देहली (इंद्रप्रस्थ) येथे झालेल्या ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’ची आध्यात्मिक वैशिष्ट्ये आणि सनातनच्या तिन्ही गुरूंचे (टीप) महोत्सवातील स्थूल अन् सूक्ष्म स्तरांवरील कार्य !

‘१३ ते १५ डिसेंबर २०२५ या कालावधीत देहली (इंद्रप्रस्थ) येथे ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सव’ झाला. ३ फेब्रुवारी या दिवशीच्या लेखातून आपण या महोत्सवाची आध्यात्मिक वैशिष्ट्ये आणि महोत्सवातून मिळालेले यश जाणून घेतले. आज आध्यात्मिक वैशिष्ट्यांचा पुढील भाग आणि तिन्ही गुरूंचे  महोत्सवातील स्थूल अन् सूक्ष्म स्तरांवरील कार्य जाणून घेऊया.

(भाग २)

टीप – सनातनचे तीन गुरु : सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले, श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ

भाग १ वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/1004288.html

२. देहली येथील ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’ची आध्यात्मिक वैशिष्ट्ये !

२ ई. वक्ते आणि युवक यांचा भाव अन् संचालकांचे उत्कृष्ट संचालन, यांमुळे काही सत्रांमध्ये आरंभी जाणवत असलेला नकारात्मक दाब नाहीसा होऊन चैतन्य वाढणे

२ ई १. वक्त्यांच्या आध्यात्मिक भावामुळे सत्रातील चैतन्याचे प्रमाण ७० टक्क्यांपेक्षा अधिक असणे : ‘महोत्सवाच्या पहिल्या दिवशी, म्हणजे १३.१२.२०२५ या दिवशी आयोजित ‘मंदिररक्षण चर्चासत्रा’त तंजावूर (तमिळनाडू) येथील वेदप्रचाररत्न वेदकुलपती श्री. जी.के. सीतारामन् आणि श्रीराम जन्मभूमीच्या न्यायालयीन खटल्यातील सर्वोच्च न्यायालयाचे वरिष्ठ अधिवक्ता श्रीधर पोतराजू यांनी अनुभवकथन केले. दोन्ही वक्त्यांची भाषणे ही तात्त्विक माहिती नसून त्यांनी अनुभवलेली ईश्वरी कृपा, म्हणजे अनुभूती होती. ते त्या अनुभूतींचे वर्णन भावपूर्ण करत असल्याने या सत्रामध्ये आरंभी होत असलेला नकारात्मक दाब नाहीसा होऊन चैतन्याचे प्रमाण ७० टक्क्यांपेक्षा अधिक झाले. याची अनुभूती म्हणून संपूर्ण वायूमंडलात सूक्ष्मातून मोगर्‍याचा सुगंध पसरला होता.

२ ई २. शौर्यप्रदर्शन सादर करणार्‍या युवकांची तळमळ आणि भाव यांमुळे श्रीकृष्ण, हनुमान अन् श्री दुर्गादेवी यांचे तत्त्व प्रगट होणे : महोत्सवात कोल्हापूर येथील ‘सव्यसाची गुरुकुलम्’ यांनी शिवकालीन युद्धकलेचे उत्कृष्ट सादरीकरण केले, तसेच ‘हिंदु जनजागृती समिती’ आणि त्यांची ‘रणरागिणी’शाखा यांच्या युवक-युवतींनी वर्तमानकाळासाठी आवश्यक असलेल्या स्वरक्षण प्रशिक्षणाविषयी वैचारिक जागृती निर्माण करणार्‍या नाटिका प्रस्तुत केल्या.

या शौर्यप्रदर्शनाचे सादरीकरण करतांना युवकांच्या अंतर्मनात धर्मरक्षणाची तळमळ आणि भाव जागृत होता. त्यामुळे शौर्यप्रदर्शनाचे सादरीकरण होतांना श्रीकृष्ण, हनुमान आणि श्री दुर्गादेवी यांचे तत्त्व कार्यक्रमस्थळी प्रगट झाले होते. युवकांची श्रद्धा आणि तळमळ यांमुळे वातावरणात ४० टक्के भाव आणि ५० टक्के चैतन्य यांची स्पंदने निर्माण झाली होती. त्यामुळे प्रेक्षकांचे मन एकाग्र होऊन त्यांच्या चित्तावर क्षात्रतेजाचे संस्कार सहजतेने झाले आणि त्यांना धर्मरक्षणासाठी सिद्ध होऊन कार्यरत होण्याची प्रेरणा मिळाली.

२ ई ३. संचालकांच्या उत्कृष्ट संचालनामुळे वायूमंडलातील सकारात्मक शक्तीत वाढ होणे : महोत्सवाच्या पहिल्या दिवशी, म्हणजे १३.१२.२०२५ या दिवशी ‘सुदर्शन’ वृत्तवाहिनीचे संपादक डॉ. सुरेश चव्हाणके यांनी ‘सनातन संस्कृतीचे रक्षण’ या विषयावर, तर दुसर्‍या दिवशी (१४.१२.२०२५ या दिवशी) सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ता श्री. चेतन राजहंस (आध्यात्मिक पातळी ६८ टक्के, वय ४२ वर्षे) यांनी ‘रणसंवाद : भारताची सामरिक रणनीती’, या सत्राचे संचालन अत्यंत उत्कृष्ट पद्धतीने केले. या संचालकांनी अनावश्यक चर्चेला प्रोत्साहन न देता समयमर्यादेत आणि नेमक्या शब्दांत मान्यवरांकडून त्यांचे मनोगत जाणून घेतले अन् चर्चेला विषयापासून भरकटू दिले नाही. त्यांच्या या उत्कृष्ट संचालनामुळे वातावरणातील नकारात्मक दाब नाहीसा होऊन तेथील सकारात्मक शक्तीचे प्रमाण ८० टक्क्यांपेक्षा अधिक झाले.

२ उ. राष्ट्रपुरुष, देवता आणि संत यांच्याशी संबंधित वस्तूंची प्रदर्शने

२ उ १. शस्त्रांच्या प्रदर्शनातील शस्त्रांतून प्रक्षेपित होणार्‍या क्षात्रतेजाने प्रेक्षकांवरील नकारात्मक शक्तीचे आवरण नष्ट होऊन त्यांच्या सात्त्विकतेत वाढ होणे : विश्वातील प्रत्येक घटकात शक्तीचे आकर्षण आणि त्या घटकातून शक्तीचे प्रक्षेपण चालू असते. काळानुसार त्या शक्तीमध्ये वाढ अथवा घट होत असते. आता सूक्ष्म स्तरावर युद्धकाळाला आरंभ झाला आहे. त्यामुळे काळानुसार छत्रपती शिवाजी महाराजांसारख्या राष्ट्रपुरुषांच्या क्षात्रतेजयुक्त शस्त्रांमध्ये ब्रह्मांडातील प्रगट क्रियाशक्ती आणि क्षात्रतेज कार्यरत होऊन प्रक्षेपित होत आहे.

नादानंतर (आकाशतत्त्वानंतर) चित्र किंवा दृश्य याच्या माध्यमातून (तेजतत्त्व) प्रक्षेपित होणार्‍या सूक्ष्म शक्तीचा व्यक्तीवर सर्वाधिक परिणाम होतो. शस्त्रांच्या प्रदर्शनात शस्त्रांची मांडणी सात्त्िवक पद्धतीने केली होती. त्यामुळे शस्त्रांच्या माध्यमातून प्रक्षेपित होणार्‍या प्रगट क्रियाशक्तीत वृद्धी होऊन ती सहजतेने प्रक्षेपित होत होती. परिणामी शस्त्रांतून प्रक्षेपित होणार्‍या क्षात्रतेजाने प्रदर्शन बघणार्‍या प्रेक्षकांचे मन प्रभावित झाले आणि त्यांच्या चित्तावरच्या नकारात्मक शक्तीचे आवरण नाहीसे झाले. त्यामुळे प्रेक्षकांच्या अंतर्गत सात्त्विकतेत वाढ झाली आणि त्यांना हिंदु राष्ट्र-स्थापनेसाठी आवश्यक असलेले आध्यात्मिक बळ मिळाले.

२ उ २. राष्ट्रपुरुष, देवता आणि संत यांच्याशी संबंधित वस्तूंमुळे तेथे उच्च लोकांतील दिव्य वातावरणाची निर्मिती होणे : देहली येथील महोत्सवात राष्ट्रपुरुषांसंबंधी माहिती देणार्‍या शस्त्रास्त्रांच्या प्रदर्शनासह विविध शिवलिंगे आणि संतांच्या सात्त्विक वस्तू यांचीही प्रदर्शने आयोजित करण्यात आली होती. राष्ट्रपुरुषांच्या प्रदर्शनातून प्रक्षेपित झालेल्या सकारात्मक शक्तीमुळे तेथे उच्च स्वर्गलोकातील वातावरण निर्माण झाले होते. परिणामी तिथे ठेवलेल्या वस्तूंच्या सकारात्मक शक्तीमुळे प्रदर्शन पहाणार्‍यांच्या मणिपूरचक्रावर परिणाम होऊन त्यांना हिंदु राष्ट्र-स्थापनेसाठी शक्ती प्राप्त होत होती.

शिवलिंग आणि संतांच्या वस्तू यांमधून प्रक्षेपित होत असलेली सात्त्विकता आणि चैतन्य यांमुळे प्रदर्शनस्थळी महर्लोकसमान वातावरण निर्माण झाले होते. त्याचा परिणाम प्रदर्शन पहाणार्‍यांच्या आज्ञाचक्रावर होऊन त्यांच्या शरिरातील सप्तचक्रांतील नकारात्मक शक्तीचे विघटन होत होते आणि त्यांना कार्यासाठी आवश्यक असलेले आध्यात्मिक बळ प्राप्त होत होते.

डावीकडून श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ, सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले आणि श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ

३. सनातनच्या तिन्ही गुरूंच्या माध्यमातून गुरुतत्त्वाने स्थूल आणि सूक्ष्म या दोन्ही स्तरांवर कार्य करणे 

धर्मसंस्थापनेचे कार्य स्थूल आणि सूक्ष्म स्तरांवर होत असते. ज्या वेळी अवतार धर्मसंस्थापनेसाठी भूतलावर जन्म घेतात, त्या वेळी ते अधिकतर स्थूल स्तरावरील कार्य करतात, तर त्यांना साहाय्य करणार्‍या देवता अन् शक्ती यांचे अधिकांश कार्य सूक्ष्म स्तरावरील असते, उदा. महाभारत युद्धात भगवान श्रीकृष्णाने धर्मसंस्थापनेसाठी अधिकांश कार्य स्थुलातून केले, तर हनुमंताने सूक्ष्म स्तरावर वाईट शक्तींशी लढणे इत्यादी कार्य केले.

३ अ. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या स्थूल, तसेच सूक्ष्म स्तरावरील धर्मसंस्थापनेच्या कार्याची उदाहरणे : देवतांची शक्ती ही भक्तांसाठी कार्यरत होते. त्यामुळे कलियुगात समष्टीला भक्ती शिकवून धर्मसंस्थापनेचे कार्य करण्यासाठी गुरुतत्त्वाला स्थूल आणि सूक्ष्म, अशा दोन्ही स्तरांवर कार्यरत व्हावे लागते. आतापर्यंत प्रत्येक कार्यक्रमात उपस्थित रहाण्याच्या माध्यमातून सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले हे कार्य स्थूल स्तरावर करत होते, तसेच सूक्ष्म स्तरावरही त्यांचे कार्य अविरतपणे चालू होते.

श्री. निषाद देशमुख

१. ज्याप्रमाणे श्रीकृष्णाने अर्जुनाला विश्वरूप दर्शन दिले, त्याप्रमाणे वर्ष २०२३ मध्ये गोव्यातील ब्रह्मोत्सवात सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी उपस्थित साधकांना मायेतून मुक्ती आणि साधनेसाठी बळ देण्यासाठी सूक्ष्मातून विराट विश्वरूप प्रगट केले होते.

२. वर्ष २०२५ मध्ये गोवा येथे झालेल्या ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’मध्ये साधकांना आपत्काळ सहन करण्याची शक्ती देण्यासाठी त्यांचे सूक्ष्म रूप ‘वटपत्राशयी विष्णु (वडाच्या झाडाच्या पानावर झोपलेले भगवान श्रीविष्णूचे बाळरूप)’, असे होते.

३ आ. देहलीतील शंखनाद महोत्सवातील तिन्ही गुरूंची सूक्ष्म रूपे हे गुरु-शिष्य एकरूपतेचे प्रतीक असणे : देहलीतील शंखनाद महोत्सवात सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे सूक्ष्म रूप योगनिद्रेत असलेल्या शेषशायी विष्णूसारखे होते, तर श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांचे सूक्ष्म रूप योगनिद्रेत असलेल्या शेषशायी विष्णूची सेवा करणार्‍या भूदेवी अन् श्रीदेवी यांप्रमाणे होते. मुख्य देवतेसह असणार्‍या देवी या त्या देवतेच्या प्रगट शक्तीचे प्रतीक असतात. प्रत्यक्षात देवता आणि तिची शक्ती यांमध्ये एकरूपता असते. त्याचप्रमाणे गुरूंशी अंतर्मनातून एकरूप झालेले आणि त्यांचा वारसा पुढे चालवणारे शिष्य हे गुरूंची प्रगट शक्ती असतात. त्यामुळे ‘सूक्ष्मातून योगनिद्रेत असलेल्या शेषशायी विष्णूच्या ठिकाणी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले आणि भूदेवी अन् श्रीदेवी यांच्या ठिकाणी अनुक्रमे श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांचे दर्शन होणे’, हे गुरु अन् शिष्य यांच्यातील एकरूपता दाखवते.

३ इ. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांची योगनिद्रा, म्हणजे धर्मराज्य-स्थापनेसाठी स्थूल अस्तित्वाच्या पलीकडे जाऊन केवळ सूक्ष्म अस्तित्वाने कार्य करण्याचा त्यांचा टप्पा असणे : पूर्वी धर्मसंस्थापनेचे कार्य यशस्वी करण्यासाठी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले स्थूल आणि सूक्ष्म, अशा दोन्ही स्तरांवर कार्य करत होते; म्हणून कार्यक्रमात त्यांची स्थूल उपस्थिती आवश्यक होती; परंतु काळाची प्रतिकूलता वाढल्याने देहलीतील या महोत्सवात त्यांना सूक्ष्म स्तरावर कार्य करणे आवश्यक होते. त्यामुळे महोत्सवाच्या सिद्धतेला आरंभ झाल्यापासूनच सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांच्या निद्रेत (योगनिद्रेत) वाढ झाली होती. ही निद्रा साधारण झोप नसून ती समष्टी कार्यासाठी आध्यात्मिक बळ प्रदान करणारी ‘योगनिद्रा’ होती.

ज्याप्रमाणे भगवान श्रीविष्णु योगनिद्रेत असला, तरी त्याच्याच अस्तित्वाने संपूर्ण सृष्टीचे संचालन होते, त्याप्रमाणे गुरुदेव गोवा येथील सनातनच्या आश्रमात स्थूल शरिराने निद्रेत असले, तरी त्यांच्या सूक्ष्म अस्तित्वाने देहलीतील महोत्सवाचे आध्यात्मिक संचालन होत होते. तसेच ज्याप्रमाणे भगवान विष्णु योगनिद्रेत असला, तरी भूदेवी आणि श्रीदेवी यांचे कार्य अविरत चालू रहाते, त्याप्रमाणे स्थुलातून श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ अन् श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ देहली येथील शंखनाद महोत्सव यशस्वी होण्यासाठी अविरत कार्यरत होत्या. यांतून ‘गुरुतत्त्व स्थूल स्तरावर श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्ति (सौ.) गाडगीळ यांच्या माध्यमातून, तर सूक्ष्म स्तरावर सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या माध्यमातून धर्मसंस्थापनेचे कार्य करत आहे’, हे स्पष्ट होते.

३ ई. स्थूल अस्तित्वाच्या पलीकडे जाऊन केवळ सूक्ष्म अस्तित्वाने कार्य करण्याचा गुरुदेवांचा हिंदु राष्ट्र-स्थापनेच्या कार्यातील एक महत्त्वाचा टप्पा : गुरुदेव स्थुलातून उपस्थित नसतांनाही त्यांच्या सूक्ष्म कार्याची अनुभूती देहलीतील शंखनाद महोत्सवात येत होती. हे धर्मराज्य-स्थापनेसाठी स्थूल अस्तित्वाच्या पलीकडे जाऊन केवळ सूक्ष्म अस्तित्वाने कार्य करण्याचा त्यांचा नवा टप्पा दर्शवते. थोडक्यात, सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले, श्रीसत्‌शक्ति (सौ.) सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्ति (सौ.) गाडगीळ यांनी आध्यात्मिक एकरूपतेने स्थूल-सूक्ष्म कार्यांचे दायित्व सांभाळल्याने हा महोत्सव यशस्वी झाला. हा प्रसंग गुरु-शिष्य यांच्या एकरूपतेमुळे होणार्‍या हिंदु राष्ट्र-स्थापनेच्या कार्यातील एक महत्त्वाचा टप्पा दर्शवतो.’

(क्रमशः)

– श्री. निषाद देशमुख (सूक्ष्मातून प्राप्त झालेले ज्ञान) (आध्यात्मिक पातळी ६३ टक्के), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (ज्ञान मिळण्याचा दिनांक १३ आणि १४ डिसेंबर २०२५)

भाग ३ वाचण्यासाठी क्लिक करा → https://sanatanprabhat.org/marathi/1005011.html

  • वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषिमुनींच्या यज्ञांत राक्षसांनी विघ्ने आणल्याच्या अनेक कथा वेद-पुराणांत आहेत. ‘अथर्ववेदात अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच तसेच करणी, भानामती यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत.
  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केेलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • सूक्ष्मातील दिसणे, ऐकू येणे इत्यादी (पंच सूक्ष्मज्ञानेंद्रियांनी ज्ञानप्राप्ती होणे) : काही साधकांची अंतर्दृष्टी जागृत होते, म्हणजे त्यांना डोळ्यांना न दिसणारे दिसते, तर काही जणांना सूक्ष्मातील नाद किंवा शब्द ऐकू येतात.
  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या काही वेळा अनिष्ट शक्तींमुळे किंवा ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांना आलेल्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सर्वांनाच येतील, असे नाही. – संपादक