१४.१०.२०२५ या दिवशी व्हन्नूर (तालुका कागल, जिल्हा कोल्हापूर) येथील सनातनचे साधक कै. प्रदीप वाडकर (वय ३३ वर्षे) यांचे निधन झाले. ते ‘सोशल मिडिया’ची सेवा करत होते. त्यांची पत्नी श्रीमती प्रियांका वाडकर यांची यजमानांच्या निधनाच्या कालावधीत झालेली विचारप्रक्रिया येथे दिली आहे. ‘या कठीण प्रसंगाला श्रीमती प्रियांका वाडकर या सकारात्मक राहून कशा सामोरे गेल्या आणि या परिस्थितीत त्यांची गुरूंवरील निष्ठा कशी टिकून राहिली ?’, हे सर्वांनाच शिकण्यासारखे आहे.

१. ‘श्री. प्रदीप यांच्या समवेत गावी जावे’, असे वाटणे आणि सर्व सेवांचे नियोजन करून त्यांच्या समवेत जाणे
‘ऑगस्ट २०२५ च्या शेवटी घरासंबंधीच्या काही कामांसाठी श्री. प्रदीप (माझे यजमान) गावी जाणार होते. त्यांना पुष्कळ वेळा गावी जावे लागायचे. त्यामुळे प्रत्येक वेळी मला त्यांच्या समवेत जाणे शक्य होत नव्हते; परंतु या वेळी मला मनातून ‘त्यांच्या समवेत जावे’, असे वाटत होते. त्यानुसार सर्व सेवांचे नियोजन करून मी त्यांच्या समवेत गेले.
२. यजमान रुग्णाईत असतांना वैद्यकीय उपचारांच्या वेळी आलेल्या अडचणी

२ अ. श्री. प्रदीप यांना अकस्मात् उलट्या होऊ लागणे आणि त्यांना तालुक्यातील एका रुग्णालयात भरती करणे अन् रात्री ‘आधुनिक वैद्य वेगळे काही उपचार करणार नाहीत’, असे समजल्यामुळे यजमानांना घरी घेऊन येणे : २०.९.२०२५ या दिवशी रात्री २.३० वाजल्यापासून श्री. प्रदीप यांना अकस्मात् उलट्या होऊ लागल्या आणि त्या थांबत नव्हत्या. त्यांना आधुनिक वैद्यांकडे नेले. आधुनिक वैद्यांनी ‘इंजेक्शन’ दिले, तरी त्यांच्या उलट्या थांबल्या नाहीत. शेवटी त्यांना तालुक्यातील एका रुग्णालयात भरती केले. तेथे त्यांना ‘सलाईन’ लावले. मी दिवसभर त्यांच्या जवळ होते. त्यांना बोलता येत नव्हते. त्यामुळे मी त्यांची राहिलेली सेवा पूर्ण केली. रात्री ‘आधुनिक वैद्य वेगळे काही उपचार करणार नाहीत’, असे समजल्यामुळे आम्ही त्यांना घेऊन घरी आलो.
२ आ. श्री. प्रदीप यांना पुन्हा उलट्या झाल्यामुळे त्यांना तालुक्यातील रुग्णालयात नेणे, तेथे आधुनिक वैद्यांनी सांगितल्यानुसार श्री. प्रदीप यांना कोल्हापूरला रुग्णालयात घेऊन जाणे आणि तेथे त्यांना अतीदक्षता विभागात ठेवणे : दुसर्या दिवशी सकाळी श्री. प्रदीप यांना परत उलट्या होऊ लागल्या. श्री. प्रदीप म्हणाले, ‘‘मी झोपलो की, बरे वाटेल’’ म्हणून ते झोपले. त्यानंतर त्यांना सायंकाळी पुन्हा ताप येऊ लागला; म्हणून रात्री ८ वाजता आम्ही त्यांना तालुक्यातील दुसर्या आधुनिक वैद्यांकडे घेऊन गेलो. त्यांनी औषधे दिली आणि घरी आल्यावर त्यांना थोड्या वेळाने पुन्हा उलट्या चालू झाल्या. त्यांचा त्रास अल्प झालाच नाही.
श्री. प्रदीप यांना तालुक्यातील प्रसिद्ध रुग्णालयात नेले. तेथे गेल्यावर तेथील आधुनिक वैद्यांनी तपासले आणि अहवाल पाहून म्हणाले, ‘‘त्यांचे ‘क्रिएटीनिन’ (Creatinine) वाढले आहे. ते आणखी वाढले, तर त्यांना ‘डायलिसिस’ (टीप १) करावे लागू शकते. त्यामुळे त्यांना ज्या रुग्णालयात ‘डायलिसिस’ची सोय आहे, अशा कोल्हापूर शहरातील रुग्णालयात घेऊन जा.’’ त्यानुसार आम्ही रात्री ८ वाजता यजमानांना कोल्हापूरच्या रुग्णालयात घेऊन गेलो. तिथे त्यांना लगेच अतीदक्षता विभागात (ICU मध्ये) ठेवले.
टीप १ – मूत्रपिंडांचे कार्य पुष्कळ न्यून झाल्याने रक्तातील दूषित पदार्थ बाहेर काढून टाकण्यासाठी वापरलेली कृत्रिम पद्धत
मला पुष्कळ भीती वाटत होती. मी आश्रमात नामजपादी उपाय विचारून घेतले आणि त्यानुसार नामजप करू लागले. दुसर्या दिवशी आधुनिक वैद्यांनी सांगितले, ‘‘औषधांचा परिणाम झाला नाही, तर ‘डायालिसिस’ करावे लागू शकते. आपण प्रयत्न करूया; पण आमच्या हातात काही नाही.
२ इ. गुरुकृपेने ‘डायालिसिस’ची आवश्यकता न पडणे : आधुनिक वैद्य प्रतिदिन वेगवेगळे निदान सांगत होते. त्यांच्या उपायांना यश येत नव्हते. गुरुकृपेने त्यांना डायालिसिसची आवश्यकता पडलीच नाही. मी गुरुदेवांचे स्मरण करत बसले असतांना ‘गुरुदेव रुग्णालयात आले आहेत आणि ते अतीदक्षता विभागात जाऊन ते श्री. प्रदीप यांना चैतन्य देऊन त्यांचा त्रास अल्प करत आहेत’, असे मला जाणवले. त्यानंतर त्यांचा तोंडाचा जंतुसंसर्ग अल्प होत होता. ६ व्या दिवशी श्री. प्रदीप यांना अतीदक्षता विभागातून बाहेर आणले. तेव्हा मला पुष्कळ आनंद झाला. मी दुसर्या दिवशी कोल्हापूरच्या श्री महालक्ष्मीच्या मंदिरात जाऊन तिची ओटी भरून आले.
श्री. प्रदीप यांना थोडे बरे वाटत होते; पण अजून त्यांना थुंकी गिळता येत नव्हती. त्यांना नाकातून घातलेल्या नळीमधून पातळ पदार्थ दिले जात होते. मला त्यांची सर्व सेवा करायला मिळाली. माझ्या मनात ‘यजमानांची सेवा संतसेवा; म्हणून करता येईल’, असा विचार होता. मी त्यांना प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न करत होते. मी दिवसातून २ वेळा उपाय विचारून घेतले, तसेच सर्व मंत्र आणि स्तोत्रे म्हणत होते. साधक भेटायला आले की, मला ‘साधकांच्या रूपात गुरुदेव भेटायला आले आहेत’, असे वाटत होते. मला पुष्कळ आनंद होत होता.

२ ई. प्रदीप यांना पुन्हा ताप येऊ लागणे, ऑक्सिजनची पातळी अल्प होणे आणि सद्गुरु गाडगीळकाका यांनी ‘देव पुष्कळ सामर्थ्यवान आहे. आपण नकारात्मक विचार करायचा नाही’, असे सांगून आश्वस्त करणे : चार दिवसांनी त्यांना पुन्हा ताप येऊ लागला. त्यांना ‘इंजेक्शन’ दिले, तरी तेवढ्यापुरता ताप अल्प व्हायचा आणि परत वाढत होता. त्यामुळे ऑक्सिजनची पातळी अल्प होत होती. एका डॉक्टरांनी प्रदीप यांना श्वसनाचा व्यायाम करायला सांगितला होता. मी तो त्यांच्याकडून १५ – २० मिनिटांनी करून घेत होते. शेवटी आधुनिक वैद्यांनी त्यांना रात्री पुन्हा अतीदक्षता विभागात ठेवले. तेव्हा मी देवाला प्रार्थना करत होते. आधुनिक वैद्य कितीही नकारात्मक बोलले, तरी ‘त्यांना काही होणार नाही’, अशी माझी श्रद्धा होती. सद्गुरु गाडगीळकाका यांनीही सांगितले, ‘‘देव पुष्कळ सामर्थ्यवान आहे. आपण नकारात्मक विचार करायचा नाही.’’
२ उ. प्रदीप यांची प्रकृती प्रतिदिन अधिक चिंताजनक होत जाणे आणि त्यांची पुष्कळ चिडचिड होऊन त्यांनी रागाने हाताला लावलेले ‘सलाईन’ अन् नाकातील नळी काढून टाकणे : आधुनिक वैद्य म्हणाले, ‘‘श्री. प्रदीप यांचा जंतुसंसर्ग पुष्कळ वाढला आहे. अजून वाढला, तर त्यांचे फुप्फुस पालटावे लागेल. त्यांची प्रकृती प्रतिदिन अधिक चिंताजनक होत होती. त्यांना ‘ऑक्सिजन’ लावला होता. त्यांची पुष्कळ चिडचिड होऊ लागली. ते म्हणाले, ‘‘मला इथून दुसरीकडे घेऊन जा. माझ्या जवळ कुणी तरी थांबा.’’ त्यांनी रागाने हाताला लावलेले ‘सलाईन’ आणि नाकातील द्रव अन्नपदार्थ देण्याची नळी काढून टाकली. ते नाकातील ‘ऑक्सिजन’ची नळीही काढत होते. तेवढ्यात मी तेथे गेले. मी त्यांना पुष्कळ प्रेमाने समजावून सांगितले. त्यांच्या जवळ उभी राहून नामजप केला आणि तेथील प्रमुखांना विनवणी करून १ घंटा अतीदक्षता विभागात थांबले.
२ ऊ. प्रदीप यांना अन्य रुग्णालयात नेणे, तेथे त्यांना ‘व्हेंटिलेटर’ लावणे नंतर त्यांना पुण्याला घेऊन जाण्यास सांगणे : दुसर्या दिवशी त्यांना दुसर्या रुग्णालयात नेले. तेथे असलेल्या ‘चेस्ट स्पेशालिस्ट’ डॉक्टरांनी तपासून त्यांना ‘व्हेंटिलेटर’ (श्वासोच्छ्वास घेण्यास साहाय्य करणारे साधन) लावले. या रुग्णालयात त्यांना नवीन द्रव अन्नपदार्थ देण्याची नळी घातली. नवीन डॉक्टरांनी त्यांची विशेष काळजी घेतली. ‘व्हेंटिलेटर’मुळे त्यांना माझ्याशी बोलता येत नव्हते; पण ते डोळे आणि भुवई हलवून मला प्रतिसाद देत होते. त्यानंतर आधुनिक वैद्य म्हणाले, ‘‘यांच्यावर वेगळे काही उपाय करू शकत नाही. तुम्ही त्यांना पुण्याला घेऊन जा’’; पण त्यांना १ घंट्याला ऑक्सिजनचा १ सिलेंडर लागत होता. अशा परिस्थितीत त्यांना हलवणे पुष्कळ धोक्याचे होते. त्यामुळे ‘दोन दिवसांनी निर्णय घेऊया’, असे आम्ही ठरवले.
२ ए. प्रसंग स्वीकारता न येणे : मी एकदा सासूबाईंना म्हणाले, ‘‘यांना काही झाले, तर ते मला सहन होणार नाही.’’ आम्ही श्रद्धेने नामजप करत होतो. मी श्री. प्रदीप यांना सारखे सांगायचे, ‘‘तुम्हाला काही होणार नाही. गुरुदेवांनी तुमचा हात धरला आहे.’’ एकदा मी गुरुदेवांचे स्मरण करत होते. तेव्हा मला असे दिसले, ‘मी गुरुदेवांच्या चरणांना नमस्कार करत आहे.’ मी त्यांना एकटीच नमस्कार करत होते; परंतु नंतर गुरुदेवांनी त्यांच्या चरणांजवळ प्रकाशाचा झोत टाकला आणि ‘श्री. प्रदीप त्यांच्या चरणांजवळ आहेत’, हे मला दाखवले. तेव्हा कदाचित् देव मला पूर्वसूचना देत होता; पण मला ते स्वीकारता येत नव्हते.
२ ऐ. प्रदीप यांच्या वेदना पाहून पुष्कळ वाईट वाटणे : डॉक्टरांनी ‘दुसर्या एका तज्ञ आधुनिक वैद्यांचे मत घेणार आहोत’, असे सांगितले. त्यांनी आमच्याकडून आवश्यक ती माहिती लिहून घेतली आणि प्रक्रिया चालू केली. श्री. प्रदीप यांची हाताची नस मिळत नव्हती. २३ दिवस सतत लावलेल्या ‘सलाईन’मुळे त्यांचे दोन्ही हात सुजले होते. पायाला एक ‘सलाईन’ लावले होते. त्यामुळे आधुनिक वैद्यांनी Central line (टीप २) घालण्यासाठी माझ्याकडून स्वाक्षरी करून घेतली. त्यांच्या शरिरात ‘Central line’ टाकल्याचे पाहून मला पुष्कळ वाईट वाटले. त्यांच्या वेदना पाहून ‘एवढे प्रारब्ध सहन करण्यापेक्षा मृत्यू आलेला बरा’, असे मला वाटले.’
टीप २ – इंट्राव्हेनस ॲडमिनिस्ट्रेशन (Intravenous administration) साठी वापरल्या जाणार्या सेंट्रल लाईन (Central Line) ला मराठीत ‘मध्यवर्ती शिरा कॅथेटर’ (Central Venous Catheter – CVC) असे म्हणतात. ही एक वैद्यकीय प्रक्रिया असून तिचा उद्देश मोठ्या शिरेद्वारे रुग्णाला दीर्घकाळ उपचार देणे हा असतो.
सेंट्रल लाईन ही एक लांब, पातळ आणि लवचिक नळी (कॅथेटर) असते, जी शरिरातील एका मोठ्या शिरेमध्ये टाकली जाते. सामान्यतः मान, छाती, हाताचा वरचा भाग किंवा जांघेत (Groin) असलेल्या मोठ्या शिरेचा यासाठी वापर केला जातो. या नळीचे टोक थेट हृदयाजवळ असलेल्या ‘व्हेना कावा’ (Vena cava) नावाच्या मुख्य शिरेपर्यंत पोचते. ती शरिरातील रक्त हृदयाकडे नेते.
३. पतीच्या कार्यालयातील वरिष्ठ अधिकार्याने ‘आर्थिक साहाय्य करणार आहे’, असे सांगितल्यावर आत्मविश्वास वाढणे
श्री. प्रदीप नोकरी करत होते. त्यांच्या वरिष्ठ अधिकार्याने भ्रमणभाष करून मला सांगितले, ‘‘तुम्हाला आर्थिक साहाय्य लागले, तर मला निःसंकोच सांगा. मी साहाय्य करीन.’’ हे ऐकून माझा आत्मविश्वास पुष्कळ वाढला. तेव्हा मला वाटले, ‘देव आता यांना बरे करील. आता माझ्या सर्व अडचणी सुटतील.’
(क्रमशः)
– श्रीमती प्रियांका वाडकर (वय ३१ वर्षे), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.(१८.१०.२०२५)
भाग २ वाचण्यासाठी क्लिक करा → https://sanatanprabhat.org/marathi/1021456.html
| येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या काही वेळा अनिष्ट शक्तींमुळे किंवा ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांना आलेल्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सर्वांनाच येतील, असे नाही. – संपादक |
थोडक्यात महत्त्वाचे : ०६.०६.२०२६
व्यष्टी साधना गांभीर्याने करणारे म्हार्दाेळ (गोवा) येथील श्री. परशुराम प्रभुदेसाई (आध्यात्मिक पातळी ६१ टक्के, वय ७८ वर्षे) आणि सौ. पूनम प्रभुदेसाई (आध्यात्मिक पातळी ६१ टक्के, वय ७९ वर्षे) !
साधकांची आध्यात्मिक पातळी घोषित करण्याच्या सत्संगात फोंडा, गोवा येथील सौ. स्नेहा शिवदत्त नाडकर्णी यांना जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती !
पू. (कै.) श्रीमती आनंदी पाटीलआजी (वय १०४ वर्षे) यांचे अंत्यदर्शन घेतांना डोंबिवली (जिल्हा ठाणे) येथील साधकांनी अनुभवलेली उच्च आध्यात्मिक स्थिती !
‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा ‘कर्मयोग, ज्ञानयोग आणि भक्तीयोग’ या क्रमाने झालेला आध्यात्मिक प्रवास’ अन् या लिखाणावर श्री. राम होनप यांना सूक्ष्मातून प्राप्त झालेले ज्ञान
वर्ष २०२५ मध्ये प्रयागराज येथे झालेल्या महाकुंभपर्वाच्या कालावधीत साधिकेने भाववृद्धीसाठी केलेले प्रयत्न आणि तिला आलेल्या अनुभूती !