देहली (इंद्रप्रस्थ) येथे झालेल्या ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’ची आध्यात्मिक वैशिष्ट्ये आणि महोत्सवातून मिळालेले आध्यात्मिक यश !

‘१३ ते १५ डिसेंबर २०२५ या कालावधीत देहली (इंद्रप्रस्थ) येथे ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सव’ झाला. या महोत्सवात ३ सहस्रांहून अधिक साधक, जिज्ञासू, हिंदुत्वनिष्ठ आणि हिंदु धर्मप्रेमी सहभागी झाले होते. या लेखातून आपण या महोत्सवाची आध्यात्मिक वैशिष्ट्ये आणि महोत्सवातून मिळालेले यश जाणून घेणार आहोत.

(भाग १)

१. राष्ट्र आणि धर्म यांसंबंधीच्या इतर कार्यक्रमांच्या तुलनेत ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’ची फलनिष्पत्ती ३० टक्के अधिक असणे  

समाजात राष्ट्र आणि धर्म यांसंबंधी आयोजित केल्या जाणार्‍या बर्‍याचशा सभा अन् कार्यक्रम प्राधान्याने मानसिक आणि बौद्धिक स्तरांवरील, तसेच संकुचित, म्हणजे ठराविक विचारसरणीचे अनुसरण करणारे असतात. अशा कार्यक्रमांत समाजाच्या समग्र कल्याणाचा, विशेषतः आध्यात्मिक कल्याणाचा विचार नसतो. त्यामुळे त्या कार्यक्रमांची फलनिष्पत्ती अल्प असते. याउलट सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या मार्गदर्शनानुसार देहली येथे आयोजित ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’चे आयोजन मानसिक आणि बौद्धिक यांसह आध्यात्मिक स्तरावरही होते. त्यामुळे त्याची फलनिष्पत्ती राष्ट्र आणि धर्म यांच्या संदर्भात आयोजित इतर कार्यक्रमांच्या तुलनेत ३० टक्के अधिक होती.

१ अ. राष्ट्र आणि धर्म यांसंबंधीचे इतर कार्यक्रम अन् ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सव’ यांच्या कार्याचा स्तर, परिणाम आणि फलनिष्पत्ती

२. देहली येथील ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’ची आध्यात्मिक वैशिष्ट्ये !

२ अ. समाजात आध्यात्मिक क्रांती करण्यासाठी कार्यक्रमातून निर्माण होणार्‍या आध्यात्मिक शक्तीचे सर्व दिशांना प्रक्षेपण होणे : समष्टी संतांच्या उपस्थितीत होणार्‍या कार्यक्रमातून ऊर्ध्व दिशेला (वर), खाली किंवा ठराविक दिशेकडे शक्तीचे प्रक्षेपण होत असते. या शक्तीच्या प्रक्षेपणाचे उद्देश ‘समष्टी प्रारब्ध न्यून करणे’, ‘उपस्थितांना आध्यात्मिक बळ आणि चैतन्य देणे’, ‘विशिष्ट देवतांच्या शक्ती आकर्षित करणे’, ‘वाईट शक्तींमुळे निर्माण झालेले समष्टी त्रास न्यून करणे’ इत्यादी सूक्ष्म स्तरावरील असतात. एखाद्या दिशेला वाईट शक्तींचा दाब असल्यास तो नष्ट करण्यासाठी कार्यक्रमातून निर्माण होणारी शक्ती त्या दिशेकडे अधिक प्रमाणात प्रक्षेपित होते.

देहली येथील ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’त आध्यात्मिक शक्तीचे सगुण-निर्गुण स्तरावर प्रगटीकरण होत होते आणि समाजात आध्यात्मिक क्रांती करण्यासाठी तिचे सर्व दिशांना प्रक्षेपण होत होते. कार्यक्रमस्थळाच्या भोवती सूक्ष्मातून सुदर्शनचक्रासारखे शक्तीवलय निर्माण होऊन त्यातून दशदिशांना आध्यात्मिक शक्ती प्रक्षेपित होत होती. त्यामुळे महोत्सवातून अधिक फलनिष्पत्ती मिळाली.

श्री. निषाद देशमुख

२ आ. संतांच्या सूक्ष्म आणि स्थूल अस्तित्वामुळे कार्यक्रमातील कोणत्याही सत्रात ४० टक्क्यांहून अधिक आध्यात्मिक दाब न जाणवणे : राष्ट्र आणि धर्म या विषयांवरील कार्यक्रमांतून समाजात जागृती होत असते. त्यामुळे अशा कार्यक्रमांत वाईट शक्ती पुष्कळ दाब निर्माण करतात. सर्वसाधारणतः राष्ट्र आणि धर्म यांसंबंधीच्या कार्यक्रमांत दाबाचे प्रमाण ६० टक्क्यांहून अधिक असते. त्यामुळे लोकांना ‘विषयाचे आकलन न होणे, कंटाळा येणे, विषयाच्या संदर्भात मनात नकारात्मक विचार येणे’ इत्यादी त्रास होतात. याउलट देहली येथील ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवात सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे सूक्ष्मातील अस्तित्व, तर श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ, श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ, सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे, सद्गुरु नीलेश सिंगबाळ, पू. प्रदीप खेमका, पू. संजीव कुमार आणि अन्य संत यांची स्थुलातून वंदनीय उपस्थिती होती, तसेच महोत्सवात सेवा करणार्‍या साधकांचा समष्टी भाव ४० टक्क्यांहून अधिक होता. त्यामुळे कार्यक्रमातील कोणत्याही सत्रात आध्यात्मिक दाब ४० टक्क्यांहून अधिक नव्हता.

२ इ. महोत्सवाच्या कार्यात सनातन धर्मप्रेमींनी विविध माध्यमांतून सहभाग घेतल्याने त्यांची साधना होणे आणि त्याचा समष्टीवर परिणाम होणे ! : कोणत्याही कार्यक्रमात जेव्हा समष्टीचा सहभाग असतो, तेव्हा तिच्या मनात त्या कार्यक्रमाविषयीचे विचार असतात. राष्ट्र आणि धर्म यांच्या संदर्भातील कार्यक्रमाच्या आयोजनात काही प्रमाणात साधना करणारे लोक असतील, तर त्यांच्या मनातील सात्त्विक विचारांशी आयोजनातील इतर लोक एकरूप होतात. त्यामुळे साधना करत नसलेल्या इतर लोकांच्या मनावरही सात्त्विकतेचे संस्कार होऊन त्यांची भावनिकता न्यून होते आणि त्यांच्यात काही प्रमाणात देवाप्रती भाव निर्माण होऊ लागतो.

देहली येथील सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवात सनातन धर्मप्रेमींनी, उदा. स्मृती रस्तोगी (‘जागरण न्यू मिडिया’च्या वरिष्ठ राजकीय संपादक), श्वेता त्रिपाठी (वृत्तनिवेदिका), डॉ. सुरेश चव्हाणके (‘सुदर्शन’ वृत्तवाहिनी’चे मुख्य संपादक) इत्यादींनी विविध चर्चासत्रांचे संचालन केले, तसेच ‘मूव्हिंग पिक्सेल्स’, या आस्थापनाने महोत्सवाला पूरक लघुपटाची निर्मिती केली. अशा प्रकारे या धर्मप्रेमींनी महोत्सवाच्या कार्यात सहभाग घेतला. त्यामुळे व्यष्टी स्तरावर त्यांची साधना झाली आणि समष्टी स्तरावर समष्टीच्या अप्रगट भावात वृद्धी होण्यास साहाय्य झाले. समष्टीच्या या अप्रगट भावामुळे महोत्सवात अधिक प्रमाणात ईश्वरी कृपा आणि चैतन्य कार्यरत राहिले.’

(क्रमशः)

– श्री. निषाद देशमुख (सूक्ष्मातून प्राप्त झालेले ज्ञान) (आध्यात्मिक पातळी ६३ टक्के), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (ज्ञान मिळण्याचा दिनांक १४.१२.२०२५, वेळ दुपारी १२.०१)

भाग २ वाचण्यासाठी क्लिक करा → https://sanatanprabhat.org/marathi/1004662.html

  • वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषिमुनींच्या यज्ञांत राक्षसांनी विघ्ने आणल्याच्या अनेक कथा वेद-पुराणांत आहेत. ‘अथर्ववेदात अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच तसेच करणी, भानामती यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत.
  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केेलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • सूक्ष्मातील दिसणे, ऐकू येणे इत्यादी (पंच सूक्ष्मज्ञानेंद्रियांनी ज्ञानप्राप्ती होणे) : काही साधकांची अंतर्दृष्टी जागृत होते, म्हणजे त्यांना डोळ्यांना न दिसणारे दिसते, तर काही जणांना सूक्ष्मातील नाद किंवा शब्द ऐकू येतात.
  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या काही वेळा अनिष्ट शक्तींमुळे किंवा ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांना आलेल्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सर्वांनाच येतील, असे नाही. – संपादक