आज छत्रपती संभाजी महाराज यांची तिथीनुसार जयंती आहे. त्या निमित्ताने...
‘भारतात हिंदु धर्मरक्षणार्थ अनेक विरांनी स्वतःच्या प्राणाची आहुती दिली आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांचे ज्येष्ठ पुत्र छत्रपती संभाजी महाराज या धर्मविरांच्या माळेतील एक अनमोल मोती आहेत. त्यांचा जन्म १४ मे १६५७ या दिवशी माता सईबाईंच्या पोटी झाला. ३ एप्रिल १६८० या दिवशी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या देहावसनानंतर छत्रपती संभाजी महाराजांनी हिंदवी साम्राज्याचा राज्यकारभार सांभाळला.

१. संस्कृत आणि मराठी भाषांचा अभ्यास करणारे अन् काव्य रचनाकार
छत्रपती संभाजी महाराज यांनी संस्कृत आणि मराठी या भाषांचा अभ्यास केला अन् काव्यरचनाही केल्या. कवी कलश त्यांचे जीवलग मित्र होते आणि ते सदैव त्यांच्यासमवेत रहात होते.

२. छत्रपती संभाजी महाराज यांनी औरंगजेबाला हुलकावण्या देणे
छत्रपती शिवाजी महाराज यांच्याकडून पराभूत आणि अपमानित झालेला औरंगजेब फणा ठेचलेल्या नागासारखा सूडबुद्धीने हिंदवी स्वराज्य चिरडून काढण्याच्या संधीची वाट पहात होता. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या देहावसनानंतर औरंगजेबाची मराठ्यांविषयीची भीती न्यून झाली; परंतु छत्रपती संभाजी महाराज यांनी वीर मराठा सैनिकांच्या बळावर औरंगजेबाला नेहमी हुलकावण्या दिल्या. कधी त्यांचे पारडे जड व्हायचे, तर कधी औरंगजेबाचे.
३. फितुरीमुळे छत्रपती संभाजी महाराज आणि कवी कलश मोगलांच्या हाती सापडणे
राजघराण्यातील अंतर्गत चालणार्या राजकारणामुळे छत्रपती संभाजी महाराज दुःखी असायचे. जेव्हा ते ५०० मावळ्यांसह संगमेश्वरमध्ये थांबले होते, तेव्हा फितुरांनी दिलेल्या बातमीमुळे मोगल सेनापती मुकर्रब खानाने ३ सहस्र सैनिकांसह छत्रपती संभाजी महाराज यांना घेरले. छत्रपती संभाजी महाराज मोगलांशी युद्ध करत राहिले. शेवटी छत्रपती संभाजी महाराज आणि त्यांचे मित्र कवी कलश मोगलांच्या हातात सापडले. औरंगजेबाला याविषयी कळल्यावर त्याला पुष्कळ आनंद झाला. त्याने छत्रपती संभाजी महाराज यांचा घोर अपमान करून स्वतःसमोर उपस्थित करण्यास सांगितले.
४. छत्रपती संभाजी महाराज यांनी औरंगजेबाचा धुडकावलेला प्रस्ताव आणि त्याने शंभूराजांचा केलेला छळ

छत्रपती संभाजी महाराज आणि कवी कलश यांना औरंगजेबाच्या समोर आणण्यात आले. औरंगजेब त्यांचे मनोबल तोडून हिंदु शक्तीला कायमस्वरूपी चिरडून टाकू इच्छित होता; म्हणून त्याने छत्रपती संभाजी महाराज यांना म्हटले, ‘जर तू मुसलमान झालास, तर तुझे राज्य परत देईन आणि तेथून कसलाही कर वसूल केला जाणार नाही’; परंतु छत्रपती संभाजी महाराज यांनी ‘सिंह कोल्ह्याने उष्टी केलेली शिकार कधीही खात नसतो. मी हिंदु आहे आणि हिंदु म्हणूनच मरणार’, असे म्हणत औरंगजेबाचा प्रस्ताव ठोकरला. ते ऐकून औरंगजेबाच्या अंगाची लाही लाही झाली आणि त्याने सूडबुद्धीने त्यांचे हाल करण्यास आरंभ केला. त्यांच्या शरिरावर २०० किलो वजनाचे साखळदंड बांधून त्यांना पायी चालवले.
छत्रपती संभाजी महाराज यांना काही दिवस अन्नपाण्याविना ठेवण्यात आले. त्यांच्या अंगावर साखळदंड घासून झालेल्या जखमांवर तिखट-मिठाचे पाणी टाकले. त्यांच्या शरिराला गरम चिमट्यांनी डागण्या दिल्या. त्यांच्या डोळ्यांत गरम सळया घुसवून आंधळे करण्यात आले; परंतु त्या सिंह पुरुषाच्या मुखातून किंकाळीही बाहेर पडली नाही. एवढे होऊनही छत्रपती संभाजी महाराज यांनी औरंगजेबाच्या कोणत्याही अटी मान्य केल्या नाहीत. त्यामुळे चिडलेल्या औरंगजेबाने त्यांना ११ मार्च १६८९ (फाल्गुन कृष्ण अमावास्या) या दिवशी ठार करण्याचे निश्चित केले. दुसर्या दिवशी चैत्र प्रतिपदा, म्हणजे हिंदूंचा गुढीपाडव्याचा सण होता.
५. छत्रपती संभाजी महाराजांचे शिर कापून त्याचा मोगल सैन्याने केलेला अपमान
११.३.१६८९ या दिवशी छत्रपती संभाजी महाराज आणि कवी कलश या दोघांना मोकळ्या जागेत आणण्यात आले. छत्रपती संभाजी महाराज यांच्या आधी त्यांचे मित्र कवी कलश यांची जीभ कापली आणि नंतर त्याचे शिर कापण्यात आले. त्यानंतर छत्रपती संभाजी महाराज यांचे हात-पाय तोडण्यात आले आणि शेवटी त्यांचे शिर धडापासून वेगळे करण्यात आले. मोगल सैनिक छत्रपती संभाजी महाराज यांचे शिर भाल्याच्या टोकावर ठेवून नाचू लागले. त्यांनी छत्रपती संभाजी महाराज यांच्या शिराचा पुष्कळ अपमान करून कचर्यात टाकले. दुसर्या दिवशी खंडोबल्लाळ आणि इतर काही वीर मराठे सैनिक यांनी वेश पालटून छत्रपती संभाजी महाराज यांचे शिर अन् त्यांच्या शरिराचे अवयव गोळा करून त्यांच्यावर यथोचित अंत्यसंस्कार विधी केले.
६. छत्रपती संभाजी महाराज यांनी स्वतःच्या बलीदानाने धर्मजागृती करणे
छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वतःच्या वीरस्फूर्तीने हिंदूंमध्ये जागृती केली होती. त्याचप्रमाणे छत्रपती संभाजी महाराज यांनी स्वतःच्या बलीदानाने ती जागृती आणखी वाढवली. छत्रपती संभाजी महाराज यांच्यानंतर त्यांचे धाकटे भाऊ छत्रपती राजाराम यांनी हिंदवी साम्राज्याची धुरा सांभाळली आणि त्यांच्या नेतृत्वाखाली औरंगजेबाविरुद्धचा संघर्ष नव्या उर्मीने आणखीनच तीव्र होत गेला.’
– डॉ. श्रीलाल, संपादक, मासिक ‘गीता स्वाध्याय’
(साभार : मासिक ‘गीता स्वाध्याय’)
लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणात पीडित धर्मांध मुलांना प्रत्येकी १० लाख रुपये हानीभरपाई देण्याचा मद्रास उच्च न्यायालयाचा आदेश !
‘श्री समर्थ रामदास – एक अभ्यास’ ग्रंथ : अभ्यासपूर्ण मननीय, चिंतनीय आणि संदर्भ ग्रंथ
सिनेमा आणि स्वतःची स्वप्ने : यशाविषयी सिनेमा काय प्रकट करतो ?
श्री शिवराज्याभिषेक आणि खोटे कथानक (नॅरेटिव्ह) !
२६ जून : छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती (तिथीनुसार)
‘सनातन क्रांती’ची नांदी !