(कै.) प्रदीप वाडकर यांच्या निधनानंतर ‘मला मायेत न अडकवता गुरूंनी साधनेची पुढची संधी दिली’, असा विचार करून स्थिर रहाणारी त्यांची पत्नी श्रीमती प्रियांका वाडकर (वय ३१ वर्षे) !

मागील भागात आपण (कै.) प्रदीप वाडकर रुग्णाईत असतांना ‘त्यांना कशा प्रकारचे त्रास झाले ?’, ते पाहिले. या भागात आपण त्यांच्या निधनानंतरची सूत्रे पहाणार आहोत.

मागील भाग  वाचण्यासाठी क्लिक करा → https://sanatanprabhat.org/marathi/1020611.html

कै. प्रदीप वाडकर

४. निधन होणे

४ अ. प्रदीप यांना खटल्याचा निकाल आपल्या बाजूला लागल्याचे सांगून त्यांची काळजी दूर करणे : १४.१०.२०२५ या दिवशी सासरे मला म्हणाले, ‘‘प्रदीपला सांग की, आपल्या दोन्ही ‘केस’चे निकाल आपल्या बाजूने लागले आहेत. तू काळजी करू नकोस.’’ (आमच्या गावच्या जमिनीचे दोन खटले चालू होते. त्या खटल्यांचा निकाल आमच्या बाजूने लागल्याने त्यांना कुठलीही काळजी रहाणार नाही. यासाठी सासर्‍यांनी मला तो निरोप त्यांना देण्यास सांगितला होता.) हा निरोप देऊन आम्ही जेवायला गेलो.

४ आ. नंतर प्रदीप यांची प्रकृती पुष्कळ बिघडणे, देवाला प्रार्थना करणे, सकारात्मक रहाण्याचा प्रयत्न करणे आणि सकाळी भावाचा भ्रमणभाष आल्यावर त्यांचे निधन झाल्याचे समजणे : आम्ही जेवून परत आलो, तर यांची स्थिती पुष्कळ बिघडली होती. डॉक्टर म्हणाले की, त्यांचे हदय बंद पडले आहे. त्यांनी कृत्रिम श्वासोच्छ्वास (CPR, Cardiopulmonary resuscitation) द्यायला आरंभ केला. मी लगेच नामजप विचारून त्याप्रमाणे नामजप चालू केला. संतांनीही त्यांच्यासाठी नामजपादी उपाय केले. माझा नामजप एकाग्रतेने आणि श्रद्धेने होत होता. माझ्या मनात ‘श्री गुरूंनी त्यांचा हात धरला आहे, तर सर्व चांगलेच होईल’, असा विचार येत होता. अर्ध्या घंट्याने प्रदीप यांच्या प्रकृतीत सुधारणा झाल्याचे दिसले. ते शांत दिसत होते. त्यांचे डोळे बंद होते. त्यांची काहीच हालचाल दिसत नव्हती. ‘व्हेंटिलेटर’ चालू होता. त्यांचा रक्तदाब अल्प झालेला दिसत होता. मी देवाला प्रार्थना केली, ‘देवा, तूच त्यांचे रक्षण कर. माझ्या मनात एकही अयोग्य विचार येऊ देऊ नकोस.’ त्या दिवशी प्रदीप यांच्या समवेत साहाय्यासाठी माझे दीर रुग्णालयात राहिले होते. मी दिरांना मध्यरात्री ३ – ४ वेळा भ्रमणभाष केला, तरी त्यांनी तो उचलला नाही. शेवटी सकाळी माझ्या भावाचा ‘मी तुला घ्यायला येतो’, असा भ्रमणभाष आला. तेव्हा ‘आता आपल्या हातात काही नाही’, असे मला वाटले. रात्रीच प्रदीप यांचे निधन झाले होते.

५. निधनानंतर

अ. प्रदीप यांचा मृतदेह घरी आणल्यावर मला पुष्कळ दुःख झाले. तेव्हा मी देवाला प्रर्थना केली, ‘देवा, तूच त्यांच्या लिंगदेहाचे रक्षण कर. त्यांना चांगली गती दे. तू त्यांचा हात धरला आहेस, तर तूच त्यांना तुझ्या समवेत घेऊन जा.’

आ. घरातील सर्वांसाठी हा प्रसंग फारच कठीण होता. सर्वजण अत्यंत शोक करत होते. ७० – ८० लोक सभोवताली बसून रडत होते. तेव्हा मी सर्वांकडे दुर्लक्ष करून डोळे मिटून एकाग्रतेने ‘श्री गुरुदेव दत्त ।’ हा नामजप करत प्रदीप यांच्या पायाजवळ बसले. मला रडायला येत होते; पण नामजपाने माझे मन स्थिर होत होते. थोड्या वेळाने त्यांचा देह अंत्यसंस्कारासाठी नेला.

इ. मी घरात जाऊन अंघोळ केली. माझ्या मनात ‘माझ्या संदर्भात असे का झाले ? इतका दुःखद प्रसंग माझ्यावर का आला ?’, असे विचार येत होते. नंतर मला ‘हे विचार म्हणजे सर्व माया आहे आणि ही परिस्थिती स्वीकारणे, ही माझी साधना आहे’, याची जाणीव झाली.

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

‘वयाच्या ३१ व्या वर्षी पतीनिधनाचे दुःख कसे असते ?’, याची कोणी कल्पनाही करू शकत नाही. अशा स्थितीत ‘स्थिर राहून पुढील साधनेचा विचार करणे’, ही अपार कौतुकाची गोष्ट आहे. पती-पत्नी एकमेकांना पूरक असोत किंवा नसोत; पण वयाच्या सत्तरीनंतरही, म्हणजे वयाने परिपक्वता आलेली असूनही पतीनिधनानंतर ‘आता माझे कसे होणार ? माझा सांभाळ कोण करणार ? मी त्यांच्या आधी का नाही गेले ?’, असे अनेक विचार सतावून सर्वसाधारण स्त्री दुःखाने होरपळून निघते; पण प्रियांका ‘मला मायेत न अडकवता गुरूंनी साधनेची पुढची संधी दिली’, असा विचार करून स्थिर राहू शकते. यातूनच तिची ‘साधनेची तळमळ आणि देवावरील निष्ठा’ लक्षात येते. प्रियांकाचे कौतुक करावे तितके थोडे !’

– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले (८.१२.२०२५)

६. सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ आणि श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांनी भ्रमणभाष करून आधार देणे

मी सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांना भ्रमणभाष करून ‘प्रदीप यांना चांगली गती मिळाली का ?’, असे विचारले. तेव्हा ते म्हणाले, ‘‘श्री गुरूंनी त्यांना चांगली गती दिलीच असेल.’’ थोड्या वेळाने श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांचा मला भ्रमणभाष आला. त्या म्हणाल्या, ‘‘प्रदीप यांचे कल्याण झाले. तू त्यांची चिंता करू नकोस. तू देवाकडे तुझे मनोबल वाढवण्यासाठी प्रार्थना कर.’’ त्यानंतर मला स्थिर वाटू लागले.

७. ‘श्री गुरूंनी कै. प्रदीप यांना पत्नीच्या दायित्वातून मुक्त केले आहे’, असे जाणवणे

प्रदीप यांच्या निधनानंतर माझे अलंकार काढणे चालू होते. तेव्हा ‘देवाने आमचे देवाणघेवाण पूर्णतः संपवले आहेत आणि श्री गुरूंनी त्यांना माझ्या दायित्वातून मुक्त केले आहे’, असे मला जाणवत होते.

८. (कै.) प्रदीप यांच्या निधनानंतर झालेली विचारप्रक्रिया !

अ. ‘देव जे घडवतो, ते चांगल्यासाठीच असते’, असे मला वाटते. सद्गुरु गाडगीळकाका म्हणाले की, ‘प्रदीप वाचले असते, तरी त्यांना अपंगत्व आले असते.’ प्रत्यक्ष डॉक्टर म्हणत होते, ‘त्यांचे फुप्फुस पालटले असते, तरी नवीन फुप्फुसात पुन्हा जंतुसंसर्ग होण्याची शक्यता होती.’

आ. कागल, कोल्हापूर या भागात कोणी व्यक्ती मृत झाली की, भेटीसाठी आलेले लोक अगदी जवळच्या नातेवाईकाच्या निकट जाऊन त्याच्या गळ्यात गळे घालून मोठमोठ्याने रडायचे. याचा मला त्रास होऊ नये, कोणी माझ्याजवळ येऊन मोठमोठ्याने रडू नये; म्हणून माझ्या सासूबाई आणि चुलत सासूबाई माझी काळजी घ्यायच्या. लोक भेटायला आले की, सासूबाई मला त्या दोघींच्या मध्ये बसायला सांगायच्या आणि भेटायला आलेल्या व्यक्तीला सांगायच्या की, ‘‘प्रियांकाला बरे वाटत नाही. त्यामुळे ितच्या जवळ जाऊ नका.’’ अशा प्रकारे सासरच्या मंडळींच्या माध्यमातून देव माझे अखंड रक्षण करत होता.

इ. या कालावधीत ‘श्री गुरुदेव दत्त ।’ या नामजपाचे महत्त्व माझ्या लक्षात आले. ‘श्री गुरुदेव दत्त ।’ हा नामजप करत असतांना गुरुतत्त्व श्वासागणिक माझ्या हदयात भरते आणि ते देहात सगळीकडे पसरते’, असे मला जाणवले. या नामजपाने ‘भावनाशीलता, अनावश्यक विचार आणि अस्वस्थता’ न्यून होऊन मला शांत वाटत होते.

ई. मी कै. प्रदीप यांच्या निधनाचा विचार सहन करू शकत नव्हते; पण आता मला वाटते, ‘सर्व ईश्वरेच्छेने होते. त्यामुळे दुःख करून काही उपयोग नाही.’ माझ्या मनात नकारात्मक विचार आले नाहीत. देवाने माझी श्रद्धा ढळू दिली नाही आणि मला सकारात्मक ठेवले.

(कै.) प्रदीप यांच्या निधनानंतर कवितेतून व्यक्त केलेले मनोगत !

१४.१०.२०२५ या दिवशी जेव्हा श्री. प्रदीप यांना पुष्कळ वेदना होत होत्या, तेव्हा श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांचा मला भ्रमणभाष आला. त्यानंतर श्री. प्रदीप यांचे निधन झाले. त्या वेळी मला कृतज्ञतेने पुढील कविता सुचली.

श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ

देवाने या जिवाचा उद्धार करून आत्मानंद दिला ।
हा जीव (प्रदीप) प्रारब्धाच्या वेदनेला कंटाळला ।
यातनांमधून भगवंताचा धावा केला ।। १ ।।

प्रियांका वाडकर

दुःख वेदनेचा काळ तो सरला ।
आत्मा अनंतात विलीन झाला ।। २ ।।

बहरला तो क्षण, जेव्हा आत्मा गुरुचरणांशी एकरूप झाला ।
ज्या क्षणी या जन्मातील नाते-बंधनातून सुटला ।। ३ ।।

आत्म्याचे परमात्म्याशी मीलन झाले ।
हा सोहळा प्रदीपसाठी आनंदाचा झाला (टीप १) ।। ४ ।।

धर्मतेजात हा दीप सामावला ।
प्रदीप तेजतत्त्वात विलीन झाला ।। ५ ।।

हे प्रभुनाथ स्वामी,

आपल्या कृपेने माझी दशा कृतकृत्य (टीप २) झाली ।
देवा, तू मला अनमोल भेट (टीप ३) दिली ।। ६।।

टीप १ – वेदनामय जगणे संपल्याने
टीप २ – मला स्थिर ठेवून गुरूंनी कल्याण केले.
टीप ३ – मला मायेत न अडकवता गुरूंनी साधनेची पुढची संधी दिली.

९. सकारात्मक रहाणे

अ. घडलेला प्रसंग ‘माझ्या साधनेसाठी पूरक आहे’, हे देवाने माझ्या लक्षात आणून दिले. कै. प्रदीप यांच्यामध्ये मी फार अडकले होते. आता माझ्याकडे अडकण्यासाठी काही उरले नाही. त्यामुळे आता मी देवासाठी पूर्ण समर्पित होऊ शकते.

आ. ‘देवच माझे सर्वस्व आहे आणि गुरु शाश्वत आहेत’, याची मला जाणीव झाली. ‘गुरुविना कुणाचा आधार नाही’, हे मला समजले.

इ. प्रदीप यांच्या निधनानंतर लोक आम्हाला येऊन भेटत होते. तेव्हा ते म्हणायचे, ‘‘बिचारी, आता हिचे कसे होणार ?’’ तेव्हा ‘देव माझी पदोपदी काळजी घेतो आणि माझा सांभाळ करतो. हे लोक असे बोलून माझे प्रारब्ध संपवत आहेत’, असा भाव ठेवल्याने मला हे स्वीकारता आले.

ई. अनेकांनी मला सांगितले, ‘‘तू लहान असल्यामुळे मंगळसूत्र घालू शकतेस.’’ तेव्हा मला वाटले की, ‘अलंकार ही बाह्य शोभा आहे.’ मी देवाला प्रार्थना करते, ‘देवा, मला आंतरिक अलंकार आणि आंतरिक तेज दे. मला अंतरंगात असे तेज किंवा क्षात्रवृत्ती दे की, ज्यामुळे मला श्री गुरूंचे मन जिंकण्यास साहाय्य होईल.’ मला अलंकारांची आवड नसल्यामुळे तो विषय तिथेच संपला.

१०. श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांनी धीर देणे

आम्हाला भेटायला येणारी माणसे गळ्यात गळे घालून मोठमोठ्याने रडत होती. ते पाहून मला भीती वाटायची. मी श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांना म्हणाले, ‘‘मला येथे थांबू नये’, असे वाटते.’’ तेव्हा त्या म्हणाल्या, ‘‘कर्तव्य पूर्ण करण्यासाठी, तसेच साधना म्हणून देवाच्या साहाय्याने कर्तव्य पूर्ण कर. तुला संयमाने रहायचे आहे.’’

(समाप्त)

– श्रीमती प्रियांका वाडकर (वय ३१ वर्षे), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१८.१०.२०२५)

  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या काही वेळा अनिष्ट शक्तींमुळे किंवा ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांना आलेल्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सर्वांनाच येतील, असे नाही. – संपादक