पाळीतील वेदना (कष्टार्तव) आणि आयुर्वेद

मासिक पाळीच्या काळात तीव्र पोटदुखी, कंबरदुखी, मांड्यांपर्यंत पसरणार्‍या वेदना, मळमळ, डोकेदुखी, चिडचिड किंवा अशक्तपणा या तक्रारी अनेक स्त्रियांना प्रत्येक मासाला सहन कराव्या लागतात. काही महिलांसाठी या वेदना इतक्या तीव्र असतात की, दैनंदिन कामकाज, नोकरी, शिक्षण यांवर त्याचा मोठा परिणाम होतो. वेदनाशामक औषधे घेतल्याने तात्पुरता आराम मिळतो; पण मूळ समस्या तशीच रहाते. आयुर्वेद या अवस्थेला ‘कष्टार्तव’ असे म्हणतो आणि या वेदनांकडे लक्षण म्हणून न पहाता त्यांच्या मुळाशी जाण्याचा प्रयत्न करतो.

लेखांक २

लेखांक १ वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/1006461.html

१. मासिक पाळीत होणार्‍या तीव्र वेदनांमागील कारण

आयुर्वेदानुसार मासिक पाळी ही अपान वायू या वातदोषाच्या उपप्रकारावर अवलंबून असलेली नैसर्गिक प्रक्रिया आहे. अपान वायूचे कार्य योग्य प्रकारे झाले, तर पाळी वेदनामुक्त आणि नियमित रहाते; मात्र अयोग्य आहार-विहार, उपवासाचे अतीप्रमाण, थंड अन् कोरडे पदार्थ, अनियमित जेवण, सतत मानसिक ताण, चिंता, भीती, तसेच अपुरी झोप यांमुळे वातदोष बिघडतो. हा बिघडलेला वात गर्भाशयाच्या स्नायूंमध्ये आकुंचन वाढवतो आणि त्यामुळे तीव्र वेदना निर्माण होतात.

कष्टार्तवामध्ये अनेकदा पाळी उशिरा येणे, रक्तस्राव अल्प होणे किंवा गुठळ्या जाणे, अशी लक्षणेही दिसून येतात. काही स्त्रियांमध्ये पाळी चालू होण्याच्या १-२ दिवस आधीच वेदना चालू होतात. आयुर्वेदाच्या दृष्टीने हे लक्षण केवळ गर्भाशयापुरते मर्यादित नसून संपूर्ण शरिरातील वातदोष आणि पचनशक्तीचे असंतुलन यांच्याशी संबंधित असते. पचन नीट न झाल्यास शरिरात आम साचतो, जो वाताला अधिक उत्तेजित करतो आणि वेदना वाढवतो.

वैद्या (सौ.) सारिका लोंढे

२. आयुर्वेदाचे उपचार

आयुर्वेदाच्या उपचारांचा मुख्य उद्देश ‘वातदोष शमवणे, अपान वायूची योग्य दिशा पुनःस्थापित करणे आणि गर्भाशयाला पोषण देणे’, हा असतो. दशमूल, हिंग, अजवाइन, शतावरी यांसारखी औषधी द्रव्ये वातशमनासाठी उपयोगी मानली जातात. हिंग्वाष्टक चूर्ण किंवा दशमूल काढा यांचा वैद्यांच्या सल्ल्याने वापर केल्यास वेदनांमध्ये हळूहळू फरक जाणवू लागतो. आयुर्वेदात स्नेहन आणि स्वेदन, म्हणजे शरिराला योग्य प्रमाणात स्निग्धता अन् उष्णता देणे यालाही विशेष महत्त्व दिले जाते; कारण त्यामुळे वातदोष शांत होतो.

३. घरगुती उपचार आणि योगासने

अ. घरगुती पातळीवर काही सोपे; पण शास्त्रीय उपाय नियमित केल्यास पाळीतील वेदना न्यून होण्यास साहाय्य होते. पाळीच्या आधी आणि पाळीच्या दिवसांत कोमट पाणी पिणे, अतीथंड अन् कोरडे पदार्थ टाळणे, तीळ आणि गूळ काढा मर्यादित प्रमाणात घेणे, तसेच ओवा किंवा जिरे यांचा कोमट काढा पिणे उपयुक्त ठरते. पोटावर कोमट पाण्याची पिशवी ठेवणे, हा साधा; पण प्रभावी उपाय मानला जातो. तेलाचा पोटावर हलका मसाजही वातशमनासाठी साहाय्य करतो.

आ. योग आणि प्राणायाम यांचा नियमित सराव केल्यास कष्टार्तवावर चांगला परिणाम दिसून येतो. भुजंगासन, बद्धकोणासन आणि पवनमुक्तासन यांसारखी योगासने अपान वायूचे कार्य सुधारण्यास साहाय्यक ठरतात. यासह ताणतणाव न्यून करणे, मन शांत ठेवणे आणि पुरेशी झोप घेणे, हेही तितकेच महत्त्वाचे आहे.

४. मासिक पाळीशी संबंधित आयुर्वेदाचा समग्र दृष्टीकोन

एकूण पहाता पाळीतील वेदना ही केवळ सहन करण्याची गोष्ट नसून शरिरातील असंतुलनाची चेतावणी आहे. आयुर्वेद या समस्येकडे समग्र दृष्टीकोनातून पहातो आणि तात्पुरत्या आरामाऐवजी दीर्घकालीन सुधारणा साधण्यावर भर देतो. योग्य आहार, जीवनशैली, मानसिक संतुलन, आयुर्वेदाची औषधे आणि घरगुती उपाय यांचा योग्य समन्वय साधल्यास कष्टार्तवाची तीव्रता न्यून होऊन स्त्रीचे मासिक आरोग्य नैसर्गिकरित्या सुधारू शकते.

– वैद्या (सौ.) सारिका नीलेश लोंढे, ‘निर्विकार आयुर्वेद हॉस्पिटल’, भोसरी, पुणे.

लेखांक ३ वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/1011554.html

🪷‘स्त्री रोग आणि आयुर्वेद’ या मालिकेतील सर्व लेख वाचण्यासाठी इथे क्लिक करा🪷