India US Trade Deal : अमेरिकेने भारतावरील ५० टक्के आयात शुल्क १८ टक्के केले !

  • भारत आणि अमेरिका यांच्यात अंततः व्यापार करार

  • भारत रशियाकडून तेल खरेदी करणार नसल्याचा ट्रम्प यांचा दावा, तर भारताचे मौन !

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डॉनल्ड ट्रम्प व भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी

नवी देहली – भारत आणि अमेरिका यांच्यातील गेले काही महिने प्रलंबित असलेला व्यापार करार अंततः झाला. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डॉनल्ड ट्रम्प यांनी सामाजिक माध्यमांतून याविषयी माहिती दिली. यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही याची माहिती दिली. भारताने रशियाकडून इंधन तेल खरेदी केल्यामुळे अमेरिकेने भारतावर लादलेला ५० टक्के आयात कर या करारामुळे न्यून करत तो १८ टक्क्यांवर आणला आहे, तर ‘भारत अमेरिकेच्या निर्यातीवरील कर शून्यावर आणेल’, असे ट्रम्प यांनी म्हटले आहे. ट्रम्प यांनी २ फेब्रुवारी सकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी दूरभाषवर चर्चा केली होती. त्यानंतर रात्री सुमारे साडेदहा वाजता ट्रम्प यांनी सामाजिक माध्यांवर याविषयी माहिती देऊन व्यापार कराराची घोषणा केली. ट्रम्प यांनी दावा केला की, पंतप्रधान मोदी रशियाकडून तेल खरेदी करणे थांबवून अमेरिकेकडून अधिक तेल खरेदी करण्यास सहमत झाले आहेत; मात्र पंतप्रधान मोदी यांनी सामाजिक माध्यमांमध्ये प्रसारित केलेल्या माहितीमध्ये याविषयी कोणताही उल्लेख केलेला नाही. त्यामुळे यावर स्पष्टता आलेली नाही.

४३ नव्हे, तर केवळ १८ टक्केच कर !

अमेरिकेने भारतावर प्रथम २५ टक्के आणि नंतर रशियाकडून तेल घेत असल्याने आणखी २५ टक्के कर लावला होता; म्हणजे एकूण ५० टक्के कर लावला. आता अमेरिकेने संपूर्ण ५० टक्क्यांतून ३२ टक्के कर रहित करून तो १८ टक्क्यांवर आणला आहे, असे व्हॉइट हाऊसकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

करारानुसार भारत अमेरिकेकडून ४६ लाख कोटी रुपयांचा माल खरेदी करणार !

ट्रम्प यांनी घोषित केलेल्या करारानुसार भारत ‘बाय अमेरिकन’ (अमेरिकेकडून खरेदी करा) धोरणांतर्गत अमेरिकेकडून ४६ लाख कोटी रुपये (५०० अब्ज डॉलर) पेक्षा अधिक किमतीचा माल खरेदी करील. हा माल पुढील ५ वर्षांत खरेदी करायचा आहे.

भारत अमेरिकेसह व्हेनेझुएलाकडून तेल खरेदी करील ! –  ट्रम्प

आज सकाळी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी बोलणे माझ्यासाठी सन्मानाची गोष्ट होती. आम्ही रशिया-युक्रेन युद्धासह अनेक सूत्रांवर चर्चा केली. पंतप्रधान मोदी यांनी रशियाकडून तेल खरेदी थांबवण्यास सहमती दर्शवली. भारत आता अमेरिकेकडून अधिक तेल खरेदी करील. याव्यतिरिक्त व्हेनेझुएलाकडून तेल खरेदी करण्याच्या शक्यतेवरही चर्चा झाली. यामुळे युक्रेनमध्ये चालू असलेले युद्ध संपवण्यास साहाय्य होईल, जिथे प्रत्येक आठवड्याला सहस्रो लोकांचा जीव जात आहे. पंतप्रधान मोदी यांच्यासमवेत असलेली मैत्री, सन्मान आणि त्यांच्या विनंतीवरून आम्ही अमेरिका आणि भारत यांच्यात त्वरित एका व्यापार करारावर सहमती दर्शवली आहे. या अंतर्गत अमेरिका भारतावर लादले जाणारे रेसिप्रोकल टॅरिफ २५ टक्क्यांवरून १८ टक्क्यांपर्यंत न्यून करील. भारतही अमेरिकेविरुद्धचे आपले टॅरिफ आणि गैर-टॅरिफ अडथळे अल्प करून शून्य करण्याच्या दिशेने वाटचाल करील. पंतप्रधान मोदींनी ‘बाय अमेरिकन’ संदर्भातही मोठी वचनबद्धता दर्शवली आहे. या अंतर्गत भारत अमेरिकेकडून ५०० अब्ज डॉलरपेक्षा अधिक किमतीची ऊर्जा, तंत्रज्ञान, कृषी, कोळसा आणि इतर उत्पादने खरेदी करेल. मला पूर्ण विश्वास आहे की, भारत आणि अमेरिका यांचे संबंध भविष्यात आणखी भक्कम होतील.

आमची भागीदारी नव्या उंचीवर नेण्यासाठी उत्सुक ! – पंतप्रधान मोदी

मला राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्याशी बोलून पुष्कळ आनंद झाला. ‘मेड इन इंडिया’ उत्पादनांवरील शुल्क आता १८ टक्क्यांपर्यंत न्यून करण्यात आले आहे, हे जाणून अतिशय समाधान वाटले. या शानदार निर्णयासाठी भारताच्या १४० कोटी लोकांच्या वतीने राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांचे मनःपूर्वक आभार. जेव्हा दोन मोठ्या अर्थव्यवस्था आणि जगातील सर्वांत मोठी लोकशाही एकत्र काम करतात, तेव्हा आपल्या लोकांना लाभ होतो आणि परस्पर सहकार्याच्या नवीन अन् मोठ्या संधी निर्माण होतात. मी त्यांच्यासमवेत काम करण्यास आणि आमची भागीदारी अभूतपूर्व उंचीवर नेण्यास उत्सुक आहे.

भारताला सरकारच्या कृतींची माहिती ट्रम्प यांच्याकडून मिळते ! – काँग्रेसची टीका

काँग्रेसने अमेरिका आणि भारत यांच्यातील व्यापार कराराच्या घोषणेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली. काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी ‘एक्स’वर म्हटले की, आज पंतप्रधान मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्यात चर्चा झाली. ही माहिती भारताने नाही, तर भारतातील अमेरिकेच्या राजदूतांनी दिली आहे. आता हे जणू एक नित्यक्रम बनत चालले आहे. भारताला आपल्याच सरकारच्या कृतींबद्दलची माहिती राष्ट्राध्यक्ष ट्रम्प किंवा त्यांच्या नियुक्त प्रतिनिधींकडून मिळते. पंतप्रधान मोदी काही कारणास्तव राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्यासमोर स्पष्टपणे दबावाखाली दिसत आहेत. सामान्यतः होणारी गळाभेट आणि मिठी मारण्याच्या गोष्टी तर दूरच राहिल्या, आता मोदी ट्रम्प यांच्यासोबत दिसण्यानेही अस्वस्थ वाटतात. त्यांनी पराभव स्वीकारला आहे, असे वाटते. हे निश्चितपणे ‘फादर ऑफ ऑल डील्स’ (सर्व करारांमधील सर्वाेच्च करार) असू शकत नाही.

भारताकडून कोणताही औपचारिक संदेश मिळालेला नाही ! – रशिया

मॉस्को (रशिया) – ‘भारत रशियाकडून तेल खरेदी करणार नाही’, असे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी भारतासमवेत व्यापार कराराविषयी सांगितल्यानंतर रशियाच्या राष्ट्राध्यक्षांचे कार्यालय असणार्‍या ‘क्रेमलिन’चे प्रवक्ते दिमित्री पेस्कोव यांनी निवेदन दिले आहे. ते म्हणाले की, या विषयावर रशियाला भारताकडून कोणताही औपचारिक संदेश प्राप्त झालेला नाही. आतापर्यंत भारताकडून रशियाचे तेल खरेदी थांबवण्यासंदर्भात कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. रशिया भारतासमवेतची आमची रणनीतिक भागीदारी पुढे नेऊ इच्छितो आणि दोन्ही देशांमधील सहकार्याला मोठे महत्त्व देतो. भारत-रशिया संबंध केवळ तेल आणि वायू यांपुरते मर्यादित नाहीत. संरक्षण, व्यापार आणि रणनीतिक सहकार्य या क्षेत्रांतील दोन्ही देशांमधील संबंध दशकानुदशके जुने आहेत. जागतिक दबाव असूनही ही भागीदारी टिकवून ठेवण्याची आमची इच्छा आहे.