांत होणे : माझ्यामध्ये ‘भावनाशीलता’ हा स्वभावदोष अधिक होता. त्यामुळे मला मानसिक त्रास होत असे. यजमान मोठ्याने बोलले, तरीही मला भीती वाटून मी रात्रभर रडत असे आणि ‘मी रडतांना दिसले, तर ते मला ‘घराच्या बाहेर निघून जा’, असे म्हणतील’, याची मला भीती वाटत होती. एकदा दिवाळी झाल्यानंतर त्यांनी सनातनचा आकाशकंदील बाहेर टाकून दिला. मी ते पाहिल्यावर माझ्या डोळ्यांतून अश्रूधारा वाहू लागल्या. यजमान माझ्या बाजूलाच होते. ते म्हणाले, ‘‘त्या कागदासाठी रडते आणि घरातील वातावरण खराब करते.’’ तेव्हा मी म्हणाले, ‘‘तुम्हाला तो कागद दिसतो. मला त्यात देव दिसतो.’’ तेव्हापासून ते मला विचारल्याविना माझ्या वस्तू म्हणजे साप्ताहिक ‘सनातन प्रभात’, ग्रंथ आणि इतर साहित्य इतरत्र ठेवत नसत.
९ इ. यजमानांना ‘नोकरी सोडते’, असे सांगितल्यावर त्यांनी विरोध न करणे : एकदा मी प.पू. गुरुदेवांच्या ‘शंकानिरसन’ या ध्वनीफीती ऐकल्या. त्यामध्ये सांगितले होते, ‘आपल्याला ज्या गोष्टींची आसक्ती असते, त्याविषयीचे विचार आपल्या मनात येतात.’ तेव्हा मला वाटले, ‘माझ्या मनात नोकरीचे विचार असतात. मी नोकरी सोडली, तर माझ्या मनातील त्याविषयीचे विचार न्यून होतील.’ मी यजमानांना सांगितले, ‘‘माझा हात पुष्कळ दुखतो. मला फळ्यावर लिहायला अडचण येते. त्यामुळे मी नोकरी करू शकणार नाही.’’ तेव्हा यजमानांनी मला विरोध केला नाही. ही केवढी मोठी गुरुकृपा आहे !

९ ई. सत्संग घेण्यासाठी बाहेर जाण्यापूर्वी ‘गुरुदेवांनाच नमस्कार करत आहे’, असा भाव ठेवून यजमानांना नमस्कार करणे आणि गुरुकृपेने त्यांनी अनुमती देणे : मी ‘सत्संग घ्यायचा’, असे ठरवले. मी बाहेर गेले की, यजमान मला भ्रमणभाष करायचे. ‘यजमानांनी भ्रमणभाष करू नये’, यासाठी मी सत्संग घेण्यासाठी घरातून बाहेर निघण्यापूर्वी यजमानांना नमस्कार केला आणि त्यांना म्हणाले, ‘‘मला तुमचे आशीर्वाद हवे आहेत. मी आज प्रथमच सत्संग घेणार आहे.’’ तेव्हा मी ‘गुरुदेवांनाच नमस्कार करत आहे’, असा माझा भाव होता. त्यामुळे यजमानांनीही होकार दिला. मी त्यांना विचारले, ‘‘तुम्ही माझा सत्संग ऐकायला येणार का ? तुम्ही आलात, तर मला आनंद होईल.’’ तेव्हा ते म्हणाले, ‘‘नको. तूच जा.’’ ‘नकळत का होईना अनुमती मिळाली’, याचा मला पुष्कळ आनंद झाला आणि गुरुकृपेने पहिला सत्संग चांगला झाला. मला त्यातून आनंद मिळाला.
९ उ. घरी संतांच्या निवासाची केलेली व्यवस्था पाहून यजमानांनी चिडचिड करणे आणि नंतर त्यांच्या मनातील ओळखून संतांप्रमाणेच यजमानांसाठी तयारी करणे अन् यजमानांनी ‘माझ्यासाठी अशी सिद्धता करू नको’, असे सांगणे आणि तेच संतसेवा करू लागणे : आमच्या घरी सनातनचे संत येत असत. मी संतांसाठी केलेली व्यवस्था पाहून यजमानांना ‘मी त्यांच्यासाठी अशी तयारी करत नाही’, असे वाटत असे. त्यामुळे ते कधी कधी चिडचिड करत असत. तेव्हा त्यांच्या मनातील ओळखून मी संतांसाठी ज्याप्रमाणे निवासाची व्यवस्था करायचे, तसेच यजमानांसाठीही करू लागले. यजमानांच्या ‘पलंगावर नवीन चादर घालणे, पलंगाजवळ चौपाईवर (स्टुलावर) पाणी ठेवणे, प्रसाधनगृहात साबण, टॉवेल ठेवणे’, असे मी करू लागले, म्हणजे त्यांना ‘त्यांच्यासाठी काही करत नाही’, असे वाटू नये. काही कालावधीनंतर यजमानांनी ‘माझ्यासाठी एवढे करू नको’, असे मला सांगितले आणि ते स्वतःच संतसेवा करू लागले. आधी त्यांचा माझ्या साधनेला प्रचंड विरोध असूनही देवानेच त्यांच्यामध्ये पालट घडवायला आरंभ केला. तेव्हा मला पुष्कळ कृतज्ञता वाटली.
१०. साधना होण्याला प्राधान्य देणे
१० अ. नातेवाइकांशी साधनेच्या संदर्भातच बोलणे आणि त्यांच्या साधनेचा आढावा घेणे : माझ्या माहेरी आम्ही ५ बहिणी आणि एक भाऊ, असे माझ्या माहेरचे कुटुंब आहे. मी भावंडांत मोठी असल्याने ‘कितीही त्रास झाला, तरी तो सहन करायचा’, अशी मला माहेरची शिकवण होती. मी नातेवाइकांशी बोललेले यजमानांना आवडत नसे. मी सनातनमध्ये आल्यानंतर नातेवाइकांना साधनेविषयी सांगायचे. मी सर्वांशी साधनेच्या संदर्भातच बोलायचे. ‘ते सर्व जण सांगितल्याप्रमाणे कृती करत आहेत ना ?’, याविषयी मी त्यांना विचारत असे. गुरुकृपेने माहेरचे सर्व नातेवाईक साधना करू लागले.
१० आ. व्यवहारात न अडकता प्रत्येक परिस्थितीत अधिकाधिक साधना होण्यासाठी प्रयत्न करणे : आम्ही सकाळी प्रसाराला जायचो आणि रात्री घरी येत असू. त्या वेळेत आम्ही बाहेर काही खरेदी केली, तर तेथील दुकानदारांना ‘साप्ताहिक ‘सनातन प्रभात’चे वर्गणीदार बनवणे, सात्त्विक उत्पादनांचे वितरण करणे’, अशा सेवा मी करत असे. त्यामुळे गुरुकृपेने मी व्यवहारात फार अडकले नाही. ‘भगवंताने माझ्यासाठी जी परिस्थिती निर्माण केली, ती माझ्या साधनेसाठीच आहे’, असा माझा भाव होता. त्या वेळी मला ‘प.पू. भक्तराज महाराज यांनी सांगितल्याप्रमाणे ‘परिस्थिती म्हणजेच भगवंत आहे’, या सुवचनाची प्रचीती घेता आली.
यजमान रात्री साडेनऊ वाजता झोपत असत. मी जागून लिखाण केलेले यजमानांना आवडणार नाही; म्हणून मी त्यांना झोप लागल्यावर रात्री १२ ते १२.३० वाजेपर्यंत सारणी लिखाण आणि साधनेचा आढावा लिहीत असे. गुरुकृपेने त्यामध्ये कधीही खंड पडला नाही.
१० इ. यजमानांचा साधनेला तीव्र विरोध असूनही मुलाला पूर्णवेळ साधना करण्यास अनुमती देणे : मयुरीचे एम्.बी.ए.चे शेवटचे एक सेमिस्टर राहिले असतांना ती पूर्णवेळ साधना करू लागली. अमितचे एम्.बी.ए. झाल्यावर तो काही दिवसांसाठी आश्रमात गेला होता. तेव्हा त्यानेही मला विचारले, ‘‘आई, मी पूर्णवेळ साधना करू का ?’’ तेव्हा माझ्या मनात विचार आला, ‘मुलांच्या साधनेत अडथळा आणला, तर पाप लागते. आपण साधनेपासून कुणाला वंचित ठेवायचे नाही.’ मी त्याला सांगितले, ‘‘तुझी इच्छा असेल, तर तू पूर्णवेळ साधना करू शकतो.’’ मला साधनेला प्रचंड विरोध असूनही गुरुकृपेने असा विचार माझ्या मनात आला. ही माझ्यावर असलेली गुरुकृपाच आहे.
‘माझा सर्व संसार गुरूंचाच आहे. ते सांभाळतील’, अशी माझी श्रद्धा होती. गुरुमाऊलींनीच सर्व सांभाळले आहे आणि तेच आम्हाला सांभाळत आहेत.’
(समाप्त)
– (पू.) श्रीमती मंदाकिनी विजय डगवार (सनातनच्या ११९ व्या (समष्टी) संत (वय ६२ वर्षे), फोंडा, गोवा. (२५.१०.२०२५)
| येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या काही वेळा अनिष्ट शक्तींमुळे किंवा ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार आलेल्या साधकांच्या आणि संतांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सर्वांनाच येतील, असे नाही. – संपादक |
गुन्हेगारीवर आळा घालण्यासाठी अपरिहार्य असलेली साधना !
व्यष्टी साधना गांभीर्याने करणारे म्हार्दाेळ (गोवा) येथील श्री. परशुराम प्रभुदेसाई (आध्यात्मिक पातळी ६१ टक्के, वय ७८ वर्षे) आणि सौ. पूनम प्रभुदेसाई (आध्यात्मिक पातळी ६१ टक्के, वय ७९ वर्षे) !
साधकांची आध्यात्मिक पातळी घोषित करण्याच्या सत्संगात फोंडा, गोवा येथील सौ. स्नेहा शिवदत्त नाडकर्णी यांना जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती !
पू. (कै.) श्रीमती आनंदी पाटीलआजी (वय १०४ वर्षे) यांचे अंत्यदर्शन घेतांना डोंबिवली (जिल्हा ठाणे) येथील साधकांनी अनुभवलेली उच्च आध्यात्मिक स्थिती !
‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा ‘कर्मयोग, ज्ञानयोग आणि भक्तीयोग’ या क्रमाने झालेला आध्यात्मिक प्रवास’ अन् या लिखाणावर श्री. राम होनप यांना सूक्ष्मातून प्राप्त झालेले ज्ञान
वर्ष २०२५ मध्ये प्रयागराज येथे झालेल्या महाकुंभपर्वाच्या कालावधीत साधिकेने भाववृद्धीसाठी केलेले प्रयत्न आणि तिला आलेल्या अनुभूती !