काही स्त्रियांमध्ये मासिक पाळीच्या दिवसांमध्ये अतीप्रमाणात रक्तस्राव होतो. पाळी पुष्कळ दिवस चालणे, वारंवार ‘पॅड’ पालटावे लागणे, मोठ्या गुठळ्या जाणे, चक्कर येणे, अशक्तपणा जाणवणे किंवा पाळीनंतरही थकवा न जाणे, अशी लक्षणे दिसून येतात. अनेक वेळा स्त्रिया हे सर्व ‘नॉर्मल’ (सामान्य) समजून दुर्लक्ष करतात; पण प्रत्यक्षात अधिक रक्तस्रावाची पाळी ही शरिरातील गंभीर असंतुलनाची सूचना असू शकते. आयुर्वेदात या अवस्थेला ‘अतीप्रवृत्ती’ किंवा ‘रक्तप्रदर’ या संज्ञांनी ओळखले जाते.
लेखांक ३
लेखांक २ वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/1008930.html

१. अधिक रक्तस्राव होण्यामागील कारण आणि होणारे त्रास
आयुर्वेदानुसार मासिक पाळीतील अधिक रक्तस्राव हा प्रामुख्याने पित्तदोषाच्या वाढीमुळे होतो. पित्तदोषाचा स्वभाव उष्ण आणि द्रव असल्याने तो रक्तधातूवर परिणाम करतो अन् रक्तस्राव वाढवतो. अतीतिखट, आंबट, तेलकट आणि मसालेदार आहार, सतत मानसिक ताण, राग, उन्हात अधिक वावर, झोपेचा अभाव आणि ‘हार्मोनल’ (संप्रेरक) पालट यांमुळे पित्तदोष वाढतो. याचा थेट परिणाम गर्भाशयातील रक्तवाहिन्यांवर होऊन रक्तस्रावाचे प्रमाण वाढते.
अधिक रक्तस्रावाच्या पाळीत काही स्त्रियांना पोटात जळजळ, अंगात उष्णता, चिडचिड, घाम अधिक येणे, डोकेदुखी किंवा छातीत धडधड जाणवू शकते. दीर्घकाळ ही अवस्था राहिल्यास रक्तधातू न्यून होऊन अशक्तपणा, पांडुरोग (ॲिनमिया), चक्कर येणे आणि रोगप्रतिकारशक्ती न्यून होण्यासारख्या तक्रारी निर्माण होऊ शकतात. म्हणूनच आयुर्वेद या समस्येकडे केवळ पाळीपुरते न पहाता संपूर्ण शरिराच्या आरोग्याच्या दृष्टीने पहातो.
२. आयुर्वेदानुसार आणि आवश्यक घरगुती उपचार

आयुर्वेदाच्या उपचारांचा मुख्य उद्देश पित्तदोष शमवणे, रक्तधातू शुद्ध आणि स्थिर करणे अन् गर्भाशयाला बळकटी देणे, हा असतो. अशोक, लोध्र, पद्मक, उशीर, प्रवाळ यांसारखी औषधी द्रव्ये रक्तस्राव नियंत्रणासाठी उपयुक्त मानली जातात. ‘अशोकारिष्ट’ किंवा ‘लोध्रासव’ यांसारखी औषधे वैद्यांच्या सल्ल्याने घेतल्यास पाळीतील रक्तस्राव हळूहळू संतुलित होण्यास साहाय्य होते. येथे हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे की, प्रत्येक स्त्रीसाठी औषध एकसारखे नसते, तर दोषप्रकृती आणि कारणानुसार उपचार पालटतात.
घरगुती पातळीवर काही उपाय पित्तशमनासाठी आणि रक्तस्राव न्यून करण्यासाठी उपयोगी ठरू शकतात. पाळीच्या काळात थंड, जड आणि मसालेदार अन्न टाळून हलका, ताजा अन् पचायला सोपा आहार घ्यावा. डाळिंब, मोसंबी यांसारखी फळे मर्यादित प्रमाणात घेणे लाभदायी ठरते. धने आणि बडीशेप यांचा कोमट काढा प्यायल्यामुळे शरिरातील उष्णता न्यून होण्यास साहाय्यभूत होते; मात्र अती घरगुती प्रयोग किंवा स्वतःहून औषधे घेणे टाळावे.
३. वेळेवर वैद्यांचा सल्ला आणि आयुर्वेदाचे उपचार घेणे महत्त्वाचे !
रक्तस्राव अधिक होत असतांना शरिराला पुरेशी विश्रांती देणे अत्यंत आवश्यक असते. या काळात अती श्रम, प्रवास, उपवास किंवा मानसिक ताण टाळावा. योग आणि प्राणायाम करतांनाही सौम्य प्रकार निवडावेत. सतत चक्कर येणे, पुष्कळ प्रमाणात रक्तस्राव होणे किंवा पाळी १० दिवसांपेक्षा अधिक दिवस चालणे, अशा स्थितीत त्वरित वैद्यकीय सल्ला घेणे आवश्यक आहे.
एकूणच अधिक रक्तस्रावाची पाळी ही दुर्लक्ष करण्यासारखी नाही. आयुर्वेद या समस्येकडे दायित्वतेने पहातो आणि तात्पुरत्या उपायांपेक्षा दीर्घकालीन आरोग्य सुधारण्यावर भर देतो. योग्य आहार-विहार, मानसिक शांतता, दोषानुसार आयुर्वेदाचे उपचार आणि वेळेवर तज्ञांचा सल्ला घेतल्यास मासिक पाळी संतुलित होऊन स्त्रीचे आरोग्य सुरक्षित ठेवता येते.
– वैद्या (सौ.) सारिका नीलेश लोंढे, ‘निर्विकार आयुर्वेद हॉस्पिटल’, भोसरी, पुणे.
लेखांक ४ वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/1014325.html

कथित सामाजिक कार्यकर्त्या तिस्ता सेटलवाड यांचे पारपत्र परत करण्यासंदर्भात सर्वाेच्च न्यायालयाची संयत भूमिका !
मोगल, ब्रिटीश आणि काँग्रेस यांनी केले नाही, ते महाराष्ट्र सरकार करायला निघाले आहे !
छत्रपती शिवरायांना हिंदवी स्वराज्याच्या विचारांनी भारलेले अन् हिंदूंसाठी उभे रहाणारे युवक हवे आहेत !
शहरी नक्षलवादामुळे झारखंड येथील आदिवासींचे अस्तित्व धोक्यात !
उन्हाळा इतका तीव्र का होत आहे ? विदेशी झाडे का नको ?