पंचमहाभूतांचे असंतुलन आणि अधर्माचरण : परिणाम साथीचे रोग !

‘साधारणतः मागील ४ दशकांचा मागोवा घेतल्यास आपणा सर्वांना लक्षात येईल की, प्रत्येकच गावात आधुनिक वैद्यांची, म्हणजे डॉक्टरांची संख्या पुष्कळ प्रमाणात वाढली आहे; कारण आजारांचे प्रमाणही पुष्कळ वाढले आहे. आजारांतील क्लिष्टता आणि सखोलता यांत विविधांगी संशोधन होऊन बारीक सारीक आजारांचे तज्ञ डॉक्टर निर्माण होत आहेत. आपल्याला आज जे आजार बळावल्याचे दिसतात, त्यांची कारणे शोधून त्यांच्यावर औषधोपचारासह अन्य उपाययोजनाही करायलाच हवी. १ मार्च या दिवशी प्रसिद्ध झालेल्या लेखात आपण ‘आजारांच्या कारणांविषयी धर्मशास्त्र काय सांगते ? दिनचर्येचे पालन न करण्याने रोग बळावणे अन् समष्टी अधर्म : अन्नपदार्थांमध्ये होणारी भेसळ आणि औषधांचा मारा’, यांविषयी वाचले. आज या लेखाचा पुढचा भाग येथे देत आहोत.

या लेखाद्वारे सर्वच रोग अधर्मामुळे होतात, असे सांगण्याचा आमचा आग्रह नाही किंवा तशी भीतीही कुणाच्या मनात निर्माण करण्याचा अथवा अंधविश्वास पसरवण्याचा हेतू नाही; परंतु शास्त्रात सांगितल्याप्रमाणे ‘सर्व रोगांचे मूळ अधर्माचरणात आहे आणि धर्माचरण अन् साधना हा त्यावर उपाय आहे’, हे बुद्धीच्या स्तरावर समजावून सांगण्याचा हा अल्पसा प्रयत्न आहे. ‘यातून यथायोग्य बोध घेऊन औषधोपचारांच्या जोडीला धर्माचरण आणि साधना करण्याची बुद्धी आम्हा सर्वांना व्हावी’, हीच गुरुचरणी प्रार्थना !

– श्री. योगेश जलतारे

(भाग २)

भाग १ वाचण्यासाठी क्लिक करा → https://sanatanprabhat.org/marathi/1013434.html

५. अधर्मामुळे रोग निर्माण होण्यामागील वैज्ञानिक आणि आध्यात्मिक विश्लेषण

एखाद्या वाचकाला असा प्रश्न पडणे स्वाभाविक आहे, ‘धर्म-अधर्म हा विषय थोडा नेहमीपेक्षा निराळा आहे. तो श्रद्धावंत लोकांसाठी आहे, जो धर्म मानत नाही, त्याने हे बुद्धीने का स्वीकारावे ?’ त्यांनी येथे लक्षात घेतले पाहिजे की, सामान्यतः रोगाची निर्मिती रोगजंतू निर्माण झाल्याने किंवा वाढल्याने होते; परंतु हे जंतू निर्माण होण्यासाठी त्यांना पोषक वातावरण, म्हणजे रज-तम गुणांचे प्राबल्य. याचे बुद्धीला समजण्यासारखे उदाहरण, म्हणजे आधुनिक वैद्य सांगतात, ‘स्वच्छता राखा.’ स्वच्छतेमुळे एखाद्या जागेवर रोगजंतूंचा संसर्ग अल्प प्रमाणात होतो, त्याच ठिकाणी अस्वच्छता असल्यास रोगजंतू वाढतात. ‘अस्वच्छता’ हे लक्षण ती करणार्‍या लोकांमध्ये रज-तम अधिक असल्याचे दर्शक आहे. जेथे तमोगुणी प्रवृत्ती अधिक असतात, तेथे आळस आणि त्यातून अस्वच्छता निर्माण होते. थोडक्यात या उदाहरणातून रज-तम वाढल्यामुळेच रोगाची निर्मिती होते, हे सकृतदर्शनी लक्षात येऊ शकेल.

जनावरे आणि फळे यांचे संकरण


अधिक दूध मिळवण्याच्या लोभापायी देशी गायींचे संकरण केले जाते. म्हशींनी अधिक दूध द्यावे, यासाठी त्यांना विविध प्रकारची औषधे दिली जातात. आज आपण बाजारात जी फळे विकत घेतो, तीही विविध प्रकारांनी संकरित केलेली असतात. त्यामुळे त्या फळांचा लाभ आपल्या आरोग्यासाठी होईल का ? अल्प कालावधीमध्ये अधिक उत्पन्न मिळवण्याच्या दुष्ट हेतूने केळी, आंबे, द्राक्ष, स्ट्रॉबेरी इत्यादी पदार्थ रासायनिक पदार्थातून बुडवून लगेचच पिकवली जातात. त्या रासायनिक पदार्थांचा शरिरावर घातक परिणाम होतो. जे लोक मांसाहार करतात किंवा मासे खातात, ते टिकून रहाण्यासाठी त्याच्यावरही रासायनिक प्रक्रिया केली जाते. त्यामुळे बाजारात मिळणारे हे पदार्थ कायम ताजेच आहेत, असे वाटते; परंतु वास्तव तसे नसते. या फळांमुळे वा खाद्यपदार्थांमुळेही लोकांना विविध प्रकारचे आजार जडतात. हेही अधर्माचे एक उदाहरण आहे.

– श्री. योगेश जलतारे

काही जण म्हणतील, ‘धर्मपालन करणार्‍या सत्त्वगुणी व्यक्तीला रोग होत नाहीत का ?’ तर याचे उत्तर आहे, ‘होतात’; परंतु सत्त्वगुणी व्यक्तीमध्ये त्या रोगाचा प्रतिकार करण्याची क्षमताही असते, किंबहुना सत्त्वगुणी व्यक्ती रोगाला अधिक सोशिकपणे सामोरे जाऊ शकते. व्यक्ती जर रज-तम गुणी असेल, तर तिला त्या आजाराचा अधिक त्रास होतो. काही वेळा अशा व्यक्ती आजाराने खचतात. सदाचरणी व्यक्तीत त्याच्यातील चांगले गुण आणि सकारात्मकता यांमुळे ‘इम्युनिटी’, म्हणजे ‘रोगप्रतिकारक्षमता’ निर्माण होते. आध्यात्मिक परिभाषेत सत्त्वगुणी व्यक्तीची देहबुद्धी अन्य व्यक्तींच्या तुलनेत न्यून असल्याने तिला होणार्‍या त्रासाची जाणीवही इतरांच्या तुलनेत न्यून असते. या व्यतिरिक्त बुद्धीला न समजण्यासारखा अनुभूतीचा भाग, म्हणजे सत्त्वगुणी व्यक्तीला देवाचा आशीर्वाद मिळत असल्याने ‘आजाराचे निदान योग्य वेळेत होणे, तज्ञ आणि सात्त्विक आधुनिक वैद्यांच्या मार्गदर्शनाखाली योग्य अन् अचूक औषधोपचार मिळणे, इतरांच्या तुलनेत दुखणे न्यून काळात दूर होणे किंवा असाध्य आजार असल्यास त्या आजाराचा त्रास न जाणवणे’, अशा विविध अनुभूती येतात.

श्री. योगेश जलतारे

जेव्हा मानवाचा लोभ वाढतो, तेव्हा तो पंचमहाभूतांचे संतुलन बिघडवतो. एकदा का हे संतुलन बिघडले की, रोगांचे मोठ्या प्रमाणात संक्रमण होते. थोडक्यात समष्टी स्तरावर होणार्‍या अधर्माच्या परिणामस्वरूप साथीचे रोग येतात.

– श्री. योगेश जलतारे

६. समष्टी स्तरावर अधर्माचा परिणाम, म्हणजे साथीचे रोग !

प्राचीन काळापासून आपल्याकडे साथीचे रोग पसरल्याने लाखो लोकांचा मृत्यू झाल्याचे आपण ऐकले असेल किंवा सध्याचे उदाहरण, म्हणजे जगभरात आलेली ‘कोरोना’ची महामारी. या महामारीमुळे लक्षावधी लोकांचा मृत्यू झाला. साथीच्या आजारांकडे विज्ञानाच्या दृष्टीने पाहिल्यास त्याचे कारण विषाणू किंवा जीवाणू असते; मात्र जेव्हा आपण आध्यात्मिक दृष्टीकोनातून विचार करतो, तेव्हा त्याचे मूळ कारण लक्षात येते.

प्रतिदिन व्यक्तीगत उपासना करत नसल्यानेही रोगांची वृद्धी !

लेखात उल्लेख केल्याप्रमाणे रोग हे रज-तम गुणांच्या आधिक्यातून निर्माण होतात. आज आपण अनुभवतो की, प्रतिदिन आपल्या अवतीभवती रज-तमाचे प्राबल्य वाढतच आहे. वातावरणातील रज-तमाच्या परिणामस्वरूप स्वतःतही रज-तमाचे प्रमाण वाढत असते; कारण रज-तमाला पोषक वातावरण असणारे स्वतःचे स्वभावदोष त्यासाठी साहाय्यभूत ठरतात. उदाहरणार्थ आपला स्वभाव रागीट आहे आणि आपण हिंसक मारामार्‍या असणारा चित्रपट पाहिला, तर त्याच्या परिणामस्वरूप आपल्यातील हिंसकता वाढते, तसेच स्वभावात चंचलता, भावूकता असल्यास तशा वातावरणात गेल्यास ती वाढीस लागते. यातून पुढे दोष बळावून त्यातून रोगांची उत्पत्ती होते, उदाहरणार्थ भावनाशीलतेमुळे मनात असुरक्षितता वाढली किंवा मनातील विचार वाढले, तर त्यातून अर्धशिशी, म्हणजे ‘मायग्रेन’ किंवा रक्तदाबाचा आजार उफाळून येतो. त्यामुळे ‘प्रतिदिन काहीतरी साधना वा उपासना करून सत्त्वगुण वाढवावा आणि स्वतःतील रज-तमाचे प्राबल्य न्यून करावे’, असे आपल्या धर्मात सांगितले आहे; परंतु बुद्धीजीवी लोकांना ‘देवधर्म म्हणजे थोतांड आहे’, असे वाटते किंवा ‘देवधर्म करणे, म्हणजे म्हातारपणी करण्याची औपचारिकता आहे’, असे काही लोकांना वाटते. त्यामुळे ते नित्यनैमित्तिक उपासना करत नाहीत, हाही अधर्मच असून रोगनिर्मितीचे हे एक कारण आहे.

– श्री. योगेश जलतारे

आयुर्वेदानुसार एखादा आजार संपूर्ण शहराचा किंवा देशाचा नाश करतो, तेव्हा त्याला ‘जनपदोद्धवंस’ (साथीचे आजार) म्हणतात. यामागेही अधर्माचरण हेच कारण असते. येथे अधर्म, म्हणजे केवळ पूजा न करणे नव्हे, तर नैतिक मूल्यांचे अधःपतन, पराकोटीचा स्वार्थ, निसर्ग नियमांचे उल्लंघन, समष्टी पाप अशा विविध गोष्टींचा अंतर्भाव असतो. जेव्हा समाजातील प्रभावशाली लोक किंवा बहुसंख्य जनता चुकीच्या मार्गाने वागू लागते, तेव्हा निसर्गातील चैतन्य शक्तीचा उद्रेक होतो. त्याच्या परिणामांमुळे साथीचे आजार उद्भवतात. जेव्हा मानवाचा लोभ वाढतो, तेव्हा तो पंचमहाभूतांचे संतुलन बिघडवतो. एकदा का हे संतुलन बिघडले की, रोगांचे मोठ्या प्रमाणात संक्रमण होते. थोडक्यात समष्टी स्तरावर होणार्‍या अधर्माच्या परिणामस्वरूप साथीचे रोग येतात.

विविध प्रकारचे मानसिक आजार

आज आपण पहातो की, मागील काही दशकांत भारतातही मनोविकारांचे प्रमाण पुष्कळ वाढले आहे. एरव्ही हे दुखणे भारतात नव्हते. ते पाश्चात्त्यांकडून आपल्याकडे आले. भारतीय लोक पूर्वीपासून साधनारत असल्याने त्यांचे मानसिक स्वास्थ्य उत्तम रहात होते; परंतु पाश्चात्त्य विकृतीच्या अंधानुकरणामुळे जीवनशैली पालटल्याने आज भारतातील लोक विविध प्रकारच्या मानसिक रोगांना सामोरे जात आहेत. कित्येकांना नैराश्याने ग्रासले आहे. काहींच्या मनात असुरक्षितता आणि न्यूनगंड वाढला आहे. परिणामस्वरूप लोकांचे मानसिक स्वास्थ्य हरवले आहे. काही जणांना तर इतके पराकोटीचे त्रास होतात की, ते त्या त्रासाने त्रस्त होत अगदी आत्महत्या करण्याचा पर्यायही निवडतात.

– श्री. योगेश जलतारे

(क्रमशः पुढच्या रविवारी)

– श्री. योगेश जलतारे, संपादक, ‘सनातन प्रभात’ प्रसारमाध्यम समूह. (५.२.२०२६)

संपादकीय भूमिका

अधर्म म्हणजे केवळ पूजा न करणे नव्हे, तर नैतिक मूल्यांचे अधःपतन, पराकोटीचा स्वार्थ, निसर्ग नियमांचे उल्लंघन आणि समष्टी पाप होय !

भाग ३ वाचण्यासाठी  क्लिक करा → https://sanatanprabhat.org/marathi/1020958.html