‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा ‘कर्मयोग, ज्ञानयोग आणि भक्तीयोग’ या क्रमाने झालेला आध्यात्मिक प्रवास’ अन् या लिखाणावर श्री. राम होनप यांना सूक्ष्मातून प्राप्त झालेले ज्ञान

१. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा ‘कर्मयोग, ज्ञानयोग आणि भक्तीयोग’ या क्रमाने झालेला आध्यात्मिक प्रवास !

१ अ. वर्ष १९८७ ते वर्ष १९९१ (कर्मयोग – स्थूलदेहाने सेवा केल्याने देहबुद्धी न्यून होणे) 

प.पू. भक्तराज महाराज यांनी (प.पू. बाबांनी) १९८७ या वर्षी गुरुमंत्र दिल्यावर साधनेसाठी खर्‍या अर्थाने प्रयत्न करायला आरंभ झाला. तेव्हा मी सर्व भंडार्‍यांना जाऊन तेथे स्थूलदेहाने सेवा करायचो, तसेच प.पू. बाबांबरोबर मी बर्‍याचदा सर्वत्र प्रवासही करायचो. तेव्हा मी जे काही करायचो, त्याच्या निराळ्या फळाची अपेक्षा नसायची; कारण तेव्हा सेवेतूनच आनंद मिळायचा.

१ आ. वर्ष १९९२ ते वर्ष २००८ (ज्ञानयोग – अध्यात्माचा अभ्यास केल्याने बुद्धी सात्त्विक होणे) 

वर्ष १९९२ ते वर्ष २००८ (प.पू. भक्तराज महाराज यांनी वर्ष १९९५ मध्ये देह ठेवला, तरी ते मला सूक्ष्मातून शिकवत असत.) या काळात प.पू. बाबांना मी सहस्रो प्रश्न विचारून शंकानिरसन करून घेतले. ‘प.पू. भक्तराज महाराज यांची शिकवण’ हा ग्रंथ त्यांनी शिकवलेल्या ज्ञानावर आधारित आहे. या काळात मी अनेक ग्रंथांचा अभ्यास केला, तसेच ग्रंथांत नसलेल्या अनेक गोष्टी मी ध्यानातून जाणून घेतल्या.

१ इ. वर्ष २००९ ते वर्ष २०१० (भक्तीयोग – म्हणजे मनाने भक्तीसाठी प्रयत्न केल्याने मन सात्त्विक होणे आणि भाव जागृत होणे) 

प.पू. भक्तराज महाराज यांच्याविषयी वाटणारा कृतज्ञताभाव, योगतज्ञ प.पू. दादाजी वैशंपायन आणि गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी या दोन संतांनी केलेल्या अन् ते अजूनही करत असलेल्या साहाय्यामुळे व्यापक होण्यास साहाय्य झाले. माझे मोठे भाऊ डॉ. वसंत आठवले (सद्गुरु (कै.) डॉ. वसंत आठवले) यांच्या ‘भक्तीयोग’ या विषयावरील अप्रकाशित ग्रंथांचे वाचन केल्यामुळे त्या प्रक्रियेस आणखी चालना मिळाली. त्यामुळे कर्मयोग आणि ज्ञानयोग यांची शुष्कता कळून भक्तीयोगाची आवड निर्माण झाली. कर्मयोग आणि ज्ञानयोग यांनुसार साधना करण्यापेक्षा ‘भक्तीयोगानुसार साधना केल्यावर पुष्कळ आणि निराळ्या तर्‍हेचा आनंद अनुभवता येतो’, हे लक्षात आले. त्यामुळे ‘भक्तीयोगानुसार आपण प्रथमपासूनच वाटचाल करायला हवी होती’, असेही मला वाटू लागले.

१ ई. आतापर्यंत झालेल्या प्रवासाचे चिंतन 

‘तेव्हा झाले, ते योग्यच झाले’, असे वाटून पुढील गोष्टी माझ्या लक्षात आल्या.

१. कर्मयोग आणि ज्ञानयोग यांनुसार साधना केली नसती, तर भक्तीयोगाचे महत्त्व लक्षात आले नसते.

२. समष्टी साधनेसाठी, म्हणजे समाजात धर्मप्रसार करण्यासाठी तिन्ही योगमार्गांची माहिती असणे आवश्यक असते. मी केलेल्या वाटचालीने ते अनायासे झाले.

३. ही वाटचाल झाली, ती गुरूंच्या इच्छेनेच झालेली आहे; कारण त्यांनी ‘अध्यात्माचा प्रसार करा’, असे मला सांगितले होते.

१ उ. पुढील वाटचाल हीसुद्धा गुरूंच्या इच्छेनुसारच होईल !

२. गुरुकृपायोगानुसार साधना करत असल्याने ‘कर्मयोग, ज्ञानयोग आणि भक्तीयोग’ या क्रमाने झालेला साधकांचा प्रवास

माझ्या आध्याित्मक प्रवासानुसार साधकांचाही प्रवास झाला आणि तो चालू आहे.

२ अ. कर्मयोग

अध्यात्माचा प्रसार करणे, सत्संग घेणे, ग्रंथ-प्रदर्शन लावणे, मंदिरांची स्वच्छता करणे आदी विविध प्रकारच्या सेवा साधक अनेक वर्षे करत आहेत.

२ आ. ज्ञानयोग 

अध्यात्मविषयक ग्रंथांचा, विशेषतः सनातनच्या ग्रंथांचा अभ्यास करणे आणि त्यांतील ज्ञान कृतीत आणण्याचा प्रयत्न करणे, हा बहुतेक साधकांच्या जीवनाचा अविभाज्य भाग झाला आहे.

२ इ. भक्तीयोग

वर्ष २००९ पासून अनेक साधकांनी भावजागृतीचे प्रयत्न चालू केले आहेत. वर्ष २०१० पासून अनेक साधकांना भावजागृतीच्या, तसेच श्रीकृष्णाच्या संदर्भातील विविध अनुभूती येत आहेत.’

– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले (ज्येष्ठ शु. १२, कलियुग वर्ष ५११२ (२३.६.२०१०))


सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या स्वतःच्या आध्यात्मिक प्रवासाच्या लिखाणावर श्री. राम होनप यांना सूक्ष्मातून प्राप्त झालेले ज्ञान

श्री. राम होनप

१. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांना त्यांच्या आध्यात्मिक प्रवासामुळे झालेले लाभ

१ अ. ‘चतुरस्र अवस्था’ प्राप्त करणे : ‘सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांनी आध्यात्मिक प्रवासात विविध योगमार्गांचे ज्ञान मिळवले आणि त्यांचा अनुभव घेतला. त्यामुळे त्यांना अध्यात्मातील विविध अंगांची सखोलता, महत्त्व, तसेच मर्यादाही लक्षात आल्या. यातून त्यांना अध्यात्मातील ‘चतुरस्र अवस्था’ प्राप्त झाली. ‘चतुरस्र’ याचा अर्थ ‘चौफेर ज्ञान असलेला’ किंवा ‘निष्णात’, असा आहे. या चतुरस्र अवस्थेमुळे त्यांना ईश्वरप्राप्तीसाठी आवश्यक असलेले अध्यात्मातील ज्ञान साररूपात अल्प कालावधीतच एकत्रित करता आले.

१ आ. ‘उत्तम दर्शन’ जाणण्याची क्षमता निर्माण होणे (उत्तम द्रष्टा) : ‘उत्तम दर्शन’ या शब्दातील ‘दर्शन’ याचा अर्थ ‘ईश्वरी तत्त्वाची विविध अंगे समजून घेणे’, असा होतो. विविध योगमार्गांनी साधना केल्यामुळे सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांना अध्यात्माची विविध अंगे समजून घेता आली. त्यामुळे त्यांच्यात अध्यात्मातील ‘उत्तम दर्शन’ जाणण्याची क्षमता निर्माण झाली, म्हणजे ते ‘उत्तम द्रष्टा’ झाले.

१ इ. ‘मोक्षगामी ज्ञान’ साररूपात प्रगट करता येणे : सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांना मिळालेल्या विविध योगमार्गांच्या स्थूल आणि सूक्ष्म ज्ञानामुळे ‘मोक्षगामी ज्ञान’ साररूपात प्रगट करता आले. ‘मोक्षगामी ज्ञान’ याचा अर्थ साधकाला मोक्षप्राप्तीच्या दिशेने नेणारे ज्ञान !

१ ई. ज्ञानदृष्टी आणि दूरदृष्टी प्राप्त होणे : सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांमध्ये विविध योगमार्गांतील ज्ञानामुळे अध्यात्मातील विविध पैलूंकडे अभ्यासाच्या दृष्टीने पहाण्याची क्षमता निर्माण झाली. यातून त्यांना अध्यात्मातील ज्ञानदृष्टी प्राप्त झाली. अध्यात्मातील या ज्ञानाद्वारे त्यांना ‘आताच्या आणि पुढील पिढ्यांना ईश्वरप्राप्तीचा सुलभ मार्ग कसा दाखवायचा ?’, ही दूरदृष्टी प्राप्त झाली.

२. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या आध्यात्मिक प्रवासामुळे समष्टीला झालेले लाभ

२ अ. ‘गुरुकृपायोगा’चा पाया रचला जाणे : सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांचा ‘कर्मयोग, ज्ञानयोग आणि भक्तीयोग’, या क्रमाने आध्यात्मिक प्रवास झाला. त्यांनी विविध योगमार्गांविषयी येणारे स्वानुभव आणि ईश्वरी ज्ञान यांद्वारे ‘गुरुकृपायोग’ या अलाैकिक योगमार्गाची निर्मिती केली. परिणामी सनातन धर्मातील गुरु-शिष्य परंपरा आणखी दृढ झाली.

गुरूंमुळेच शिष्याची आध्यात्मिक प्रगती होत असून त्यासाठी उच्च आध्यात्मिक पातळी असलेल्या गुरूंची आवश्यकता असते. सध्याच्या कलियुगात साधकाला उच्च आध्यात्मिक पातळीचे गुरु मिळणे दुर्लभ आहे. हे जाणून सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांनी साधकांना अष्टांग साधना (१. स्वभावदोष-निर्मूलन आणि गुण-संवर्धन, २. अहं-निर्मूलन, ३. नामजप, ४. भावजागृतीसाठी करायचे प्रयत्न, ५. सत्संग, ६. सत्सेवा, ७. सत्साठी त्याग आणि ८. प्रीती (इतरांविषयी निरपेक्ष प्रेम)’) करण्याचा मार्ग दाखवला. त्यांनी ‘गुरु म्हणजे केवळ देह नसून ते तत्त्व आहे’, हे शिकवले.

पुढे कठीण काळात ‘साधकांना मोक्षाला नेणारे आणि उच्च आध्यात्मिक पातळी असलेले गुरु मिळतीलच’, असे नाही. अशा वेळी साधकांनी ‘अष्टांग साधना मनोभावे करून गुरूंची (गुरुतत्त्वाची) कृपा संपादन करावी आणि जलद आध्यात्मिक प्रगती साध्य करावी’, यासाठी सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांनी ‘गुरुकृपायोगा’ची निर्मिती केली आहे. ‘गुरुकृपायोगा’द्वारे त्यांनी साधकांना थेट गुरुतत्त्वाशी जोडण्याचे कार्य केले आहे.

२ आ. ‘गुरुकृपायोग’ या योगमार्गाची वैशिष्ट्ये 

२ आ १. श्रीविष्णूचे ‘परात्पर ज्ञान’ हे ‘गुरुकृपायोग’ या योगमार्गाद्वारे प्रगट होणे : सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांना भक्तीद्वारे सूक्ष्मातून श्रीविष्णूचे ‘परात्पर ज्ञान’ प्राप्त झाले. ‘परात्पर ज्ञान’ याचा अर्थ ‘अती उच्च आध्यात्मिक ज्ञान’ असा आहे. यातून सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांनी ‘गुरुकृपायोग’ या योगमार्गाची निर्मिती केली.

२ आ २. अध्यात्मातील सार नेमक्या शब्दांत मांडलेले असणे : सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांनी विविध योगमार्गांच्या अभ्यासामुळे अध्यात्मातील सार नेमक्या शब्दांत आणि सुलभ भाषेत मांडले आहे. त्यामुळे अनेक साधक ईश्वरप्राप्तीसाठी तन-मन-धन यांचा त्याग करण्यास उद्युक्त झाले.

२ आ ३. ‘गुरुकृपायोगा’मुळे जिज्ञासू आणि साधक यांचा अध्यात्म समजून घेण्यासाठी विविध ग्रंथांचा अभ्यास करण्यातील वेळ वाचणे : अध्यात्मातील ज्ञान ‘वेद, उपनिषदे, पुराणे आणि असंख्य ग्रंथ’ यांत विखुरलेले आहे. सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांना विविध योगमार्गांतील ज्ञान प्राप्त झाल्याने त्यांनी ‘विविध योगमार्ग आणि अध्यात्मातील विखुरलेले ज्ञान’, यांची सांगड घालत ‘गुरुकृपायोग’ या योगमार्गाची निर्मिती केली. त्यामुळे जिज्ञासू आणि साधक यांची अध्यात्मातील विस्तृत ज्ञान समजून घेण्यातील अनेक वर्षे वाचली.

२ आ ४. साधकांच्या जलद आध्यात्मिक प्रगतीचा मार्ग मोकळा होणे : ‘गुरुकृपायोग’ हा योगमार्ग ईश्वरी, अचूक आणि परिपूर्ण असून तो ईश्वरप्राप्तीच्या दिशेने जलद गतीने नेणारा आहे. त्यामुळे साधकांसाठी जलद आध्यात्मिक प्रगतीचा मार्ग मोकळा झाला आहे.

२ आ ५. ‘गुरुकृपायोग’ या योगमार्गाची फलश्रुती : सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांनी निर्माण केलेल्या ‘गुरुकृपायोगा’नुसार साधना करून अनेक साधक उच्च आध्यात्मिक पातळी गाठून जन्म-मृत्यूच्या फेर्‍यांतून मुक्त झाले, तर काही साधकांनी ‘संत’, तसेच ‘सद्गुरु’ पद प्राप्त केले.’

– श्री. राम होनप (सूक्ष्मातील ज्ञानप्राप्तकर्ते साधक), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (ज्ञान मिळण्याचा दिनांक : २१.१.२०२६, वेळ : सकाळी १०.३०, कालावधी : २५ सेकंद)

  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • सूक्ष्मातील दिसणे, ऐकू येणे इत्यादी (पंच सूक्ष्मज्ञानेंद्रियांनी ज्ञानप्राप्ती होणे) : काही साधकांची अंतर्दृष्टी जागृत होते, म्हणजे त्यांना डोळ्यांना न दिसणारे दिसते, तर काही जणांना सूक्ष्मातील नाद किंवा शब्द ऐकू येतात.
  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या काही वेळा अनिष्ट शक्तींमुळे किंवा ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांना / संतांना / धर्मप्रेमींना आलेल्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सर्वांनाच येतील, असे नाही. - संपादक
  • सूक्ष्म-ज्ञानाविषयीचा प्रयोग : काही साधक सूक्ष्मातील कळण्याच्या क्षमतेचा अभ्यास म्हणून ‘एखाद्या वस्तूविषयी मन आणि बुद्धी यांच्या पलीकडे काय जाणवते’, याची चाचणी करतात. याला ‘सूक्ष्म-ज्ञानाविषयीचा प्रयोग’ म्हणतात.