उद्योजकाच्या दृष्टीने साक्षीभावाचे अनन्यसाधारण महत्त्व !

‘पितांबरी प्रॉडक्ट्स प्रा.लि.’चे व्यवस्थापकीय संचालक डॉ. रवींद्र प्रभुदेसाई यांच्या अनुभवावर आधारित ‘उद्योग ही साधनाच’ लेखमाला !

मला असे वाटते की, ‘साक्षीभाव’ हा विशेषतः उद्योजकांसाठी अत्यंत आवश्यक असा आध्यात्मिक गुण आहे. उद्योगात विविध विभागांतील दायित्व निभावतांना कसे दृष्टीकोन ठेवायचे, साक्षीभाव आणि अहं कमी यांमुळे उद्योगातील अडचणींवर साधनेमुळे मात करत पुढे कसे जायचे, यांविषयीचे विवेचन येथे दिले आहे. २२ फेब्रुवारी या दिवशी प्रसिद्ध झालेल्या लेखात आपण ‘साक्षीभाव : उद्योजकांसाठी अत्यंत आवश्यक असा आध्यात्मिक गुण आणि उद्योगातील विविध विभागांमधील कामे अन् तेथे लक्षात ठेवायचे अमूल्य दृष्टीकोन’, यांविषयी वाचले. आज या लेखाचा पुढचा भाग येथे देत आहोत.                

(भाग २०) 

लेखक : डॉ. रवींद्र प्रभुदेसाई (वय ६२ वर्षे, आध्यात्मिक पातळी ६१ टक्के),  व्यवस्थापकीय संचालक, पितांबरी प्रॉडक्ट्स प्रा. लि., ठाणे.

भाग १९ वाचण्यासाठी क्लिक करा → https://sanatanprabhat.org/marathi/1010661.html

१. उद्योजकाने संभाव्य हानीची सिद्धता ठेवून सर्व कामे इतरांवर सोपवणे आवश्यक !

उद्योगातील विविध दायित्वे पार पाडतांना मीच खरेदी व्यवस्थापक, मीच लेखापाल, मीच उत्पादन व्यवस्थापक, मीच विक्रेता प्रतिनिधी, अशी ओळख स्वतःच्या व्यक्तीमत्त्वाशी जोडू नये. त्याऐवजी पदाचे महत्त्व, त्या पदाकडून असलेल्या अपेक्षा आणि त्या पदाने केलेली कामगिरी यांकडे साक्षीभावाने पाहिले, तरच खरी उन्नती होऊ शकते. अशी उन्नती झाली की, पदोन्नती मिळते आणि खरा आनंदही प्राप्त होतो.

या प्रक्रियेत वरील विभागांमध्ये काम करणार्‍या व्यक्तींकडून काही चुका होऊ शकतात. त्यामुळे आस्थापनाची थोडी हानीही होऊ शकते; पण जर आपण एकूण ‘प्रॉफिटॅबिलिटी’मध्ये (लाभामध्ये) अशा संभाव्य हानीची मानसिक सिद्धता ठेवली, तरच खरे नेतृत्व घडते. अनेकदा उद्योजक मानसिकदृष्ट्या यासाठी सिद्ध नसतात. अशा वेळी तो स्वतःच खरेदी व्यवस्थापक बनतो, तोच उत्पादन पहातो, तोच लेखा विभाग हाताळतो आणि विक्रीसाठीही स्वतःच बाहेर जातो. परिणामी अशा परिस्थितीत व्यवसायाची प्रगती होत नाही.

२. साक्षीभावाने पहातांना आत्मसात् करावयाचे दृष्टीकोन

‘प्रत्येकामध्ये परमेश्वराचा अंश आहे’, असे आपण मानले, तर साक्षीभावाकडे आपण पुढील २ दृष्टीकोनांमधून पाहू शकतो.

२ अ. परमेश्वर सगळीकडे आहे ! : ‘परमेश्वर प्रत्येकामध्ये आहे’, ही जाणीव ठेवली, तरच आपण साक्षीभाव ठेवू शकतो. ‘समोरच्या व्यक्तीमधील कर्तृत्व, धडाडी आणि चिकाटी हे परमेश्वराच्या अंशामुळे आहे’, असा भाव ठेवणे महत्त्वाचे आहे. प्रशिक्षण देतांना त्यालाही ही जाणीव करून द्यायला हवी आणि तसे गुण त्याने आत्मसात् करत जावेत. अशा वेळी त्या व्यक्तीच्या कर्तृत्वाला आणि प्रयत्नांना प्रेरणा मिळावी, या हेतूने आपण त्याला शिकू देतो, अनुभव घेऊ देतो. त्यामुळे तो हळूहळू प्रयोग करू लागतो आणि त्यातून प्रगती साधतो. काम योग्य दिशेने व्हावे, यासाठी त्याला ‘अमुक एवढ्यापेक्षा न्यून काम होता कामा नये आणि अमुक एवढ्यापेक्षा अधिकही होता कामा नये’, अशी मर्यादा आखून देऊन ते करण्याचे स्वातंत्र्य दिले, तर त्या व्यक्तीचा विकास योग्य दिशेने होतो.

२ आ. अलिप्तता : साक्षीभावाचा दुसरा दृष्टीकोन, म्हणजे अलिप्तता ! काही वेळा आपण गोष्टींकडे अलिप्तपणे पहायला शिकले पाहिजे. सगळ्या परिस्थितींमध्ये आपण स्वतःला गुंतवून घेत राहिलो, तर मनावर ताण येतो. ‘आपण त्या ठिकाणी असतो, तर काय झाले असते ?’, असा विचार करणे आपण थांबवले पाहिजे. बर्‍याचदा अनेक जण अशा विचारांमध्ये अडकतात, त्याचा धसका घेतात आणि त्यामुळे निर्णय घेणे कठीण होते. अलिप्ततेने साक्षीभाव ठेवल्यास परिस्थिती स्पष्टपणे दिसते आणि योग्य निर्णय घेता येतो.

आमचा अनुभव – प्रयोग, लाभात झालेली हानी आणि साक्षीभाव

डॉ. रवींद्र प्रभुदेसाई

१. आमचेच (‘पितांबरी’चे) उदाहरण घेतले, तर जेव्हा आम्ही ‘ॲग्री डिव्हिजन’ (कृषी विभाग) चालू केले, तेव्हा आरंभी आम्हाला बांबूविषयी काहीच माहिती नव्हती. त्या वेळी आम्ही ‘तुल्डा’ नावाच्या बांबूची जात लावली. आज ती चांगल्या प्रकारे वाढलेली आहे. तिचे बियाणे आम्ही आसाममधून आणले होते. हा प्रयोग आम्ही केला नसता, तर पुढे बांबूच्या कलमांसाठी लागणार्‍या ‘स्टिक्स’ (काड्या), त्यासंबंधी इतर उपयोग आणि त्याचा अभ्यास आम्ही कधीच चालू करू शकलो नसतो. आज अगरबत्तीसाठीही त्या बांबूचा उपयोग होत आहे. याचप्रमाणे ‘माणगा’ नावाचा जो बांबू आहे, तोही आम्ही आता मोठ्या प्रमाणावर घेतला आहे. तो भरीव आणि उपयोगी असा बांबू आहे. 

२. एकदा आम्ही नागपूरच्या एका विद्यापिठासह भागीदारी केली होती. त्यांच्यासमवेत काही प्रयोग करण्याचे ठरवले; मात्र ते प्रयोग तेवढे यशस्वी झाले नाहीत. त्या वेळी आम्ही त्याकडे साक्षीभावाने पाहिले. पूर्ण यश मिळाले नाही, काही हानी झाली, १०० टक्के अपेक्षित परिणाम मिळाला नाही; पण ते संपूर्णपणे वाया गेले, असेही नाही. जे काही काम अर्धवट राहिले होते, ते पुढे आम्ही विकसित केले आणि ते दुसर्‍या कामासाठी वापरले, म्हणजेच एखाद्या गोष्टीत थोडी हानी झाली, तरी त्याकडे केवळ तोट्याच्या दृष्टीने न पहाता ‘लाभातील तोटा’ असे तत्त्व मानून जर आपण साक्षीभावाने पाहिले, तर त्यातून पुढचा मार्ग नक्कीच सापडतो.


– डॉ. रवींद्र प्रभुदेसाई

३. संकटकाळात साक्षीभावाचे महत्त्व

साक्षीभावाचा एक महत्त्वाचा पैलू, म्हणजे संकटाच्या काळात तो कसा उपयोगी पडतो, हे समजून घेणे.

३ अ. मनात नकारात्मकता निर्माण होत असतांना साक्षीभाव महत्त्वाचा ! : उद्योजक असो किंवा सामान्य व्यक्ती सगळ्यांनाच आयुष्यात वेगवेगळ्या प्रकारच्या परिस्थितींना सामोरे जावे लागते. उद्योगात नवनवीन प्रयोग करत असतांना, नवीन उत्पादने आणतांना अथवा सतत प्रवास करतांना अनेक अडचणी येतात. त्याचसमवेत आपल्या सभोवतालच्या लोकांना त्रास होतात, कुटुंबातील व्यक्तींना आजारपण येते, कधी ते आजार गंभीर स्वरूपाचेही असतात. कधी एखादे आस्थापन बुडते, कधी आस्थापनाला आग लागते, कधी एखाद्या नातेवाईकाला कर्करोगासारख्या गंभीर व्याधीचे निदान होते. अशा घटना समोर दिसल्या की, मनामध्ये तीव्र नकारात्मक भावना निर्माण होतात. यात भर, म्हणजे वर्तमानपत्रे आणि टीव्ही यांमधील बातम्या. त्या सतत पाहिल्या की, माणसे पुष्कळ घाबरतात. काही लोक इतके भयभीत होतात की, बर्‍याचदा ते भीती व्यक्तही करत नाहीत; पण आतून अस्वस्थ होतात. अशा वेळी साक्षीभाव अत्यंत आवश्यक ठरतो.

३ आ. नामस्मरणामुळे मन स्थिर होणे : जेव्हा आपण साक्षीभाव ठेवतो किंवा परमेश्वराचे नामस्मरण करतो, ‘परमेश्वर माझ्याजवळ आहे’, असा भाव ठेवतो, तेव्हा मन स्थिर होते. काही वेळा एखादा अनुभव ऐकतांना, पुस्तक वाचतांना किंवा दूरचित्रवाहिनीवरील मालिका पहातांना भीती वाढू शकते. विशेषतः जे लोक मानसिकदृष्ट्या कमकुवत असतात, त्यांना ही भीती अधिक तीव्रतेने जाणवते.

सनातन संस्थेने त्यांच्या ग्रंथांमधून सांगितले आहे, ‘प्रारब्धानुसार प्रत्येकाच्या वाट्याला सुख-दुःख येत असते. आपण चांगले कर्म केले आणि दान करत राहिलो, तर त्याचे फळही आपल्याला चांगलेच मिळते.’ त्यामुळे ‘इतरांना आलेले दुःख आपल्यालाही होणार’, असा अविचार करणे चुकीचे आहे.

३ इ. उद्योगामध्ये साक्षीभाव ठेवून आणि प्रारब्ध समजून संभाव्य धोका स्वीकारावा : उद्योगामध्ये असे म्हटले जाते, ‘जेवढा संभाव्य धोका अधिक, तेवढे अधिक पुरस्कार (रिवॉर्ड).’ नवीन प्रयोग करतांना बर्‍याचदा भागीदारी करावी लागते. एखादे संशोधन आपण स्वतः करू शकत नसू, तर त्यासाठी दुसर्‍यावर अवलंबून रहावे लागते. त्यांना काही पैसे द्यावे लागतात किंवा आपण स्वतःचा वेळ व्यय करतो. अशा परिस्थितीत प्रत्येक वेळी १०० टक्के लाभ आणि १०० टक्के हानी होईलच, असे नाही. काही वेळा काम अर्धवट राहू शकते; पण ती अर्धी मिळालेली गोष्टसुद्धा एखादे वेगळे उत्पादन बनवण्यासाठी किंवा एखादी नवीन संकल्पना विकसित करण्यासाठी उपयोगी ठरू शकते. म्हणूनच साक्षीभाव ठेवून प्रारब्ध समजून घेत धोका स्वीकारला, तर उद्योगात पुढे जाणे शक्य होते.

वाचकांना सूचना

या लेखाविषयी वाचकांनी अभिप्राय कळवण्यासाठी [email protected] या ई-मेलवर किंवा दू.क्र. (०२२) ६७०३५५५५ यावर संपर्क साधावा.

४. साक्षीभाव आणि नामस्मरणाचे महत्त्व

मनुष्याने जीवनात साधना करणे अत्यंत आवश्यक आहे. असे म्हटले जाते, ‘रिकामे मन हे भूताचे घर असते.’ त्यामुळे मन कधीही रिकामे राहू द्यायचे नाही. मनात उद्योग, वर्तमानातील कामे किंवा भविष्यातील योजना यांविषयी विचार येणारच; पण ते विचार पूर्ण झाल्यानंतर पुन्हा नामजपाकडे वळायला आपण शिकायला हवे. श्री गुरुदेव दत्त, कुलदेवता, इष्टदेवता यांचा किंवा गुरूंकडून मिळालेला नामजप यांचे सतत स्मरण करून मन कसे स्थिर करता येईल, याचा प्रयत्न करायला हवा.

स्वतःच्या मनातील विचारांची आणि सकारात्मकतेची एक टाकी असते; पण तिला गळती कधी लागते, हे लक्षात येत नाही. जसे खोलीत टाकलेला कचरा दिसतो, तसा मनात साठणारा कचरा दिसत नाही. ‘तुला हे कळले का…’, ‘असे झाले… तसे झाले…’, अशा प्रकारे बोलून अनेक नकारात्मक लोक सतत मनात चुकीच्या गोष्टी भरत असतात आणि आपण त्या ऐकत रहातो; पण ते ‘या कानाने ऐकून त्या कानाने सोडणे’, म्हणजेच साक्षीभावाने त्याकडे पहाणे. हे आता आपण जाणूनबुजून शिकायला हवे.

४ अ. नामस्मरणाच्या माध्यमातून भगवंताचे अस्तित्व अनुभवणे : ‘जेथे जातो तेथे तू माझा सांगाती । चालविसी हातीं धरोनियां ।’, या जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या अभंगानुसार आपण भगवान श्रीकृष्णाची आठवण ठेवली, तर तो आपल्यासमवेच असतो; पण आपण त्याची आठवणच ठेवली नाही, तर तो आपल्याला कसा वाचवणार ? ‘नामजप’, म्हणजे त्याचे अस्तित्व आहे. जसजसे नामस्मरण भावपूर्ण होत जाते वा वाढत जाते, तसतसे त्याचे अस्तित्व वेगवेगळ्या व्यक्तींच्या माध्यमातून किंवा संकटाच्या प्रसंगी आपल्याला जाणवू लागते.

४ आ. स्वतःभोवती ‘रामकवच’ निर्माण करणे : आपण नेहमी ‘रामरक्षास्तोत्र’ म्हणतो. त्यामधील जे ११ श्लोक आहेत, त्यांना ‘रामकवच’ असे म्हटले जाते. हे रामकवच स्वतःभोवती निर्माण करायचे असते.

४ इ. स्वतःभोवती नामाचे संरक्षणकवच निर्माण करणे : स्वतःभोवती नामजपाचे संरक्षणकवच कसे निर्माण करायचे, हे सनातन संस्थेमध्ये शिकवले जाते. आपण ज्या खोलीत बसलो आहोत त्या खोलीभोवती, वास्तूभोवती, गाडीभोवती नामाचे कवच निर्माण करायला शिकायला हवे. असे नामकवच निर्माण केल्यामुळे त्याचा पुष्कळ लाभ होऊ शकतो. सनातननिर्मित ग्रंथ वाचून किंवा सत्संगाला जाऊन हे आपल्याला शिकायला मिळते. त्यामुळे प्रवास, वाहन, अपघात यांच्याविषयीची, म्हणजेच बाह्य स्वरूपाच्या ज्या भीती असतात, त्यापासून नामकवचामुळे स्वतःचे रक्षण होते, असा अनुभव मी आणि माझे सर्व सहकारी यांनी घेतलेला आहे. आपणही तो नक्की घ्यावा. साक्षीभावाने कर्म करत राहिलो, तर मन शांत रहाते आणि कृती योग्य दिशेने घडते. अहंकार न्यून होऊन परमेश्वरावरचा विश्वास वाढला की, सामाजिक जीवन, उद्योग आणि साधना अशा तिन्ही मार्गाने माणसाची प्रगती होते.

‘साक्षीभावा’चा हा अमूल्य नियम सनातन संस्थेमुळे समजला, त्यासाठी मी संस्थेप्रती मनःपूर्वक कृतज्ञता व्यक्त करतो आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या चरणी कोटीशः नमन करतो !’

(क्रमशः पुढच्या रविवारी)

भाग २१ वाचण्यासाठी क्लिक करा → https://sanatanprabhat.org/marathi/1016147.html

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या काही वेळा अनिष्ट शक्तींमुळे किंवा ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांना आलेल्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सर्वांनाच येतील, असे नाही. – संपादक