प्रत्येक मंगळवारी वाचा ‘स्त्रीरोग आणि आयुर्वेद’ याविषयीची लेखमाला !
लेखांक १
अनियमित मासिक पाळी ही आज अनेक स्त्रियांमध्ये आढळणारी सामान्य; पण दुर्लक्षित समस्या आहे. मासिक पाळी ही स्त्रीच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्याचा आरसा मानली जाते. पाळी वेळेवर, वेदनामुक्त आणि योग्य प्रमाणात येत नसेल, तर शरिरात काहीतरी असंतुलन होत असल्याचा तो संकेत असतो. पालटलेली जीवनशैली, वाढता ताणतणाव, अनियमित आहार, झोपेचा अभाव आणि ‘हार्मोनल’ (संप्रेरक) पालट यांमुळे ही समस्या वाढतांना दिसते.

१. अनियमित मासिक पाळी
साधारणपणे २१ ते ३५ दिवसांच्या अंतराने मासिक पाळी येणे नियमित मानले जाते. काही महिलांमध्ये पाळी उशिरा येते, काहींमध्ये पुष्कळ लवकर येते, तर कधी कधी महिनाभर पाळीच येत नाही. काही स्त्रियांना पुष्कळ प्रमाणात रक्तस्राव होतो, तर काहींना पुष्कळ अल्प. पाळीत तीव्र पोटदुखी, कंबरदुखी, गुठळ्या जाणे, चिडचिड होणे, थकवा येणे, अशी लक्षणे दिसतात. या सगळ्यांना एकत्रितपणे ‘अनियमित मासिक पाळी’ असे म्हटले जाते.
२. वात, पित्त आणि कफ या ३ दोषांच्या संतुलनावर पाळीची नियमितता अवलंबून
आयुर्वेदात मासिक पाळीला ‘आर्तव’ किंवा ‘रज’ असे संबोधले जाते. आयुर्वेदानुसार वात, पित्त आणि कफ या ३ दोषांच्या संतुलनावर पाळीची नियमितता अवलंबून असते. वातदोष बिघडला, तर पाळी उशिरा येणे, वेदना होणे किंवा अल्प रक्तस्राव होतो. पित्तदोष वाढल्यास अधिक रक्तस्राव, जळजळ, उष्णता आणि चिडचिड जाणवते. कफदोष वाढल्यास पाळी उशिरा येणे, शरिरात जडपणा, सूज आणि वजन वाढण्यासारखी लक्षणे दिसतात.
वैद्या (सौ.) सारिका नीलेश लोंढे यांचा परिचय

वैद्या (सौ.) सारिका लोंढे ‘एम्.डी. आयुर्वेद’ आणि योगशिक्षक असून पिंपरी-चिंचवड, पुणे येथे कार्यरत अनुभवी आयुर्वेदाच्या अन् कुटुंब चिकित्सक आहेत. त्यांना आयुर्वेद आणि पंचकर्म उपचारांचा १३ वर्षांचा ‘क्लिनिकल’ (वैद्यकीय) अनुभव आहे. त्या ‘निर्विकार आयुर्वेद हॉस्पिटल, भोसरी’ या सुसज्ज आयुर्वेद रुग्णालयाच्या संस्थापिका आणि संचालिका आहेत. या रुग्णालयात बाह्य रुग्ण आणि आंतररुग्ण विभाग, पंचकर्म विभाग, तसेच ‘सी.जी.एच्.एस्.’ (सेंट्रल गव्हर्नमेंट हेल्थ स्कीम – केंद्र सरकारची आरोग्य योजना), ‘ई.सी.एच्.एस्.’ (एक्स सर्व्हिसमेन कॉन्ट्रिब्युट्री हेल्थ स्कीम – माजी सैनिक अंशदायी आरोग्य योजना) आणि इतर अनेक आस्थापनांची ‘कॅशलेस’ (रोखमुक्त) सुविधा असलेले पुणे जिल्ह्यातील पिंपरी-चिंचवडमधील पहिले रुग्णालय असून अनुमाने ५००० चौरस फूट क्षेत्रफळात वर्ष २०१८ पासून सेवा चालू आहे.
स्त्रीरोग, वंध्यत्व, दीर्घकालीन आजार आणि पंचकर्म उपचार यांमध्ये त्यांचे विशेष कार्य आहे. त्यांनी ‘आयुर्वेद आणि वंध्यत्व’ या विषयावर वैद्य आणि आधुनिक वैद्य (डॉक्टर) यांच्यासाठी व्याख्याने दिली असून जनसामान्यांसाठीही आरोग्यविषयक मार्गदर्शन केले आहे. त्या ‘महाराष्ट्र आयुर्वेद संमेलन, पिंपरी-चिंचवड’ यांच्या उपाध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत. ‘निमा वुमन्स फोरम, पिंपरी-चिंचवड’ यांच्या त्या संयुक्त सचिव आहेत. ‘अविरत श्रमदान’ या स्वयंसेवी संस्थेच्या सचिव म्हणून सामाजिक आणि आरोग्य जनजागृती कार्यात सक्रीय आहेत. त्या ‘रोटरी क्लब ऑफ उद्योगनगरी’च्या अभिमानी सदस्य आहेत.
३. मासिक पाळीवर आयुर्वेदाच्या उपचारांचा मुख्य उद्देश
अनियमित मासिक पाळीचा विचार करतांना आयुर्वेद संपूर्ण शरिराचा विचार करतो. केवळ गर्भाशय किंवा ‘हार्मोन्स’ नव्हे, तर पचनशक्ती, रक्ताची गुणवत्ता, मनःस्थिती, दिनचर्या आणि आहार या सगळ्यांचा एकत्रित विचार केला जातो. पचनशक्ती कमकुवत असेल, शरिरात आम साचले असेल किंवा सतत मानसिक ताण असेल, तर त्याचा थेट परिणाम मासिक पाळीवर होतो.
आयुर्वेदाच्या उपचारांचा मुख्य उद्देश ‘शरिरातील दोष संतुलित करणे, पचनशक्ती सुधारणा करणे आणि नैसर्गिकरित्या मासिक पाळी नियमित करणे’, हा असतो. ‘अशोक’, ‘लोध्र’, ‘शतावरी’, ‘कुमारी (कोरफड)’ यांसारख्या औषधी वनस्पती आयुर्वेदात स्त्रीरोगांसाठी विशेष उपयोगी मानल्या जातात. ‘अशोकारिष्ट’, ‘कुमारी आसव’, ‘लोध्रासव’, ‘शतावरी कल्प’ यांसारखी औषधे वैद्यांच्या सल्ल्याने घेतल्यास चांगला लाभ होतो.

४. पाळी नियमित होण्यासाठी घरगुती उपाय
या समस्येत घरगुती उपायही उपयोगी ठरू शकतात. सकाळी कोमट पाणी पिणे, आहारात तीळ आणि गूळ यांचा समावेश करणे; जिरे, धणे आणि सौंफ (बडिशेप) यांचा काढा पिणे, रात्री कोमट दुधातून तूप घालून घेणे, हे उपाय पाळी नियमित होण्यास साहाय्य करतात. अतीथंड पदार्थ, जंक फूड (पिझ्झा, बर्गर), फार तिखट आणि तेलकट अन्न टाळणे आवश्यक असते.
५. मासिक पाळीसाठी उपयुक्त योगासने
योग, प्राणायाम आणि ध्यान यांचा नियमित सराव केल्यास मानसिक ताण न्यून होतो आणि ‘हार्मोनल’ संतुलन सुधारते. भुजंगासन, धनुरासन आणि पवनमुक्तासन यांसारखी योगासने मासिक पाळीसाठी उपयुक्त मानली जातात. पुरेशी झोप, नियमित दिनचर्या आणि सकारात्मक मानसिकता यांचाही मोठा वाटा असतो.
६. मासिक पाळी नैसर्गिकरित्या नियमित रहाण्यासाठी…
एकूणच अनियमित मासिक पाळी ही केवळ शारीरिक समस्या नसून ती शरीर आणि मन यांच्या असंतुलनाचे लक्षण आहे. आयुर्वेद या समस्येकडे समग्र दृष्टीकोनातून पहातो. योग्य आहार, योग्य जीवनशैली, मानसिक शांतता, आयुर्वेदाची औषधे आणि घरगुती उपाय यांचा समन्वय साधल्यास मासिक पाळी नैसर्गिकरित्या नियमित होऊन स्त्रीचे आरोग्य उत्तम राहू शकते.
– वैद्या (सौ.) सारिका नीलेश लोंढे, निर्विकार आयुर्वेद हॉस्पिटल, भोसरी, पुणे. (४.१.२०२६)
लेखांक २ वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/1008930.html
कथित सामाजिक कार्यकर्त्या तिस्ता सेटलवाड यांचे पारपत्र परत करण्यासंदर्भात सर्वाेच्च न्यायालयाची संयत भूमिका !
मोगल, ब्रिटीश आणि काँग्रेस यांनी केले नाही, ते महाराष्ट्र सरकार करायला निघाले आहे !
छत्रपती शिवरायांना हिंदवी स्वराज्याच्या विचारांनी भारलेले अन् हिंदूंसाठी उभे रहाणारे युवक हवे आहेत !
शहरी नक्षलवादामुळे झारखंड येथील आदिवासींचे अस्तित्व धोक्यात !
‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा ‘कर्मयोग, ज्ञानयोग आणि भक्तीयोग’ या क्रमाने झालेला आध्यात्मिक प्रवास’ अन् या लिखाणावर श्री. राम होनप यांना सूक्ष्मातून प्राप्त झालेले ज्ञान
उन्हाळा इतका तीव्र का होत आहे ? विदेशी झाडे का नको ?