लेखांक ५
पाळीच्या काळात अनेक महिलांना प्रचंड थकवा, अंगात शक्ती नसल्यासारखे वाटणे, चक्कर येणे, झोप अधिक येणे किंवा अगदी प्रतिदिनची कामे करायलाही उत्साह न रहाणे, अशी लक्षणे जाणवतात. अनेकदा याकडे केवळ पाळीमुळे होते म्हणून दुर्लक्ष केले जाते; पण आयुर्वेदाच्या दृष्टीने हा शरिराचा महत्त्वाचा संकेत असतो. मासिक पाळी ही नैसर्गिक शुद्धीकरण प्रक्रिया असली, तरी या प्रक्रियेत शरिरातून रक्त, उष्णता आणि ऊर्जा व्यय होते. जर शरीर आधीच दुर्बल असेल, आहार अपुरा असेल किंवा मनावर ताण असेल, तर या काळात कमजोरी (अशक्तपणा / दुर्बलता) आणि थकवा अधिक प्रमाणात जाणवतो.
लेखांक ४ वाचण्यासाठी क्लिक करा → https://sanatanprabhat.org/marathi/1014325.html

१. पाळीच्या काळात वाढणार्या अशक्तपणाचे आयुर्वेदानुसार कारण
आयुर्वेदानुसार पाळीच्या काळात होणारी कमजोरी प्रामुख्याने वातदोष वाढल्यामुळे दिसते. अपानवायूच्या असंतुलनामुळे शरिरातील ऊर्जा योग्य प्रकारे वितरित होत नाही आणि त्यामुळे थकवा, कंबरदुखी, पाय दुखणे अन् अशक्तपणा जाणवतो. काही स्त्रियांमध्ये पित्तदोष वाढल्यामुळे अधिक रक्तस्राव होतो, ज्यामुळे रक्तधातू क्षीण होऊन कमजोरी वाढते. कफदोष प्रबळ असलेल्या स्त्रियांमध्ये जडपणा, सुस्ती, झोप येणे, अशी लक्षणे ठळकपणे दिसतात. त्यामुळे प्रत्येक महिलेमध्ये कमजोरीचे कारण वेगवेगळे असू शकते.

२. आयुर्वेदानुसार उपचार
चिकित्सेचा विचार करतांना ‘केवळ थकवा न्यून करणे’, हा उद्देश न ठेवता शरिराची शक्ती, पचनशक्ती आणि रक्तधातू यांचा एकत्रित विचार करणे आवश्यक असते. आयुर्वेदात ‘खजुरादी मंथ’, ‘दाडिमवालेह’, ‘शतावरी कल्प’ यांसारखे उपचार, तसेच आयुर्वेदामध्ये पाळीच्या काळात अतिशय उष्ण, अतीथंड, उपाशीपोटी किंवा पुष्कळ जड आहार टाळण्याचा सल्ला दिला आहे. योग्य वेळी घेतलेला पौष्टिक आणि सुपाच्य (पचायला हलका) आहार शरिराला आवश्यक ऊर्जा देतो आणि कमजोरी न्यून करण्यास साहाय्य करतो. विश्रांती, पुरेशी झोप आणि मानसिक शांतता या घटकांनाही तितकेच महत्त्व आहे.
३. घरगुती उपाय आणि आयुर्वेदाचा सल्ला
घरगुती उपायांमध्ये कोमट दूध, तूप, सात्त्विक आहार, सूप किंवा पातळ भाजी, अशा गोष्टी उपयोगी ठरतात. पाळीच्या काळात बळजोरीने काम करणे, जड व्यायाम किंवा सतत उपवास करणे टाळावे. काही वेळा सततची कमजोरी, पुष्कळ चक्कर येणे, श्वास लागणे किंवा पाळीनंतरही थकवा न्यून न होणे, ही शरिरातील रक्ताची कमतरता किंवा इतर आजारांची चिन्हे असू शकतात. अशा वेळी फक्त घरगुती उपायांवर अवलंबून न रहाता वैद्यकीय सल्ला घेणे अत्यंत आवश्यक आहे.

एकंदरीत पाळीच्या कालावधीत येणारी कमजोरी ही सामान्य वाटणारी; पण दुर्लक्षित न करता समजून घेण्यासारखी अवस्था आहे. आयुर्वेद शरिराच्या या संकेतांकडे संवेदनशीलतेने पहातो आणि योग्य आहार, जीवनशैली अन् आवश्यक असल्यास उपचारांच्या माध्यमातून महिलांना या काळात अधिक सक्षम, तसेच संतुलित रहाण्यास साहाय्य करतो.
– वैद्या (सौ.) सारिका नीलेश लोंढे, ‘निर्विकार आयुर्वेद हॉस्पिटल’, भोसरी, पुणे.
लेखांक ६ वाचण्यासाठी क्लिक करा → https://sanatanprabhat.org/marathi/1019364.html
शांत, संयमी, दूरदर्शी नेतृत्व, विनम्रता आणि सेवाभाव यांचा आदर्श असलेल्या आदरणीय दीदी !
डॉक्टरांना (आधुनिक वैद्यांना) मारून कुणाचा जीव वाचणार ?
हिंदूंना शत्रूबोध नाही !
भारतातील ‘डेटा सेंटर्स’मुळे निर्माण होणारे जलसंकट !
न्यायालयातील भाषेचा अडथळा : ‘लॅटिन’ संज्ञांमुळे सामान्य माणूस भारतीय कायद्यापासून दूर जात आहे का ?
समर्थ रामदासस्वामींच्या ‘दासबोधा’तील संदर्भांवरून ‘१०८’ या जपसंख्येचे महत्त्व !