Ex-Muslim Movement : इराणमधील आंदोलनामुळे भारतात केरळमधून प्रारंभ झालेल्या ‘एक्स मुस्लिम’ चळवळीला बळ !

‘एक्स मुस्लिम’ इमरोज आलम (उजवीकडे)

नवी देहली – इराणमध्ये सध्याच्या सरकारविरुद्ध चालू असलेल्या आंदोलनामुळे देशात ‘एक्स मुस्लिम’ (पूर्वीचे मुसलमान) चळवळीला चालना मिळत आहे. इराण आणि भारत येथील परिस्थितींमध्ये ‘एक्स मुस्लिम’ समानता पहात आहेत. महागाईच्या विरोधात इराणमध्ये चालू असलेले आंदोलन इस्लामविरोधी भूमिकेपर्यंत पोचले आहे. तेथील मुसलमान लोक स्वतःची सांस्कृतिक ओळख मूळ पारशी धर्माशी जोडू लागले आहेत. भारतात ही ओळख सनातन धर्माच्या स्वरूपात मांडली जाते.

इराणमध्ये इस्लामविषयीची अनिच्छा उघडपणे व्यक्त होत असतांना भारतात मात्र हा विचारप्रवाह प्रामुख्याने इंटरनेट माध्यमांद्वारे वाढतांना दिसतो. एक्स, यू ट्यूब, फेसबुक आणि व्हॉट्सअ‍ॅप यांसारख्या माध्यमांचा यात मोठा वाटा आहे. येथे इस्लामच्या विरोधात उघडपणे पुढे आल्यास कारवाईची भीती कायम आहे. तरीही काही पूर्वीच्या मुसलमानांमध्ये धैर्य वाढले असून ते आता सार्वजनिक व्यासपिठांवर येऊ लागले आहेत.

१ कोटींपेक्षा अधिक ‘एक्स मुस्लिम’ असल्याचा दावा

अलीकडे नवी देहलीतील रामलीला मैदानात आयोजित आर्य समाजाच्या एका कार्यक्रमात देहलीतील ‘एक्स मुस्लिम’ इमरोज आलम यांनी व्यासपिठावर येत स्वतःचे नाव ‘राजन चौधरी’ ठेवत असल्याची घोषणा केली. त्यांच्यासारख्या अनेक अन्य ‘एक्स मुस्लिमां’चा दावा आहे की, देशभरात अलीकडच्या काही वर्षांत त्यांची संख्या एक कोटींपेक्षा अधिक झाली आहे; मात्र याविषयी कोणताही ठोस पुरावा उपलब्ध नाही. तरीही या चळवळीशी संबंधित लोक मोठ्या आशेने सांगतात की, सुमारे २५ वर्षांपूर्वी केरळमध्ये चालू झालेली ही चळवळ आता जोर धरत उत्तर भारतापर्यंत पोचली आहे. तिचा विस्तार वाढत आहे. लोक स्वतः किंवा कुटुंबासह इस्लामचा त्याग करत आहेत.

कुटुंबासह घरवापसी (मूळ हिंदु धर्मात पुनर्प्रवेश) !

चंडीगड येथील ‘एक्स मुस्लिम’ जावेद इक्बाल यांनी काही महिन्यांपूर्वी हिंदु धर्म स्वीकारत स्वतःचे नाव जितेंद्र गौड ठेवले आहे. त्यांनी पत्नी आणि दोन किशोरवयीन मुलांसह हिंदु धर्म स्वीकारला. ते म्हणतात की, आमच्या पूर्वजांनी ज्या कोणत्या दबावाखाली दुसरा धर्म स्वीकारला असेल; परंतु आमच्या मुळांचा संबंध तर तिथेच (सनातन धर्मातच) आहे.