‘१३ ते १५ डिसेंबर २०२५ या कालावधीत देहली (इंद्रप्रस्थ) येथे ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सव’ झाला. ४ फेब्रुवारी या दिवशीच्या लेखातून आपण या महोत्सवाची आध्यात्मिक वैशिष्ट्ये आणि सनातनच्या तिन्ही गुरूंच्या माध्यमातून गुरुतत्त्वाने स्थूल आणि सूक्ष्म या दोन्ही स्तरांवर कार्य करणे ही सूत्रे पाहिली. आज साधक आणि संत यांचा शरणागतभाव, तसेच आध्यात्मिक उत्तराधिकार्यांची द्वैत-अद्वैत स्थिती यांचा परिणाम याविषयी जाणून घेऊया.
(भाग ३)
टीप – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या आध्यात्मिक उत्तराधिकारी : श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ
भाग २ वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/1004662.html
४. देहली येथील ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’तील साधक आणि संत यांच्या शरणागतभावामुळे सूक्ष्मातून ‘कृष्णविवर’ कार्यरत झाल्याने कार्यक्रमस्थळाचे सूक्ष्मातील युद्धात रक्षण होणे
‘पूर्वी समाजात सात्त्विकतेचे प्रक्षेपण करणार्या सनातन संस्थेने आयोजित केलेल्या विविध कार्यक्रमांच्या वेळी ‘साधकांना आजारी पाडणे, त्यांचा अपघात घडवून आणणे, तांत्रिक अडचणी निर्माण करणे’ इत्यादी विविध माध्यमांतून वाईट शक्ती कार्यक्रमांत अडथळे आणत असत.
गोवा येथील ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’च्या वेळीही मोठ्या वाईट शक्तींनी कार्यक्रमस्थळावर सूक्ष्मातून तीव्र आक्रमणे करून त्रास देण्याचा प्रयत्न केला. याउलट देहली येथील ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’त सहभागी झालेले साधक आणि संत यांच्या शरणागतभावामुळे सूक्ष्मातून ‘कृष्णविवर (Black Hole (टीप))’ कार्यरत झाले होते. कार्यक्रमाच्या वेळी वाईट शक्तींनी निर्माण केलेल्या त्रासदायक शक्तीच्या दाबाचे प्रमाण ४० टक्क्यांहून अधिक झाल्यावर हे कृष्णविवर वायूमंडलातील निर्गुण-सगुण स्तरावरील त्रासदायक शक्ती खेचून घेत होते. त्यामुळे कार्यक्रमस्थळाची शुद्धी होत होती. तसेच सगुण-निर्गुण स्तरावरील त्रासदायक शक्तीत वाढ झाल्यावर कृष्ण विवराच्या ठिकाणी जिव्हा बाहेर काढलेले देवी कालीमातेचे मुख प्रगट होत असे. देवीचे ते मुख सर्व काळी शक्ती ओढून घेत असे. त्यामुळे मोठ्या वाईट शक्तींना कोणत्याही प्रकारची काळी शक्ती वायूमंडलात दीर्घकाळ प्रक्षेपित करणे शक्य झाले नाही.
टीप – कृष्णविवर : अवकाशातील या जागी प्रचंड वस्तुमान एका अतिसूक्ष्म बिंदूत एकवटलेले असते. त्या ठिकाणी गुरुत्वाकर्षण इतके प्रचंड असते की, त्यातून प्रकाशही बाहेर पडू शकत नाही. त्यामुळे ते ठिकाण काळ्या रंगाचे दिसते.
भगवंताच्या कृपेने साधक आणि कार्यक्रमस्थळ यांवर आक्रमण करणे वाईट शक्तींना शक्य झाले नाही; म्हणून त्यांनी अन्य मार्गांनी त्रास देण्याचे षड्यंत्र रचले; पण तेही यशस्वी झाले नाही. अशा प्रकारे सूक्ष्मातील युद्धात कार्यक्रमस्थळाचे रक्षण झाले.

५. श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांच्या ‘द्वैत-अद्वैत’, या आध्यात्मिक स्थितीमुळे कार्यक्रम आध्यात्मिक स्तरावर होणे
‘मनाची एकाग्रता’, ‘बुद्धीची सतर्कता’, ‘गुणग्राहकता’, ‘शरणागती’ आणि ‘भावस्थितीतील अनुसंधान’, या सर्व स्थितींचे एकत्रीकरण, म्हणजे संतांची द्वैत-अद्वैत अवस्था. समष्टी संत जेवढा काळ ‘द्वैत-अद्वैत’ या आध्यात्मिक स्थितीत रहातात, तेवढा तिचा लाभ समष्टीला होतो; कारण या स्थितीत समष्टी संत समाजाला काळानुसार आवश्यक ते ज्ञान, भक्ती आणि कर्म यांची शिकवण देऊन त्यांच्यात पालट घडवणारे माध्यम होतात, उदा. आद्य शंकराचार्य, समर्थ रामदासस्वामी, महर्षि अरविंद, सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले इत्यादी.
देहली येथील ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’त श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांच्याकडून पुढीलप्रमाणे कार्य होत होते.
अ. त्या दोघी या महोत्सवात समष्टी कार्य करण्यासाठी पूर्णवेळ द्वैत-अद्वैत या अवस्थेत होत्या. यामुळे त्या स्थुलातील कृतींच्या संदर्भात साधकांना योग्य मार्गदर्शन करत होत्या.
आ. शरणागतभावरूपी अनुसंधानातून त्या विश्वमन आणि विश्वबुद्धी यांच्याशी एकरूपता साध्य करत होत्या. त्यामुळे त्यांच्याकडून काळानुसार आवश्यक अशी तारक किंवा मारक शक्ती प्रक्षेपित होत होती.
इ. श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) गाडगीळ व्यासपिठावर असतांना त्यांच्याकडून प्रगट शक्ती प्रक्षेपित होऊन कार्य होत होते, तर त्या श्रोत्यांमध्ये बसलेल्या असतांना त्या दोघींकडून प्रगट-अप्रगट शक्ती प्रक्षेपित होत होती. त्यामुळे स्थूल आणि सूक्ष्म, अशा दोन्ही स्तरांवर कार्य होत असल्याने कार्यक्रम आध्यात्मिक स्तरावर होत होता.
‘श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) गाडगीळ यांनी द्वैत-अद्वैत स्थितीत राहून अशा प्रकारे समष्टी कार्य करणे’, हे सनातन राष्ट्र-स्थापनेसाठी होत असलेल्या त्यांच्या ऊर्ध्वगामी कार्याचे प्रतीक आहे.
६. साधकांनी परिस्थिती स्वीकारून कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी प्रयत्न केल्याने त्यांची साधना होणे

कधी ईश्वरेच्छेने, तर कधी वाईट शक्ती देत असलेल्या त्रासामुळे कार्यक्रमाच्या रूपरेषेत सतत पालट होत होते. या स्थितीतही साधकांनी चिडून किंवा कंटाळून प्रयत्न सोडून न देता परिस्थिती स्वीकारून कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी तळमळीने आणि चिकाटीने प्रयत्न केले. त्यामुळे त्यांना गुरुतत्त्वाची कृपा स्थूल आणि सूक्ष्म, या दोन्ही स्तरांवर अनुभवायला मिळाली. साधकांनी परिस्थिती स्वीकारल्याने त्यांचा मानसिक संघर्ष न्यून होऊन त्यांना कार्यक्रमाची अनुभूती आध्यात्मिक स्तरावर घेता आली. अशा प्रकारे कार्यक्रमात दायित्व घेऊन सहभाग घेतल्याने, तसेच परिस्थिती स्वीकारल्याने साधकांचा अहंभाव न्यून झाला. या कठोर साधनेमुळे त्यांच्या संचिताचे प्रमाण न्यून झाले, तर या एका महोत्सवाच्या माध्यमातून अनेक साधकांना २ वर्षे साधना करून मिळणारी आध्यात्मिक ऊर्जा प्राप्त झाली.
७. समारोपाच्या वेळी युवकांनी ‘छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेला अफजलखानाचा वध’, याविषयीची नाटिका सादर केल्याने सर्वत्रच्या हिंदूंना कर्मज्ञानाचा संदेश मिळणे
महोत्सवाच्या समारोपाच्या सत्रात स्वरक्षण प्रशिक्षणाचे प्रात्यक्षिक करणार्या युवकांनी ‘आतंकवाद असा संपवला जातो !’, हा संदेश देण्यासाठी एक छोटीशी नाटिका प्रस्तुत केली. या नाटिकेत ‘छत्रपती शिवाजी महाराजांनी क्रूरकर्मा अफजलखानाचा वध कसा केला ?’, ते दाखवण्यात आले. ही नाटिका दुपारच्या सत्रात नियोजित होती; पण काही अडचणीमुळे या नाटिकेचे प्रस्तुतीकरण महोत्सवाच्या शेवटी करण्यात आले. या नाटिकेचे सादरीकरण चालू असतांना सभागृहात उपस्थित सर्वच लोक एकदम भारावून गेले. त्यांच्यातील धर्मप्रेमाची भावना उत्कट झाली, तर काहींची भावजागृती झाली.
भक्तीयोगानुसार कोणतीही कृती भगवंताच्या इच्छेविना होत नाही. महोत्सवाच्या शेवटी या नाटिकेचे प्रस्तुतीकरण झाल्याने त्याद्वारे भगवंताने सर्वत्रच्या हिंदूंना ‘छत्रपती शिवाजी महाराजांप्रमाणे ईश्वरी अधिष्ठान ठेवून आणि शक्य तेवढा संघर्ष करून हिंदु राष्ट्र-स्थापनेत सहभागी व्हावे’, असा कर्मज्ञानाचा संदेशच दिला आहे. त्यामुळे ही नाटिका प्रस्तुत होत असतांना ईश्वरी शक्तीचे प्रमाण ८० टक्क्यांहून अधिक होऊन अनेक जणांची भावजागृती होत होती.
८. कृतज्ञता
ज्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याच्या स्थापनेसाठी केलेली लहान-मोठी युद्धे महत्त्वाची होती, त्याप्रमाणे वर्तमानकाळात हिंदु राष्ट्राच्या (रामराज्याच्या) स्थापनेसाठी होत असलेले विविध कार्यक्रम महत्त्वाचे आहेत. ‘सत्ताप्राप्तीसाठी नव्हे, तर आपली साधना म्हणून सनातन धर्मप्रेमी आणि साधक यांच्याकडून हिंदु राष्ट्र-स्थापनेसंबंधी कार्यक्रम आयोजित करण्याच्या माध्यमातून सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले साधकांचे देवाण-घेवाण संपवत आहेत, तसेच साधकांना स्थुलासह सूक्ष्मातील युद्धातही सहभागी करून घेऊन त्यांची आध्यात्मिक उन्नती करून घेत आहेत’, याबद्दल त्यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता !’
(समाप्त)
– श्री. निषाद देशमुख (सूक्ष्मातून प्राप्त झालेले ज्ञान) (आध्यात्मिक पातळी ६३ टक्के), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (ज्ञान मिळण्याचा दिनांक : १३ आणि १४ डिसेंबर २०२५, एकूण कालावधी अडीच मिनिटे; ज्ञानाच्या टंकलेखनाचा दिनांक १५.१२.२०२५)
|

उन्हाळा इतका तीव्र का होत आहे ? विदेशी झाडे का नको ?
परीक्षांमधील प्रश्नपत्रिका फुटण्यामुळे विद्यार्थांच्या आणि समाजाच्या भवितव्याविषयी प्रश्नचिन्ह !
धर्म काटेकोर आचरण्याचे महत्त्व !
मिरज (जिल्हा सांगली) येथील सनातनच्या आश्रमातील सौ. शोभा पांडुरंग कौलकर (वय ६७ वर्षे) यांना सुचलेल्या प्रार्थना आणि कृतज्ञता !
देवाला नैवेद्य दाखवून स्वतःच खायचा ! काय अर्थ आहे मग त्या नैवेद्य दाखवण्याचा ?