Pakistan-Sindh Hindu Minority : पाकच्या सिंधमध्ये हिंदु अल्पसंख्यांकांना जाणीवपूर्वक केले जात आहे लक्ष्य !

कराची (पाकिस्तान) : पाकिस्तानच्या सिंध प्रांतात सर्वाधिक हिंदु अल्पसंख्यांक लोकसंख्या रहाते. या प्रांतात ईशनिंदेच्या आरोपांमुळे वारंवार धार्मिक हिंसाचार उसळत असतो. प्रसिद्ध झालेल्या एका अहवालानुसार ही आक्रमणे एका ठराविक पद्धतीने केली जातात. या हिंसक घटनांना एका आरोपाने प्रारंभ होतोे, त्यानंतर धार्मिक नेत्यांकडून जमाव जमवला जातो, अशांतता निर्माण केली जाते आणि शेवटी प्रभावित हिंदु समुदायाला बलपूर्वक तेथून हाकलून लावण्याची प्रक्रिया चालू होते.

हिंदु शेतकर्‍याची हत्या आणि त्यातून समोर आलेले वास्तव

नेपाळी वृत्तसंस्था ‘खबरहब’च्या वृत्तानुसार सिंधमध्ये एका हिंदु शेतकर्‍याच्या नुकत्याच झालेल्या हत्येने पाकिस्तानमधील धार्मिक अल्पसंख्यांकांच्या परिस्थितीवर पुन्हा एकदा प्रकाश टाकला आहे. पीडित व्यक्ती कोल्ही समुदायातील शेतकरी होती. भूमीच्या वापरावरून एका शक्तीशाली स्थानिक जमीनदारासमवेत त्याचा वाद झाला होता. या वादानंतर पीडित हिंदु शेतकर्‍याची दिवसाढवळ्या गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. या घटनेनंतर संपूर्ण सिंधमध्ये निषेध आंदोलने चालू झाली. हिंदु समुदायांनी महामार्ग रोखून धरले आणि न्यायाची मागणी केली.

गुन्हेगारांना मिळणारे अभय आणि भेदभाव

या वृत्तात पुढे म्हटले आहे की, हे प्रकरण केवळ एका हत्येपुरते मर्यादित नाही. हे प्रकरण गुन्हेगारांना मिळणारे अभय, सरंजामी शक्ती आणि धार्मिक भेदभाव यांचा एक खोलवर रुजलेला प्रकार उघड करते. या घटनेने गेल्या अनेक दशकांपासून पाकिस्तानमधील अल्पसंख्यांक हिंदूंची वास्तविकता जगासमोर आणली आहे. अनेक अल्पसंख्यांकांसाठी, विशेषतः हिंदूंसाठी, पाकिस्तान वेगाने एक प्रतिकूल ठिकाण बनत चालले आहे. येथे खोटे आरोप, सक्तीचे धर्मांतर, अपहरण, पैशांचा दबाव आणि लक्ष्यित हिंसाचार यांसारख्या घटना घडत आहेत.

हिंदु महिला आणि मुली यांवरील अत्याचार

पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातही हिंसाचाराच्या अशाच घटना घडल्या आहेत. तिथे हिंदूंची लोकसंख्या अत्यंत अल्प आहे. लाहोरच्या ‘सेंटर फॉर सोशल जस्टिस’च्या अभ्यासाचा दाखला देत या वृत्तात नमूद करण्यात आले आहे की, वर्ष २०२१ ते २०२४ या काळात किमान ४२१ अल्पसंख्यांक महिला आणि मुली यांचे सक्तीने धर्मांतर करण्यात आले. यामध्ये ७१ टक्के मुली अल्पवयीन होत्या आणि त्यातील बहुतेक हिंदू अन् ख्रिस्ती समुदायातील होत्या.

शारीरिक हिंसाचाराव्यतिरिक्त पद्धतशीर छळानेही हिंदु नागरिकांचे अस्तित्व धोक्यात आणण्यात तितकीच धोकादायक भूमिका बजावली आहे. प्रतिवर्षी अल्पवयीन हिंदु मुलींचे अपहरण करणे, त्यांना इस्लाम स्वीकारण्यास भाग पाडणे आणि मुसलमान पुरुषांशी त्यांचे विवाह लावण्याच्या प्रकरणांची नोंद होते. अशा प्रकरणांमध्ये पीडित कुटुंबांनी कायदेशीर मार्ग अवलंबण्याचा प्रयत्न केल्यास त्यांना जिवे मारण्याच्या धमक्या, सुनावणीत होणारा विलंब आणि न्यायालयाच्या प्रतिकूल निर्णयांचा सामना करावा लागतो. न्यायालयाचे बहुतेक निर्णय कथित धर्म पालटणार्‍यांच्या बाजूनेच लागतात.

कायद्याची कमतरता आणि सरकारची उदासीनता

सार्वजनिक चर्चा आणि कायदेशीर प्रयत्न यांनंतरही सक्तीच्या धर्मांतराला गुन्हा मानणारा कोणताही प्रभावी राष्ट्रीय कायदा बनवण्यात आलेला नाही. हिंदु कुटुंबांच्या बाजूने कोणताही ठोस कायदेशीर दाखला उपलब्ध नाही. या कायदेशीर पोकळीमुळे गुन्हेगारांचे धैर्य वाढले असून हिंदु पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

वृत्तात शेवटी म्हटले आहे की, सरकारचा पाठिंबा नसणे आणि कट्टरपंथी इस्लामी संघटनांप्रती वाढती सहनशीलता यांमुळे पाकिस्तानमधील हिंदु अल्पसंख्यांकांसाठी आता प्रश्‍न समानतेचा उरलेला नसून त्यांच्यावर वारंवार अन्याय करणार्‍या व्यवस्थेत केवळ जिवंत रहाण्याचा बनला आहे.