लेखांक ४
काही स्त्रियांमध्ये मासिक पाळी पुष्कळ अल्प प्रमाणात येते. एक-दोन दिवसांतच पाळी थांबते, रक्तस्राव पुष्कळ न्यून होतो किंवा केवळ डाग येतात. अनेक वेळा यासह पाळी उशिरा येणे, पोटात जडपणा, वेदना किंवा मानसिक अस्वस्थता जाणवते. बहुतांश स्त्रिया ही समस्या फारशी गंभीर नाही, असे समजून दुर्लक्ष करतात; परंतु आयुर्वेदाच्या दृष्टीने न्यून रक्तस्रावाची पाळी ही शरिरातील असंतुलनाचे महत्त्वाचे लक्षण मानले जाते. आयुर्वेदात या अवस्थेला ‘अल्प आर्तव’ किंवा ‘क्षीणार्तव’ असे म्हटले जाते.
लेखांक ३ वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/1011554.html

१. न्यून रक्तस्रावाची पाळी येण्यामागील कारणे
आयुर्वेदानुसार मासिक पाळी योग्य प्रमाणात होण्यासाठी वात, पित्त आणि कफ या तिन्ही दोषांचे संतुलन, तसेच रक्तधातू अन् रसधातूंची योग्य पोषणस्थिती आवश्यक असते. न्यून रक्तस्रावाच्या पाळीत प्रामुख्याने वातदोष किंवा कफदोष वाढलेला आढळतो. अति उपवास, पुष्कळ न्यून खाणे, वजन झपाट्याने न्यून होणे, थंड आणि कोरडे पदार्थांचे अधिक सेवन, सतत ताणतणाव, चिंता, भीती किंवा ‘हार्मोनल’ (संप्रेरके) असंतुलन यांमुळे वात बिघडतो अन् रक्तस्राव न्यून होतो. काही वेळा कफदोष वाढल्यामुळे शरिरात जडपणा येऊन पाळीची नैसर्गिक प्रवृत्ती मंदावते.
न्यून रक्तस्रावाची पाळी दीर्घकाळ राहिल्यास स्त्रीच्या प्रजनन आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. अशा स्त्रियांमध्ये थकवा, अशक्तपणा, त्वचेचा कोरडेपणा, केस गळणे, मन निरुत्साही होणे किंवा गर्भधारणेत अडचणी येण्याची शक्यता वाढते. आयुर्वेद या समस्येकडे केवळ गर्भाशयापुरते मर्यादित न ठेवता संपूर्ण शरिरातील पोषण, पचनशक्ती आणि मानसिक स्थिती यांचा एकत्रित विचार करतो.

२. आयुर्वेदाचे उपचार
आयुर्वेदाच्या उपचारांचा उद्देश वात आणि कफ दोष शमवणे, रक्तधातूची वाढ करणे अन् मासिक पाळीची नैसर्गिक प्रवृत्ती सुधारण्याचा असतो. शतावरी, अश्वगंधा, कुमारी (कोरफड), दशमूल यांसारखी औषधी द्रव्ये या अवस्थेत उपयुक्त मानली जातात. ‘कुमारी आसव’ किंवा ‘शतावरी कल्प’ यांसारखी औषधे वैद्यांच्या सल्ल्याने घेतल्यास हळूहळू पाळीचे प्रमाण आणि नियमितता सुधारण्यास साहाय्य होते; मात्र प्रत्येक स्त्रीची प्रकृती वेगळी असल्याने उपचार वैयक्तिक असणे आवश्यक असते.
३. घरगुती आणि योगसने यांचे उपचार
घरगुती पातळीवर आहार आणि दिनचर्येत योग्य पालट केल्यास न्यून रक्तस्रावाच्या पाळीत सुधारणा दिसून येते. पोषक, उष्ण आणि स्निग्ध आहार घेणे महत्त्वाचे असते. तूप, दूध, तीळ, डाळी, भाज्या यांचा समावेश योग्य प्रमाणात करावा. अति उपवास, सतत ‘डायटिंग’ (आहार नियंत्रण) किंवा पुष्कळ कडक व्यायाम टाळावा. कोमट पाणी पिणे आणि नियमित जेवणाची वेळ पाळणेही उपयुक्त ठरते.
मानसिक ताण, चिंता आणि भीती यांचा मासिक पाळीवर मोठा परिणाम होतो. त्यामुळे ध्यान, सौम्य योगासने आणि प्राणायाम यांचा नियमित सराव केल्यास मन शांत होते, तसेच ‘हार्मोनल’ संतुलन सुधारण्यास साहाय्य होते. भुजंगासन, बद्धकोनासन आणि सौम्य पवनमुक्तासन यांसारखी योगासने या अवस्थेत लाभदायक मानली जातात.

४. मासिक पाळी नैसर्गिकरित्या सुधारण्यासाठी…
न्यून रक्तस्रावाची पाळी ही दुर्लक्ष करण्यासारखी समस्या नसून शरिराची पोषणस्थिती आणि दोषसंतुलन यांचा संकेत आहे. आयुर्वेद या समस्येवर मूळ कारणांवर उपचार करण्यावर भर देतो. योग्य आहार, संतुलित जीवनशैली, मानसिक शांतता आणि वैद्यांच्या मार्गदर्शनाखाली घेतलेले आयुर्वेदाचे उपचार यांमुळे मासिक पाळी नैसर्गिकरित्या सुधारून स्त्रीचे आरोग्य सुदृढ राहू शकते.
– वैद्या (सौ.) सारिका नीलेश लोंढे, ‘निर्विकार आयुर्वेद हॉस्पिटल’, भोसरी, पुणे.
लेखांक ५ वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/1016843.html
देवाला नैवेद्य दाखवून स्वतःच खायचा ! काय अर्थ आहे मग त्या नैवेद्य दाखवण्याचा ?
काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या दुहेरी नागरिकत्वप्रकरणी प्रयागराज (उत्तरप्रदेश) उच्च न्यायालयाच्या लक्ष्मणपुरी खंडपिठासमोर पेच !
सनातन धर्माला संपवणारे तुम्ही कोण ?
भारताला विनाशाकडे नेणारा ‘वोकिझम’ !
परीक्षांमधील प्रश्नपत्रिका फुटण्यामुळे विद्यार्थ्यांच्या आणि समाजाच्या भवितव्याविषयी प्रश्नचिन्ह !
गुरुकृपायोगानुसार साधनेच्या अंतर्गत ‘अहं-निर्मूलन प्रक्रिया’ आणि कला !