सर्व रोगांचे मूळ कारण : ‘अधर्म’

‘साधारणतः मागील ४ दशकांचा मागोवा घेतल्यास आपणा सर्वांना लक्षात येईल की, प्रत्येकच गावात आधुनिक वैद्यांची, म्हणजे डॉक्टरांची संख्या पुष्कळ प्रमाणात वाढली आहे; कारण आजारांचे प्रमाणही पुष्कळ वाढले आहे. आजारांतील क्लिष्टता आणि सखोलता यांत विविधांगी संशोधन होऊन तज्ञ डॉक्टर निर्माण होत आहेत. उदाहरणार्थ पूर्वी तालुका स्तरावरील गावात एक किंवा दोन दंतवैद्य असायचे. नाक, कान, घसा तज्ञांकडे किंवा हृदयविकारतज्ञाकडे जायचे, तर जिल्ह्याच्या ठिकाणी जावे लागायचे. आज मात्र परिस्थिती पुष्कळ पालटली आहे, तालुकास्तरावरही तज्ञ डॉक्टर मोठी चिकित्सालये थाटत आहेत आणि त्यांची भरभराटही होत आहे. आपण कधी या स्थितीच्या कारणांचा विचार केला आहे का ? नाही ना ! कारण येणार्या परिस्थितीला धीराने सामोरे जाणे, ‘कालाय तस्मै नमः ।’ (अर्थ : त्या काळाला नमस्कार असो) म्हणून काळाशी समरस होणे, अशी आपली मानसिकता असते. त्यामुळे आपण समस्येचे मूळ शोधून त्यांच्यावर औषधोपचारासह अन्य उपाययोजनाही करायलाच हवी. यासाठीच हा लेखप्रपंच !
या लेखाद्वारे सर्वच रोग अधर्मामुळे होतात, असे सांगण्याचा आमचा आग्रह नाही किंवा तशी भीतीही कुणाच्या मनात निर्माण करण्याचा अथवा अंधविश्वास पसरवण्याचा हेतू नाही; परंतु शास्त्रात सांगितल्याप्रमाणे ‘सर्व रोगांचे मूळ अधर्माचरणात आहे आणि धर्माचरण अन् साधना हा त्यावर उपाय आहे’, हे बुद्धीच्या स्तरावर समजावून सांगण्याचा हा अल्पसा प्रयत्न आहे. ‘यातून यथायोग्य बोध घेऊन औषधोपचारांच्या जोडीला धर्माचरण आणि साधना करण्याची बुद्धी आम्हा सर्वांना व्हावी’, हीच गुरुचरणी प्रार्थना !
– श्री. योगेश जलतारे
भाग १

१. आजारांच्या कारणांविषयी धर्मशास्त्र काय सांगते ?
‘अधर्म एव मूलं सर्व रोगाणाम् ।’ (अर्थ : अधर्म (व्यक्ती आणि समाज धर्माचरणापासून विन्मुख होणे), हेच सर्व रोगांचे मूळ आहे), असे संस्कृत वाक्य आपण नेहमी ऐकत असतो. थोडक्यात अयोग्य आचरण किंवा अधर्म हेच सर्व रोगांचे मूळ कारण आहे. या श्लोकाद्वारे महर्षि चरक आपल्याला सांगतात, ‘केवळ शारीरिक कारणेच नव्हे, तर निष्काळजीपणा आणि नैतिक नियमांचे उल्लंघन यांमुळे स्वतःचे आरोग्य अन् मनःशांती बिघडते. अनैतिक आणि अयोग्य वर्तनामुळे, म्हणजेच अधर्मामुळे शरीर अन् मन यांच्यात असंतुलन निर्माण होते, तसेच त्यातून पुढे रोग आणि दुःखे उत्पन्न होतात.’
अधर्मामुळे रोग व्याधी वाढतात, हे समजून घेण्याआधी ‘धर्म म्हणजे काय ?’, हे समजून घेणेही आवश्यक आहे. आद्यशंकराचार्य धर्माची व्याख्या करतांना सांगतात, ‘ज्या तत्त्वांमुळे संपूर्ण विश्वाची समाजव्यवस्था सुरळीत रहाते आणि प्रत्येक व्यक्तीची व्यावहारिक अन् आध्यात्मिक उन्नती होते, ती जीवनपद्धत म्हणजे धर्म.’ थोडक्यात या तत्त्व-नियमांचे पालन न करणे, म्हणजे अधर्म होय. श्लोकात सांगितल्याप्रमाणे आपल्याकडून बेसावधपणा आणि अधर्माचरण कसे होते, हे आपण समजून घेऊया.

२. प्रज्ञापराध : खाण्या-पिण्याचे पथ्य न पाळणे
प्रज्ञापराध, म्हणजे बेसावधपणा किंवा निष्काळजीपणा. हे रोग उत्पन्न होण्याचे एक कारण सांगितले आहे आणि ते अगदी अचूक असे आहे. आपल्याला ठाऊक असते की, काय योग्य आणि अयोग्य आहे, तरीही आपण लोभ, निष्काळजीपणा किंवा अहंकार यांच्यामुळे चुकीच्या गोष्टी करतो. यालाच ‘प्रज्ञापराध’ असे म्हणतात.
आपण सर्वसाधारणतः पहातो की, रोगी मनुष्य खाण्या-पिण्याचे पथ्य पाळण्याविषयी उदासीन असतो आणि हेच कारण त्याचा रोग बळावण्याला कारणीभूत ठरते, उदाहरणार्थ ‘मधुमेह असल्याने साखर अधिक असलेले पदार्थ खाऊ नये किंवा ‘कोलेस्ट्रॉल’ अधिक असलेल्या व्यक्तीने तेलकट पदार्थ खाऊ नये’, असे आधुनिक वैद्य सांगतात; परंतु हे आजार असलेले अनेक रुग्ण हे पथ्य पाळतांना दिसत नाहीत. यातून त्यांचा आजार बळावल्यास दोष कुणाचा ? रोगी मनुष्याचे सोडा, निरोगी व्यक्तीही खाण्या-पिण्याचे पथ्य पाळण्यासाठी काळजी घेत नाही. सतत बाहेरचे खाणे; जागा अस्वच्छ असली, तरी तेथील लोभापोटी तेथील पदार्थांचा आस्वाद घेणे; अतीमसालेदार, अतीतेलकट, चरबी वाढवणारे पदार्थ खाणे, ‘जंकफूड’च्या (पिझ्झा, बर्गर) आहारी जाणे, शीतपेय ग्रहण करणे, अशा कितीतरी गोष्टी घातक आहेत, हे माहिती असूनही निरोगी मनुष्य त्यांचे सेवन करतो आणि त्याच्या परिणामस्वरूप त्या व्यक्तीतही रोग बळावत असतो.
३. दिनचर्येचे पालन न करण्याने रोग बळावणे
आपल्या वैज्ञानिकदृष्ट्या प्रगत अशा हिंदु धर्मात अनेक ऋषिमुनी होऊन गेले, ही आपल्यावरील एक मोठी कृपा आहे. त्यांनी मनुष्य जीवनाचे कल्याण लक्षात घेऊन प्रत्येक गोष्टीचे सखोल संशोधन केले आणि माणसाची आदर्श दिनचर्या कशी असली, म्हणजे त्याचे आरोग्य चांगले राहून त्याची उपासना नियमित होत राहील, असे पाहिले. त्यासाठी त्यांनी आचारधर्मानुसार माणसाची दिनचर्या आखून दिली आणि वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक ऋतूचर्येनुसार योग्य दिनचर्या कशी असायला हवी, हेही लिहून ठेवले; परंतु मनुष्य प्राण्याचे दुर्दैव असे की, तो ऋषिमुनींनी सांगितलेल्या या दिनचर्येचे पालन करत नाही, म्हणजेच अधर्माचरण करतो. त्यामुळे त्याला नानाविध रोग होतात, हे आपण सर्वांनीच अनुभवले असणार, यात शंका नाही. याची उदाहरणे, म्हणजे रात्री उशिरापर्यंत जागणे, सकाळी उशिरा उठणे आणि मग संपूर्ण दिवस क्रियाशील रहाण्याऐवजी आळसात वेळ घालवणे, असे मनुष्याचे जीवन आहे. काही ठिकाणी खासगी आस्थापने दिवस आणि रात्रपाळीतही कर्मचार्यांकडून कामे करून घेतात, हे नियोजन सतत पालटत असल्याने संबंधित कर्मचार्यांची दिनचर्या बिघडते अन् यातूनही त्याला विविध रोग होतात. यामागेही ‘खासगी आस्थापनांचा स्वार्थ आणि कर्मचार्यांना हवे तसे राबवून घेण्याची मनोवृत्ती’, हा अधर्मच आहे.
४. समष्टी अधर्म : अन्नपदार्थांमध्ये होणारी भेसळ आणि औषधांचा मारा
आपण ज्या समाजात वावरतो, तेथेही मोठ्या प्रमाणात अधर्म बोकाळलेला आहे. त्याचाही स्वतःच्या आरोग्यावर परिणाम होत असतो, उदाहरणार्थ आपण जे पदार्थ खातो, ते भेसळयुक्त असतात. त्यामुळे त्यांचा स्वतःच्या शरिरावर दुष्परिणाम होतो.
सर्वसाधारणतः संपूर्ण भारतात ॲलोपॅथी औषधे घेणार्यांची मोठी लोकसंख्या आहे. या औषधांची मात्रा लगेचच लागू होत असल्याने सर्वच लोक त्या पर्यायाकडे वळतात; परंतु या औषधामुळे शरिरावर काही दुष्परिणामही होत असतात. त्यांच्याविषयी औषधाच्या माहितीपत्रकात लिहिलेलेही असते; परंतु ‘मोठा आजार घालवण्यासाठी काही छोटे आजार स्वीकारावे लागतात’, या धोरणाने आधुनिक वैद्य आपल्याला ती औषधे देतात आणि कालांतराने छोटे आजार घालवण्यासाठी निराळी औषधे घ्यावी लागतात. अर्थात् हे दुष्टचक्र चालू राहते. त्यासह काही विदेशी औषधनिर्मिती आस्थापने अधिक लाभाचा विचार करून अयोग्य औषधे बाजारात आणतात. त्या औषधांमुळे समाजात मोठी हानी होते. मध्यप्रदेशमध्ये नुकतेच विशिष्ट प्रकारचे खोकल्याचे औषध प्यायल्याने अनेकांचा मृत्यू झाल्याची बातमी ताजी आहे. आज आपण बंद पिशवीतील दूध घरात वापरतो, तेही टिकून राहण्यासाठी त्यामध्ये काही ना काही रासायनिक संवर्धक (प्रिझर्व्हेटीव्ह) घालावेच लागत असणार. त्यांचाही परिणाम आपल्यावर होत असतो. भारताची लोकसंख्या लक्षात घेता इतक्या लोकांना प्रतिदिन दूध आणि दुग्धजन्य पदार्थांचा पुरवठा होण्यासाठी प्रमाणात गायी-म्हशी भारतात आहेत का ? हा एक संशोधनाचा विषय आहे.
– श्री. योगेश जलतारे, संपादक, ‘सनातन प्रभात’ प्रसारमाध्यम समूह.
भाग २ वाचण्यासाठी क्लिक करा → https://sanatanprabhat.org/marathi/1015985.html
संपादकीय भूमिकादुर्दैवाने आज हिंदूंना धर्मशिक्षण नसल्यामुळे आध्यात्मिक कारणांमुळे निर्माण होणारी आजारपणे दूर होण्यासाठी घरच्या घरी उपाययोजना असूनही ते त्यासाठी बाहेर फिरत रहातात. |
उन्हाळा इतका तीव्र का होत आहे ? विदेशी झाडे का नको ?
परीक्षांमधील प्रश्नपत्रिका फुटण्यामुळे विद्यार्थांच्या आणि समाजाच्या भवितव्याविषयी प्रश्नचिन्ह !
इतरांचा विचार करणारे आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याप्रती भाव असलेले म्हार्दोळ, गोवा येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. परशुराम प्रभुदेसाई अन् सौ. पूनम प्रभुदेसाई !
समष्टीसाठी सतत झटणारे सनातनचे ७५ वे (समष्टी) संत पू. रमानंद गौडा (वय ४९ वर्षे)!
धर्म काटेकोर आचरण्याचे महत्त्व !