आज ‘व्हॅलेंटाईन डे’ची कुप्रथा पाळली जाते. त्या निमित्ताने…
१४ फेब्रुवारीला भारतात साजरा होणारा ‘व्हॅलेंटाईन डे’ हा केवळ प्रेमाचे प्रतीक नसून तो हिंदु संस्कृतीवर झालेला ‘सांस्कृतिक आघात’ आहे. ज्या पाश्चात्त्य देशांनी ‘व्हॅलेंटाईन डे’ चालू केला, तिथे आज कुटुंबव्यवस्था मोडकळीस आली आहे, तेच लोण आता भारतात पसरवले जात आहे. प्रेमाच्या नावाखाली आज युवा पिढीला भोगवाद, व्यसनाधीनता आणि अनैतिकता यांच्या गर्तेत ढकलले जात आहे, ज्याला आमचा तीव्र विरोध आहे.

१. ‘व्हॅलेंटाईन डे’मुळे निर्माण होणारे महत्त्वाचे प्रश्न आणि समस्या
अ. गुन्हेगारी आणि महिला सुरक्षा : या अनुषंगाने महत्त्वाचे सूत्र लक्षात घ्यायला हवे की, १४ फेब्रुवारीलाच महिलांवरील अत्याचारात वाढ का होते ? आकडेवारी पाहिली, तर या दिवशी एकतर्फी प्रेमातून मुलींवर आम्ल फेकणे (ॲसिड ॲटॅक), विनयभंग आणि आत्महत्या करणे या घटनांत वाढ होते.
सर्वोच्च न्यायालयाने ‘विशाखा विरुद्ध राजस्थान सरकार’ आणि ‘एस्. समुथिरम विरुद्ध तामिळनाडू राज्य’ या खटल्यांमध्ये महिलांच्या सुरक्षिततेसाठी अन् ‘इव्ह टीझिंग’ (छेडछाड) रोखण्यासाठी स्पष्ट मार्गदर्शक तत्त्वे दिली आहेत. १४ फेब्रुवारीला उघडपणे सार्वजनिक ठिकाणी या तत्त्वांचे उल्लंघन होते, तेव्हा पोलीस प्रशासन गप्प का असते ?

आ. ‘लव्ह जिहाद’ आणि धर्मांतर : हा मुद्दा अत्यंत गंभीर आहे. १४ फेब्रुवारीचा मुहूर्त साधून अनेक धर्मांध युवक हातात लाल गुलाब घेऊन हिंदु मुलींना खोटी नावे सांगून प्रेमाच्या जाळ्यात ओढतात. हे ‘प्रेम’ नसून ‘लव्ह जिहाद’चा सुनियोजित सापळा आहे. केरळ आणि कर्नाटक येथील अनेक पीडित मुलींच्या घटना पाहिल्या, तर याचा प्रारंभ अशाच ‘डे’पासून झाल्याचे दिसून येते.
इ. व्यसनाधीनता आणि ‘ड्रग्ज माफिया’ (अमली पदार्थांची तस्करी) : प्रेमाच्या नावाखाली आज पब, हॉटेल्स आणि रिसॉर्ट्स या ठिकाणी ‘रेव्ह पार्ट्या’ आयोजित केल्या जातात. १४ फेब्रुवारीला शहरांत अमली पदार्थ आणि मद्य यांचा खप प्रचंड वाढतो. तरुण पिढीला नशेच्या आहारी घालून त्यांचे भविष्य उद्ध्वस्त करण्याचे हे मोठे षड्यंत्र आहे.
केवळ नशाच नाही, तर या दिवशी संतती प्रतिबंधक साधनांच्या विक्रीत होणारी वाढ हे स्पष्ट करते की, हा दिवस प्रेमाचा नसून ‘वासनेचा’ बाजार झाला आहे. अल्पवयीन मुलींचे शोषण रोखण्यासाठी ‘पॉक्सो’ कायद्यांतर्गत प्रशासनाने या दिवशी हॉटेल आणि लॉज यांवर धाडी टाकल्या पाहिजेत.
ई. आर्थिक शोषण : एकीकडे भारतात बेरोजगारी आहे, तर दुसरीकडे ‘व्हॅलेंटाईन डे’च्या एका दिवसात शुभेच्छा पत्रे, महागड्या भेटवस्तू आणि मेजवान्या यांच्या माध्यमातून भारतातून अनुमाने२५ सहस्र कोटी रुपये विदेशी आस्थापनांच्या खिशात जातात. हे मानसिक गुलामगिरीचे लक्षण नाही का ?
२. उपाययोजना

अ. प्रशासनावर उत्तरदायित्व : सर्वोच्च न्यायालयाच्या ललिता कुमारी खटल्यामधील आदेशानुसार १४ फेब्रुवारी या दिवशी घडणार्या प्रत्येक गुन्ह्याची त्वरित ‘एफ्.आय.आर्.’ (प्रथमदर्शी माहिती अहवाल) नोंदवला पाहिजे. कायदा-सुव्यवस्था बिघडल्यास त्याला प्रशासन उत्तरदायी असणार आहे.
आ. हिंदु संस्कृतीनुसार उपाययोजना : आपण प्रेमाच्या विरोधात नाही; पण स्वैराचाराच्या विरोधात आहोत. ज्या आई-वडिलांनी आपल्याला जन्म दिला, त्यांच्यावर प्रेम व्यक्त करण्यासाठी१४ फेब्रुवारीला ‘मातृ-पितृ पूजनदिन’ साजरा करा. आतापर्यंत अनेक राज्ये आणि शाळा यांनी याला अधिकृत मान्यता दिली आहे, मग उर्वरित भारतात का नाही ?
३. प्रेम विरुद्ध वासना यांतील मूलभूत भेद
सूत्र : पाश्चात्त्यांची ‘व्हॅलेंटाईन डे’ची संकल्पना ही ‘देहबुद्धी’वर आधारित आहे, तर भारतीय संस्कृती ‘आत्मबुद्धी’वर आधारित आहे.
स्पष्टीकरण : आजची पिढी ज्याला ‘प्रेम’ म्हणते, ती खरेतर ‘वासना’ आहे, जी केवळ शारीरिक आकर्षणापुरती मर्यादित असते आणि ती क्षणभंगुर असते. हिंदु धर्मात ‘प्रीती’ सांगितली आहे. प्रीती म्हणजे निरपेक्ष प्रेम ! जे प्रेम शरिराकडे बघून नाही, तर जिवातील ईश्वराकडे बघून केले जाते, तेच खरे शाश्वत प्रेम आहे. ‘व्हॅलेंटाईन डे’मधून वासनेचे उदात्तीकरण होते, तर हिंदु धर्म संयम आणि त्याग यांचे महत्त्व शिकवतो.
४. ३६५ दिवसांचे प्रेम विरुद्ध १ दिवसाचे नाटक
सूत्र : हिंदु संस्कृतीत नाती ही ‘कॉन्ट्रॅक्ट’ (करार) नसून ‘संस्कार’ आहेत. त्यामुळे प्रेमासाठी एका दिवसाच्या मुहूर्ताची आवश्यकता आम्हाला नाही.
स्पष्टीकरण : पाश्चात्त्य देशांत जिथे कुटुंबव्यवस्था मोडकळीस आली आहे, तिथे नात्यांची आठवण करून देण्यासाठी ‘मदर्स डे’, ‘फादर्स डे’ किंवा ‘व्हॅलेंटाईन डे’ साजरा करावा लागतो. आमची संस्कृती ‘वसुधैव कुटुम्बकम्’ (संपूर्ण पृथ्वी कुटुंब आहे) शिकवते. आम्ही वर्षाचे ३६५ दिवस आणि श्वासाच्या प्रत्येक क्षणी प्रेम करण्यास शिकतो. आई-वडील, बहीण-भाऊ, गुरु, मित्र, राष्ट्र आणि धर्म या सर्वांवर निरपेक्ष प्रेम करणे, ही हिंदु धर्माची शिकवण आहे. एका दिवसाच्या गुलाबाच्या फुलात प्रेम सीमित करणे, हा प्रेमाचा अपमान आहे.
प्रेमाच्या नावाखाली चाललेल्या ‘स्वैराचाराला’ प्रोत्साहन नको !

१. प्रेम हे प्रदर्शनाचे, तर समर्पणाचे असते; पण ‘व्हॅलेंटाईन डे’ला केवळ शरिराचे प्रदर्शन होते.
२. आमच्या देशात स्त्रीला ‘माता’ मानले जाते, त्यामुळे तिला ‘उपभोगाची वस्तू’ बनवणार्या विकृतीला आमचा विरोध आहे.
३. ज्या ‘व्हॅलेंटाईन’चा भारताशी काहीही संबंध नाही, त्याच्यासाठी आपल्या मुलींना आमिषात का अडकू द्यायचे ?
आमचा विरोध प्रेमाला नाही, तर प्रेमाच्या नावाखाली चाललेल्या ‘स्वैराचाराला’ आहे. श्रीकृष्ण आणि राधा यांचे प्रेम हे ‘आत्मिक’ होते, तर ‘व्हॅलेंटाईन डे’चे प्रेम हे ‘दैहिक’ आहे. भारताला ‘राधे-कृष्णा’च्या उदात्त प्रेमाची आवश्यकता आहे, ‘रोमियो-ज्युलिएट’च्या विकृत आणि आत्मघातकी प्रेमाची नाही.
– श्री. अभय वर्तक
५. संकुचित वृत्ती विरुद्ध व्यापक दृष्टीकोन
सूत्र : ‘व्हॅलेंटाईन डे’ प्रेमाला संकुचित करतो, तर हिंदु धर्म प्रेमाला व्यापक करतो.
स्पष्टीकरण : ‘व्हॅलेंटाईन डे’मध्ये प्रेम हे केवळ एका मुलापुरते किंवा मुलीपुरते मर्यादित केले जाते; पण हिंदु धर्म सांगतो की, प्रेम हे केवळ प्रेयसीवरच का ? ते तर आई, वडील, सीमेवर लढणारे सैनिक, निसर्ग आणि गोमाता यांवरही केले पाहिजे. प्रेमाचा हा ‘व्यापक’ दृष्टीकोन सोडून तरुण पिढी पाश्चात्त्यांच्या ‘संकीर्ण’ आणि स्वार्थी प्रेमाच्या जाळ्यात अडकत आहे.
६. ‘यूज अँड थ्रो’ (वापरा आणि फेकून द्या) संस्कृती विरुद्ध ‘सात जन्मांचे नाते’
सूत्र : ही ‘डे संस्कृती’, म्हणजे मानवी भावनांचा बाजार आहे.
स्पष्टीकरण : पाश्चात्त्य संस्कृती ‘यूज अँड थ्रो’ (वापरा आणि फेकून द्या), या तत्त्वावर चालते, त्यामुळे तिथे नाती टिकत नाहीत. आजचा ‘व्हॅलेंटाईन’ उद्या पालटतो. याउलट भारतीय संस्कृती ‘त्याग आणि समर्पण’ शिकवते, जिथे पती-पत्नीचे नाते हे ७ जन्मांचे मानले जाते. त्यामुळे क्षणिक सुखासाठी आयुष्य उद्ध्वस्त करणार्या ‘डे संस्कृती’ची आवश्यकता भारतियांना नाही.

७. आनंदाची व्याख्या : भोग कि त्याग ?
सूत्र : सुख हे उपभोगण्यात नसून त्यागात आहे.
स्पष्टीकरण : तरुण पिढीला वाटते की, हॉटेल्समध्ये (उपाहारगृहामध्ये) जाणे, मौजमजा करणे, म्हणजे आनंद; पण हा आनंद ‘राजसिक-तामसिक’ आहे, जो नंतर दुःखच देतो. आई-वडिलांच्या चरणी नतमस्तक होऊन जो आनंद (सात्त्विक समाधान) मिळतो, तो पबमधील मेजवान्यांमध्ये कधीच मिळू शकत नाही. म्हणूनच आम्ही ‘मातृ-पितृ पूजनदिना’चा आग्रह धरतो.
८. पाश्चात्त्यांचे अंधानुकरण थांबवा !
एक दिवसाच्या गुलाबापेक्षा आयुष्यभरासाठी आई-वडिलांचा आशीर्वाद महत्त्वाचा आहे. त्यामुळे हिंदूंनो, पाश्चात्त्यांचे अंधानुकरण थांबवा आणि धर्माचरण करा.
– श्री. अभय वर्तक, प्रवक्ते, सनातन संस्था. (६.२.२०२६)
‘श्रद्धे’चा बाजार !
‘जीवोत्तम विद्यापीठ’ : भारतीय ज्ञानपरंपरेचे आधुनिक पुनरुज्जीवन !
स्वातंत्र्यवीर सावरकर यांची रणनीती आणि नेताजी सुभाषबाबूंशी झालेली भेट
खासगी संस्थांची नोंदणी अनिवार्य नाही !
स्त्रियांचे मानसिक आरोग्य आणि ‘हार्मोन्स’ (संप्रेरक) : आयुर्वेदाचा समतोलाचा मार्ग
हिंदू बहुत ही डरपोक कौम है ! (हिंदू अत्यंत भित्रे आहेत !)