Love Jihad in Ladakh : बौद्ध युवतीचे अपहरण आणि धर्मांतर प्रकरणी ‘जांस्कर बौद्ध संघा’कडून कठोर कायद्याची मागणी

लडाखपर्यंत पोचला ‘लव्ह जिहाद’ !

लेह (लडाख) – लडाखमधील जांस्कर भागात ‘लव्ह जिहाद’ आणि बलपूर्वक धर्मांतर यांच्या घटनांबाबत ‘जांस्कर बौद्ध संघा’ने प्रशासनाला पत्र पाठवून चिंता व्यक्त केली आहे. एका बौद्ध युवतीचे अपहरण आणि बलपूर्वक धर्मांतर केल्याचे सूत्र संघाने उपस्थित करत तिची सुरक्षित सुटका करण्याची मागणी केली आहे. त्याचबरोबर लडाखमध्ये कठोर धर्मांतरविरोधी कायदा लागू करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. अशा घटना परिसरातील धार्मिक सलोखा गंभीररित्या बिघडवू शकतात, असे संघाचे म्हणणे आहे.

युवती बेपत्ता झाल्याने वाढलेली चिंता

जांस्कर बौद्ध संघाच्या माहितीनुसार स्टांजिन यांगडोल नावाची बौद्ध युवती अनेक दिवसांपासून बेपत्ता आहे. अज्ञात व्यक्तींनी तिला पळवून नेऊन तिच्या इच्छेविरुद्ध कुठेतरी बंदी करून ठेवले असावे, अशी भीती व्यक्त केली जात आहे. हा विषय गंभीर असून सार्वजनिक हिताशी संबंधित असल्याचे सांगत संघाने प्रशासनाकडे तातडीने हस्तक्षेप करण्याची मागणी केली आहे

विवाहाच्या नावाखाली धर्मांतराचा आरोप

संघाने त्याच्या पत्रात आरोप केला आहे की, लडाखमध्ये बौद्ध समाजातील मुलींना आमिष दाखवून धर्मांतरासाठी भाग पाडले जात आहे. अनेक प्रकरणांत युवतींची संमती नसतांनाही ही प्रक्रिया राबवली जात असल्याचे संघाचे म्हणणे आहे. हा प्रकार नियोजनबद्ध आणि संघटित पद्धतीने चालू असल्याची शंका व्यक्त करत संघाने यामागे एका विशिष्ट समाजाची धार्मिक ओळख पालटण्याचा उद्देश असल्याचे नमूद केले आहे. परस्पर संमतीने विवाह होत असेल आणि धर्मांतराचा दबाव नसेल, तर तो विशेष विवाह कायद्यानुसार करता येऊ शकतो, असेही संघाने स्पष्ट केले आहे.
इस्लामी धर्मगुरूंनाही अशा कृत्यांपासून लोकांना परावृत्त करण्यासाठी जनजागृती करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. जेणेकरून परिसरात शांतता आणि सलोखा टिकून राहील.