(म्हणे) ‘अल्पसंख्यांकांवरील आक्रमणांची बहुतांश प्रकरणे धार्मिक द्वेषाची नसून गुन्हेगारी स्वरूपाची !’ – Bangladesh

बांगलादेशातील अंतरिम सरकारचा वार्षिक अहवालातून दावा

महंमद युनूस (डावीकडे) हत्या झालेले हिंदू (उजवीकडे)

ढाका (बांगलादेश) – बांगलादेशाच्या अंतरिम सरकारने अल्पसंख्यांक समुदायांशी संबंधित घटनांच्या संदर्भातील १ वर्षाचा आढावा अहवाल प्रसिद्ध केला आहे.

या काळात अल्पसंख्यांक समुदायांशी संबंधित एकूण ६४५ प्रकरणांची नोंद झाल्याचे यात नमूद करण्यात आले आहे. या ६४५ पैकी केवळ ७१ घटनांना धार्मिक द्वेषाच्या स्वरूपाचे मानण्यात आले आहे, तर ५७४ प्रकरणे धार्मिक द्वेषी नसल्याचे नमूद करण्यात आले आहे. धार्मिक द्वेषाच्या घटनांमध्ये प्रामुख्याने धार्मिक स्थळे किंवा मूर्तींची तोडफोड अशा प्रकारांचा समावेश होता. हा आढावा देशभरातील पोलिसांच्या नोंदींच्या आधारे सिद्ध करण्यात आला आहे.

१. उर्वरित बहुतांश प्रकरणांमागे भूमीचे वाद शेजारीपाजार्‍यांतील भांडणे, राजकीय वैर, चोरी, लैंगिक अत्याचार आणि वैयक्तिक शत्रुत्व अशी कारणे आढळून आली असून त्यांचा थेट धर्माशी संबंध नसल्याचे अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे.

२. अंतरिम सरकारचे प्रमुख महंमद युनूस यांनी सांगितले की, प्रत्येक घटना गंभीर असून त्याकडे दुर्लक्ष करता येणार नाही; मात्र चुकीची माहिती आणि भीती यांचे वातावरण निर्माण होऊ नये, यासाठी अचूक वर्गीकरण आवश्यक आहे. अल्पसंख्यांकांशी संबंधित बहुतांश प्रकरणे ही सर्व नागरिकांना प्रभावित करणार्‍या कायदा-सुव्यवस्थेच्या आव्हानांचा भाग आहे. राज्यघटनेनुसार मुसलमान, हिंदु, बौद्ध, ख्रिस्ती आणि सर्व समुदाय यांचे संरक्षण अन्  न्याय सुनिश्चित करणे हे सरकारचे कायदेशीर आणि नैतिक दायित्व आहे.

३. अहवालानुसार अनेक प्रकरणांत पोलिसांनी औपचारिक गुन्हे नोंदवले असून काही ठिकाणी अटक करण्यात आली आहे, तर उर्वरित प्रकरणांचा अन्वेषण चालू आहे. धार्मिक स्थळांशी संबंधित किंवा संवेदनशील घटनांकडे विशेष लक्ष देण्यात आले आहे.

प्रत्येक वर्षी हिंसक गुन्ह्यांत ३ सहस्र ते ३ सहस्र ५०० जणांचा होतो मृत्यू !

राष्ट्रीय पातळीवर सरकारने कायदा-सुव्यवस्थेची आव्हाने अद्याप कायम असल्याची स्वीकृती दिली आहे. प्रतिवर्षी सुमारे ३ सहस्र ते ३ सहस्र ५०० लोकांचा मृत्यू हिंसक गुन्ह्यांमध्ये होतो; मात्र तातडीच्या कारवाईमुळे परिस्थितीत हळूहळू सुधारणा होत असल्याचे सरकारचे म्हणणे आहे.

संपादकीय भूमिका

बांगलादेशात हिंदूंवर झालेली आक्रमणे ही धर्मद्वेषातूनच झालेली आहे, हे जगजाहीर आहे. सरकारने अशी कितीही खोटे अहवाल प्रसिद्ध केले, तरी सत्य पालटणार नाही !