लेखांक ६
पांढर्या पाण्याची समस्या ही स्त्रियांमध्ये आढळणारी सामान्य; पण त्रासदायक तक्रार आहे. योनीमार्गातून पांढरट, चिकट किंवा कधी दुर्गंधीयुक्त स्राव होणे, ओलसरपणा जाणवणे, अंगात अशक्तपणा येणे, कंबरदुखी किंवा चिडचिड अशी लक्षणे या समस्येत दिसून येतात. अनेक स्त्रिया लाज, संकोच वा माहितीअभावी ही समस्या सांगत नाहीत अन् घरगुती उपायांवरच अवलंबून रहातात. आयुर्वेद या अवस्थेकडे स्थानिक समस्या म्हणून न पहाता शरिरातील दोष आणि धातू यांच्या असंतुलनाशी जोडून पहातो.
लेखांक ५ वाचण्यासाठी क्लिक करा → https://sanatanprabhat.org/marathi/1016843.html

१. काय आहे पांढर्या पाण्याची समस्या ? आणि त्याची लक्षणे
आयुर्वेदात पांढर्या पाण्याच्या समस्येला ‘श्वेतप्रदर’ असे म्हटले जाते. ही अवस्था प्रामुख्याने कफदोष वाढल्यामुळे निर्माण होते. कफदोषाचा स्वभाव जड, स्निग्ध आणि शीत असल्याने त्याचा परिणाम योनीमार्गातील स्रावावर होतो. अतीगोड, अतीतेलकट आणि जड आहार, सतत बसून रहाणे, व्यायामाचा अभाव, अपुरी स्वच्छता, वारंवार होणारे जंतूसंसर्ग, तसेच मानसिक ताणतणाव यांमुळे कफदोष वाढून पांढर्या पाण्याची समस्या वाढू शकते. काही वेळा वात आणि पित्त या दोषांचा सहभागही दिसून येतो.
पांढर्या पाण्याची समस्या दीर्घकाळ राहिल्यास शरिरावर त्याचे दुष्परिणाम दिसून येतात. सतत होणार्या स्रावामुळे शरिरातील पोषक द्रव्ये न्यून होतात आणि अशक्तपणा, थकवा, चक्कर येणे किंवा मन निरुत्साही होणे, अशी लक्षणे दिसू शकतात. काही स्त्रियांमध्ये वारंवार योनी जळजळ, खाज किंवा संसर्ग होण्याची शक्यता वाढते. त्यामुळे ही समस्या दुर्लक्ष न करता योग्य वेळी उपचार करणे आवश्यक असते.

२. ‘श्वेतप्रदर’ समस्येवर करावयाचे आयुर्वेदाचे आणि घरगुती उपचार
आयुर्वेदाच्या उपचारांचा मुख्य उद्देश कफदोष शमवणे, योनीमार्ग स्वच्छ अन् निरोगी ठेवणे आणि शरिराची एकूण प्रतिकारशक्ती वाढवणे, हा असतो. ‘लोध्र’, ‘अशोक’, ‘नागकेशर’, ‘आमलकी’ यांसारखी औषधी द्रव्ये श्वेतप्रदरामध्ये उपयुक्त मानली जातात. ‘लोध्रासव’ किंवा ‘अशोकारिष्ट’ यांसारखी औषधे वैद्यांच्या सल्ल्याने घेतल्यास स्रावाचे प्रमाण हळूहळू न्यून होण्यास साहाय्य होते. येथे हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे की, संसर्गजन्य कारण असल्यास योग्य पडताळणी करून उपचार करणे आवश्यक असते.
घरगुती पातळीवर काही सवयी पालटल्यास पांढर्या पाण्याच्या समस्येत निश्चितच सुधारणा दिसून येते. स्वच्छता राखणे अत्यंत महत्त्वाचे आहे; पण अतीसाबण किंवा रसायनेयुक्त द्रव्यांचा वापर टाळावा. हलका, पचायला सोपा आहार घ्यावा आणि अतिगोड, जड आणि आंबट पदार्थ न्यून करावेत. ताक, डाळी, भाज्या यांचा समावेश करणे उपयुक्त ठरते. घट्ट कपडे टाळून सैल आणि सूती कपडे वापरणेही लाभदायी ठरते. मानसिक ताण, चिंता आणि सततचा थकवा यांचा श्वेतप्रदरावर मोठा परिणाम होतो. त्यामुळे पुरेशी झोप, नियमित दिनचर्या, सौम्य योगासने आणि प्राणायाम यांचा सराव करणे आवश्यक आहे. शरीर आणि मन दोन्ही शांत राहिल्यास उपचारांचा परिणाम अधिक चांगला दिसून येतो.

३. श्वेतप्रदराची समस्या नियंत्रित राखण्यासाठी…
एकूणच पांढर्या पाण्याची समस्या ही लाज वाटण्यासारखी नसून उपचारयोग्य अवस्था आहे. आयुर्वेद या समस्येकडे समग्र दृष्टीकोनातून पहातो आणि मूळ कारणांवर उपचार करण्यावर भर देतो. योग्य आहार-विहार, स्वच्छतेची काळजी, आयुर्वेदाची औषधे आणि वैद्यांचे मार्गदर्शन याप्रकारे उपचार केल्यास श्वेतप्रदराची समस्या नियंत्रित होऊन स्त्रीचे आरोग्य अन् आत्मविश्वास दोन्ही सुधारू शकतात.
– वैद्या (सौ.) सारिका निलेश लोंढे, निर्विकार आयुर्वेद हॉस्पिटल, भोसरी, पुणे.
लेखांक ७ वाचण्यासाठी क्लिक करा → https://sanatanprabhat.org/marathi/1021930.html
शांत, संयमी, दूरदर्शी नेतृत्व, विनम्रता आणि सेवाभाव यांचा आदर्श असलेल्या आदरणीय दीदी !
डॉक्टरांना (आधुनिक वैद्यांना) मारून कुणाचा जीव वाचणार ?
हिंदूंना शत्रूबोध नाही !
भारतातील ‘डेटा सेंटर्स’मुळे निर्माण होणारे जलसंकट !
न्यायालयातील भाषेचा अडथळा : ‘लॅटिन’ संज्ञांमुळे सामान्य माणूस भारतीय कायद्यापासून दूर जात आहे का ?
समर्थ रामदासस्वामींच्या ‘दासबोधा’तील संदर्भांवरून ‘१०८’ या जपसंख्येचे महत्त्व !