‘साधारणतः मागील ४ दशकांचा मागोवा घेतल्यास आपणा सर्वांना लक्षात येईल की, प्रत्येकच गावात आधुनिक वैद्यांची, म्हणजे डॉक्टरांची संख्या पुष्कळ प्रमाणात वाढली आहे; कारण आजारांचे प्रमाणही पुष्कळ वाढले आहे. आजारांतील क्लिष्टता आणि सखोलता यांत विविधांगी संशोधन होऊन बारीक सारीक आजारांचे तज्ञ डॉक्टर निर्माण होत आहेत. आपल्याला आज जे आजार बळावल्याचे दिसतात, त्यांची कारणे शोधून त्यांच्यावर औषधोपचारासह अन्य उपाययोजनाही करायलाच हवी. १ आणि ८ मार्च या दिवशी प्रसिद्ध झालेल्या लेखांमध्ये आपण ‘आजारांच्या कारणांविषयी धर्मशास्त्र काय सांगते ? दिनचर्येचे पालन न करण्याने रोग बळावणे, विविध प्रकारचे मानसिक आजार आणि अधर्मामुळे रोग निर्माण होणे : वैज्ञानिक अन् आध्यात्मिक विश्लेषण’, यांविषयी वाचले. आज या लेखाचा अंतिम भाग येथे देत आहोत.
(भाग ३)
भाग २ वाचण्यासाठी क्लिक करा- https://sanatanprabhat.org/marathi/1015985.html

७. साथीचे रोग न येण्यासाठी किंवा ते दूर होण्यासाठी ग्रामदेवता अथवा स्थानदेवता यांची उपासना आवश्यक !
आपल्या भारतात असे साथीचे रोग बळावल्यास स्थानिक लोकांना ग्रामदेवता किंवा स्थानदेवता यांना शरण जाऊन त्यांची उपासना करण्यास सांगितली जाते. त्यामुळे संबंधित देवतेची कृपा होऊन साथीचे आजार आटोक्यात येतात. याची अनुभूती अनेक लोकांनी घेतलेली असते, उदाहरणार्थ आजही ग्रामीण भागांमध्ये लहान मुलांना कांजिण्या किंवा गोवर असे आजार झाल्यास औषधोपचार करण्यासह स्थानदेवतेला दहीभाताचा नैवेद्य दाखवला जातो. ‘त्यामुळे हे आजार दूर होतात’, अशी लोकांची केवळ श्रद्धा नव्हे, तर अनुभूती असते; परंतु आज लोक स्थानदेवता किंवा ग्रामदेवता यांचे महत्त्व लक्षात न घेता त्यांची उपासना करण्याचे टाळतात. त्यामुळे अनेक ठिकाणी अनेक प्रकारचे साथीचे रोग वाढल्याचे लक्षात येते, उदाहरणार्थ महाराष्ट्रात कोकणामध्ये प्रतिवर्षी ‘माकडताप’, ‘वराहज्वर’ किंवा जनावरांना किंवा पक्ष्यांना होणारे ‘लंपी’ अथवा ‘चिकनपॉक्स’ यांसारखे विविध आजार, असे रोग येतात आणि त्यात मोठ्या प्रमाणात हानी होते; परंतु देवतेच्या कृपेने अशा आपत्ती येण्याचे टळू शकते किंवा आल्या तरी संबंधित गावाची तितकी हानी होणार नाही; परंतु या विषयावर लोकांची श्रद्धा नसल्याने लोक ग्रामदेवता किंवा स्थानदेवता यांचा यथायोग्य मान राखत नाहीत.
काही गावांमध्ये तर देवतेच्या पूजेच्या मानापमानावरून संघर्ष इतका वाढलेला असतो की, लोक किंवा पोलीस प्रशासन प्रसंगी देवतेचे मंदिर बंद करतात. असे लोक स्वतःचा अहंकार जोपासून स्वतःची आणि पर्यायाने गावाची हानी करून घेत आहेत. काही लोक स्वतःची नोकरी-व्यवसाय आदींना प्राधान्य देऊन गावच्या नियमित कुलोत्सवाला येत नाहीत; कारण त्यांना पैसा महत्त्वाचा वाटत असतो. त्यामुळे त्यांच्यातही संबंधित देवतेविषयी कृतज्ञताभाव जागृत होत नाही आणि स्वाभाविकपणे देवतेची कृपा संपादन न झाल्याने त्यांना विविध आजारांना सामोरे जावे लागते.
कुलदेवतेच्या उपासनेअभावी घरात निर्माण होणार्या समस्या या बुद्धीअगम्य असतात, त्यांवर अन्य कोणतीही मात्रा लागू होत नाही. त्यासाठी ‘नियमित साधना करणे’, हाच एकमेव रामबाण औषधोपचार आहे.
– श्री. योगेश जलतारे
८. घरातील रोगराई दूर करण्यासाठी कुलदेवतेची उपासना आवश्यक !
प्रत्येक घराण्याची एक विशिष्ट कुलदेवता असते. ती त्या घराण्याची व्यावहारिक आणि पारलौकिक, म्हणजे आध्यात्मिक प्रगती करून घेत असते; परंतु आज अनेक लोक स्वतःच्या कुलदेवतेची उपासना करत नसल्याने त्यांच्यावर तिची कृपा होत नाही. त्यामुळे त्यांच्या प्रपंचात अनेक प्रकारच्या व्यावहारिक आणि आध्यात्मिक अडचणी निर्माण होतात, उदा. एखाद्याच्या घरात सतत आजारपणे असतात, काहींच्या घरी असाध्य आजारांची शृंखला असते; काहींच्या घरी मुले जन्माला आल्यास ती अपंग, मतीमंद किंवा गतीमंद असतात. ‘असे आपल्याच वाट्याला का आले ?’, या प्रश्नाचे उत्तर बुद्धीने कळण्यासारखे नसते आणि या अडचणी भौतिक उपायांनी दूर होणार्याही नसतात. कुलदेवतेच्या उपासनेअभावी घरात निर्माण होणार्या समस्या या बुद्धीअगम्य असतात, त्यांच्यावर अन्य कोणतीही मात्रा लागू होत नाही. त्यासाठी ‘नियमित साधना करणे’, हाच एकमेव रामबाण औषधोपचार आहे. कुलदेवतेला संपूर्ण कुटुंबाची काळजी असल्याने तिच्या कृपेने या समस्या दूर होऊ शकतात किंवा प्रारब्धवश अशा समस्या आपल्या वाट्याला यायच्याच झाल्यास त्यांना सामोरे जाण्यासाठी बळ मिळते; मात्र त्यासाठी कुलदेवतेची नियमित उपासना, कुलाचारपालन, कुलदेवतेच्या दर्शनाला जाणे इत्यादी करणे आवश्यक असते. कुलदेवतेचे स्मरण रहाण्यासाठी दिवसातील काही काळ तरी कुलदेवतेचा नामजप करायलाच हवा. असे केल्याने घरातील समस्यांचे निराकरण होते, अशी अनुभूती अनेकांनी घेतली आहे.
दुर्दैवाने आज हिंदूंना धर्मशिक्षण नसल्यामुळे आध्यात्मिक कारणांमुळे निर्माण होणारी आजारपणे दूर किंवा सुसह्य होण्यासाठी घरच्या घरी उपाययोजना असूनही ते त्यासाठी बाहेर फिरत रहातात.

या लेखाद्वारे सर्वच रोग अधर्मामुळे होतात, असे सांगण्याचा आमचा आग्रह नाही किंवा तशी भीतीही कुणाच्या मनात निर्माण करण्याचा अथवा अंधविश्वास पसरवण्याचा हेतू नाही; परंतु शास्त्रात सांगितल्याप्रमाणे ‘सर्व रोगांचे मूळ अधर्माचरणात आहे आणि धर्माचरण अन् साधना हा त्यावर उपाय आहे’, हे बुद्धीच्या स्तरावर समजावून सांगण्याचा हा अल्पसा प्रयत्न आहे. ‘यातून यथायोग्य बोध घेऊन औषधोपचारांच्या जोडीला धर्माचरण आणि साधना करण्याची बुद्धी आम्हा सर्वांना व्हावी’, हीच गुरुचरणी प्रार्थना !
– श्री. योगेश जलतारे
९. धर्माचरण आणि साधना केल्याने रोगावर नियंत्रण मिळवता येईल का ?
आता एखाद्याला प्रश्न पडेल की, धर्माचरण आणि साधना केल्याने रोगावर नियंत्रण मिळवता येईल का ? तर याचे उत्तर निश्चितच ‘हो’ असे आहे. वास्तवात घडलेल्या एका उदाहरणातून हे सूत्र अधिक स्पष्ट होईल. मी पूर्वी अध्यात्मप्रसारानिमित्त अकोला जिल्ह्यात असतांना विविध ठिकाणी सत्संग घ्यायचो. एका सत्संगात एक डॉक्टर येत होते. ‘ते मानसिकदृष्ट्या काहीसे अस्थिर आहेत’, असे लक्षात आल्याने मी त्यांच्याशी एकदा संवाद साधला. तेव्हा कळले की, त्यांना काही वर्षांपासून निद्रानाशाची व्याधी आहे आणि एरव्हीही दिवसभर भूतकाळातील विचार अन् घटना आठवून त्यांचे मन त्यांना खात रहाते.
यावर उपाययोजना म्हणून मी त्यांना त्यांच्याकडून कळत-नकळत झालेल्या पापांचे क्षालन होण्यासाठी त्यांना नियमित देवाकडे क्षमायाचना करण्याचा उपाय सांगितला. त्यांनी २ दिवसांनी येऊन मला सांगितले की, ते मध्यप्रदेश येथे त्यांचा वैद्यकीय व्यवसाय करत असतांना त्यांनी काही रुग्णांना आवश्यकता नसतांना ‘शल्यकर्म करणे आवश्यक आहे’, असे सांगून शल्यचिकित्सक डॉक्टरांकडे पाठवले होते. त्या काळी त्यांना प्रत्येक रुग्णामागे ५ सहस्र रुपये मिळत असत. यासह ते रुग्ण आल्यावर त्याला आवश्यकता नसतांनाही विविध चाचण्याही करायला सांगत असत. यातूनही त्यांचे अर्थार्जन होत असे. सनातन संस्थेच्या सत्संगात आल्यामुळे पुण्य, पाप, धर्माचरण इत्यादी विषय कळल्याने त्यांना त्यांच्या चुकांची जाणीव झाली आणि त्यांनी त्याविषयी मोकळेपणाने सांगितले. त्यांनी साधना चालू केल्याने भगवंत निश्चितच त्यांच्याकडून भूतकाळात झालेल्या पापांसाठी त्यांना क्षमा करील, हे निश्चितच होते; परंतु धर्माचरणामुळे त्यांच्याकडून घडणारे पापाचरण थांबले, हे महत्त्वाचे !
कित्येक लोकांना ‘आपण पाप करतो’, याची जाणीवही नसते. यात आणखीन एक भाग आपल्या लक्षात आला असेल की, त्यांना होणारे निद्रानाश आणि अन्य मानसिक त्रास हे त्यांच्याकडून झालेल्या अधर्माचरणी कृतीतून निर्माण झालेले होते. धर्मानुसार आचरण करण्यास आरंभ केल्यानंतर त्यांना त्याची जाणीव झाल्याने पुढील उपाययोजनाही काढता येते. पुढे धर्मशास्त्रात सांगितल्याप्रमाणे त्यांनी काही प्रायश्चित्ते घेतल्यावर त्यांचा त्रास बर्याच प्रमाणात न्यून झाला. या उदाहरणातून धर्माचरण आणि साधना यांमुळे रोगनिवृत्तीस साहाय्य होते, हे स्पष्ट होते.
(समाप्त)
– श्री. योगेश जलतारे, संपादक, ‘सनातन प्रभात’ प्रसारमाध्यम समूह. (५.२.२०२६)

कथित सामाजिक कार्यकर्त्या तिस्ता सेटलवाड यांचे पारपत्र परत करण्यासंदर्भात सर्वाेच्च न्यायालयाची संयत भूमिका !
मोगल, ब्रिटीश आणि काँग्रेस यांनी केले नाही, ते महाराष्ट्र सरकार करायला निघाले आहे !
छत्रपती शिवरायांना हिंदवी स्वराज्याच्या विचारांनी भारलेले अन् हिंदूंसाठी उभे रहाणारे युवक हवे आहेत !
शहरी नक्षलवादामुळे झारखंड येथील आदिवासींचे अस्तित्व धोक्यात !
‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा ‘कर्मयोग, ज्ञानयोग आणि भक्तीयोग’ या क्रमाने झालेला आध्यात्मिक प्रवास’ अन् या लिखाणावर श्री. राम होनप यांना सूक्ष्मातून प्राप्त झालेले ज्ञान
साधकांनो, शब्दशक्तीच्या माध्यमातून विकल्प पसरवण्यासाठी कार्यरत असलेल्या सातव्या पाताळातील मोठ्या वाईट शक्तींचा डाव ओळखून साधना वाढवा !