पिंपरी (पुणे) येथे हिंदु तरुणीचे धर्मांतर करून धर्मांधाने १० वर्षे छळ केला !

हिंदु संघटनांच्या पुढाकाराने पीडित तरुणीचा ४ अपत्यांसह हिंदु धर्मात पुनर्प्रवेश !

पीडित तरुणी आद्या यांच्या पुनर्प्रवेशासाठी करण्यात आलेल्या धार्मिक विधीसाठी उपस्थित हिंदुत्वनिष्ठ

पिंपरी चिंचवड (जिल्हा पुणे) – आंतरराष्ट्रीय महिलादिनाचे औचित्य साधून पिंपरी येथील आर्य समाज मंदिरात ८ मार्चला एक पीडित हिंदु तरुणी आणि तिची ४ अपत्य यांचा विधीवत् हिंदु धर्मात पुनर्प्रवेश करण्यात आला. ‘लव्ह जिहाद’ आणि बळजोरीच्या धर्मांतराला बळी पडलेली ही तरुणी १० वर्षांच्या नरकयातनांनंतर पुन्हा स्वधर्मात परतली आहे. या प्रसंगी पूर्वाश्रमीची ‘सायली’ (लग्नानंतरची अलिझा) हिचे शुद्धीकरण करून तिचे ‘आद्या’, असे नामकरण करण्यात आले. या वेळी आद्या आणि तिची मुले यांना जेजुरी देवस्थानाचे विश्‍वस्त आणि धर्मप्रेमी यांकडून भेटवस्तू देऊन पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.

काय आहे प्रकरण ?

पिंपरी-चिंचवड येथील सायली सुर्वे या हवाई सुंदरी (एअर होस्टेस) अभ्यासक्रमाचे प्रशिक्षण घेतलेल्या तरुणीने वर्ष २०१६ मध्ये घरच्यांचा विरोध डावलून मीरारोड येथील उद्योगपती आतिफ तासे याच्याशी विवाह केला होता. विवाहासाठी तिचे बळजोरीने धर्मांतर करून ‘अलिझा’ असे नाव ठेवण्यात आले. विवाहानंतर काही काळातच तिचा छळ चालू झाला. गेल्या १० वर्षांच्या काळात तिला ४ मुले झाली; मात्र या काळात तिला सासरच्या मंडळींकडून अनन्वित शारीरिक आणि मानसिक अत्याचार सहन करावे लागले.

पोलिसांची उदासीनता आणि हिंदु संघटनांचा आधार !

पीडित तरुणीने अनेकदा पोलिसांकडे तक्रार करण्याचा प्रयत्न केला; परंतु दुर्दैवाने पोलिसांनी तिच्या तक्रारीची नोंद घेतली नाही. शेवटी ती काही हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या संपर्कात आली आणि तिची सुरक्षित सुटका करण्यात आली. स्वधर्मात परतण्याचा धाडसी निर्णय घेतल्यानंतर, तिचे आणि तिच्या चारही मुलांचे हिंदु धर्मात विधीवत् स्वागत करण्यात आले. (जर एखाद्या पीडितेला न्याय मिळवण्यासाठी हिंदु संघटनांची वाट पहावी लागत असेल, तर पोलीस प्रशासन कुणासाठी काम करत आहे ? अशा कर्तव्यशून्य पोलिसांवरही कठोर कारवाई व्हायला हवी. – संपादक)

मान्यवरांची उपस्थिती !

या सोहळ्याला राज्यसभेतील भाजपच्या खासदार प्रा. डॉ. (सौ.) मेधा कुलकर्णी, भाजपच्या आमदार सौ. उमाताई खापरे, समस्त हिंदु आघाडीचे श्री. मिलिंद एकबोटे, बजरंग दलाचे श्री. कुणाल साठे, हिंदुत्वनिष्ठ श्री. समीर कुलकर्णी यांसह अनेक धर्माभिमानी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

हिंदु मुलींनी स्वत:चा जोडीदार निवडतांना सावध रहावे ! – प्रा. डॉ. (सौ.) मेधा कुलकर्णी, खासदार

प्रा. डॉ. (सौ.) मेधा कुलकर्णी

आद्याने दाखवलेले धैर्य कौतुकास्पद आहे. हिंदु मुलींनी स्वत:चा जोडीदार निवडतांना अत्यंत सावध रहाणे आवश्यक आहे. संकटकाळी सरकारने अशा महिलांच्या पाठीशी उभे रहाण्याचे आश्‍वासन दिले आहे.

देशातील लोकसंख्याशास्त्रीय पालटाच्या षड्यंत्रासाठी ‘लव्ह जिहाद’ हे एक हत्यार ! – मिलिंद एकबोटे

मिलिंद एकबोटे

देशातील लोकसंख्याशास्त्रीय (डेमोग्राफी) पालटाच्या षड्यंत्रासाठी ‘लव्ह जिहाद’ हे एक हत्यार म्हणून वापरले जात आहे. आद्यासारख्या अनेक मुली परत येण्यास इच्छुक आहेत; परंतु भीतीपोटी त्या पाऊल उचलू शकत नाहीत.

हिंदु धर्मात स्त्रियांना जो मान-सन्मान दिला जातो, तो दुसरीकडे कुठेही नाही ! – पीडित तरुणी

हिंदु धर्मात स्त्रियांना जो मान-सन्मान दिला जातो, तो दुसरीकडे कुठेही नाही. जगाची माहिती नसल्याने भावनिक स्तरावर घेतलेला निर्णय मला महाग पडला. माझे विचार आधी ‘सेक्युलर’ (धर्मनिरपेक्ष) होते; पण १० वर्षे जे भोगले त्यावरून मी आता ठामपणे सांगू शकते की, आपली संस्कृतीच श्रेष्ठ आहे. भविष्यात अशा पीडित मुलींना साहाय्य करण्यासाठी मी प्रयत्न करेन, असे आद्याने भावूक होऊन सांगितले.

अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर यांचे आभार !

या प्रसंगी ‘आर्य समाज मंदिरा’ने या प्रकरणात हिंदु विधीज्ञ परिषदेचे अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर यांच्या कायदेशीर साहाय्याविषयी आभार मानले.