आज ‘जागतिक चिमणी दिवस’ आहे. त्या निमित्ताने…
चिमण्यांचे चिवचिवणे मनाला उभारी देते. अंगण आणि बाल्कनी येथे येणार्या या पाखरांच्या चपळ हालचाली, त्यांचे धान्य टिपणे यांच्याकडे पहात राहिले नाही, असे बालपण नसेल. सर्वसाधारणपणे त्यांना कुणी फार त्रास देते, असे नाही, तसेच फार जवळही कुणी करते, असे नाही. असे सगळे असले, तरी एकदा एका देशात चिमण्यांना देशाचे शत्रू ठरवून सरसकट मारण्यात आले होते. या लेखात ही दुर्दैवी घटना, तसेच त्याला कारण ठरलेली विचारसणीचाही वेध घेऊ.

१. माओ-त्से-तुंग यांनी चिमण्यांना ‘देशाचे शत्रू’ घोषित करणे
वर्ष १९५० नंतर साम्यवादी विचारसरणीचे नेते माओ-त्से-तुंग यांची सत्ता चीनमध्ये प्रस्थापित झाली. वर्ष १९५८ मध्ये त्यांनी राबवलेल्या ‘फोर पेस्ट्स कँपेन’ (४ किटकांची मोहीम) या राष्ट्रव्यापी मोहिमेचा चिमण्या मारण्याची मोहीम ही एक भाग होती. डास, उंदीर, चिमण्या, माशा हे ते ४ कीटक होत. माओ यांनी चिमण्यांना तापदायक म्हणून ‘देशाचे शत्रू’ घोषित केले; कारण त्यांच्या मते एक चिमणी वर्षाला अनुमाने ४.५ किलो धान्य खाते. धान्य वाचवण्यासाठी त्यांनी संपूर्ण देशाला चिमण्या नष्ट करण्याचे आदेश दिले. लोकांनी भांडी, थाळ्या आणि ढोल वाजवून चिमण्यांना झाडांवर बसू दिले नाही. सतत उडत राहिल्यामुळे चिमण्या थकून भूमीवर पडू लागल्या आणि मरण पावल्या. स्वाभाविक या प्रकल्पात याच कारणाने अन्य पक्ष्यांच्याही नशिबी असाच मृत्यू आला; कारण तेही आवाजाला घाबरून उडू लागले आणि थकून मेले. याखेरीज चिमण्यांची घरटी तोडणे आणि अंडी फोडणे अशाही पद्धती वापरल्या गेल्या. थोडक्यात सर्व स्तरांवर जे जे शक्य ते ते सर्व उपाय चिमण्यांना संपवण्यासांठी वापरण्यात आले. सर्व शाळाच चिमण्यांना मारायला जात असे. एका मुलाच्या नोंदीनुसार ‘चिमण्यादी मारण्यात मजा होती.’ प्रतिदिन वर्तमानपत्रात किती कीटक मारले, याच्या बातम्या छापून येत. संपूर्ण जगाच्या पक्षी इतिहासातील ही एक पुष्कळ पुष्कळ मोठी घटना होती. एका मोठ्या देशात एका पक्षी जातीचा वंशविच्छेद अशा रीतीने करण्यात आला.
चिमण्यांचा नायनाट झाल्यामुळे निसर्गाचा समतोल बिघडला. चिमण्या धान्य खाण्यासह टोळ आणि इतर कीटकही खात असत. चिमण्या नसल्यामुळे अशा कीटकांची संख्या प्रचंड वाढली आणि त्यांनी उभी पिके फस्त केली. या चुकीच्या धोरणामुळे चीनमध्ये ‘ग्रेट चायनीज फेमीन’, म्हणजे चिनी महादुष्काळ आला, ज्यामध्ये अनुमाने १.५ कोटी ते ५.५ कोटी लोकांचा मृत्यू झाला. दुष्काळाची तीव्रता इतकी होती की, माणसांनी माणसांना अन्नासाठी मारले. काहींनी मृत माणसांची प्रेते खाल्ली. जगभरातील संशोधनाने सिद्ध झाले आहे की, मोठ्या दुष्काळाचा तो संपून गेल्यानंतरही माणसावर अनेक दशके शारीरिक, तसेच मानसिक दुष्परिणाम होतो. तसा या महादुष्काळाचा चिनी समाजावरही परिणाम झाला असणारच.

२. समाजमानसाचे विश्लेषण
या सगळ्याच घटनेचे विश्लेषण चीनमधून फारशी माहिती उपलब्ध होत नसतांनाही इतरांनी केले. चिमण्यांविरुद्धची ही मोहीम, म्हणजे देशाने एका छोट्या पक्षाविरुद्ध पुकारलेले युद्ध होते. जेव्हा माओ यांनी चिमण्यांना देशाचे शत्रू घोषित केले, तेव्हा संपूर्ण चीनमध्ये ‘ग्रुप थिंकिंग’ची स्थिती निर्माण झाली. यात व्यक्ती स्वतःची बुद्धी वापरण्याऐवजी समूहाच्या प्रवाहासह वाहून जाते. येथे एका तुलनेने पुष्कळच नवीन असलेल्या विचारसरणीला सर्व समाजाने सर्वांत श्रेष्ठ मानणे, हा गंभीर मानसशास्त्रीय दोष होता. यासह त्या वेळी माओप्रणित नक्षलवादी क्रांतीसमोर सगळ्यांनी मान तुकवली, हेही तितकेच खरे. क्रांतीच्या नावाखाली चालवलेल्या आमूलाग्र परिवर्तनाचा तो काळ होता. लोकांनी जीव वाचवण्यासाठी दुसर्याविरुद्ध खोट्या साक्षी दिल्या.
३. साम्यवादी माओंची निसर्गाकडे पहायची दृष्टी
माओंच्या विचारसरणीत निसर्ग ही एक ‘आध्यात्मिक किंवा नैसर्गिक व्यवस्था’ नसून केवळ मानवी वापरासाठी असलेली ‘वस्तू’ होती. अभ्यासक ज्युडिथ शापिरो यांनी नमूद केले आहे की, ‘माओंचा दृष्टीकोन हा ‘निसर्गावर विजय मिळवणे’, असा होता. यात निसर्गाशी असलेले मानवाचे ‘सहअस्तित्व’ याला काही स्थान नव्हते.
४. प्राचीन चीनमधील निसर्गाकडे पहायची दृष्टी आणि त्यावरील माओप्रणीत आघात
चीनमध्ये प्राचीन काळापासून ताओवाद (लाओ त्से या तत्त्वज्ञाने स्थापन केलेली चिनी तत्त्वज्ञानाची एक शाखा) आणि बौद्ध धर्माचा मोठा पगडा होता. ताओवाद निसर्गाच्या प्रवाहात ढवळाढवळ न करण्यावर भर देतो. बौद्ध धर्म सर्व सजीवांप्रती ‘करुणा’ शिकवतो. माओ सरकारने सत्तेवर येताच या दोन्हींना किंवा त्यांच्या विचारांना ‘अंधश्रद्धा’ ठरवून त्यांच्या विरोधात मंदिरे तोडणे इत्यादी प्रकारे कारवाई केली होती. समाजात सहज असलेली अन्य सजीवांविषयीची एक प्रकारची आंतरिक करुणा संपली. त्यामुळे अशा प्रकारचे सामूहिक क्रौर्य शक्य झाले. माओंचा दृष्टीकोन अत्यंत हिंसक होता, ज्यामध्ये सृष्टीच्या रचनेविषयी कोणतीही कृतज्ञता नव्हती. जाता जाता आपण एका वेगळ्या भारतियांना परिचित व्यक्तीमत्त्वाचा विचार करूया.

५. राज्यकर्त्यांचा अहंकार आणि त्याचा समुहावरील परिणाम
शेतात आलेल्या पिकांच्या कणसांतील दाणे पाखरांनी खाऊ नयेत, यासाठी जगातील शेतकरी पूर्वापार बुजगावणे वापरण्यासारखे उपाय करत आले आहेत. असे असले, तरी ‘पाखरांना सरसकट संपवून टाकूया आणि त्यांची समस्या कायमचीच मिटवूया’, असा विचार नव्हता. ‘कुठे तरी पाखरे काही दाणे घेऊन जाणारच, तर जाऊ देत’, असा विचार त्यामागे असायचा. याउलट माओच्या मोहिमेत ‘निसर्ग मानवाच्या नियंत्रणात असायला हवा’, हा अहंकार चीनमध्ये चिमण्यांना संपवण्याच्या आपत्तीचे मूळ कारण होते. चीनमधील या ‘फोर पेस्ट कँपेन’ जिच्या अंतर्गत चिमण्यांचा वंशविच्छेद करण्यात आला. त्यात एक घोषणा सर्वत्र गाजत होती, ‘माणसाने निसर्गावर विजय मिळवायलाच हवा !’
मानवकेंद्रीत विचारांच्या साम्यवादी माओंना ताओवाद इत्यादी विचार टाकाऊ वाटत होते. त्यांच्या या विचारांना त्यांच्याकडे असलेल्या अमर्यादित आणि निरंकुश सत्तेची जोड लाभली. जे काही मोजके शास्त्रज्ञ किंवा अन्य याला विरोध करत होते, त्यांचा ‘आवाज’ माओंने बंद केला होता. मानव हा सृष्टीतील तसा सर्वांत बुद्धीमान घटक. त्यांच्या मोठ्या एका भूप्रदेशात असणार्या समुहाच्या नायकाचा विचार तेथील सर्वांचाच बनला किंवा बनवण्यात आला. या विचारांच्या आधारे पहाणार्यांच्या मनात तेथील प्राचीन पंथांच्या माध्यमातून रूजलेल्या आध्यात्मिक मूल्यांची जाणीवच उरली नव्हती. धर्म-पंथांचे वरकरणी दिसणारे मंदिरादी स्वरूप हे अंधश्रद्धा म्हणून त्याज्य ठरवल्यावर त्यासह जपली जात असणारी आध्यात्मिक मूल्ये संपली.
लोकमान्य टिळक आणि चिमण्या

लोकमान्य टिळक मंडालेच्या (म्यानमार) तुरुंगात ६ वर्षांची शिक्षा भोगत होते (वर्ष १९०८-१९१४). तुरुंगात टिळक यांना अत्यंत एकाकी वातावरणात ठेवण्यात आले होते. राजकारणावर बोलण्यास किंवा लिहिण्यास सक्त मनाई होती. टिळक प्रतिदिन सकाळी त्यांच्या जेवणातील भाताचा काही भाग बाजूला काढून ठेवत असत. ते आपल्या खोलीच्या बाहेर असलेल्या कठड्यावर किंवा भूमीवर तो पसरवून ठेवत. चिमण्या ते येऊन खात. प्रारंभीला घाबरणार्या चिमण्या हळूहळू टिळक यांच्याशी इतक्या रुळल्या की, त्या त्यांच्या खांद्यावर, हातावर आणि अगदी डोक्यावरही न घाबरता बसू लागल्या. अनेकदा त्या त्यांच्या ताटातूनही दाणे-शिते टिपत असत. जेव्हा त्यांना त्यांच्या पत्नीच्या निधनाची दुःखद बातमी मिळाली, तेव्हाही त्यांनी त्यांचा हा नित्यक्रम चालू ठेवला. ‘गीतारहस्य’ ग्रंथाच्या या लेखकाचे हे सहज वर्तन त्यांची मूल्ये कोणती आणि तशी ती का आहेत, हे दाखवते. निसर्गाशी जुळवून घेण्याच्या किंवा निसर्गाला स्वतःसारखेच महत्त्वाचे स्थान देण्याच्या वृत्तीचे, हे उदाहरण झाले.
– आधुनिक वैद्य (डॉ.) दुर्गेश सामंत
६. चीनने केलेली चुकीची दुरुस्ती
चिमण्यांच्या वंशविच्छेदामुळे ओढवलेली परिस्थिती पालटण्यासाठी वर्ष १९६० मध्ये शास्त्रज्ञांच्या सल्ल्यानंतर माओ यांनी ही मोहीम थांबवली. नंतर पर्यावरणाचे संतुलन परत बसवण्यासाठी चीनला सोव्हिएत युनियनकडून २.५ लाख चिमण्या आयात कराव्या लागल्या. असे असले, तरी माओंच्या कारकीर्दीत झालेली एकूणच स्थिती पालटण्यासाठी वर्ष १९७६ मध्ये त्यांच्या मृत्यूनंतर चीनने ‘व्यावहारिकता (प्रॅगमॅटिझम)’ आणि ‘सांस्कृतिक पुनरुज्जीवन’ या २ मार्गांचा अवलंब केला. आज चीनमध्ये चिमण्यांच्या संरक्षणासाठी कायदे आहेत. नष्ट झालेली आध्यात्मिक आणि सांस्कृतिक मूल्ये पुन्हा रुजवण्यासाठी ताओवादी मंदिरे आणि बौद्ध मठ यांची डागडुजी करण्यात आली. अर्थात् हे सगळे करतांना स्वतःची चूक राज्यकर्त्यांनी प्रांजळपणे स्वीकारली नाही. त्या कालखंडाला ‘तीन वर्षांचा कठीण काळ’, असे संबोधण्यात येते.
७. वैज्ञानिक सत्य आणि आध्यात्मिक सत्य
हिंदु, जैन, बौद्ध आदी पौर्वात्य धर्म होत. त्यांची स्वत:ची निसर्गविषयक दृष्टी आहे. साम्यवाद, भांडवलशाही इत्यादी पाश्चिमात्य विचारसरणी होत. त्यांचीही निसर्गदृष्टी आहे. पौर्वात्य तत्त्वज्ञान सांगते की, जगातील प्रत्येक जीवच नव्हे, तर सार्या विश्वातील प्रत्येक घटक एकमेकांशी जोडलेला आहे. हे पारमार्थिक किंवा आध्यात्मिक सत्य आहे. चिमण्यांना मारल्याने धान्य वाचेल, हे एकप्रकारे विज्ञानाच्या आधारे केलेले अनुमान होते. नंतर टोळ वाढले आणि पिके नष्ट झाली, हे विज्ञानाने निरीक्षणातून सिद्ध झालेले सत्य आहे. वैज्ञानिक दृष्टी जीवनसाखळीतील संबंध जाणीवपूर्वक निरीक्षण अणि अनुमान यांच्या आधारे पहाते. त्यात मानव अणि निसर्ग यांसंबंधी भेद दृष्टी असते. आध्यात्मिकतेचा प्रारंभच सर्व समान आणि सर्वांचे आंतरिक ऐक्य यांतून होते. त्यासाठी वैज्ञानिक प्रयोग नसतात. त्यात शुद्ध अंत:करणातून प्रत्यक्ष जाणवणारे सत्य समोर असते. जसे बालकाने डोळे उघडले की, त्याची दृष्टी जशी निर्मळ असते, तसे काहीसे तेथे होत असते. ‘मला माझी कुणी हानी करू नये, असे वाटत असेल, तर दुसर्याचीही हानी मी न करणे’, तसेच ‘मला अन्नाची जितकी आवश्यकता आहे, तितकीच अन्य जिवांनाही आहे’, हा विचार वैश्विक धर्म किंवा अलिखित सिद्धांत आहे. मानवकेंद्रीत दृष्टी, म्हणजे काय आणि तिची परिणती कशात होऊ शकते, ते चीनमधील चिमण्यांचा वंशविच्छेद यातून स्पष्ट झाले असेल. ‘धान्य केवळ माणसांसाठीच आहे’, या दृष्टीतून चिमण्यांना मारण्यात आले. मग चिमण्यांना मारल्याने टोळ वाढले, त्यांनी धान्य फस्त केले आणि दुष्काळाने माणसे मेली म्हणून चिमण्यांची आयात करण्यात आली. ही आयात करण्यामागे केंद्रस्थानी चिमणीप्रेम नव्हे, तर माणूसप्रेमच होते, हे लक्षात घ्यावे.
श्री गुरुचरणार्पणमस्तु ।
– आधुनिक वैद्य (डॉ.) दुर्गेश सामंत (वय वर्षे ६५), एम्.डी. (मेडिसीन), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१८.३.२०२६)
संपादकीय भूमिकाकुठे चिमण्यांची हत्या करण्यास सांगणारा साम्यवाद आणि निसर्गाशी जुळवून घेण्यास सांगणारा हिंदु धर्म कुठे ? |
शेतकर्यांच्या कर्जमुक्ती योजनेची कार्यवाही आता ऑनलाईन होणार !
बेदखल कुळांच्या प्रश्नाविषयी बविआचे लांजा तहसीलदारांना निवेदन
९० वर्षीय वृद्ध सासूला स्वतःच्या डोक्यावर वाहून नेत सूनबाई पूर्ण करत आहे ८४ कोस प्रदक्षिणा !
शेतकर्यास अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केल्याप्रकरणी साहाय्यक कृषी अधिकारी अमोल देवकर तात्काळ निलंबित !
सरकारची उद्यापासून ९० दिवस वृक्षारोपण मोहीम
महाराष्ट्र शासनाकडून ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती’ योजना घोषित !