स्थुलातील आपत्काळाला प्रत्यक्ष सामोरे जाण्यासाठी साधकांमध्ये काळानुसार आवश्यक ‘अर्जुनभावा’ची निर्मिती विशेष भक्तीसत्संगाद्वारे होणे

विशेष भक्तीसत्संग शृंखला : गुरुकृपायोगातील मूलतत्त्वाची शिकवण देणारी श्री गुरुगीता !

‘वर्ष २०२५ च्या गुरुपौर्णिमेनंतर भारतभरातील सर्व साधकांसाठी भक्तीसत्संगात विशेष शृंखला चालू करण्यात आली आहे. या शृंखलेत साधनेची पंचसूत्री (विचारणे, ऐकणे, स्वीकारणे, शिकणे आणि आढावा देणे) यांच्या संदर्भात मार्गदर्शन केले जात आहे. या लेखाच्या ९ जानेवारीला प्रसिद्ध झालेल्या पहिल्या भागात आपण ‘विशेष भक्तीसत्संगाद्वारे सांगितलेल्या प्रयत्नांमुळे साधकांची खर्‍या अर्थाने गुरुकृपायोगानुसार साधना होत आहे’, हे समजून घेतले. आता ‘पंचसूत्री शिकवणार्‍या विशेष भक्तीसत्संग शृंखलेचे काळानुसार महत्त्व आणि लाभ’ हे सूत्र बघूया.

स्थुलातील आपत्काळाला प्रत्यक्ष सामोरे जाण्यासाठी साधकांमध्ये काळानुसार आवश्यक ‘अर्जुनभावा’ची निर्मिती विशेष भक्तीसत्संगाद्वारे होते. जेव्हा जेव्हा खर्‍या भक्तांवर संकट येते, तेव्हा तेव्हा त्यांचे त्या संकटापासून रक्षण करण्यासाठी भगवंत विविध माध्यमांतून त्यांना साहाय्य करतो.

भाग २ 

भाग १ वाचण्यासाठी क्लिक करा → https://sanatanprabhat.org/marathi/995864.html

१. व्यष्टी स्तरावरील स्थुलातील संकटाला सामोरे जाण्यासाठी देवाने भावजागृतीची शिकवण देणे

साधारण वर्ष २००८-२००९ मध्ये सनातन संस्थेवर बंदीचे सावट होते. हे संकट स्थुलातील होते आणि ते तुलनेत व्यष्टी स्तरावरील होते. या संकटातून तरून जाण्यासाठी सर्वच साधकांच्या भावाच्या पातळीत वाढ होणे आवश्यक होते. यासाठी भगवंताने ‘गोपीभाव (गोपींच्या मनात श्रीकृष्णाप्रती असलेल्या भावाप्रमाणे)’ असलेले काही जीव सनातनमध्ये पाठवले. या साधकांमुळे ‘प्रत्यक्ष भाव कसा असतो ?’, ‘भावजागृतीसाठी कसे प्रयत्न करावे ?’, हे साधक स्थुलातून शिकले. त्यामुळे त्यांना व्यष्टी स्तरावरील संकटाला सामोरे जाणे सहज शक्य झाले.

२. समष्टी स्तरावरील संकटाला, म्हणजेच आपत्काळाला सामोरे जाण्यासाठी ‘अर्जुनभाव’ आवश्यक असणे 

श्री. निषाद देशमुख

वर्ष २०२५ पासून समष्टी स्तरावरील स्थूल आपत्काळाला आरंभ झाला आहे. येणारा आपत्काळ एवढा भीषण असेल की, पूर्ण पृथ्वी हे कुरुक्षेत्र (रणक्षेत्र) होईल, तर प्रत्येक साधक स्वतःला अर्जुनाच्या ठिकाणी उभा असल्याचे अनुभवेल. या प्रचंड भीषण आपत्काळाला सामोरे जाण्यासाठी साधकांमध्ये ‘अर्जुनभाव’ असेल, तरच ते संत (गुरु), सद्गुरु आणि परात्पर गुरु यांच्याकडून प्रक्षेपित होणारे चैतन्य ग्रहण करून जगू शकतील.

२ अ. साधनेतील पंचसूत्री म्हणजेच ‘अर्जुनभाव’ : ‘अर्जुनभाव’ म्हणजे अर्जुनासारखी ‘विचारणे, ऐकणे, स्वीकारणे, शिकणे आणि आढावा देणे ’ याची वृत्ती ! याचे थोडक्यात विश्लेषण पुढे दिले आहे.

अ. विचारणे : एकही क्षण व्यर्थ न घालवता रणक्षेत्रातही अर्जुन श्रीकृष्णाला मनातील द्वंद्वाच्या संदर्भात प्रश्न विचारतो आणि त्याचे मार्गदर्शन घेतो. मार्गदर्शनाच्या संदर्भात शंका आल्यावर प्रतिप्रश्न विचारतो. यामुळे आज मानवजातीला गीतेसारखे महान तत्त्वज्ञान असलेला ग्रंथ मिळाला.

आ. ऐकणे : श्रीकृष्ण अर्जुनाला ‘परम गुह्य’ असे गीतेचे ज्ञान सांगतो. ते अर्जुन मनात इतर कोणताही विचार न करता निष्ठेने ऐकतो.

इ. स्वीकारणे : अर्जुन श्रीकृष्णाने सांगितलेले गीतेचे ज्ञान वर-वर ऐकत नाही, तर ते स्वीकारून परत युद्ध करण्यास आरंभ करतो. श्रीकृष्ण ज्याच्याशी युद्ध करायला किंवा युद्धातून माघार घ्यायला सांगायचा, तसे अर्जुन स्वीकारत होता. श्रीकृष्णाने चाक भूमीत गेल्यामुळे अडकलेल्या कर्णाचा वध करायला सांगितला. त्या वेळी अर्जुन स्वत:च्या मतावर ठाम न रहाता कर्णाचा वध करतो आणि आध्यात्मिक न्याय करतो.

ई. शिकणे : श्रीकृष्ण अर्जुनाला रणक्षेत्रात गीता सांगत असतांना अर्जुन त्यातून शिकतो आणि युद्धक्षेत्रात समोर असलेल्या आपल्या प्रतिद्वंद्वीकडूनही शिकतो.

उ. आढावा देणे : अर्जुन रणक्षेत्रात मनमोकळेपणाने श्रीकृष्णाला आपल्या मनात चालू असलेले द्वंद्व सांगतो आणि पुढेही त्याला नियमितपणे मनमोकळेपणाने आपली स्थिती सांगतो.

यामुळे साधनेतील पंचसूत्रीचे आचरण करणे, म्हणजेच स्वतःमध्ये ‘अर्जुनभाव’ निर्माण करणे, असेही म्हणता येईल.

३. ‘अर्जुनभाव’ असल्यावरच आपत्काळात जगणे शक्य होईल !

ज्या वेळी तीव्र समष्टी प्रारब्ध आणि अल्प समष्टी क्रियमाण असते, तो काळ म्हणजे आपत्काळ. व्यक्ती साधनेविना स्वतःचे मंद व्यष्टी प्रारब्धही (समष्टी प्रारब्धाचा ०.००००१ अंश) टाळू शकत नाही, तर समष्टी प्रारब्ध टाळणे किंवा त्याची झळ अल्प करणे, हे अशक्यच. केवळ गुरुकृपेने व्यष्टी स्तरावरील मंद आणि मध्यम प्रारब्ध दूर होऊ शकते आणि तीव्र प्रारब्ध भोगण्याची शक्ती मिळते. केवळ गुरूंच्या मार्गदर्शनानुसार समष्टी साधना केल्याने समष्टी स्तरावरील मंद आणि मध्यम प्रारब्ध दूर होऊ शकते अन् तीव्र समष्टी प्रारब्ध भोगण्याची शक्ती मिळते. त्यामुळे आपत्काळात केवळ ‘अर्जुनभाव’ असलेले जीवच गुरूंची शक्ती आणि चैतन्य ग्रहण करून आपत्काळात जगू शकतील.

येणारा आपत्काळ हा समष्टी स्तरावरील आपत्काळ आहे. यासाठीच समष्टी गुरूंच्या (श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्या) माध्यमातून भगवंत साधना करणार्‍या समष्टीला साधनेतील पंचसूत्री, म्हणजे ‘अर्जुनभाव’ शिकवत आहे. त्यामुळे साधकांना आपत्काळाला सामोरे जाणे आणि जगणे शक्य होईल.

३. विशेष भक्तीसत्संगामुळे साधकांकडून योग्य क्रियमाण वापरण्याच्या प्रमाणात वाढ होणे

वर्तमान कलियुगात प्रत्येक जिवाला सरासरी ६५ टक्के प्रारब्ध भोगावे लागते, तर त्याला ३५ टक्के क्रियमाणही वापरता येते. या क्रियमाणाद्वारे, म्हणजेच साधनेद्वारे त्याला ६५ टक्के प्रारब्धाची झळ अल्प करता येते. साधना सोडून जीव करत असलेले इतर क्रियमाणकर्म त्याच्या देवाण-घेवाण हिशोबात, म्हणजेच प्रारब्धात वाढ करते.

असे असले, तरी साधना करणारे काही जीव साधना करतांना स्वतःच्या मनानुसार साधना करणे (वाटेल ती साधना करणे), सांप्रदायिक साधना करणे (साधनेच्या प्रकारात अडकणे), स्वतःला साधक समजणे (इतरांना तुच्छ लेखणे, इतरांचे मत न स्वीकारणे), मनाने गुरु करणे (आवड-नावड यांनुसार साधना करणे) या प्रकारच्या चुका करतात. त्याचे परिणाम असे होतात की, साधकाने साधना करून मिळवलेली थोडी फार शक्ती चुकीच्या क्रियमाणामुळे नष्ट होते आणि त्यामुळे साधकाला ‘अनुभूती येणे, अनिष्ट शक्तींच्या आक्रमणांपासून रक्षण होणे, आध्यात्मिक उन्नती होणे’, अशी ध्येये साध्य करता येत नाहीत. वर्तमानकाळात गुरुकृपायोगानुसार साधना करणारे साधक त्यांच्या क्रियमाणाचा केवळ सरासरी १० टक्के योग्य वापर करत आहेत.

३ अ. साधकांनी वापरलेले क्रियमाण आणि त्यामुळे त्यांना साध्य होणारे ध्येय

३ आ. विशेष भक्तीसत्संगातून शिकवल्या जाणार्‍या साधनेच्या पंचसूत्रीमुळे साधकांकडून सरासरी २० टक्क्यांपर्यंत क्रियमाण वापरले जाऊ शकणे : विशेष भक्तीसत्संगातून साधकांना साधनेची पंचसूत्री, म्हणजेच योग्य क्रियमाण वापरण्याची शिकवण दिली जात आहे. त्यामुळे साधकांचे स्वभावदोष अल्प होत असून त्यांच्यात गुणनिर्मिती होण्यास साहाय्य होत आहे. व्यष्टी स्तरावर काही साधक तळमळीने प्रयत्न करत असून त्यामुळे ते त्यांचे क्रियमाण २५ टक्क्यांपर्यंत वापरतील, तर काही कार्यकर्ते अजूनही काहीच प्रयत्न करत नसल्याने पुढे आपत्काळात त्यांना स्वतःच्या स्वभावदोषांमुळे शिक्षा भोगावी लागेल.

प्रत्यक्ष गुरुतत्त्वच या सत्संगाच्या माध्यमातून साधकांना मार्गदर्शन करत असल्याने सत्संगातील सूत्रांनुसार तळमळीने प्रयत्न करणार्‍या जिवांवर गुरुकृपा होऊन साधकांकडून सरासरी २० टक्क्यांपर्यंत क्रियमाण वापरले जाऊ शकेल. त्यामुळे साधकांना मोठ्या अनिष्ट शक्तींच्या त्रासाशी लढा देणे आणि आध्यात्मिक उन्नती करणे, हे टप्पे साध्य करता येतील.’

(क्रमशः)

– श्री. निषाद देशमुख (सूक्ष्मातून मिळालेले ज्ञान) (आध्यात्मिक पातळी ६३ टक्के), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (ज्ञान मिळण्याचा दिनांक १.८.२०२५ आणि वेळ दुपारी १२.०६)

भाग ३ वाचण्यासाठी क्लिक करा → https://sanatanprabhat.org/marathi/997126.html

• सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे  ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
• सूक्ष्मातील दिसणे, ऐकू येणे इत्यादी (पंच सूक्ष्मज्ञानेंद्रियांनी ज्ञानप्राप्ती होणे) : काही साधकांची अंतर्दृष्टी जागृत होते, म्हणजे त्यांना डोळ्यांना न दिसणारे दिसते, तर काही जणांना सूक्ष्मातील नाद किंवा शब्द ऐकू येतात.
• वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषिमुनींच्या अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच तसेच करणी, भानामती यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत.
आध्यात्मिक त्रास : याचा अर्थ व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने असणे. व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने ५० टक्के किंवा त्यांहून अधिक प्रमाणात असणे, म्हणजे तीव्र त्रास, नकारात्मक स्पंदने ३० ते ४९ टक्के असणे, म्हणजे मध्यम त्रास, तर ३० टक्क्यांहून अल्प असणे, म्हणजे मंद आध्यात्मिक त्रास असणे होय. आध्यात्मिक त्रास हा प्रारब्ध, पूर्वजांचे त्रास आदी आध्यात्मिक स्तरावरील कारणांमुळे होतो. आध्यात्मिक त्रासाचे निदान संत किंवा सूक्ष्म स्पंदने जाणू शकणारे साधक करू शकतात.
• येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक