Sarsanghchalak P.P. Mohanji Bhagwat : येत्या २० ते ३० वर्षांत भारत विश्वगुरु बनेल !  

प.पू. सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांची ग्वाही !

प.पू. सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत

मथुरा (उत्तरप्रदेश) : संतांचा सहवास मिळवणे आणि त्यांच्या उपदेशातील किमान एक तरी गोष्ट आचरणात आणण्याचा संकल्प करणे आवश्यक आहे. असे करत आपण जीवन घडवत राहिलो आणि सर्वांना जोडत राहिलो, तर येत्या २० ते ३० वर्षांत भारत विश्वगुरु बनेल. संपूर्ण जगाला सुख आणि शांती देणारा नवा मार्ग भारत दाखवेल. भारत हिंदु राष्ट्र आणि धर्म राष्ट्र बनेल. कुणीही ते पालटू शकणार नाही. भारताच्या जन्मामागील उद्देश हाच आहे आणि तो स्पष्टपणे समोर आहे. आता सिद्धतेला लागणे हीच आवश्यकता आहे, असे विधान  प.पू. सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी येथे केले. ते वृंदावन येथील सुदामा कुटी आश्रमाचे संस्थापक संत सुदामा दास महाराज यांच्या १० दिवसांच्या शताब्दी महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते.

प.पू. सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी केलेले मार्गदर्शन

भारत हिंदु राष्ट्र आणि धर्म राष्ट्र बनेल.

आसुरी शक्ती ऐक्यामुळे दुर्बल होतील !

समाजातील सर्व आसुरी शक्ती हळूहळू दुर्बल होतील. धार्मिक समाज आणि सनातन समाजातील लोक जसेजसे एकत्र येतील, तसे या शक्तींचा र्‍हास होईल. गेल्या ५० वर्षांत हिंदु समाज जसा अधिक संघटित झाला, तसतसे या शक्तींचे तुकडे झाले आहेत.

सुलतानशाहीत हिंदु समाज नष्ट झाला नाही !

सुलतान आणि बादशाह यांच्या राजवटीत हिंदु समाजाने जवळजवळ ५०० वर्षे जीवन व्यतीत केले. जर समाज नष्ट होणार असता, तर तो तेव्हाच नष्ट झाला असता. तरीही हिंदु समाज टिकून राहिला आणि आज पुन्हा हिंदूंच्या देशाच्या रूपाने पुढे वाटचाल करत आहे.

राष्ट्र धर्मासाठीच निर्माण झाले !

भारत राष्ट्राची निर्मिती धर्मासाठीच झाली आहे. काळानुसार जगाला धर्मज्ञानाने मार्गदर्शन करणे आणि स्वतःच्या आचरणातून धर्ममय जीवन कसे जगावे ?, हे दाखवणे हेच आपले कर्तव्य आहे. जेव्हा वानरवीर सज्ज होतात, तेव्हा प्रभु श्रीराम अवतरतात आणि जेव्हा पांडव युद्धासाठी सिद्ध होतात, तेव्हा श्रीकृष्ण स्वतः सारथी बनतात. अनेक वेळा आपलीच सिद्धता अपुरी असल्यामुळे कार्य अर्धवट रहाते.

भेदभावमुक्त भारताची आवश्यकता !

देशाला भेदभावमुक्त भारताची आवश्यकता आहे. हिंदु समाज कधीही इतरांच्या शौर्यामुळे किंवा सामर्थ्यामुळे पराभूत झाला नाही. जेव्हा पराभव झाला, तेव्हा तो फूट पडल्यामुळे झाला. कोणत्याही प्रकारचा भेदभाव न ठेवता परस्पर मैत्री वाढवली पाहिजे. हिंदु समाज सामाजिक आहे आणि भाषा, पंथ, जात अशा विविधतेतून तो घडलेला आहे. ज्या सर्वांना हिंदू मानले जाते, त्या सर्वांशी मैत्री असली पाहिजे.

भक्ती हीच खरी शक्ती आहे !

आपण सृष्टीचे घटक आहोत. सृष्टीशी आपलेपणा भक्तीतून निर्माण होतो. जोडले जाणे, म्हणजेच भक्ती. सत्संग महत्त्वाचा आहे; कारण जे जोडले गेले आहेत, त्यांच्यासमवेत राहिल्याने आपले जीवन घडत जाते. भक्ती हीच खरी शक्ती आहे. तपश्चर्या करणार्‍या संतांच्या छायेत आपण उभे असल्यामुळे आपले अस्तित्व कुणीही नष्ट करू शकत नाही. धर्माच्या प्रकाशाने संपूर्ण जग उजळवणे हे आपले ध्येय आहे.