युक्रेन-रशिया युद्धात ट्रम्प यांनी फेटाळला होता भारतीय सैनिकांना शांतता मोहिमेसाठी पाठवण्याचा प्रस्ताव !

‘द न्यूयॉर्क टाइम्स’चे पत्रकार मॅगी हॅबरमन आणि जोनाथन स्वान यांच्या पुस्तकातून समोर आली माहिती

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (डावीकडे), अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डॉनल्ड ट्रम्प व उपराष्ट्राध्यक्ष जे.डी. वान्स (उजवीकडे)

वॉशिंग्टन (अमेरिका) – अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जे.डी. वान्स यांनी युक्रेन-रशिया युद्धाच्या वेळी शांतता मोहीम राबवण्याकरता भारतीय सैन्याला तेथे पाठवण्याचा ठेवलेला प्रस्ताव राष्ट्राध्यक्ष डॉनल्ड ट्रम्प यांनी फेटाळून लावला, असा दावा एका नवीन पुस्तकात करण्यात आला आहे. ‘भारतीय असे करणार नाहीत. ते अशा गोष्टींसाठी पैसे खर्च करणार नाहीत’, असे ट्रम्प यांनी या वेळी म्हटल्याचा दावा यात करण्यात आला आहे.

१. ‘द न्यूयॉर्क टाइम्स’चे पत्रकार मॅगी हॅबरमन आणि जोनाथन स्वान यांच्या ‘रिजिम चेंज : इनसाईड द इम्पेरियल प्रेसिडन्सी ऑफ डॉनल्ड ट्रम्प’ (सत्तापालट : डॉनल्ड ट्रम्प यांच्या साम्राज्यशाही राष्ट्राध्यक्षपदाच्या अंतर्भागातील सत्य) या पुस्तकानुसार ट्रम्प यांनी पदभार स्वीकारल्याच्या १० दिवसांनंतर म्हणजेच ३० जानेवारी २०२५ या दिवशी ओव्हल कार्यालयामध्ये वान्स आणि वरिष्ठ अधिकारी यांची युक्रेन-रशिया युद्धातील अमेरिकेची भूमिका निश्चित करण्यासाठी बैठक घेतली होती. या बैठकीला रशिया आणि युक्रेन यांचे विशेष दूत लेफ्टनंट जनरल कीथ केलॉग (निवृत्त) उपस्थित होते.

२. केलॉग यांच्या ‘ट्रम्प ऐतिहासिक शांतता करार’ या योजनेत ब्रिटीश, फ्रेंच आणि डच शांतता सैनिकांचा समावेश करण्याची मागणी करण्यात आली होती; मात्र वान्स यांनी ‘नाटो’ देशांच्या सैन्याला पाठवण्यास विरोध केला. ‘नाटो’ देशांचे सैन्य पाठवल्यास रशिया आणखी भडकू शकतो; कारण रशियाने याआधीच या आघाडीविषयी अविश्वास व्यक्त केला होता, असे व्हान्स याचे म्हणणे होते.

३. वान्स यांनी विचारले की, या कामासाठी युरोप खंडाच्या बाहेरील इतर देशांचे सैन्य मिळू शकते का? असे विचारत त्यांनी भारताचे नाव सुचवले. त्या वेळी ट्रम्प यांनी याला विरोध केला. ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी माझे घनिष्ठ संबंध आहेत आणि मोदी यांना मी पुष्कळ आवडतो अन् त्यांना भेट द्यायची आहे’, असेही ट्रम्प म्हणाले होते.