मनुष्याचे शरीर, मन, चित्त आणि बुद्धी यांच्यावर प्रारब्धाचा असलेला प्रभाव अन् त्यांचा ग्रहांशी असलेला संबंध !

‘मनुष्याचे शरीर, चित्त, मन आणि बुद्धी हे घटक त्याची कार्य करण्याची विविध माध्यमे आहेत. प्रत्येक घटकाचे स्वरूप निराळे असून त्यांवरील प्रारब्धाचा प्रभाव निरनिराळ्या प्रमाणांत असतो. प्रस्तुत लेखात या घटकांवर प्रारब्धाचा असलेला प्रभाव आणि त्यांचा ग्रहांशी असलेला संबंध, यांचे विवेचन केले आहे. २५ जून या दिवशी प्रसिद्ध झालेल्या लेखात आपण ‘प्रारब्ध म्हणजे काय ?’ यासह ‘मनुष्याच्या अस्तित्वाच्या विविध घटकांवर प्रारब्धाचा असलेला प्रभाव आणि त्यांचा ग्रहांशी असलेला संबंध’, याविषयीची काही सूत्रे वाचली. आज या लेखाचा अंतिम भाग येथे देत आहोत.             

(उत्तरार्ध)

या लेखाचा पूर्वार्ध वाचण्यासाठी येथे क्लिक करा. https://sanatanprabhat.org/marathi/1054733.html

शरीर, मन, चित्त आणि बुद्धी ही आत्म्याची सगुणात व्यक्त होण्याची माध्यमे आहेत.

२ इ. मन (बाह्यमन)

श्री. राज कर्वे

‘योग्य-अयोग्य विचार येणे, भूतकाळाचे स्मरण आणि भविष्याची कल्पना करणे, भावना व्यक्त करणे, इंद्रियजन्य अनुभव घेणे इत्यादी मनाची कार्ये आहे. मन (बाह्यमन) हे बाह्य जगातील परिस्थिती आणि जिवाची आंतरिक स्थिती यांच्यात होणार्‍या देवाण-घेवाणाचे मध्यवर्ती क्षेत्र आहे. चित्तामध्ये (अंतर्मनामध्ये) असणार्‍या संस्कारांना अनुसरून मन (बाह्यमन) परिस्थितीला प्रतिसाद देते, उदा. धनाचा विषय निघाल्यावर व्यक्तीच्या चित्तात धनासंबंधी जे संस्कार असतात, ते इच्छा, भावना आणि विचार यांच्या रूपात व्यक्त होतात. थोडक्यात, चित्तातील सुप्त संस्कारांना भावना, विचार, प्रतिक्रिया आदींच्या रूपात व्यक्त करण्याचे मन हे एक जागृत माध्यम आहे. मन (बाह्यमन) हे विचार आणि कल्पना करू शकते; परंतु चित्त (अंतर्मन) तसे करू शकत नाही. मनाचे विचार, कल्पना इत्यादींना आपण नियंत्रित करू शकतो; पण चित्तातील वासना, आवडी-निवडी, स्वभाववैशिष्ट्ये आदी संस्कारांच्या केंद्रांना नियंत्रित करू शकत नाही. त्यामुळे मनापेक्षा चित्तावर प्रारब्धाचा प्रभाव अधिक असतो.

२ इ १. मन आणि ग्रह यांचा संबंध : ज्योतिषशास्त्रानुसार ‘चंद्र’ हा मनाचा कारक आहे. कुंडलीत चंद्र शुभ स्थितीत असल्यास व्यक्तीचे मनोबल चांगले असते. व्यक्ती सकारात्मक, स्थिर आणि आशावादी राहून परिस्थिती हाताळते. याउलट, चंद्र अशुभ स्थितीत असल्यास व्यक्ती नकारात्मकता, चिंता, भय आदींनी ग्रस्त होते. चंद्राच्या अन्य ग्रहांशी असलेल्या योगांवरून ‘व्यक्तीचे मन परिस्थितीला कशा प्रकारे प्रतिसाद देईल’, हे लक्षात येते. ते पुढील सारणीत दिले आह

२ ई. बुद्धी

बुद्धी ही सत्याचा बोध होण्याचे माध्यम आहे. मन हे इंद्रियजन्य अनुभव ग्रहण करते, तर बुद्धी त्यातील अर्थ, तत्त्व आणि सत्य शोधते. ‘सामान्यबुद्धी’ ही तर्क, चिंतन, विश्लेषण, मूल्यमापन आदींद्वारे सत्याला जाणते, तर ‘अंतर्ज्ञान बुद्धी’ला सत्याचे प्रत्यक्ष दर्शन होते. बुद्धी जेवढी सात्त्विक आणि सूक्ष्म होईल, तेवढे सत्यज्ञान होण्याचे प्रमाण वाढते. बुद्धी म्हणजे ज्ञानशक्ती असल्यामुळे केवळ तिच्यामध्ये योग्य-अयोग्य यांचा विचार करून निर्णय घेण्याची क्षमता असते. थोडक्यात चित्तातील आवेगांच्या अधीन न जाता जागरूक राहून कर्म करण्यात बुद्धी महत्त्वाची भूमिका बजावते. बुद्धी, म्हणजे आत्म्याचा जिवापर्यंत (अहंपर्यंत) पोचणारा पुसटसा प्रकाश आहे. चित्तातील संस्कार जेवढे न्यून होतात, तेवढा अधिक स्वच्छ प्रकाश जिवापर्यंत पोचतो. शरीर, चित्त आणि मन यांच्या तुलनेत बुद्धी सात्त्विक असल्याने तिच्यावर प्रारब्धाचा प्रभाव अल्प असतो.

२ ई १. बुद्धी आणि ग्रह यांचा संबंध : ज्योतिषशास्त्रात ‘बुध’ आणि ‘रवि’ हे बुद्धीचे कारक आहेत. ‘त्या ग्रहांची कुंडलीतील स्थाने आणि राशी यांनुसार स्थिती कशी आहे ?’, यावरून बुद्धीची क्षमता लक्षात येते. ‘बुध’ आणि ‘रवि’ यांचे कोणत्या ग्रहांशी योग आहेत, यावरून बुद्धीचे स्वरूप कळते. ते पुढे दिले आहे.

२ उ. अहं

अहं म्हणजे स्वतःच्या स्वतंत्र अस्तित्वाची असलेली संकुचित जाणीव. ‘संकुचन करणे’ हा अहंचा गुणधर्म असल्याने अहंमुळे जिवाला विश्वाच्या समग्र अस्तित्वाचा मर्यादित अनुभव येतो, तसेच मर्यादित ज्ञान होते. अंतःकरण चतुष्ट्यात मन, बुद्धी, चित्त आणि अहं हे ४ घटक असतात; परंतु मन, बुद्धी आणि चित्त या सर्वांमध्ये अहं कार्यरत असतो. अहंचा संबंध विशिष्ट ग्रहांशी नाही; कारण प्रत्येक ग्रह अहंचे कोणते न् कोणते रूप दर्शवतो. त्यामुळे अहं आणि ग्रह यांचे निराळे विवेचन येथे केलेले नाही.

२ ऊ. आत्मा

बुद्धी ही ज्ञान होण्याचे माध्यम आहे, तर आत्मा हा ज्ञानाचा स्रोत आहे. आत्मा हा शाश्वत, चैतन्यमय, ज्ञानमय, आनंदमय आणि त्रिगुणातीत आहे. त्यामुळे आत्म्याला प्रारब्ध शिवत नाही. तो सर्व ग्रहांच्या पलीकडे आहे. तो मायेच्या अधीन नसून माया त्याच्या अधीन आहे. आत्म्यावर मायेने आवरण घातलेले नाही, तर सगुणात व्यक्त होण्यासाठी आणि विविध प्रकारचे अनुभव घेण्यासाठी आत्म्याने स्वतःहून मायेला धारण केले आहे.

३. जिवाच्या विविध घटकांवरील प्रारब्धाचा प्रभाव दर्शवणारी सारणी

वरील सारणीवरून लक्षात येते की, आपले अस्तित्व परस्परविरोधी घटकांनी युक्त आहे. एकीकडे चैतन्यमय आत्मा, तर दुसरीकडे जड शरीर आहे. एकीकडे अचेतन मन (चित्त), तर दुसरीकडे सजग बुद्धी आहे. त्यामुळे ‘मनुष्य प्रारब्धाधीन आहे का ?’, या प्रश्नाचे उत्तर ‘हो’ किंवा ‘नाही’ असे सरळ नसून स्तरबद्ध (layered) आहे. शरीर, चित्त, मन आणि बुद्धी या घटकांवरील प्रारब्धाचा प्रभाव उत्तरोत्तर न्यून होत जातो, तसेच ते घटक उत्तरोत्तर सजग (conscious) होत जातात. सजगता (जाणीव) जेवढी अधिक, तेवढा प्रारब्धाचा प्रभाव न्यून असतो.

४. मनुष्य प्रारब्धावर मात करू शकतो का ?

‘मनुष्य प्रारब्धावर मात करू शकतो का ?’, या प्रश्नाचे उत्तरही ‘हो’ किंवा ‘नाही’ असे सरळ नसून गुंतागुंतीचे आहे. ज्या गोष्टी मनुष्याच्या हातात नाही, त्यांत तो पालट करू शकत नाही, उदा. शारीरिक स्थिती, कौटुंबिक परिस्थिती, सामाजिक परिस्थिती, जीवनात घडणारे अनपेक्षित प्रसंग इत्यादी; परंतु घडणार्‍या परिस्थितीला किंवा प्रसंगांना आपण देत असलेला प्रतिसाद, स्वतःचा असलेला दृष्टीकोन, आपण घेत असलेले निर्णय आणि करत असलेले कर्म यांमध्ये पालट अन् सुधारणा करता येते. बाह्य परिस्थितीला नियंत्रित करणे आपल्या आवाक्यातील नाही; परंतु आंतरिक स्थितीमध्ये परिर्वतन घडवून आणणे प्रयत्नांद्वारे शक्य आहे. याखेरीज ‘प्रारब्धावर मात करणे,’ हे आपले ध्येय नाही, तर ‘अहं न्यून करून ईश्वराच्या जवळ जाणे’ हेच ध्येय आहे !

५. साधनेमुळे अहं न्यून होऊन ईश्वराच्या सच्चिदानंद स्वरूपाची अनुभूती येणे

स्वतःच्या आंतरिक स्थितीमध्ये परिर्वतन घडवून आणणे, हे केवळ आपल्या साधनेद्वारे शक्य आहे. साधनारत व्यक्ती ही चित्तातील इच्छा, कामना, वृत्ती, स्वभावदोष आदींच्या अधीन न होण्यासाठी, तसेच ईश्वराच्या अधिकाधिक जवळ जाण्यासाठी प्रयत्न करत असते. ती आत्मकेंद्रितता त्यागून व्यापक होण्यासाठी प्रयत्नशील असते. या प्रक्रियेमुळे तिच्यावरील संस्कार आणि अहं न्यून होतात. अहं न्यून झाल्यामुळे व्यक्तीचे जाणीवक्षेत्र वाढते अन् तिला ईश्वराच्या सत्य, चैतन्य, ज्ञान, प्रीती आणि व्यापकता या स्वरूपांची अनुभूती येते.’

– श्री. राज कर्वे, ज्योतिष विशारद, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा. (२१.५.२०२६)