भक्तीसत्संगात शिकवण्यात येणार्‍या साधनेतील पंचसूत्रीमुळे साधकांची खर्‍या अर्थाने गुरुकृपायोगानुसार साधना होणे

विशेष भक्तीसत्संग शृंखला : गुरुकृपायोगातील मूलतत्त्वाची शिकवण देणारी श्री गुरुगीता !

‘वर्ष २०२५ च्या गुरुपौर्णिमेनंतर भारतभरातील सर्व साधकांसाठी भक्तीसत्संगात विशेष शृंखला चालू करण्यात आली आहे. या शृंखलेत ‘विचारणे, ऐकणे, स्वीकारणे, शिकणे आणि आढावा देणे’ या साधनेच्या पंचसूत्रीच्या संदर्भात मार्गदर्शन केले जात आहे. या सत्संगाच्या संदर्भात ईश्वरीय ज्ञानातून मिळालेली माहिती पुढे देत आहे.

भाग १ 

१. गुरुकृपायोगानुसार साधना करण्यासाठी शिष्यत्व वृत्ती असणे आवश्यक असल्याने शिष्यत्वाला हानीकारक चुका टाळणे आवश्यक

‘ज्ञानयोग, भक्तीयोग, कर्मयोग किंवा गुरुकृपायोग’ असा कोणताही योगमार्ग असो, प्रत्येक योगमार्गातील नियम, तत्त्वे यांसहित त्या योगमार्गानुसार साधना करतांना ‘कोणत्या चुका टाळाव्यात ?’, हेही सांगितले जाते.

वर्तमान कलियुगात सर्व योगमार्गांमध्ये ‘गुरुकृपायोग’ हा ईश्वरप्राप्ती (मोक्षप्राप्ती) करवून देणारा राजमार्ग असला, तरी गुरुकृपायोगानुसार साधनेत शिष्यवृत्ती असणे प्रधान असते. त्यामुळे गुरुकृपायोगानुसार साधना करतांना शिष्यत्वाच्या वृत्तीला बाधक असे स्वभावदोष टाळणे आवश्यक आहे. यासाठी गुरुकृपायोगाचे निर्माता सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांनी ‘मनानुसार साधना’, ‘मनाने गुरु ठरवणे’, ‘स्वतःला साधक समजणे’ आणि ‘सांप्रदायिक साधनेत अडकणे’ या शिष्यत्वाला हानीकारक चार चुका टाळून ‘गुरुकृपायोगानुसार साधना’ करण्याचे मार्गदर्शन साधना करणार्‍या समष्टीला केले आहे.

२. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी ‘मनानुसार साधना’ ही साधनेतील सांगितलेली प्रथम चूक लक्षात न घेता साधकांकडून साधनेचे प्रयत्न मनाप्रमाणे केले जात असणे

श्री. निषाद देशमुख

समष्टी संत सांगत असलेली साधनेची तत्त्वे उच्च स्तराच्या ज्ञानाने युक्त आणि काळातीत असतात; पण समाज त्यांचे स्वतःच्या बुद्धीनुसार आकलन करत असल्याने त्यातील भावार्थ समाजाला समजून घेता येत नाही. शीघ्र आध्यात्मिक उन्नती होण्यासाठी ‘मनोलय होणे’, तसेच ‘काय आवडते ? या तुलनेत आध्यात्मिक उन्नतीसाठी साधना म्हणून काय करणे आवश्यक आहे ?’, ही दोन सूत्रे सर्वांत महत्त्वाची आहेत. व्यष्टी साधना करणारे अधिकतर हे तत्त्व समजून न घेता ज्या देवतेची किंवा ज्या साधना प्रकाराने (देवपूजा, तीर्थयात्रा, ध्यान इत्यादी) सुख (तात्कालिक आनंद) मिळते, ते करत रहातात. अशा प्रकारे स्वतःच्या मनाप्रमाणे साधना करत राहिल्याने मन आणि चित्त यांवरील संस्कार कार्यरत रहातात अन् मनोलयाचा टप्पा कधीच साध्य होत नाही. यासाठी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी ‘मनानुसार साधना’, ही साधनेतील प्रथम चूक सांगितली आहे. असे असूनही आजही अनेक साधकांकडून ही चूक टाळण्याचा प्रयत्न न होता त्यांच्याकडून त्यांना आवडते ती साधना (विशिष्ट सेवा, स्वतःच्या वेळेनुसार सेवा) केली जाते.

३. ‘गुरुकृपायोगा’नुसार साधनारत असूनही साधकांकडून शिष्यत्वाला हानीकारक प्रमुख चुका टाळल्या जात नसल्याने साधकांची आध्यात्मिक उन्नती न होता त्यांना विविध आध्यात्मिक अडथळ्यांना सामोरे जावे लागणे

एखाद्या ठिकाणचा प्रवास करतांना जाण्याचा मार्ग चांगला असला, तरी प्रवासाचे वाहन नीट नसले, तर प्रवासात अनेक अडथळे निर्माण होतात आणि ध्येयाकडे जाण्याच्या कालावधीतही वाढ होते. त्याचप्रमाणे ‘गुरुकृपायोगानुसार साधना’ हा ईश्वरप्राप्तीचा (मोक्षप्राप्तीचा) राजमार्ग असला, तरी त्यानुसार साधनारत असूनही काही साधकांकडून शिष्यत्वाला हानीकारक प्रमुख चुका टाळल्या जात नाहीत. त्यामुळे अनेक वर्षे साधना करूनही काही साधकांची आध्यात्मिक उन्नती होत नाही. अनेक वर्षे साधना करूनही काही साधकांमध्ये शिष्यवृत्ती निर्माण झाली नसल्यामुळे त्यांना संत आणि सद्गुरु यांच्याकडून चैतन्य ग्रहण करता येत नाही. अशा साधकांना तीव्र प्रारब्धाच्या प्रसंगांना समोर जातांना पुष्कळ संघर्ष करावा लागतो, तसेच अनिष्ट शक्तींनाही त्यांच्या जीवनात विविध अडथळे निर्माण करून त्यांना साधनेपासून दूर करणे किंवा दीर्घकाळ विकल्पयुक्त स्थितीत ठेवून त्यांच्या साधनेचा अमूल्य वेळ वाया घालवणे शक्य होत आहे. थोडक्यात, शिष्यत्वाला हानीकारक प्रमुख चुका टाळल्या जात नसल्याने काही साधक ‘आपण गुरुकृपायोगानुसार साधना करत आहोत’, या भ्रमात जगत असतात. प्रत्यक्षात त्यांची गुरुकृपायोगानुसार साधना चालू नसल्याने त्या साधकांना गुरूंची कृपा ग्रहण होत नाही आणि विविध संकटांना मात्र सामोरे जावे लागते.

४. गुरुकृपायोगात सांगितलेल्या साधनेतील प्रमुख ४ चुका, त्यामुळे आध्यात्मिक गुणांचा होणारा र्‍हास आणि चूक टाळण्यासाठी पंचसूत्रीतील उपयुक्त कृती

५. साधनेतील पंचसूत्रीनुसार केलेल्या आचरणामुळे साधकांना प्रमुख चुका टाळून स्वतःच्या मनावर शिष्यत्वाचे संस्कार करणे शक्य होणे

साधनेतील पंचसूत्रीचे (विचारणे, ऐकणे, स्वीकारणे, शिकणे आणि आढावा देणे यांचे) आचरण करणे, म्हणजे स्वतःच्या मनावर शिष्यत्वाचे संस्कार करणे. साधकाने पंचसूत्रीनुसार आचरण केल्यावर त्याच्याकडून शिष्यत्वासाठी हानीकारक चुका नकळत आपोआप टाळल्या जातात आणि त्याच्या मनावर शिष्यत्वाच्या गुणांचे संस्कार होत जातात. शिकण्याची वृत्ती असणारा साधक कधीच सांप्रदायिक साधनेत अडकू शकत नाही. प्रत्येक साधनाप्रकार (नामजप, सेवा, त्याग इत्यादी) विचारून आणि त्याचा आढावा देऊन करणार्‍या साधकाच्या मनावर आपोआप आज्ञापालनाचा गुण निर्माण होतो. या प्रकारे साधनेतील पंचसूत्रीद्वारे शिष्यत्वासाठी पूरक गुण स्वीकारणे, म्हणजेच मनोलय करणे. भगवंत पात्र जिवावर आपोआप कृपा करतो. त्यामुळे शिष्यत्वाचे संस्कार असलेला जीव सहजतेने गुरुकृपेस पात्र होऊन व्यष्टी स्तरावर ईश्वरप्राप्तीसाठी, तर समष्टी स्तरावर रामराज्य (हिंदु राष्ट्र) स्थापनेसाठी भगवंताची कृपा संपादन करतो.

६. विशेष भक्तीसत्संग शृंखलेमुळे साधकांची खर्‍या अर्थाने गुरुकृपायोगानुसार साधना होणे

विशेष भक्तीसत्संग शृंखलेद्वारे गुरु साधकांना त्यांच्याकडून होणार्‍या चुकांची जाणीव करून देत आहेत आणि प्रत्येक सत्संगात साधनेतील पंचसूत्रींचे प्रत्यक्ष आचरण करण्याचे ध्येय देऊन साधकांकडून खर्‍या अर्थाने गुरुकृपायोगानुसार साधना करून घेत आहेत. यासाठी साधकांनी कृतज्ञताभावात राहून भक्तीसत्संगात सांगितलेल्या ध्येयाचे आचरण करणे आवश्यक आहे.’

(क्रमश:)

– श्री. निषाद देशमुख (सूक्ष्मातून मिळालेले ज्ञान) (आध्यात्मिक पातळी ६३ टक्के), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (ज्ञान मिळण्याचा दिनांक १.८.२०२५ आणि वेळ दुपारी १२.०६)

भाग २ वाचण्यासाठी क्लिक करा → https://sanatanprabhat.org/marathi/996394.html

  • वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषिमुनींच्या यज्ञांत राक्षसांनी विघ्ने आणल्याच्या अनेक कथा वेद-पुराणांत आहेत. ‘अथर्ववेदात अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच तसेच करणी, भानामती यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत.
  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • सूक्ष्मातील दिसणे, ऐकू येणे इत्यादी (पंच सूक्ष्मज्ञानेंद्रियांनी ज्ञानप्राप्ती होणे) : काही साधकांची अंतर्दृष्टी जागृत होते, म्हणजे त्यांना डोळ्यांना न दिसणारे दिसते, तर काही जणांना सूक्ष्मातील नाद किंवा शब्द ऐकू येतात.
  • सूक्ष्म-ज्ञानाविषयीचा प्रयोग : काही साधक सूक्ष्मातील कळण्याच्या क्षमतेचा अभ्यास म्हणून ‘एखाद्या वस्तूविषयी मन आणि बुद्धी यांच्या पलीकडे काय जाणवते’, याची चाचणी करतात. याला ‘सूक्ष्म-ज्ञानाविषयीचा प्रयोग’ म्हणतात.
  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक