Sabarimala Temple Theft : तुम्ही देवालाही सोडले नाही !

  • केरळमधील शबरीमला मंदिरातील सोन्याच्या चोरीचे प्रकरण

  • ‘देवस्वम् बोर्डा’चे माजी सदस्य के.पी. शंकर दास यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले

मुख्य आरोपी उन्नीकृष्णन् पोट्टी

थिरुवनंतपूरम् (केरळ) – केरळमधील प्रसिद्ध शबरीमला अय्यप्पा मंदिरातील सोने चोरीच्या प्रकरणात ‘देवस्वम् बोर्डा’चे माजी सदस्य के.पी. शंकर दास यांनी प्रविष्ट (दाखल) केलेली याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली. या प्रकरणात ‘तुम्ही देवालाही सोडले नाही’ अशा कठोर शब्दांत न्यायालयाने त्यांना फटकारले. या प्रकरणात केरळ उच्च न्यायालयाने के.पी. शंकर दास यांच्या विरोधात नोंदवलेली निरीक्षणे वगळण्याची मागणी दास यांनी सर्वोच्च न्यायालयात केली होती; मात्र न्यायमूर्ती दिपांकर दत्ता आणि न्यायमूर्ती सतीश चंद्र शर्मा यांच्या खंडपिठाने ही मागणीही फेटाळून लावली.

शबरीमला मंदिरातील सोन्याच्या वस्तू विद्युत्लेपनासाठी (इलेक्ट्रोप्लेटिंगसाठी, म्हणजे धातूवर विद्युत्प्रवाहाच्या साहाय्याने दुसर्‍या धातूचा थर चढवण्याची प्रक्रिया), तसेच दुरुस्तीसाठी पाठण्यात आल्या असतांना त्यातील सोन्याची चोरी झाल्याचा संशय व्यक्त करण्यात आला होता. हे प्रकरण केरळ उच्च न्यायालयात गेल्यानंतर विशेष अन्वेषण पथकाकडे (‘स्पेशल इन्व्हेस्टीगेशन टीम’ अर्थात् ‘एस्.आय.टी.’कडे) या प्रकरणाचे अन्वेषण सोपवण्यात आले. एस्.आय.टी.च्या अन्वेषणानुसार या वस्तूंमधील सोने चोरी करून ते विकले गेले असण्याची शक्यता आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी उन्नीकृष्णन् पोट्टी याने स्वतःच्या लाभासाठी मंदिरातील सोने चोरल्याचा आरोप आहे.

देव आणि मंदिर यांना तरी हात लावायला नको होता !

याचिका फेटाळतांना सर्वोच्च न्यायालयाने ‘किमान देव आणि मंदिर यांना तरी हात लावायला नको होता’, असे सांगत याचिकाकर्त्याला फटकारले. शबरीमला अय्यप्पा मंदिरातील सोने चोरी प्रकरणात ‘देवस्वम् बोर्डा’चे सदस्य शंकर दास हेही तितकेच उत्तरदायी आहेत’, असेही न्यायालयाने नमूद केले.

न्यायालयाने पुढे स्पष्ट केले की, गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेता उच्च न्यायालयाने दास यांचे वय आणि आरोग्य यांचा विचार करून काही सवलती दिल्या असल्या, तरी खटल्यातून कोणताही दिलासा मिळालेला नाही. सोन्याच्या प्लेट्सची चोरी आणि त्यांत फेरफार करण्यासाठी रचलेल्या गुन्हेगारी कटातून शंकर दास आणि के. विजयकुमार सुटू शकत नाहीत.

अन्वेषण पथकाला दिला अतिरिक्त वेळ !

केरळ उच्च न्यायालयाच्या देवस्वम् खंडपिठाने शबरीमला सोने चोरी प्रकरणाचे अन्वेषण पूर्ण करण्यासाठी एस्.आय.टी.ला अतिरिक्त वेळ दिला आहे. अन्वेषणाच्या अंतरिम प्रगतीचा अहवालाचा आढावा घेत न्यायालयाने ही समयमर्यादा ६ आठवड्यांनी वाढवली. आता एस्.आय.टी. १९ जानेवारीला अंतरिम तपास अहवाल सादर करणार आहे.

आरोपी उन्नीकृष्णन् पोट्टीचे सोनिया गांधी यांच्यासमवेत छायाचित्र

मुख्य आरोपीचे सोनिया गांधी यांच्यासमवेत छायाचित्र !

या प्रकरणातील मुख्य आरोपी उन्नीकृष्णन् पोट्टी आणि गोवर्धन यांचे काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी यांच्याससवेतचे छायाचित्र समोर आल्याने राजकीय वाद निर्माण झाला आहे. भाजपकडून याविषयी प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. भाजपचे केरळचे माजी प्रदेशाध्यक्ष के. सुरेंद्रन् यांनी ‘काँग्रेसने या छायाचित्रामागील सत्य लोकांसमोर मांडावे’, अशी मागणी केली आहे. ‘शबरीमला मंदिरातील सोने चोरीचे प्रकरण साधे नसून त्याचा आंतरराष्ट्रीय तस्करीशीही संबंध असू शकतो’, असा अंदाज त्यांनी व्यक्त केला आहे.

संपादकीय भूमिका

  • मंदिर सरकारीकरणाचे आणखी किती दुष्परिणाम समोर आल्यावर हिंदू जागे होणार आहेत ? १०० कोटी हिंदूंना हे अत्यंत लज्जास्पद !
  • साम्यवादी हे कट्टर हिंदुद्वेषी असल्याने त्यांची राजवट, म्हणजे मोगलांची राजवट आहे ! अशांना निवडणुकीत राजकीय पटलावरून नामशेष करणे, हाच यावरील उपाय आहे !