‘लव्ह जिहाद’च्या विरोधात देशात कठोर कायदा लागू करावा ! – Pramod Muthalik, Karnataka Shree Ram sena chief

  • मुसलमान तरुण गोड बोलून जाळ्यात अडकवतात ! – ‘लव्ह जिहाद’च्या जाळ्यातून सुटलेल्या हिंदु युवतींनी व्यक्त केल्या वेदना

  • ‘लव्ह जिहाद’विषयी हुब्बळ्ळीत पत्रकार परिषद !

पत्रकार परिषदेत डावीकडून चौथ्यास्थानी श्री प्रमोद मुतालिक

हुब्बळ्ळी (कर्नाटक) – देशात आणि राज्यात अनेक हिंदु युवती बेपत्ता होत आहेत. बेपत्ता होणार्‍यांचा वापर ‘लव्ह जिहाद’साठी केला जात आहे. त्यामुळे देशात  ‘लव्ह जिहाद’च्या विरोधात कठोर कायदा लागू करावा, अशी मागणी श्रीराम सेनेचे प्रमुख  प्रमोद मुतालिक यांनी केली. ‘लव्ह जिहाद’च्या आरोपांविषयी हुब्बळ्ळीत झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ‘लव्ह जिहाद’च्या मागे केवळ प्रेम नसून भारताला इस्लामी देश बनवण्याचा कट आहे, असा आरोपही त्यांनी केला. प्रमोद मुतालिक यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या कार्यक्रमात ‘लव्ह जिहाद’च्या जाळ्यातून सुटलेल्या काही हिंदु पीडित युवतींनी त्यांचे अनुभव सांगितले. ‘मुसलमान तरुण गोड बोलून हिंदु तरुणींना जाळ्यात अडकवतात’, असे एका पीडितेने सांगितले.

पीडित युवतींचे अनुभव कथन

पत्रकार परिषदेत बोलतांना काही हिंदु युवतींनी सांगितले की, मुसलमान तरुण प्रथम ओळख करून घेतात. गोड बोलून जवळीक साधतात आणि नंतर म्हणतात, ‘तू माझ्याशी लग्न केले, तर तुला धर्मांतर करण्याची आवश्यकता नाही. तुला बुरखा (संपूर्ण शरीर झाकण्याचे वस्त्र) घालण्याचीही आवश्यकता नाही. तू राणीप्रमाणे सुखात रहाशील.’ ‘त्यांनी गोड बोलांनी आमचे मन वळवण्याचा प्रयत्न केला. आमच्या आई-वडिलांविषयी आणि घरच्यांविषयी आम्हाला द्वेष वाटावा, अशा प्रकारे ते बोलत होते; पण नंतर लक्षात आले की, ही सर्व फसवणूक होती. त्यामुळे आम्ही ‘लव्ह जिहाद’च्या जाळ्यातून बाहेर पडलो’, अशा शब्दांत त्यांनी त्यांच्या वेदना व्यक्त केल्या.

या वेळी नेहा हिरेमठ हत्या प्रकरणाविषयी बोलतांना तिचे वडील निरंजन हिरेमठ म्हणाले की, ‘लव्ह जिहाद’ नियोजित पद्धतीने चालू आहे. नेहाची हत्या करणार्‍यांना आज कारागृहात अतीमहनीय व्यक्तींसारखी वागणूक मिळत आहे. त्यांना बिर्याणी खाऊ घातली  जात आहे. नेहाला अजूनही न्याय मिळालेला नाही, अशी खंत त्यांनी व्यक्त केली. हे प्रकरण ‘सीबीआय’ किंवा ‘एन्.आय.ए.’कडे सोपवावे, अशी मागणी हिरेमठ यांनी केली.